स्त्रियांमधील लैंगिक भावना आणि जाणिवा
आपल्या शरीरातल्या लैंगिक अवयवांमध्ये निर्माण होणाऱ्या आणि लैंगिक विचारांसोबत येणाऱ्या भावनांना आपण लैंगिक भावना म्हणू शकतो. लैंगिक भावना निर्माण होतात तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. मायांग (योनि) आणि मांड्यांमध्ये ओलसरपणा जाणवतो. स्तन संवेदनशील आणि स्तनाग्रं ताठर होतात. चेहरा आणि कानशिलं तापतात. शरीरामध्ये ताण जाणवतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. शरीरातल्या काही भागांना आणि काही विशिष्ट अवयवांना स्पर्श केल्यावर लैंगिक भावना निर्माण होतात.
स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बहुतेक वेळा तो दाखवलेला नसतो. आणि दाखवला असेलच तर एक छोटासा उंचवटा म्हणून दाखवलेला असतो. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी किंवा बटण म्हणलं जातं. पण या सगळ्याचा अर्थ संवेदनशील टोक इतकाच आहे. प्रत्यक्षात मात्र क्लिटोरिस संपूर्ण मायांगामध्ये पसरलेलं आहे.
हळुवार दाबलं, चोळलं, स्पर्श केला किंवा सायकल चालवण्यासारख्या कृतीमध्ये क्लिटोरिस उद्दीपित होऊ शकतं. लैंगिक संभोगामध्येही ते उद्दीपित होऊ शकतं. असं झाल्यावर लैंगिक संवेदना सर्वोच्च बिंदू गाठतात आणि ऑरगॅझमचा अनुभव येतो. उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून क्लिटोरिस फुलतं, आकुंचन पावतं आणि शिथिल होतं. लैंगिक सुख देणं हेच याचं एकमेव कार्य आहे. प्रजननामध्ये त्याची कोणतीही स्पष्ट किंवा प्रत्यक्ष भूमिका नसते.
योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग हाताला लागेल. त्याला स्पर्श करून पहा. काय संवेदना जाणवतात? लैंगिक संवेदना निर्माण होतात का? लैंगिक भावना निर्माण झाल्यावर क्लिटोरिसला स्पर्श करून लैंगिक सुखाचा अनुभव घेता येतो. स्त्रिया किंवा मुली हस्तमैथुन करताना क्लिटोरिसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात.
No Responses