स्तनांचा आकार

0 15,626

वेबसाईटवर स्त्रियांसंबंधी येणाऱ्या प्रश्नांमध्ये अगदी सर्रासपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्तनांच्या आकाराविषयीचा प्रश्न. ‘माझे स्तन खूप लहान आहेत, वाढविण्यासाठी काय करू ?’, ‘माझ्या पत्नीचे स्तन खूप लहान आहेत, माझ्या गर्लफ्रेंडचे स्तन लहान आहेत लग्नानंतर काही अडचण येईल का?’, ‘मला माझे स्तन मोठे, आकर्षक आणि सुडौल करायचे आहेत त्यासाठी उपाय सुचवा’ यांसारखे अनेक प्रश्न वाचकांनी विचारले आहेत. याच प्रश्नांना अनुसरून स्तनांच्या आकाराविषयी असणारे समज- गैरसमज याविषयीचा लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

स्तनांचा आकार कशावर अवलंबून असतो?

आपल्या कोणत्याही अवयवांचं रूप, रंग, आकार कसा/किती असावा हे सर्व जनुकं, अनुवंशिकता, संप्रेरकं, पर्यावरण, पोषणाची स्थिती ई. गोष्टी ठरवत असतात. त्यातील काही गोष्टी जन्मतःच ठरतात तर काही जन्मानंतर. स्तनांचा आकार मुख्यतः जनुकं ठरवतात. संप्रेरक (हार्मोन्स) बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. मुलगा किंवा मुलगी वयात येत असताना त्यांच्या शरीरात काही बदल दिसायला सुरुवात होते त्याला हा संप्रेरकांचा प्रभावच कारणीभूत असतो. मुलींच्या शरीराला विशेषतः छातीला जी गोलाई प्राप्त होते ती ह्या संप्रेरकांच्या संतुलनामुळेच. हे संतुलन जर नसेल तर त्याचा परिणाम स्तनांच्या आकारावर ही होतो. त्या सोबतच तुमचे वजन आणि वय किती आहे ह्यावरही स्तनांचा आकार ठरतो. जिथे कुपोषण आहे, पौष्टिक अन्नाची कमतरता आहे तिथे एकूणच शरीराच्या वाढीवर परिणाम होतो.

स्तनांचा आकार किती/ कसा असावा?

खरंतर याचा काहीही मापदंड ठरलेला नाही. शरीराबद्दल किंवा शरीरातल्या अवयवांबद्दल नॉर्मल काय आणि कमी किंवा जास्त, लहान किंवा मोठं असं काही नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही जणींचे स्तन आकाराने लहान असतात तर काहींचे मोठे. मात्र नॉर्मल असा साइझ नाही. असेल तर तो कपड्यांच्या आणि ब्रा बनवणाऱ्या कंपन्यांनी आणि फॅशन उद्योगाने तयार केला आहे. तो प्रत्येक मुलीसाठी खरा नाही.

प्रत्येक व्यक्तीनुरुप शरीररचना वेगवेगळी असू शकते. अगदी जुळी मुलं देखील स्वभाव आणि शरीराने एकसारखी नसतात. त्याचप्रमाणे,  प्रत्येक मुलीचे, स्त्रीचे  स्तन देखील वेगवेगळ्या आकाराचे असतात. प्रत्येकाच्या प्रकृती आणि वयानुसार लहान, मोठे, सैल अथवा घट्ट असू शकतात . महत्वाचं म्हणजे स्तन मोठे असावेत की छोटे, सैल असावेत की घट्ट  असा काहीही मापदंड नाही. समाजामध्ये स्तनांच्या आकाराविषयी अनेक गैरसमज आढळतात आणि त्यात काहीही तथ्य नाही.

माध्यमांनी दिलेल्या साईजमध्ये जे बसत नाही त्यांना न्यूनगंड आणि जे बसतात त्यांना अहंकार येतो. खरंतर वयानुसार स्तनांचा आकार बदलत राहतो. अनेकवेळा दोन्ही स्तन देखील एकसारखे नसतात. त्यात फिकीर करण्याचं काही कारण नाही.

स्तनांचा आकार आणि लैंगिक उत्तेजना किंवा लैंगिक आनंद

स्तनांचा आकार आणि लैंगिक समाधान याचा देखील अनेकदा संबंध लावला जातो पण त्यात देखील काहीही तथ्य नाही. स्तनांच्या आकारावर लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या-घेण्याची क्षमता अवलंबून नसते. स्तन फार संवेदनशील असतात, हलक्या स्वरूपाच्या स्पर्शानेही ते उत्तेजित होतात.

स्तन मोठे करण्यासाठीचे उपाय 

मुळात स्तन मोठे करण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. काही मार्केट धार्जिणे लोक स्तन सुडौल करण्यासाठी उपाय आहेत असा दावा करून त्यांची उत्पादने खपवत असतात.  स्तन सुडौल करणारी किंवा वाढवता येणारी कोणतीही शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेली वैद्यकीय औषधं उपलब्ध नाहीत. अशा औषधांचा किंवा उत्पादनांचा उलट आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

स्तनांचा आकार आणि सौंदर्य

स्तनांचा आकार आणि सौंदर्य असा संबंध लावला जातो.  पण यात काहीही तथ्य नाही. हे जाणीवपूर्वक पसरवले गेलेले गैरसमज आहेत.आपलं शरीर जसं आहे तसं सुंदर असतं. त्यामुळे त्यात वीक, कमजोर, कमी, लहान असं काही न मानता जसे आहोत तसे सुंदर आहोत हे समजून घ्यायचा प्रयत्न करू या. स्तन लहान असले म्हणजे ते आकर्षक नाहीत असं मानू नका. आणि टीव्ही, जाहिराती, फॅशन शोमध्ये दाखवतात त्याच्याशी आपल्या शरीरांची तुलना करत राहू नका. आकर्षक असणं अवयवांच्या मापाशी नाही तर आपण कसं राहतो, आपण कसं बोलतो, वागतो आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं. सौंदर्य आपल्या स्वतःच्या मनात आणि नजरेत असतं. ठराविक साच्यामध्ये न अडकता जसे आहोत तसे सुंदर आहोत हे समजून घ्या.

थोडक्यात काय, आपण, आपले स्तन, आपले अवयव, आपले शरीर जसे आहे तसे खूप सुंदर आहे. सौंदर्याच्या चुकीच्या कल्पनांना नक्कीच छेद देता येवू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.