काही काही पुस्तके अशी असतात की सामान्य वाचकांपेक्षा अभ्यासकांमध्ये ती अधिक प्रिय होतात. वर्तमान कालगणनेच्या आगे मागे एक शतक या कालखंडात रचलेला मराठीतील आद्य ग्रंथ समजला जाणारा ‘गाहा सत्तसई ‘ अर्थात गाथा सप्तशती हा या प्रकारात मोडतो. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर राजा हाल (म्ह सतरावा शालिवाहन) याने सामान्य जनतेची कवने गाथेत संग्रहित केली. तत्कालीन म्ह आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी पंडिती काव्य न घेता जनतेचे काव्य ग्रथित करणे हे अलौकिक होते. दुसरे म्ह या गाथेतील भाषा महाराष्ट्री प्राकृत म्हटली जाते. आपण आज जी मराठी बोलतो लिहितो त्या मायबोलीची महाराष्ट्री प्राकृत ही जन्मदात्री म्हटली पाहिजे. आता हे ओघाने आलेच की हे काव्य थेट सरळ त्या वेळच्या जीवनाला भिडणारे असल्याने आज रांगडे वाटले तरी रसरशीत आहे. गाहेची हस्तलिखिते देशाच्या विविध भागात आढळतात. तसेच तिच्यावर अनेक (स्पष्टीकरणात्मक) टीका ही लिहिल्या गेल्या आहेत. अशा वैशिष्ट्यांमुळे गाथेला ऐतिहासिक, साहित्यिक, सामाजिक आणि भाषाशास्त्रीय मोल लाभले आहे.
राजसत्तेने वैदिक परंपरे ऐवजी बौद्ध व जैन यासारख्या धारणांचा अवलंब केल्यावर सम्राट अशोकापासून प्राकृत वा बोली भाषांना राजाश्रय मिळू लागला. विंध्याच्या दक्षिणेकडील भागात वैदिक संस्कृतीचा प्रभाव मुळात कमी असल्याने महाराष्ट्रात प्राकृताला मान्यता सहज लाभली. हाल राजाने ही लोक कवने ग्रथित केली ही एक गोष्ट या मान्यतेची साक्ष देण्यास पुरेशी आहे. लोकांच्या भाषेतील त्यांच्या अनुभवांचे अस्सल चित्रण आपल्याला या गाथेत पाहावयास मिळते. गाहेतल्या दुसऱ्याच पदात म्हटले आहे की “लाजिरवाणे आहे जिणे त्यांचे, जे प्राकृतातले अमृताच्या तोडीचे काव्य न वाचता-ऐकता नुसते कामशास्त्रावरील ग्रंथ धुंडाळत बसतात”, संस्कृत पंडितांच्या प्राकृतबद्दलच्या दृष्टिकोनाकडे हा निर्देश आहे. मिश्र समाजात भाषा हे राजकारणाचे साधन असल्याने हाल राजाने पुढाकार घेऊन या ग्रंथाची निर्मिती केली त्यामागे पंडिती वर्चस्वाला धक्का देण्याचा उद्देश असावा, हे स्पष्ट आहे.
१८७० मध्ये जर्मन विद्वान वेबर यांनी गाहेचे जर्मन भाषांतर प्रसिद्ध केले. वि ना मंडलिक व डॉ रा गो भांडारकर या महाराष्ट्रीय विद्वानांनी गाहेचे स्वरूप विशद करणारे अभ्यासपूर्ण निबंध त्याच सुमारास लिहून हा आद्य ग्रंथ अभ्यासकांपुढे आणला. त्यानंतर स आ जोगळेकरांनी सव्वा चारशे पानांचा विवेचक ग्रंथ आणि सर्व गाथांचा मराठी अर्थ व स्पष्टीकरण देणारा ग्रंथराज १९५६ मध्ये प्रकाशित केला. त्यानंतरही गाहा सत्तसई वर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत आहेत. गाहा मधील रचनांवर आधारित संगीतनृत्याचा कार्यक्रम लक्ष्मीकांत धोंड यांच्या पुढाकाराने आजही सादर होत आहे. इंग्रजीमध्ये गाहेवर देशी-विदेशी अभ्यासकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नात तिचे प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी गाहेचा दाखला दिला जात आहे.
जोगळेकरांनी त्यांच्या ग्रंथात गाहेमध्ये चित्रित झालेल्या लैंगिक जीवनावर ६७ पानांचे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आणि त्यात वेदना व संवेदना, संकेत व संकेतस्थळे, व्यभिचार, वेश्या, स्त्रीसौंदर्य, प्रसाधन व संभोग या गाहेमध्ये आलेल्या विषयांचा ऊहापोह केला. अर्थात हे करताना त्यांनी कामशास्त्रावरील उपलब्ध ग्रंथामध्ये त्या त्या विषयावर काय लिहिले आहे याच्याशी गाहांमधले आशय ताडून पाहण्याचा प्रयत्न केला. खरे तर गाहाचा असा तौलनिक अभ्यास करण्याची गरज नाही. कारण सामान्यतः – आणि विशेषेकरून लैंगिक बाबतीत – लोक व्यवहार हा शास्त्राचे बोट धरून चालत नाही. तर तो सामान्य ज्ञान, अनुभव आणि प्रयोगशीलता यामधून पुढे जात असतो. लोकव्यवहाराची सार्थता शास्त्राने ठरत नसून उलट शास्त्र हे व्यवहाराच्या परिशीलनावर आधारित असावे लागते. तरच त्या शास्त्राला प्रामाण्य लाभते. म्हणून ‘’गाहा “ ही कामशास्त्रावरील ग्रंथांच्या सूत्रांचे उदाहरण म्हणून न पाहता लोकव्यवहाराचे चित्रण म्हणून पाहिली तर उपयुक्त ठरेल. जोगळेकरांच्या उहापोहावरून ग्रंथप्रामाण्य मानणारी ज्ञानपरंपरा आणि तिचा प्रभाव हा आपल्याला आजतागायत दिसून येतो. पण तो विषय तिथेच सोडून देऊ आणि गाहेकडे वळू.
वयात आलेली मुले-मुली एकमेकांकडे आकर्षित होत असताना प्रथम नजरभेटी होतात. प्रिय व्यक्तीला तर इशारा कळला पाहिजे, पण वडीलधाऱ्यांना पत्ता लागता कामा नये, याची काळजी ते घेत असतात. गाहेमध्ये आर्या वृत्तातील रचना आहेत. त्यात संवाद वा स्वगत या रूपात भाव व्यक्त केले आहेत. प्रतिमा, रूपके इ ग्रामीण बाजाची आहेत. ही क्र 220-221 ची रचना पहा – (सर्व उद्धरणे जोगळेकरांच्या अनुवादावर आधारित )
“पोरा, तू गेलास तेव्हा कुंपणाच्या एकेका छिद्रातून तिने चंचल दृष्टीने तुझ्याकडे पाहिले, जणू पिंजऱ्यातले पाखरूच ते, कुंपणाला छाती भिडवून नि रग लागेपर्यंत चौड्यावर उभे राहून तू दिसावास म्हणून तिने धडपड केली, पण व्यर्थ! मग तिने करावे काय ?”(220)
काही जणी धीटपणे लक्ष ठेवायला जातात अन पकडल्या जातात.
“मुली, उंच कलशावर पूजेचे कमळ ठेवावे, त्याप्रमाणे उभार उरोजावर मुख ठेवून दारात उभ्याने कुणाची वाट पाहत आहेस?” (256)
अर्थात पोरेदेखील पोरींच्या मागावर असतात. त्यांची नजर भिरभिरत असते.
“कुंपणाच्या छिद्रातून डोकावणारी एरंडाची मोठाली पाने तिथून जाणाऱ्या तरुणांना हे जाहीर करतात की शेतकऱ्याची पुष्ट स्तन असलेली तरुण पत्नी येथे राहते . “(२५७)
पौगंडावस्थेतले शारीरिक आकर्षण येथे व्यक्त होत आहे.
“ हत्तीच्या छाव्याच्या गंडस्थळासारखे मोठे, भरदार, उंच नि मध्ये अंतर नसलेले असे स्तन असल्यामुळे तिला धड श्वासही नीट घेता येत नाही, मग झपाझप चालावे तरी कसे तिने? “ (258)
मुलींची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी असते. “जगाला पराचा कावळा करण्याची मेली खोडच असते, प्रियकर गावातल्या गावात आहे, पण नजर वर करून त्याच्याकडे बघण्याची चोरी, कारण लोक काय म्हणतील?” (501)
“इतर तरुणींच्या मत्सराचे कारण, सौंदर्याचे घट आणि मदनरुपी हत्तीचे गंडस्थळच जणू असलेली तुझी वक्षस्थळे शंभर जण आपल्या हृदयात धारण करतात, तर तुला का त्यांचा भार व्हावा?” असा मार्मिक चावट शेरा तरुणी एकमेकींमध्ये मारताना गाहेमध्ये दिसतात. (260)
इथल्या तरुणांमध्ये काही चतुर आहेत. ते सूक्ष्मपणे मुलींचे हावभाव निरखत असतात. “तू तिच्या आईवडलांच्या समोरून गेलास तेव्हा तिने काहीच दर्शविले नाही असे म्हणतोस? अरे, तिने डोळे मिटताच तिच्या पापणीवर तरळणारा अश्रू टपकन ओघळला”. (367)
आपल्या शरीराला मोकळेपणे स्वीकारणे हे आज धीट वाटेल, पण हा धीटपणा एका मुलीच्या स्वगतात कसा व्यक्त होतो ते पाहण्यासारखे आहे :
“नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीनुसार विस्तारत का नाही ?तसे झाला असता तर वडीलमाणसांच्या समोर संकोचलेली असताना मुद्दाम दुरून जाणाऱ्या प्रियकराला चुकून का होईना स्पर्श करता आला असता ! (393)
थोडे बळ एकवटून ती मामीला सांगते की “ मामी, मी नदीत नाहात होते. तो खालच्या प्रवाहात उभा होता. माझ्या अंगावरील हळदीने कडू झालेल्या पाण्याचा घोट घेऊन त्याने जणू माझ्या हृदयाचा घोट घेतला.” (246)
पावसाळ्यातली काळोखी रात्र ही चोरून भेटण्यासाठीची अनुकूल वेळ . जाऊ की नको या विचारात असलेल्या मुलाला मित्र सांगतात की विचार करण्यात संधी दवडून बसशील आणि मुलीला बजावले जाते की न जाणो त्याचा प्रेमाचा आवेग विरून गेला तर! पण बिनबोभाट आणि मनसोक्त भेटता येईल की नाही, ही शंका तरी मनात राहतेच. त्यापेक्षा “ डोंगरगावात राहणाऱ्या लोकांचे चांगले आहे. दाट झाडी आणि बांबूची गच्च बेटे तिथे असल्याने ते नि:शंकपणे कामक्रीडा करू शकतात.” (635)
सुंदर मुलीला तिची सखी चिडवते,” चोरून भेटायचेच असेल प्रियकराला, तर काळोख्या रात्री नको जाऊस गं बाई! तुझा मुखडा दिव्याच्या ज्योतीसारखा काळोखाला उजळून टाकील ना वेडे!” (415)
कधी ती उशीरा येते. तो झोपल्याचे सोंग करतो. ती त्याचे चुंबन घेते आणि म्हणते ,” तू झोपेचे सोंग घेऊन डोळे मिटून पडला आहेस. मला शेजारी जागा दे, तुझ्या गालाचे चुंबन घेतले तेव्हा तुझे अंग रोमांचित झालेले मी पाहिले आहे. ढोंगी कुठला ! पुन्हा नाही उशीर करणार! “ (20)
मग भेट होऊन परतल्यावर तीच आश्चर्य करू लागते की खरंच आपण हे धाडस केलं तरी कसं? “ स्त्रियांच्या ठिकाणी सहसा न दिसणारं माझं साहस आणि त्याचं सद्भाग्य हे फक्त जाणो तो गोदावरीचा पूर आणि ती काळोखी रात्र ! (231)
प्रथम एक दुर्मिळ प्रसंग पाहू. जिचा पती तिच्या शब्दात आहे, तिला ‘स्वाधीनभर्तृका” म्हणतात. ती सांगतेय, “ मी त्यांना एक चापट मारली तर माझ्या हाताला कोण झिणझिण्या आल्या! तेव्हा माझा दुखरा हात हातात घेऊन ते त्यावर फुंकर घालू लागले. मग मी दुसरा हात त्यांच्या गळ्यात घातला.” (86) एकाच वेळी आपले, नवऱ्याचे आणि भाग्याचे हे कौतुक विरळाच म्हटले पाहिजे.
मिलनानंतर तो परत फिरकलाच नाही, म्हणून तिची सखी त्या भटक्या प्रियकराला सांगतेय ,” तू तिच्या गालावर दंतव्रणांची माळ रेखलीस. आपल्याकडे ही तू दिलेली ठेव आहे असे समजून तिच्याभवती रोमांचांचे कुंपण उभे करून ती त्यांचे रक्षण करीत आहे.” (96) तिला निराश करू नकोस असे सखी सुचवीत आहे.
कामामुळे प्रवासात असलेल्या पतीची वाट पाहून कोमेजलेली पत्नी सांगतेय, “ मदनाचे स्वागत करण्यासाठी म्हणून मी आंब्याच्या कोवळ्या पालवीचे दर्शन घेतले, मद्यही चाखले आणि पर्वतावरून येणारी वाऱ्याची मंद झुळूकही अंगावर घेतली, पण त्यांना कामाची फिकीर पडलेली. मग कोण कुणाचे प्रियजन उरतात?” (97) थोडक्यात रोमँटिक मूडच्या चिंध्या झाल्या.
दिराबरोबर रममाण झालेली नंतर त्याने तोंड फिरवल्यावर त्याला धिक्कारते तीअशी,” भावजी, खरे सांगा, तोंड चाटण्यात तरबेज असलेला कुत्रा काम संपताच तोंड फिरवतो, हे त्याला कुणी शिकवले?” (688)
विरह आणि प्रतीक्षा हा प्रेमसंबंधातला अविभाज्य घटक . “तुझी वाट पाहत ती दरवाजात उभी आहे. तिच्या दृष्टिक्षेपांनी रस्त्यावर नीलकमलांची पायघडी अंथरली आहे आणि दरवाजाच्या चौकटीला टेकून उभी असल्याने तिची वक्षस्थळे जणू मंगलकलश झाले आहेत. “ (140)
गाहा सत्तसईचे एकूण बहुविध मूल्य लक्षात घेण्यासाठी जोगळेकरांचे खालील मत पाहू या:
“ (गाहा सत्तसईत) समाजाचे अंतर्याम प्रकट झालेले आहे आणि तेही अकृत्रिमपणे. येथील भावना उत्स्फूर्त आहेत आणि ऐहिकही आहेत. म्हणूनच म्हटले आहे की हे भारताचे आद्य लौकिक लोकसाहित्य आहे. …….बहुजनसमाजाच्या जीवनाशी एकरूप असे लोकवाङ्मय आहे”
जोगळेकरांनी आपला ग्रंथ प्रसिद्ध केला त्या विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात त्यांना अश्लीलताविरोधी कायद्याची दखल घेणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी गाहा सत्तसई हा अश्लील ग्रंथ आहे काय या प्रश्नाचे उत्तर सविस्तर दिलेले आहे. शिष्टसाहित्य आणि लोकसाहित्य असा फरक करून ते म्हणतात की लोकसाहित्यातील (तथाकथित) अश्लीलता हा “केवळ ग्राम्य विनोदबुद्धीचा आविष्कार” असतो, त्यात “लैंगिक आवाहन” नसते, त्यामुळे तिचा परिपाक “चित्ताच्या कलुषिततेत” किंवा “लैंगिक क्षुब्धतेत” होत नाही. शेवटी ते असा आशावाद प्रकट करतात की ‘लोकसाहित्यविषयीची आपली सहानुभूती वृद्धिंगत होईल आणि बहुजनसमाजाच्या अंतर्यामाचा आपल्याला ठाव लागेल, तेव्हा एकही गाथा अश्लील आहे असे म्हणण्याचे साहस कोणालाही होणार नाही”.
चित्र व संंदर्भ साभार : गाथा सप्तशती – स आ जोगळेकर
No Responses