valentine special : इश्क आणि शहराची तीन पायांची शर्यत

‘दिल्ली में महफूज जगह की तलाश दो ही तरह के लोग करते हैं, जिन्हें प्रेम करना है और जिन्हें प्रेम करते हुए लोगों को देखना है. घबराहट में दोनों इतनी तेजी से उठे कि पास की झाड़ियों में भी हलचल मच गई. प्रेमियों को लगा कि पुलिस आ गई है. उसका कहा याद रहा – यह कैसा शहर है? हर वक्त शरीर का पीछा करता रहता है.’

“इश्क में शहर होना” हे रवीश कुमारच्या नाटकाचं गमतीशीर नाव वाचल्यापासून हे नाटक पुण्यात कसं बघायचं हा प्रश्न पडला होता. कोल्हापूरच्या सर्जनशाळेच्या संचाने पुण्यात याचे प्रयोग करायचे घोषित केल्यावर काहीतरी करून एक प्रयोग गाठला. हा प्रयोग न चुकवल्याचा आनंद झाला.

स्थित्यंतर आणि स्थलांतर या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी अटळ आहेत. माणसाचं एखाद्या शहरात स्थलांतर अनेक कारणाने होतं पण शहारानुरुप सवयी, अपेक्षा, दर्जा, वेग अशा बाबींत स्थित्यंतर होणं ही तुलनेनं हळू घडणारी प्रक्रिया आहे. या स्थित्यंतराच्या काळातच, माणूस अनेकदा ऐन जवानीत असतो आणि त्यामुळे त्याचं होणारं शारीर आणि मानसिक स्थित्यंतरसुद्धा एकाच वेळी घडत असल्याने हे दोन पेड असे थेट वेगळे करता येत नाहीत.

हे नाटक हाच दुवा नेमका पकडत. पटण्यासारखा शहरातून एकदम दिल्लीसारख्या बहुआयामी शहरात आल्यावर एका तरुणाचा प्रवास आपल्याला इथे दिसतोच. खरंतर त्या तरुणाचा असा प्रवास न दिसता एकूणच अशा तरुणांच्या अनेक छोट्या छोट्या कथांच्या धाग्याने तो आपल्यापुढे उभा रहातो.

या कथा तरुणांच्या बदलत्या शारीर आणि मानसिक गरजांबद्दल सहज पण ठाम भाष्य करतात. शहरांमध्ये सर्वात जास्त संकोच कशाचा होत असेल तर तो वेळ आणि जागेचा. तारुण्यातील प्रेमविव्हल जोडप्यांना सर्वाधिक गरज नेमक्या याच दोन बाबींची असते. जो काही उपलब्ध वेळ असेल त्यात एकमेकांच्या डोळ्यांत बुडून जाण्यापासून ते मनसोक्त चुंबन घेण्यापर्यंत अनेक प्रकारची आराधना करण्याची निकड भासत असताना जागेची टंचाई आड येऊ लागते. टोलेजंग इमारती, मोठाली मैदाने, मोठमोठ्या जत्रा इत्यादींसाठी मुबलक जागा असताना जोडप्यांना या गरजांसाठी शहरं ना अवकाश देतात ना खाजगीपण. मग जेव्हा या जोडप्यांना उघड अभिव्यक्त होण्यापासून रोखलं जातं ते अर्थातच लपून करण्यासाठी अंधार शोधू लागतात. या नाटकात असे अनेक प्रकारचे अंधारही आपल्याला दिसतात. बसमधील मागल्या सीटपासून, रिक्षाचे पडदे बंद करून केलेल्या मजेपासून ते बागांमध्ये झाडांमागे होणाऱ्या शृंगारापासून ते अण्णांच्या आंदोलनाच्या गर्दीचा फायदा घेत होणाऱ्या भेटींपर्यंत या मनोकायिक खेळाचे कंगोरे प्रेक्षक बघत जातो.

तरुण जोडप्यांसाठी प्रेम असणं हे अनेकदा पुरेसं नसतं. ते व्यक्त करण्यासाठी शब्दासारख्या कृत्रिम माध्यामापेक्षा शारीरिक जवळीक साधून प्रेम व्यक्त करण्याचे थेट शस्त्र उपलब्ध असते. एकमेकांना कवेत घेणे, एकमेकांच्या केसांशी निर्हेतुक चाळे करणे इथपासून ते चुंबन घेणे वगैरे सोपस्कारांपर्यंत अनेक मार्गाने हे प्रेम व्यक्त केले जाते हे आपण सगळे जाणतो. या नाटकात यातील बहुतांश बाबी दाखवल्या असल्या तरी नाटकाचा तोल ढळत नाही. दोन व्यक्तींमध्ये असणारं आकर्षण आणि त्याचं शारीरिक पर्यवसान या बाबी अत्यंत सामान्य आहेत आणि त्या तशाच नाटकात येतात.

बाकी शहर दिल्ली असो वा मुंबई किंवा पुणे, अशा काही जागा असतात ज्या या प्रेमवीरांच्या लाडक्या असतात. पण तिथूनही त्यांना हटकले किंवा हाकलले जाते. इतक्या मोठ्या शहरांत परस्परसंमतीने शांतपणे चार खाजगी घटका काढता येऊ नयेत हेच मुळात आपल्या समाजाच्या कोत्या आणि अनारोग्यपुर्ण  वागण्याचं दर्शन आपल्याला या नाटकात दिसतं.

मूळात public display of affection अर्थात प्रेमाचा सार्वजनिक आविष्कार याला हरेक समाजात काही बंधने असतात हे मान्य. पण ती बंधने किती असावीत, प्रेमिकांनी सहज मारलेली मिठी, हलकेच घेतलेले चुंबन यांनी बाकी समाजाला काय फरक पडतो? या मर्यादा समाजाने मोठ्या मनाने थोड्या शिथिल करायची वेळ आली आहे का? (खरंतर केव्हापासून ती बंधने झुगाराली जातही आहेत पण त्याला अजूनही सामाजिक स्वीकार का असू नये?) असेही प्रश्न पडतात. खरंतर अशाप्रकारे सहज प्रेम व्यक्त झाल्याने समाजात दिसणारी विकृती कमी होत जाते आणि प्रेम ही चावट, लपून छपून  करण्याची विकृत गोष्ट न रहाता एक कविता बनते.

तर असो. या नाटकात या सगळ्या “नॅनो प्रेमकथांना” साजेसा अवकाश, मध्ये सुयोग्य वेळ देत प्रेक्षकांपुढे ज्याप्रकाराची पात्रांची बसायची रचना, नेपथ्य वापरुन हे नाटक येते त्यामुळे या सगळ्या सुट्या धाग्यांचा, ठिगळांचा नुसता संचय न होता त्याला छान गोधडीचे रूप येते.

एकुणात केवळ इश्कातच नव्हे तर रोजच्या जगण्यात मुरलेले शहर दाखवण्यात नाटक यशस्वी झाले आहे. आणखी प्रयोग कधी होतील, कुठे होतील कल्पना नाही. पण झाल्यास नक्की बघा अशी शिफारस!

-ऋषिकेश

rushimaster@gmail.com

———————–

नाटकाच्या विचारणेसाठी खालील क्रमांकावर संंपर्क करावा.

सत्पाल – 9921785563, जयदीप – 7028191009

https://www.facebook.com/sarjanshala.kolhapur/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap