‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा

“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या… माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले, ‘जे आवश्यक आहे ते कर’. ‘बाहुली आणायला जाऊयात’ असं सांगून आईनं मला बोहरा समुदायाच्याच एका बाईच्या घरी नेलं. आमच्याच शेजारी माझी मैत्रीण आणि तिची आईसुद्धा बसली होती. पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीचा नंबर आला. ती आत गेली आणि त्यापाठोपाठ तिचा जोरात वेदनेने किंचाळल्याचा आवाज मला ऐकू आला. लगेचच ती आईचा हात पकडून बाहेर आली. नंतर माझा नंबर आला. त्या बाईने मला टेबलवर झोपवण्यास आणि आतील कपडे काढायला सांगितले. ‘मी नाही पाहू शकणार’ असं म्हणून माझी आई बाहेर गेली. माझ्या आंटीनं मला घट्ट पकडलं… त्या बाईनं माझ्या समोरंच एक नवीन ब्लेड काढलं… माझ्या पायाजवळ वाकली… मला खाली काहीतरी जोरात कापल्याची जाणीव झाली… त्यानंतर माझाच मला जोरात किंचाळल्याचा आणि रडल्याचा आवाज…. त्या बाईने रक्त टिपण्यासाठी कापसाचा बोळा दिला. त्यांनतर एक आठवडाभर माझी आई डेटॉलने योनी धूत होती. त्यांनतर हा विषय कायमचा बंद झाला. याविषयी कधीच कोणीच काहीही बोललं नाही.” ‘सहियो’ संस्थेने केलेल्या एका अभ्यासामध्ये सहभागी झालेली एक महिला.

वरील घटनेमध्ये नमूद केलेली ‘खतना’ ही प्रथा तशी आफ्रिकेमधील काही देशांमध्ये खूप वर्षांपासून चालत आली आहे पण भारताच्या काही भागांमध्येही ती पाळली जाते. ‘खतना’ (Female Genital Cutting/Mutilation) म्हणजे पाच ते आठ वर्षे वयोगटातील मुलींच्या लैंगिक अवयवाचा काही भाग कापला किंवा शिवला जातो. मुलींच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी ‘खतना’ केली जाते. परंपरांच्या नावाखाली चालणारी ही एक अमानवीय, क्रूर आणि स्त्रियांच्या लैंगिक अधिकारावर गदा आणणारी प्रथा आहे. धार्मिक मान्यतेमुळे आजही ही प्रथा जगभरातल्या काही देशात अस्तित्वात आहे. बऱ्याच लोकांना, अगदी महिलांनासुद्धा आपण ही प्रथा चालू ठेवून काहीतरी चांगले काम करत आहोत असे वाटते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ‘खतना’ चार प्रकारे केली जाते. क्लिटोरिसचा (योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग) काही किंवा पूर्ण भाग कापला जातो. योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते ज्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ (labia minora and the labia majora) असं म्हणतात ते कापले जातात. काही ठिकाणी ही त्वचा शिवून बंद केली जाते. याशिवाय टोचणे, कोरणे, खरवडून काढणे, डागणे आणि टोचणे यांसारख्या अनेक अवैद्यकीय हानीकारक प्रकारही काही ठिकाणी केले जातात.

पूर्वीच्या काळी धारदार पाते गरम करून खतना केली जात असे. काही ठिकाणी एकच ब्लेडने अनेक जणींची खतना केली जात असे. अजूनही काही ठिकाणी हेच प्रकार आढळतात. काही ठिकाणी स्वतःला शिक्षित आणि पुढारलेले म्हणवून घेणारे लोक खतना करण्यासाठी चक्क डॉक्टरकडे जातात. कोणताही वैद्यकीय आधार नाही हे माहित असूनही डॉक्टरसुद्धा खतना करतात.

मुलींना शिस्त लावण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुली कोणासोबत पळून जाऊ नयेत, त्यांनी लग्नाआधी सेक्स करू नये, त्यांच्यामध्ये लैंगिक भावना येऊ नयेत तसेच मुलींनी नवऱ्याशिवाय इतर कोणासोबत सेक्स करू नये यासाठी खतना केली जाते. जर एखादी मुलगी प्रेमात पडली तर ‘हिची खतना बरोबर केली नाही का’ असे म्हणून तिला आणि पालकांना हिणवले जाते.

युनिसेफच्या अहवालानुसार, आत्तापर्यंत किमान २ अब्ज मुली आणि स्त्रियांचा ‘खतना’ झाला आहे. ही प्रथा जगभरात तीन खंडांतील 30 देशांमध्ये अजूनही अस्तित्वात आहे. गेल्या तीन दशकांत या प्रथेचे प्रमाण तुलनेने कमी झाले असले तरीही होणारी लोकसंख्या वाढ पाहता २०५० पर्यंत जवळजवळ ६३ कोटी  मुलींची ‘खतना’ होऊ शकते.

पाच ते आठ वर्षे इतक्या कोवळ्या वयातील मुली खतना केल्यांनतर कितीतरी दिवस वेदनेने तडफडत असतात. काही मुलींना योनिमार्गाजवळ जंतूसंसर्ग होतो, मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. ही प्रथा म्हणजे कोणतेही वैद्यकीय कारण नसताना, धर्माच्या नावाखाली लक्षावधी मुलींना विनाकारण पोहचवली जाणारी हानी आहे. ‘खतना’ सारख्या प्रथा पाळणे हे स्त्रीच्या लैंगिक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

लैंगिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये क्लिटोरिस खूप महत्वाची भूमिका बजावते. हळुवार दाबलं, चोळलं, स्पर्श केला किंवा सायकल चालवण्यासारख्या कृतीमध्ये क्लिटोरिस उद्दीपित होऊ शकतं. हस्तमैथुनामध्ये या अवयवाला स्पर्श करून मुली लैंगिक सुख मिळवू शकतात. लैंगिक संबंध आणि नाती जोडण्याचा, लैंगिक अभिव्यक्ती/ निवडीचा, जोडीदार निवडीचा अधिकार, लैंगिक क्रिया करायची का नाही हे ठरवण्याचा अधिकार यांसारखे लैंगिक अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहेत. व्यक्तीच्या धर्माशी, शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी, ती स्त्री आहे का पुरुष याच्याशी किंवा ती समलिंगी आहे की भिन्नलिंगी याचा या हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेच पाहिजेत.

संकलन आणि लेखन: गौरी सुनंदा

संदर्भ:

www.unicef.org

www.who.int

www.sahiyo.com

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap