लज्जागौरी  – लैंगिकता आणि संस्कृती ७

आपल्या समाजात पुरुषाचे जननेंद्रिय व स्त्रीचा योनिमार्ग यांचा सभ्य भाषेत दैनंदिन व्यवहारात उल्लेख, उच्चार व चित्रांकन होत नाही. शिवराळ भाषेत त्यांचा वापर वेगवेगळ्या तऱ्हेने अवमान, अपमान व मानसिक हिंसाचारासाठी केला जातो. त्यांना ‘गुह्य’ इंद्रिये असे म्हटले जाते. गुह्य म्हणजे झाकून ठेवण्याचे. झाकून का ठेवायचे तर एक कारण त्यांना इजा होऊ नये आणि दुसरे म्हणजे त्यांचा वापर नुसता खाजगी नव्हे तर अत्यंत निकटच्या शरीरसंबंधासाठी करायचा. समाजाचे संख्याबळ स्थिर राखण्यासाठी आणि वंश चालू ठेवण्यासाठी इतिहासकाळापासून प्रजनन म्हणजे मुले जन्माला घालणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली गेलेली आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेत कामी येणारे शरीर अवयव यांना त्यामुळे वेगळे स्थान मिळाले आहे. परंतु महत्त्व जाणले गेले असले तरी या अवयवांना “झाकून” ठेवण्याचा, उच्चार, उल्लेख व चित्रांकन टाळण्याचा प्रघात हा इतिहासाच्या एका टप्प्यावर सुरु झाला असावा. म्हणजे एक कालखंड असा होता की त्या काळात हे अवयव लोकांच्या संभाषणासाठी “उघड” होते.

ऋग्वेदातील १०.८६ या सूक्तात इंद्र, इंद्राणी हे इंद्राचा सहचर वृषाकपी याच्या संबंधी बोलत आहेत. हे सूक्त कर्मकांडाविषयी नसून काही घटनांबद्दल असल्याने त्याला एक ऐतिहासिक मूल्य आहे. इंद्र हा देवांचा अधिपती व इंद्राणी त्याची पत्नी. देव ही संज्ञा एका विशिष्ट लोकसमूहाची निर्देशक आहे. वृषाकपी हा इंद्राच्या दासांचा प्रमुख आहे. तो व हे दास आदिवासी जमातीपैकी असावेत. वृषाकपी हा इंद्राच्या खास मर्जीतला कारण तो उत्तम सोमाचे मद्य बनवितो आणि गोमांसही चांगले खायला घालतो. पण त्याची नजर, येजा, हातवारे हे इंद्राणीला छेडछाडवजा वाटतात. ती इंद्राकडे याबद्दल तक्रार करते.  मात्र इंद्र ते काही मनावर घेत नाही. हे संभाषण होत असताना इंद्राणीचा पारा चढतो. तशी इंद्र तिला बजावतो की शेवटी मी पुरुष असल्याने तुला माझे ऐकावे लागेल. त्यावर इंद्राणी फणकारते की मीपण स्त्री आहे, माझ्याशिवाय तू खुळखुळा आहेस. मग इंद्र वृषाकपीला गोमांसाच्या मेजवानीची तयारी करण्यासाठी घरी पिटाळतो. या सर्व प्रसंगात इंद्राणी इतकी संतापलेली असते की वृषाकपीचा कायमचा काटा काढण्यासाठी कोणते मार्ग अवलंबावे हेही ती इंद्राला सांगते. इंद्र जेव्हा इंद्राणीवर आपले पुरुषत्व गाजवण्याचा शाब्दिक प्रयत्न करतो, तेव्हा तो पुरुषाचे लिंग व स्त्रीची योनी यांच्या संभोग प्रसंगातील स्थितीचा दाखला देतो. पण इंद्राणी देखील तोडीस तोड ठरते आणि तोच दाखला त्याच अवयवांचा उल्लेख करीत त्याच्यावर उलटवते.

या सूक्ताच्या सुरवातीला इंद्राणी विनासंकोच स्वत:च्या आकर्षक अवयवांचे वर्णन करते आणि माझी छेड काढण्याची या (वृषाकपी) अधमाची हिंमत होते कशी असेही विचारते. तिचा रोख असा आहे की माझ्यासारखी आकर्षक नारी कोणाही पुरुषाला आपल्या ताब्यात सहज ठेवू शकते. त्यामुळे कुणी माझ्या वाटेला जाता कामा नये.

या सूक्तातील १६, १७ व १८ या ऋचांचे भाषांतर ही अभ्यासकांसाठी एक डोकेदुखी ठरली.  ऋग्वेदाचे एकोणिसाव्या शतकात इंग्रजीत भाषांतर करणारे ग्रिफिथ हे एरवी अशा उघड्या वागड्या वर्णनाचे भाषांतर करताना इंग्रजीऐवजी लॅटिनचा वापर करीत. पण या सूक्ताच्या बाबतीत त्यांनी संबंधित ऋचाच भाषांतरातून वगळून टाकल्या. दुसरे अभ्यासक राजाराम रामकृष्ण भागवत यांनी हे व अन्य दोन सूक्ते यावर १८९० मध्ये रायल एशियाटिक सोसायटीच्या अंकात इंग्रजीत एक लेख लिहिला. त्यानी संबंधित ऋचांचे भाषांतर असे केले:

इंद्र : सत्ता म्हटली की ती पुरुषाची नव्हे काय? ती स्त्रीची कशी काय होते?

इंद्राणी : सत्ता म्हटली की ती स्त्रीची नव्हे काय? ती पुरुषाची कशी काय होते?” (मराठी माझे)

या भाषांतरात झाले एवढेच की इंद्राणीचा कोप मात्र लोप पावला.

या उल्लेखांवरून स्पष्ट असे होते की वेदकालातील रचनांमध्ये स्वत:च्या व दुसऱ्यांच्या शारीरिकतेचा व लैंगिकतेचा संपूर्णपणे स्वीकार केला गेला होता. त्यानंतरच्या साडेतीन हजार वर्षात समाज व संस्कृतीमध्ये इतके बदल झाले की ते अवयव गुह्य ठरले आणि आधुनिक भाषांतरकारांची लेखणी त्या ठिकाणी थबकली.या ऋचांचे शब्दश: भाषांतर आक्सफर्ड विद्यापीठातर्फे २०१४ साली प्रकाशितझाले तेही अमेरिकेतल्या दोघा प्राध्यापकांच्या लेखणीतून! स्त्रीपुरुषांमध्ये एक सुप्त वा प्रकट अशी वर्चस्व गाजविण्याची इच्छा असते आणिसमागम आणि प्रजनन या दोन्हीच्या क्षमतेचा वापर त्यासाठी केला जातो हे या सूक्तातून सूचित होते.

वेदकाळात देव होते पण दैवते नव्हती आणि त्यांची मूर्तिपूजा नव्हती. पंचमहाभूतांकरवी निसर्गव्यापार घडतात, त्याचे ठोकताळे होते.  पण निसर्गचक्राचे नियम अवगत होण्यास कालावधी होता.  निसर्गाचा प्रकोप टाळणे आणि पंचमहाभूतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञयाग, होमहवन असे उपाय होते.  अतिवृष्टी, पूर, भूकंप, वणवे इ. नैसर्गिक आपत्तींना तोंड देतानाव रोगराई, स्थलांतर आणि त्यातून उद्भवणारे युद्धसंघर्ष यांना सामोरे जाताना काही जीवितहानी अटळ होती. अशा काळात प्रजनन महत्त्वाचे ठरत होते. पण प्रजननाची प्रक्रिया गूढ होती. त्यामुळे तिच्यामागे देखील अदृश्य शक्ती असावी अशी धारणा निर्माण झाली.

वेदोत्तर काळात यज्ञसमाप्तीनंतर एक स्तंभ असे, तो यज्ञात पूजलेल्या देवतेचे प्रतीक म्हणून राखला जाऊ लागला. तो पुरुषतत्त्वाचे प्रतीक बनला व पुढे त्याचे शिवलिंगात रूपांतर झाले असावे असा एक कयास आहे. त्याला स्वामी विवेकानंदांनी पुष्टी दिलेली आहे. तसेच आकाशातून होणारी वृष्टी आणि धरतीच्या पोटातून निर्माण होणाऱ्या वृक्षसंपदेचा संबंध स्त्रीपुरुष समागमातून जन्मणाऱ्या संततीशी जोडला गेला. जननशीलता व सुपीकता यांना एका निसर्गातीत शक्तीचे वरदान असे समजले जाऊ लागले. त्या अदृश्य शक्तीला मानवी रूपात देवी म्हणून पूजले जाऊ लागले.ऋग्वेदातील १०.१२५ या देवीसूक्तात देवी स्वत:च आपल्या शक्ती, सामर्थ्य, सत्ता, संपत्ती या गोष्टी मनुष्यमात्राला प्रदान करण्याच्या क्षमतेचे वर्णन करते. इंद्राणीच्या पुरुषाला नमविण्याच्या आपल्या क्षमतेचा हा विस्तारित प्रकार आहे. पृथ्वी ही धरणीमाता झाली. जन्मदात्री, भरणपोषण, संगोपन व प्रसंगी संहार करू शकणारी माता झाली. शिव-शक्ती, पुरुष-प्रकृती या तत्त्वांनी आकार घेतला व तत्त्वज्ञानाचा पाया रचला.

शंभर वर्षापूर्वी मोहेंजोदारो हडप्पा येथे उत्खनन केल्यावर वर्तमान इतिहासपूर्व तिसऱ्या शतकातील एक स्त्रीची मूर्ती सापडली. ही स्त्री वृक्षाला जन्म देताना दाखवली आहे.याच सुमारास शिवलिंगाची पूजा प्रचलित झाली असावी असा अंदाज आहे. कारण सर्वात जुने शिवलिंग हे वर्तमानपूर्व दुसऱ्या शतकातले समजले जाते. जवळपास या कालखंडात शिवलिंगाला समांतर अशी स्त्रीयोनीची पूजा सुरु झाली असावी. कारण अमरावती येथे वर्तमान गणनेच्या पहिल्या दुसऱ्या शतकातली लज्जागौरीची मूर्ती सापडली. या विशिष्ट मूर्तीला “लज्जागौरी” असे नाव मिळत गेले.

लज्जागौरीच्या मूर्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. तिचा योनिमार्ग व वक्षस्थळे उघडी आहेत. पाय फाकलेले व गुडघ्यात वाकलेले, जणू प्रसूतीच्या अवस्थेत बसलेली. हात गुडघ्यावर टेकून उंचावलेले आणि दोन्ही हातात कमळे धरलेली.  डोक्याच्या ठिकाणी पूर्ण उमललेले कमळ.बऱ्याच मूर्तींशेजारी बैल दाखविला आहे.

महाराष्ट्र संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रा चिं ढेरे यांनी लज्जागौरीवर ग्रंथ लिहून तिचे सांस्कृतिक महत्त्व विशद केले. बरेच प्रदेश पालथे घातल्यावर त्यांना लज्जागौरीची वैशिष्ट्ये असणाऱ्या विविध नावांनी पूजल्या जात असलेल्या देवता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र येथल्या गावांमध्ये आढळल्या. म्हणजे सिंधू संस्कृती व दक्षिण भारतात या संकल्पनेने मूळ धरले असे आपल्याला दिसते.  महाराष्ट्रात  वडगाव (सातारा), भोकरदन, तेर, नेवासे या ठिकाणी अशा मूर्ती असल्याची नोंद ढेरे यांनी केली आहे. त्यांच्या मते लज्जागौरी हे नाव मूळ कन्नड नावाचे संस्कृतरूप आहे. लंजे हा कन्नड शब्द वेश्या/गणिका या अर्थी वापरला जातो, तर नग्नता वा निर्लज्जपणा सूचित करण्यासाठी लज्जा हा शब्द तिथे योजला गेला असावा. विशेष म्हणजे कर्नाटकातील महाकूट मधील सातव्या शतकात बांधलेल्या महाकूटेश्वर मंदिर समूहात लज्जागौरीची मूर्ती आहे आणि त्या काळातला राजा विजयादित्य याची रखेली (विनापोटी) हिने देणगी दिल्याचा शिलालेख ही आहे. संततीप्राप्तीसाठी या देवीची पूजा केली जात होती आणि ती मिळाल्यापोटी देणगी दिल्याचे शिलालेखही उपलब्ध आहेत.  काळाच्या ओघात दक्षिणेकडच्या प्रदेशावर जैन, शैव, वीरशैव, वैष्णव राजघराण्यांचा राजकीय व सांस्कृतिक प्रभाव वाढत गेला तसे या देवीचे माहात्म्य ओसरत गेले. दोन अपवाद मात्र ठळक उठून दिसतात.

बेळगावाजवळील सौदत्ती येथील यल्लम्मा (सर्वांची माता) ही लज्जागौरीचेच एक रूप आहे, असे ढेरे यांचे मत आहे. देवदासी समुदायाची ती मुख्य देवी आहे. दहाव्या शतकात तिचे सध्याचे देऊळ बांधले गेले.महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक येथून वर्षातून दोनदा लाखावर भक्तसमुदाय तेथे जमतो.  कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींचा, देवदासींचा त्यात मोठा भाग असतो. तेथे नग्नावस्थेत प्रदक्षिणा घालण्याची प्रथा हजार वर्षे चालत आली होती. देवदासी प्रथेतून आर्थिक-सामाजिक मागास वर्गातील स्त्रियांचे उच्च वर्णीयांकडून शोषण होत असल्यावरून प्रथम १९३४ साली व त्यानंतर १९८४ मध्ये कायद्याने देवदासी प्रथेवर व नग्न प्रदक्षिणांवर बंदी घालण्यात आली. लज्जागौरी ही सुपीकतेचे, संततीचे वरदान देणारी देवी. समागम व प्रजनन यासाठी साधन ठरणाऱ्या योनिमार्गाला पावित्र्य देणारे प्रतीक. तिचे रूपांतर रेणुकेत होते. ही रेणुका कनिष्ठ ठरविलेल्या मागास वर्गांची देवता बनते, तेव्हा त्या दंतकथेत एक शुचितेचा अंश मिसळतो. रेणुका ही एक ऋषिपत्नी पाणी आणण्यास गेली असता नदीत जलक्रीडा करणाऱ्या जोडप्यातील पुरुषाकडे आकृष्ट होते, या तिच्या अपराधाबद्दल तिची हत्या होते, पण नंतर तिला जिवंत केले जाते, हा दंतकथेचा सारांश आहे.

सांस्कृतिक दृष्टीने पाहिले तर स्वत:ची कमनीयता व समागमक्षमता अभिमानाने मिरवणारी इंद्राणी नंतरच्या दोन हजार वर्षात रेणुका बनून केवळ कामुक आकर्षण मनात उमटले म्हणून अपवित्र ठरून त्यागली जाते. एवढेच नव्हे तर सत्ताधारी व उच्च वर्णीयांच्या लैंगिक गरजा पुरविणाऱ्या वेश्यासमुदायाचा भावनिक आसरा बनते.

दुसरा अपवाद आसामातील गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा. या देवळात देवी एका गुहेत लज्जागौरीच्या रूपात आहे. देवीची दंतकथा असे सांगते की सती (पार्वती) चा देह विष्णूच्या सुदर्शन चक्राने ५१ तुकड्यात भेदला गेला आणि त्यातला योनीचा भाग जिथे पडला, तिथे तिची “कामाख्या” म्हणून पूजा होऊ लागली. पर्वतवासीयांचा देव शंकर व कृषिसंस्कृतीचे आराध्य दैवत विष्णू यांच्याद्वारे काही सांस्कृतिक इतिहास त्या दंतकथेत लपला असावा.  पण येथे महत्त्वाचे हे आहे की आसामातील जनपद संस्कृतीने स्त्रीशक्तीचे एक ठळक आणि म्हणून पुरुषवर्चस्वाला धीटपणे भिडणारे प्रतीक दैवत या स्वरूपात जागते ठेवले आहे. पुरुषांना त्यांची कामोपभोग शक्ती मिळवून देणारी देवता म्हणून देखील ती पूजली जाते.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap