गोष्ट शरीराची… मनाची… सत्र २.

 

आपलं शरीर आणि मन एकमेकांशी कसं जोडलेलं आहे, त्यांचा सहसंबंध काय आहे आणि पालक-शिक्षक अंध मुला-मुलींशी याविषयी कशा पद्धतीने बोलू शकतील हे सारं जाणून घेऊया… ‘शरीर आणि मन’ या दुसऱ्या सत्रातून…

शरीर आणि मन

आपल्या शरीराच्या कार्यामध्ये आपल्या मनाची खूप महत्त्वाची भूमिका असते. पण मन कुठे असतं? मन म्हणजे नक्की काय?आपले विचार, भावना, कल्पना आणि अनुभव या सगळ्यांचं मिळून मन बनतं. मनाचा अंश शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असतो. आपण जसे आहोत ते आपल्या मनामुळेच. म्हणूनच निरोगी, स्वस्थ राहण्यासाठी मन आणि शरीराचा एकत्रच विचार करायला हवा. कारण मन आणि शरीर अगदी एकमेकांत गुंतलं आहे, ते एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. आपल्या प्रत्येक कृतीत मनाचा मोठा वाटा असतो. मनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीराचा मनावर. आपल्या मनाची काळजी कशी घ्यायची? मन रमवणारा एखादा छंद यासाठी खूपच उपयोगी ठरू शकतो. मुलांचे छंद हे तणावरहित असतात आणि त्यातून मुलं सहजच बऱ्याच गोष्टी शिकत असतात. गोष्ट शरीराची… मनाची… या पुस्तकामध्ये अशा छंदांची काही उदाहरणं दिली आहेत. आपल्याला काही छंद आहेत का? आपल्याकडे पाहून मुलं काही शिकतात का? आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याचाही एकदा विचार करायला हवा.

आपली तब्येत चांगली रहावी यासाठी चांगलं पोषण आणि व्यायामही आवश्यक आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वं आणि प्रथिनांबाबत आपण शिकतो. आपल्या शरीराशी मैत्री करताना आपण आपल्या आरोग्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, रक्तपांढरी आणि कुपोषणासारख्या आजारांचा मुकाबला करताना या माहितीचा कसा उपयोग करायचा ते शिकतो. जेव्हा मुलं स्वतःच्या शरीराविषयी, शरीरातल्या संस्थांविषयी समजून घेतात, श्वासाचे आवाज कसे ऐकायचे, नाडी कशी मोजायची हे शिकतात तेव्हा शरीराविषयीचा बागुलबुवा आपोआप दूर होतो. हे सगळं फक्त डॉक्टरांनाच कळतं ही धारणा दूर होते आणि आपणही काही वेळेला स्वतःचे डॉक्टर बनू शकतो, आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो हा विश्वास निर्माण होतो.

शरीराशी दोस्ती करता आली तर आपल्याला आपलं शरीर आणि मन आपल्या ताब्यात आहे, ही भावना निर्माण होते. आपण काही करू शकत नाही, हे आपल्या हातात नाही अशी हतबलता कमी होऊ लागते. आपला आपल्या भावनांवर ताबा असतो आणि म्हणूनच आपल्या कृतींवरदेखील. हे जाणून घेतलं की मग मला राग का आला आहे, कशाने दुःख झालं आहे, हे समजून घेण्याचा आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा मी जास्त प्रयत्न करू शकते/शकतो. माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि मला कशाचा त्रास होऊ शकतो ते मी आता निवडू आणि ठरवू शकते/शकतो. यात शरीर आणि मन दोन्हीचा समावेश होतो.

आपली स्वतःची प्रतिमा आणि आपलं शरीर यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. शरीराबद्दल नावड किंवा नकारार्थी विचार, पुढे जाऊन स्वतःबद्दलच्या नकारार्थी प्रतिमेत रुपांतरित होते. आजूबाजूच्या वातावरणातून, टीव्हीवरच्या जाहिरातींमधून, आपल्या कुटूंबियांकडून आणि अनेक इतरही माध्यमातून आपल्या या प्रतिमा घडत जातात, आपण त्या शिकत असतो. अशा नकारात्मक प्रतिमा घेऊन आपण मोठे होतो, पालक आणि शिक्षक बनतो आणि त्याच नकारार्थी प्रतिमा पुन्हा एकदा आपल्या मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो. लहानपणीच जर या साचेबध्द प्रतिमा मोडता आल्या तर मुलांची वयात येण्याची आणि मोठं होण्याची प्रक्रिया सोपी, सहज होऊन जाते. मुलं आत्मविश्वासाने इतरांना सामोरी जातात. आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आपल्या काय भावना आहेत? आपण आपलं शरीर, आपलं दिसणं सहज स्वीकारलं आहे का? मी खूप काळी आहे किंवा मी खूप जाड आहे अशा आपल्या प्रतिमा आपल्याला त्रासदायी वाटतात का? या प्रतिमांपलीकडे जाऊन आपण आपल्या शरीराचा स्वीकार कसा करू शकू? मुलांसोबत काम करताना याबाबत विचार करणं आणि आपल्या शरीराचा सहज स्वीकार करणं फार आवश्यक आहे.

आपण काय शिकलो?

१. आपल्या शरीराची सातत्याने वाढ होत असते आणि मनाचा विकास होत असतो.

२. आपले शरीर आणि मन एकच आहे. ते एकत्रितपणे काम करतात.

३. आपण आपल्या भावनांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवू शकतो.

४. समतोल आहार, व्यायाम आणि छंद हे शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आवश्यक आहेत.

५. सौंदर्याबाबतच्या स्वत:च्या कल्पना समजून घेण्याची आपल्याला गरज आहे.

६. स्वत:बद्दलच्या सकारात्मक कल्पना आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात.

७. वाईट सवयी बदलता येतात. अशा सवयी आणि व्यसनं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असतात.

८. साचेबद्धता आपल्या व्यक्तिमत्त्वावर मर्यादा आणते.

या विषयावर संवाद साधताना :

  • आपल्या शरीराची आणि मनाची वाढ होत असते, आपण बदलत असतो असे सांगून त्याबाबतची काही उदाहरणे द्या. जसे की आपण जन्मलो तेव्हा आपल्याला दात नव्हते, नंतर हळूहळू दात आले. आपल्याला बोलता येत नव्हते, हळूहळू आपण बोलू लागलो. आता मुलांना ते लहान असताना कसे होते ते आठवायला सांगा. हळूहळू आपण मोठे होत गेलो तसतसे बदलत गेलो असे सांगून हा बदल त्यांना आठवायला सांगा. आपण वाढत असतो, बदलत असतो हे पुन्हा एकदा लक्षात आणून द्या.
  • शरीरात अशी आणखी कोणकोणती प्रमाणं सापडतात ते शोधायला सांगा. खेळण्यातील बाहुल्या प्रमाणबद्ध नसतात पण आपलं शरीर मात्र प्रमाणबद्धच असतं. मोठे होत असताना या प्रमाणात फरक पडतो हे मुलांच्या लक्षात आणून द्या. वेगवेगळ्या वयात शरीर कसं दिसतं, त्याचं प्रमाण कसं असतं हे वर्णन करून सांगा.
  • आपल्या वाढीवर अनेक घटक परिणाम करत असतात. आपल भोवतालचं पर्यावरण, जनुकं, अन्न, काम, आपलं लिंग, वय इत्यादी. या घटकांबद्दल स्पष्टता देऊन त्यांचे आपल्या शरीरावर दिसून येणारे परिणाम आणि त्यामागची कारणं सांगा.
  • शरीर आणि मन या विभागामध्ये दिलेल्या गोष्टी सांगून शरीराच्या प्रत्येक कृतीमध्ये कोणकोणते अवयव सहभागी असतात ते विचारा, मुलांना त्यावर विचार करू द्या.
  • आपलं मन, भावना आणि शरीर यांचा संबंध असतो, ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि आपल्या कृतींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो हे मांडा आणि हा विषय पूर्ण करा.

संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे. 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap