उमलत्या शरीराची धुम्मस – मुक्ता चैतन्य

शरीराचे सोहळे साजरे करण्यासाठी उत्सुक असणार्‍या तारुण्याच्या लैंगिक वर्तनाबद्दल तरुणांशी बोलण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार का?

”आमचं गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होतं. पहिल्यांदा आम्ही एकत्र आलो तेव्हा मी जरा संकोचले होते. यातून काही गडबड झाली तर ही भीती मला होती. पण त्यानं कॉन्डोम वापरायचं ठरवलं आणि आम्ही एकत्र आलो. सुरुवातीचा संकोच गळून पडला. मग मला ओढच लागली. सतत त्याच्या मिठीत असावं असं वाटायला लागलं. गेल्या तीन वर्षांत आम्ही अनेकदा एकत्र आलो. कसलीही गडबड होऊ दिली नाही. पण आता आमचं लग्न होईल असं दिसत नाही. जात वेगळी आहे आणि घरच्यांच्या विरोधात जायची, पळून जायची माझ्यात धमक नाही. त्यामुळे आमचं प्रेम, आम्ही एकमेकांच्या सहवासात घालवलेले दिवस सारं काही इथेच संपून जाणार. परक्या माणसाशी उद्या लग्न करावं लागणार. मी व्हर्जिन नाही हे त्याला कळलं तर? आणि त्याच्या सहवासात मी मनापासून एकरूप होऊ शकले नाही तर? माझी पुरती गोची झालेली आहे.”
– एमबीएच्या पहिल्या वर्षात शिकणारी शिल्पा सांगते.

तरुण-तरुणींच्या लैंगिक जीवनाचं वास्तव काय आहे हे समजून घेताना असे कितीतरी जण मला भेटले. अनेेक वर्षं भेटत आहेत. तरुणांच्या प्रेमजीवनाविषयी सदर लेखन करायचं म्हणून सुरू झालेला प्रवास आजही चालू आहे. १३ ते २३ या वयोगटातल्या तरुण मुलींच्या भावविश्वातले अनसेन्सॉर्ड अनुभव समजून घेताना, तरुणांच्या प्रेमजीवनाबद्दल, त्यातल्या ताण-तणावांबद्दल, नात्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल जशा नवनवीन गोष्टी समजत होत्या त्याचप्रमाणे तरुणांच्या लैंगिक वर्तनाबद्दल, त्यातल्या कुतूहलापासून घुसमटीपर्यंत अनेक बाबी समोर येत होत्या. त्यातून दोन मूलभूत गैरसमज आपल्या समाजानं अजूनही पोसलेले आहेत असे दिसतं. पहिला म्हणजे विवाहपूर्व लैंगिक संबंध हा निव्वळ पाश्चात्त्य संस्कृतीचा खुळचटपणा आहे. आणि आपल्या घरा-दारात वावरणारी आपली तारुण्यानं मुसमुसलेली पोरं असलं काही करत नाहीत, त्याच्या भानगडीत पडत नाहीत. इतकंच कशाला पण माझ्या कामाचा आणि अभ्यासाचा भाग म्हणून मी जेव्हा पालकांशी याविषयावर बोलते त्यावेळी, हो हल्ली हे सगळं चालतं पण आमची मुलं तसलं काही करणारी नाहीत. असला टिपिकल स्वर ते लावतात. म्हणजे लग्न न झालेल्या तरुण मुला-मुलींचं स्वतंत्र लैंगिक जीवन आहे हे ते मान्य करतात, पण त्यांच्या घरात तसलं काही चालत नाही अशी स्वतःचीच फसवणूक करून स्वतःला दिलासा द्यायला ते विसरत नाहीत. आणि दुसरा मोठ्ठा गैरसमज आपल्या समाजानं पोसलेला आहे तो म्हणजे हे असलं सगळं उच्चंभ्रूंच्या नाहीतर एकदम झोपडपट्टीवाल्यांच्या पोरा-पोरींमध्ये असतं, मध्यमवर्गीय तरुण-तरुणी असलं काही करत नाही. ते त्यांच्या संस्कारात बसत नाही. मध्यमवर्गीय संस्काराची चौकट मोडून शरीराचे सोहळे साजरे करण्यासाठी ते आसुसलेले नसतात.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून या विषयात काम करताना जाणवलं की हे दोन्ही समज नुसतेच फोल, खोटे नाहीत तर आपल्या समाजासाठी अत्यंत धोकादायक आहेत. कारण मुळात दोन्ही गैरसमजुतींमुळे आपण आपल्याच समाजातल्या तरुणाईच्या जगण्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवापासून स्वतःला तोडून टाकतो. त्यामुळे त्या वास्तवाशी संबंधित असणारे समज-गैरसमज, त्यातला ताण, वेदना, असहायता आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. समलिंगी नसूनही समलिंगीसंबंधात अडकून पडलेला विलास हे काही आपल्या समाजातल्या तरुणांमधलं दुर्मिळ उदाहरण नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर असले निसरडे क्षण अनेकांच्या वाट्याला येतात. शरीराची नव्याने होणारी ओळख, त्यातच शरीरात होणारे बदल यामुळे निर्माण होणारी लैंगिक ओढ या सगळ्या गुंतागुंतीत शरीराची ओढ शमवण्याची संधी मिळाली तर ती नाकारली जातेच असं नाही. ही संधी जशी मुलगा-मुलगी यांना मिळते तशीच ती काही वेळा मुलगा-मुलगा आणि मुलगी-मुलगी यांनाही मिळते आणि समलिंगी संबंध निर्माण होतात. जे निसर्गतः समलिंगी असतात ते वगळता इतरांसाठी असे संबंध म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःच्या गरजांसाठी, त्यातल्या थ्रिल करता, उत्सुकतेपोटी केलेले प्रयोग असतात.

मुळात लैंगिकता हा आपल्याकडे न बोलण्याचाच विषय आहे. इतका की अजूनही लग्न झालं की सगळं कळेलच या मुद्द्यावर हा विषय सोडून दिला जातो. ऐन तारुण्यात पर्दापण करणार्‍या मुला-मुलींना त्यांच्या शरीरात होणार्‍या बदलांबद्दल, त्यामुळे त्यांच्या भावनेत आणि मानसिकतेत होणार्‍या बदलांबद्दल कुणीही काहीही सांगत नाही. पाळी आलेल्या मुलींना आजही ‘आता मुलांपासून चार हात लांब’ किंवा ‘असुरक्षित संबंध आले तर पाळी चुकते’ इतकंच सांगितलं जातं. पण स्वतःच्या बदलणार्‍या शरीराची ओळख, त्या शरीराचा सन्मान, आपल्याच शरीराशी मैत्री, बदलत्या शरीराबरोबर मनात म्हणजे भावनांमध्ये होणारे बदल, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, स्पर्शाची ओढ याविषयी सांगण्याची तसदी कुणीही घेत नाही. असुरक्षित संबंध म्हणजे नेमकं काय हेही अनेकांना माहीत नसतं. इतकं सगळं अज्ञान घेऊन भावनेच्या आवेगात अनेकांमध्ये संबंध घडतात.

कॉलेजमध्ये गेल्यानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असलाच पाहिजे असा अलिखित नियम बनला आहे. प्रेमसंबंध असतील तर शारीरिक जवळीक असलीच पाहिजे असाही नियम आहे. जितके दिवस प्रेमप्रकरण चालतं त्यात स्कोअर किती होता याचे अपडेट्स मित्रमैत्रिणींना द्यावे लागतात, त्याचं पिअर प्रेशर अनेकदा असतं. त्यामुळे लैंगिक नात्याचा आनंद, एकमेकांच्या सहवासातील सुख, लैंगिक जीवनातील जबाबदारी आदी गोष्टींचा मिसरूड फुटण्याच्या वयात काहीही संबंध नसतो. इथे असतो तो सगळा घिसाडघाईचा मामला. मुळातच लैंगिक जीवनात आनंद घेणं आणि देणं या दोन मूलभूत गोष्टींचा समावेश असतो, त्यात ‘वर्तन जबाबदारी’ असते याची जाणीव तरुण वयात असतेच असं नाही. कारण त्याबद्दल या मुलांशी कुणीही काहीही बोलत नाही. लैंगिक वर्तनातल्या नाजूक पैलूंची ओळख करून देत नाही. जबाबदारीची जाणीव करून देत नाही. मग काय, असलेल्या-नसलेल्या अर्धवट माहितीच्या बळावर गोष्टी घडतात.
तरुणाईबरोबर काम करताना अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लैंगिकतेबद्दलचं शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र नीटसं माहीत नसलं तरी पोर्नोग्राफिक साईटस्ने लैंगिक वर्तनाच्या भलत्याच बाजूबद्दलचं ज्ञान वाढवलं आहे. तरुण आणि तरुणी या दोघांच्याही आयुष्यात पोर्नोग्राफिक साईटस्चा शिरकाव आहे. तरुणांच्या लैंगिक वर्तनावर त्याचा प्रभाव अधिक आहे, पण तरुणी तसल्या साईटस् बघतच नाहीत असं काही उरलेलं नाही. त्यामुळे तिथे जे काही दाखवलं जातं, त्यातल्या गोष्टी करून बघण्याच्या नादातही अनेकदा सुरक्षित किंवा असुरक्षित लैंगिक संबंध घडतात.
आपल्या समाजातल्या तरुण-तरुणींच्या लैंगिक गरजा, स्वतःच्या लैंगिकतेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन झपाट्याने बदलतो आहे हे आपण समजून घेणं अत्यावश्यक आहे. जोवर या गोष्टी समजून घेऊन समाज म्हणून आपण मान्य करीत नाही तोवर बदललेल्या लैंगिक वर्तनातून निर्माण होणारे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीत. आज अधिकृत सर्वेक्षणं आणि आकडेवारी असे सांगते की फक्त महाराष्ट्रातील ३० टक्के तरुण आणि २४ टक्के तरुणी प्रेमाच्या नातेसंबंधांमध्ये गुंतून लैंगिक संबंधांच्या भावनिक-शारीरिक टप्प्यांपर्यंत जातात. लैंगिक संबंधाच्या अंतिम टप्प्यापर्यंत न जाता वारंवार शारीरिक जवळीक साधणार्‍यांचं प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत आहे तर १६ टक्के तरुण विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य करतात. पण हे सारं करताना सुरक्षित संबंध, गरोदरपणा आणि एचआयव्हीसह लैंगिक आजाराची माहिती आणि त्यातला धोका याविषयी मात्र बरेचजण अनभिज्ञ असतात. इतकंच काय पण या सर्वेक्षणात असंही दिसून आलं आहे की पहिल्याच शरीरसंबंधात ती तरुणी गरोदर राहू शकते ही इतकी साधी माहितीही ५० टक्के पुरुषांना आणि ४६ टक्के स्त्रियांना नसते. एचआयव्ही या आजारापलीकडे इतर लैंगिक आजारांविषयीची जेमतेम २२ टक्के तरुणांनी ऐकलेलं आहे. मुलींमध्ये हे प्रमाण तर केवळ १५ टक्के इतकेच आहे. ९० टक्के तरुणांनी कंडोम वापराविषयी आणि गर्भनिरोधक उपायांविषयी ऐकलेले आहे. जेमतेम ४१ टक्के तरुणींच्या कानावरून ही माहिती गेली आहे. लैंगिक संबंधांबद्दल, त्यातल्या जबाबदारीबद्दल ७६ टक्के तरुणांना मित्रच काहीबाही शिकवतात तर ६० टक्के तरुण सांगतात की टीव्ही आणि इतर माध्यमातून ते ही माहिती चोरून मिळवतात. ३१ टक्के तरुण तर सर्रास पोर्नोग्राफिक साईट्सचीच मदत घेतात असंही हे सर्वेक्षण अधोरेखित करते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरुणाईतल्या ५० टक्के तरुणाईच्या मते लैंगिक शिक्षण दिलं गेलंच पाहिजे आणि पालकांपेक्षा शिक्षक अधिक योग्य पद्धतीने या विषयावर मुला-मुलींशी संवाद साधू शकतात. पण दुर्दैवाने आपल्याकडे तो अजूनही न बोलण्याचाच विषय आहे.

तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांना भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण नाही वाटणार तर कुणाचं वाटणार? पण त्या आकर्षणाबद्दल, त्यापोठापाठ येणार्‍या नात्यांबद्दल, अफेअर्सच्या नावाखाली होणार्‍या शरीरसंबंधांबद्दल बोलण्याचं टाळून कसं चालेल? महाविद्यालयीन बॉइज आणि गर्लस् हॉस्टेलमधून होणार्‍या दारू पार्ट्या आणि ग्रुप सेक्सचे प्रयोग हे वास्तव आहे, ज्याकडे डोळेझाक करणं समाज म्हणून फार धोकायदायक असू शकतं.

मुळात या सगळ्या गोष्टी अचानक, हल्लीच्या पिढीतच घडायला लागल्या आहेत आणि पूर्वी असलं काही नव्हतं असं मानण्याचेही दिवस आता उरलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी जितक्या आज आहेत, तितक्याच त्या पूर्वीही होत्या. फरक इतकाच आहे, की आज त्याबद्दल उघडपणे बोललं जातंय, समस्या आहेत हे मान्य करा, तरुणाईचं लैंगिक वर्तन बदललेलं आहे असं सांगितलं जातंय; पूर्वी या विषयावर अगदीच अळीमिळी गुपचिळी असायची. योनीशुचितेच्या कल्पना झपाट्याने बदलल्या आहेत. तसं बघायला गेलं तर तरुणाईचं लैंगिक वर्तन हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि विविधस्तरीय विषय बनलेला आहे. मग तो शहरी भागातला तरुण असो वा ग्रामीण भागातला. नैतिकतेच्या तराजूत या सगळ्याला तोलण्यापेक्षा आणि लग्नाचं वय वाढलेलं असताना, लिव्ह इन रिलेशनशिप हा सरसकट पर्याय अजूनही नसताना, प्रेमात असणार्‍या तरुणाईचे लैंगिक संबंध निर्माण होणार हे स्वाभाविक वास्तव आहे.
ते स्वीकारलेलंच बरं.

कारण जितक्या मोकळेपणानं आपण त्याचा स्वीकार करू, तितकीच या विषयाकडे बघण्याची सजग दृष्टी आपण आपल्या समाजातल्या तारुण्याला देऊ शकू. त्यातले धोके, निसरड्या वाटा समजावून सांगू शकू.

वाढत्या शरीरातून उफाळून येणार्‍या इच्छा, गरजा, त्यातून होणारे लैंगिक संबंध आणि लैंगिक वर्तन म्हणजे निव्वळ शय्यासोबत नाही; हा त्यापलीकडे अधिक गंभीरपणे हाताळण्याचा विषय आहे. हेही समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे.
—-

(मूळ लेखाचा हा संपादित भाग ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकातून साभार. संपूर्ण लेखाची लिंक पुढीलप्रमाणे http://www.miloonsaryajani.com/node/979)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap