प्रजनन संस्थेतील वेगळेपण

मागील भागात आपण जननेंद्रियांची घडण व वेगळेपण या विषयावर याबाबत माहिती पाहिली या भागात थोड्या प्रमाणात दिसणा-या क्वचित दिसणा-या व  अत्यंत दुर्मीळ अशा प्रजनन संस्थेतील वेगळेपणाबाबत माहिती घेणार आहोत.

थोड्या प्रमाणात दिसणारे प्रजनन संस्थेतील वेगळेपण
वृषण कोषात न उतरलेले वृषण (क्रिप्टॉरचिडिजम)

जन्माला आलेल्या काही मुलांमध्ये एक किंवा दोन्ही वृषण पोटातून खाली वृषणकोषात उतरलेली नाहीत असं दिसून येतं. कालांतराने एका वर्षात काही बाळांचे वृषण वृषणकोषात उतरतात. जर ती निसर्गतः खाली उतरतील म्हणून वर्षभर वाट बघायची ठरवली तरी या काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुलाची अधूनमधून तपासणी होणं आवश्यक आहे.

जर या काळात वृषण वृषणकोषात उतरले नाहीत तर शस्त्रक्रिया करून ते खाली उतरवावे लागतात. तसं न केल्यास वयात आल्यावर त्या वृषणांमध्ये पुरुषबीजं निर्माण होत नाहीत. त्या वृषणात कर्करोग होण्याची शक्यता असते.

मियाटल स्टेनोसिस

काही लहान मुलांच्या शिस्नमुंडातील मूत्रमार्ग खूप अरुंद असतो व म्हणून लघवी करताना खूप त्रास होतो. लघवी थोडी थोडी व अडखळत होते. या त्रासामुळे मूल रडतं. अशा वेळी अॅलोपथिक डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. जर मूत्रमार्ग अरुंद असेल तर, शस्त्रक्रिया करून हा मार्ग मोठा करावा लागतो. मूत्रमार्ग मोठा केला, की लघवी करायला अडचण येत नाही. वयात आल्यावर मोठेपणी लैंगिक क्षमतेत कोणतीही बाधा येत नाही.

प्रजनन संस्थेमध्ये क्वचित दिसणारे वेगळेपण

हायपोस्पेडिया : 

शिस्नमुंडाच्या टोकाला लघवी व वीर्य बाहेर सोडण्यासाठी छिद्र असतं. क्वचित वेळा हे छिद्र लिंगाच्या टोकाला नसून अलीकडे लिंगाच्या खालच्या भागाला असू शकतं. याला हायपोस्पेडिया’ म्हणतात. हे छिद्र लिंगाच्या टोकापासून ते लिंगाच्या देठापर्यंतच्या भागात कुठेही असू शकतं. (जर मूत्रमार्गाचं छिद्र अगदी वृषणकोषाच्या शेजारीच असेल, तर मुलाला लघवी बसून करावी लागते.) याचबरोबर काहीजणांच्या लिंगाला बराच बाकही दिसतो. हे छिद्र कुठे आहे त्यावर हा बाक अवलंबून असतो. वीर्यनिर्मिती व पुरुषबीजनिर्मितीत कोणतीही अडचण नसते. या समस्येवर जाणकार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काहीजणांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. हे छिद्र बंद करून शिस्नमुंडापर्यंत मूत्रमार्ग वाढवून हे छिद्र शिस्नमुंडांच्या टोकाशी बनवलं जातं.

एपीस्पेडिया :

काही वेळा मूत्रमार्गमुख लिंगाच्या वरच्या भागाला असू शकतं. याला एपीस्पेडिया म्हणतात. या समस्येबरोबर काही वेळा लघवीवर नियंत्रण आणण्याच्या यंत्रणेत अडचण असू शकते. ही ‘एपीस्पेडिया’ ची समस्या गुंतागुंतीची असते व अत्यंत कुशल सर्जनची जरूरी लागते.

क्लिटोरलमेगॅली :

क्वचित वेळा एखाद्या मुलीची शिस्निका सरासरी शिस्निकेच्या आकारापेक्षा जास्त मोठी असू शकते. याला ‘क्लिटोरलमेगॅली’ म्हणतात. याच्यामुळे लैंगिक सुखात कोणतीही बाधा येत नाही.

गर्भाशयाचा अभाव

जर आंतरिक प्रजनन रचना वेगळी असेल तर ती लक्षात येणं अवघड असतं. हे वेगळेपण खूप उशिरा लक्षात  येऊ शकतं किंवा कधीकधी आयुष्यभर लक्षात येत नाही.  काही वेळा एखाद्या वैद्यकीय प्रश्नातून हे वेगळेपण लक्षात येत.

एक ताई म्हणाल्या,”१६ वर्षे झाली तरी पाळी आली नाही म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, सोनोग्राफी केल्यावर मला कळलं की मला गर्भपिशवी नाहीये. मला खूप धक्का बसला.” धक्का बसणं साहजिक आहे. कारण असं वेगळेपण असेल याची कल्पना नसते. कोणत्याच बाबतीत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं जाणवलेलं नसतं त्यामुळे असं आकस्मितपणे हे वेगळेपण कळल्यामुळे आपण एका क्षणात परके बनतो. मनात प्रत्येकक्षणी येतं की आता इतराचं व आपलं आयुष्य वेगळं असणार आहे. इतरांची व आपली सुख-दुःख एकच असतील हा ‘कंफर्ट  इन मेजॉरिटी’ धारणा क्षणात नष्ट होते. आपल्यावर निसर्गानं अन्याय केला आहे असं वाटून नैराश्य येतं. आपल्याला गर्भाशय नाही हे जाणवल्यावर आपल स्त्रीत्व कमी झाल्याची भावना मनात येऊ शकते. आपल्याला मूलं होणार नाही याचं दुःख होतं.

गर्भाशयाचे विभाजन

क्वचित वेळा गर्भाशयात नैसर्गिकदृष्ट्या विभाजन झालेलं असतं. याचा अर्थ गर्भाशयात दोन कप्पे पडतात. याच्यामुळे गर्भधारणेस अडचण येते. जरी गर्भधारणा झाली तरी गर्भाला वाढण्यास पुरेशी जागा मिळत नाही. याच्यामुळे गर्भ पडण्याची शक्यता वाढते. गर्भाशयाच्या वेगळेपणानुसार डॉक्टर विविध पर्याय सुचवतात.

प्रजनन संस्थेमध्ये अत्यंत दुर्मीळ असलेलं वेगळेपण

वरील सर्व उदाहरणं अशी आहेत की जिथं थोडं वेगळेपण असलं तरी बाळाचं लिंग ओळखण्यास अडचण येत नाही. पण काही बाळांच्या जननेंद्रियांमध्ये खूप वैविध्यं असतं, ज्याच्यामुळे त्याचं लिंग ठरवणं अवघड होतं. उदा. लिंगाचा अभाव व वृषणं असणं. अशा वेळी या बाळाला मुलगा म्हणायचं की मुलगी? अस मूल जन्माला आलं की पालकांना मोठा धक्का बसतो. वडिलांना आपण आपल्या पुरुषार्थात कमी पडलो असं वाटून न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. या वेगळेपणाला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल व आपला छळ होईल ही आईला भीती असते. आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करतील का? ही काळजी असते. लोकांना कळलं तर त्याचं कुतूहल, त्यांचे अनावश्यक सल्ले व त्यांचे शेरे ऐकून जीव मेटाकुटीला येतो.

अशा वेगळेपणाला कोणाचाही दोष नसतो- मातेचा नाही, वडिलांचा नाही व त्या बाळाचाही नाही. निसर्गातील अनेक वैविध्यांमधील ही वैविध्य आहेत . पालकांनी एकमेकांना आधार देणं व बाळाला प्रेमानं स्वीकारणं हाच योग्य मार्ग आहे.

काही वेळा डॉक्टर ‘कॅरयोटाईप’ चाचणी करून (बाळाच्या पेशींमधील गुणसूत्रांची रचना तपासणे), संप्रेरकांची चाचणी करून (संप्रेरकांचं प्रमाण तपासून) वेगळेपणाच्या कारणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात.

लिंग घडवायची शस्त्रक्रिया (सेक्स असाइनमेंट सर्जरी)

ज्या बाळाच्या जननेंद्रियांवरून तो मुलगा आहे की मुलगी आहे हे कळणं अवघड असतं. अशा बाळाला मुलगा म्हणायचं की मुलगी म्हणायचं? याच उत्तर अवघड आहे. काही वेळा अंदाजाने लिंग ठरवावं लागतं. हे ठरवण्यात स्त्री व पुरुष यांतील असमानता डोकावू शकते व तो मुलगा म्हणूनच वाढवू असा पालकांचा हट्ट असू शकतो.

काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्या अर्भकाचा जननेंद्रियांवर शस्त्रक्रिया करून त्या अर्भकाची बाह्य जननेंद्रिय एका विशिष्ट लिंगाची बनवायचा प्रयत्न केला जातो. याला लिंग घडवण्याची शस्त्रक्रिया म्हणतात.

अशी शस्त्रक्रिया करावी का?

जर वेगळेपणामुळे बाळाचा जीव धोक्यात असेल, बाळाला त्रास होत असेल, तर शस्त्रक्रिया करावी लागते पण केवळ दिसण्यासाठी (समाजात स्वीकार व्हावा) म्हणून अशी शस्त्रक्रिया करायची का? काही डॉक्टरांचं म्हणणं असतं की अशी शस्त्रक्रिया लवकरात लवकर, मूल लहान असताना करावी. जर पालकांनी बाळाची अशी शस्त्रक्रिया करायची ठरवली तर या शस्त्रक्रियेच्या काय मर्यादा आहेत? ही शस्त्रक्रिया नाही केली तर काय अपाय होईल? किती उशिरानं शस्त्रक्रिया केली तर चालेल? शस्त्रक्रियेचे नजीकचे व दूरगामी (विशेषतः लैंगिक कार्यावर) काय परिणाम असू शकतात? शस्त्रक्रियेच्या अगोदर व शस्त्रक्रियेनंतर जननेंद्रियांच्या कार्यांची काय मर्यादा असणार याची पालकांनी नीट माहिती करून घ्यावी.

काहीजणांचं म्हणणं असतं की, शस्त्रक्रिया करायची घाई करू नये. लहान असताना जननेंद्रियांच्या कार्यात लैंगिक पैलू आलेला नसतो. लहानपणी शस्त्रक्रिया केल्यावर, त्या शस्त्रक्रियेचे तारुण्यात आल्यावर लैंगिक कार्यावर काय परिणाम होतात हे कळत नाही. काही उदाहरणं समोर आहेत की लहान असताना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली व मोठं झाल्यावर त्या व्यक्तीला त्या शस्त्रक्रियेचे लैंगिक दुष्परिणाम आयुष्यभर सहन करावे लागत आहेत.

दुसरं एक कारण असं, की ही शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेण्यास (बाळाचा मुलगा करायचा की मुलगी करायची) आई-वडील व काही वेळा डॉक्टर असमर्थ असतात कारण त्या बाळाचा लिंगभाव दोघांनाही माहीत नसतो. शस्त्रक्रिया करून मुलासारखी किंवा मुलीसारखी बाह्यरचना  केली पण मूल मोठं होताना लक्षात आलं की त्या मुलाचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे तर मग काय करणार?

म्हणून काहीजणांचं म्हणणं असतं की, ज्या कारणांनी जिवाला धोका असेल, वेदना होत असेल ती दूर करण्यापुरतीच/तेवढीच शस्त्रक्रिया करावी. बाळाला वाढवताना त्याला मुलगा किंवा मुलगी काहीही मानून प्रेमाने वाढवावं. ते मूल मोठं होताना स्वत:ला मुलगी म्हणायला लागली, तर ती मुलगी आहे असंं समजावं. ते मूल स्वत:ला मुलगा मानायला लागलं, तर त्याला मुलगा समजावं. बाळाला वाढवताना त्याला स्वत:बद्दल काय वाटतंय हे समजून घ्यावं. बाळाला सक्तीनं किंवा दडपणाखाली मुलगा म्हणून वाग किंवा मुलगी म्हणून वाग असा हट्ट करू नका (अशाने त्या मुलाचा लिंगभाव घडत नाही), हळूहळू त्याला जसजशी समज येईल तसतसं त्याच्या वागण्यावरून त्याचा लिंगभाव काय आहे हे कळेल.

तो/ती प्रौढ झाल्यावर त्या व्यक्तीने या विषयावर काम करणाऱ्या संस्थांकडून संपूर्ण माहिती मिळवावी. कॉन्सेलिंग, मानसोपचारतज्ज्ञ, प्लॅस्टिक सर्जन, एन्डॉक्रिनॉलॉजिस्ट यांच्याशी संवाद करून शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय घ्यावा. शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीवर कोणतीही सक्ती केली जाऊ नये, दबाव आणला जाऊ नये. शक्यता आहे, की ती व्यक्ती कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेईल. अशा निर्णयात काहीही गैर नाही. चुकीचं नाही.

संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा  साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा  मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे  विक्रीसाठी उपलब्ध).

P.C. : https://twitter.com/OsmosisMed/status/841321737895702529/photo/1

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. पिनु says:

    दोघांचाही रक्तगट एकच आहे, आणि जवलचे नाते आहे, लग्नाला तिन वर्ष होत आली मुल नाही. काय करावे समजत नाही.

    • डॉक्टरांचा सल्ला घ्या.
      मुल न होण्यामागे अनेक कारणं असतात. अन जरी रक्तगट समान असतील तरी काही अडचण नाही, डॉक्टर त्यासाठी ही योग्य मार्गदर्शन करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap