मैत्री आणि स्वतःला जपा
नातेसंबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्मत:च निर्माण झालेल्या नात्यांव्यतिरिक्त काही नाती आपण नंतर जोडत असतो. आपल्याला काही व्यक्ती आवडतात, काही आवडत नाहीत. ज्या व्यक्तींमुळे आपल्या मनात स्वत:बद्दल चांगली भावना निर्माण होते त्या व्यक्ती आपले मित्र असतात. आपण दुखावले गेलो किंवा आपल्याला वाईट वाटले तर मित्रमैत्रिणींशी बोलून आपल्याला मोकळे / हलके वाटते. आपण इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीसुद्धा एका विशिष्ट साच्यातूनच पाहतो. त्यामुळे मैत्रीबाबत आपल्यामध्ये खूप गैरसमज असल्याचे आढळते. त्यातूनच अनेक छोटे – छोटे ताण निर्माण होतात.
मैत्री कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये होऊ शकते. त्यासाठी वय, पैसा, लिंग, जात, धर्म, वर्ण याचा कुठलाही अडसर ठरू शकत नाही. मैत्री प्रत्येक वयात वेगळी गरज पूर्ण करत असते. आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटकांपैकी मित्र-मैत्रिणी हा एक महत्त्वाचा घटक असतो, विशेषतः कुमारवयात मैत्रीला खूप महत्त्वाचे स्थान असते. ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे. आजकाल मित्र-मैत्रिणींपुढे वेळच नसतो कशाला किंवा सारखं काय आपलं मैत्रिणींच्यात रहायचं असं म्हणून मुलांना दुखवू नका. मैत्रीचं नातं जोपासता येण्यासाठी मुलांना मैत्री म्हणजे काय आणि त्याच्या मर्यादा निश्चितपणे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलांशी बोला, त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये तुम्हीही थोडं जाणीवपूर्वक लक्ष घाला.
वाढत्या वयात मुला – मुलींवर त्यांच्या समवयस्कांचा मोठा प्रभाव असतो. मित्र-मैत्रिणी जसं राहतात, वागतात, जे विचार किंवा कृती करतात त्या करण्यासाठी, या समवयस्कांमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलं धडपडत असतात. त्यातून त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमादेखील तयार होत असते. मित्र-मैत्रिणींमध्ये आवडता किंवा लाडका असणं हे आत्मविश्वास वाढवणारं देखील असतं. त्यामुळे वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी पालक किंवा शिक्षकांपेक्षा त्यांचे मित्र-मैत्रीण काय सांगतात याला जास्त महत्त्व असतं. याच प्रभावाखाली कधी कधी काही सवयी किंवा वागण्याच्या पद्धतीही मुलं शिकत असतात. हा प्रभाव त्यांच्यासाठी घातक नाही ना हे पाहणं मात्र गरजेचं असतं. तसंच मैत्रीमध्ये दबाव किंवा शोषण नाही ना हे ओळखायला शिकवलं पाहिजे.
मैत्रीमधील आदर, आपुलकी, विश्वास या सर्व भावना प्रेमात असतातच. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दल वाटणारी ओढ त्यांना मिठी मारून, भेट देऊन किंवा इतरही अनेक मार्गांनी व्यक्त करत असतो. अंध मुलं-मुली स्पर्शाच्या आधारे भावना व्यक्त करत असतात. त्यामुळे मित्र-मैत्रिणी देखील एकमेकांवरचं प्रेम, जवळीक स्पर्शातून, एकत्र राहण्यातूनच व्यक्त करत असतात. असे स्पर्श किंवा जवळीक दर वेळी लैंगिक भावनेतून केली असेल हा समज चुकीचा आहे. त्यांच्या स्पर्शाकडे केवळ अशा दृष्टीने पाहून दोषारोप करण्याच्या घटना टाळायल्या हव्यात. मैत्री मोकळी आणि निखळ असते आणि ती तशीच राहील याकडे आपण पालक किंवा शिक्षक म्हणून लक्ष द्यायला पाहिजे.
मैत्रीच्या आडून आपलं शोषण होत नाही ना हे ओळखता येणं गरजेचं आहे. त्यामुळे तसं शोषण ओळखणं आणि त्याला विरोध करणं ही कौशल्यं मुलां-मुलींमध्ये विकसित व्हायला हवीत.
अनेकदा आपल्याला अवघड प्रसंगांचा सामना करावा लागतो. आपल्यावर आपल्या ओळखीचे किंवा अनोळखी लोक काही गोष्टींची जबरदस्ती करत असतात. त्या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात. अशा वेळी आपण त्याचा विरोध करणं आवश्यक असतं. मनाविरूद्ध घडणाऱ्या गोष्टींना कसा विरोध करायचा हे शिकता आणि शिकवता येतं.
स्पर्शातून व्यक्त होणारे अर्थ आपल्याला समजत असतात. काही स्पर्श आपल्याला सुखावतात तर काही आपल्याला नकोसे वाटतात, दुखावतात. असे कोणतेही स्पर्श जे आपल्याला नकोसे वाटतात, आपल्या मर्जीविरुद्ध केलेले असतात तो एक शोषणाचाच प्रकार आहे. त्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे आपल्या शरीरावर फक्त आपलाच हक्क आहे. आपल्या इच्छेविरुद्ध केलेला कोणताही स्पर्श, कृती, वर्तन हे शोषणच असते. मुलांना आपले शोषण होत असेल तर ते ओळखता यावे आणि याबाबत त्यांनी पालक, शिक्षक किंवा इतर व्यक्तींशी बोलावे या उद्देशाने हा विषय शरीर साक्षरतेचा एक भाग म्हणून अंतर्भूत केला आहे. मुलं जे काही सांगत असतील त्यावर विश्वास ठेवणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.
आपल्या मुलाचे लैंगिक शोषण झाले असल्यास किंवा होत असल्यास
क्र. |
हे आवर्जून करा |
हे अजिबात करू नका |
१. | मुलांकडून विश्वासाने नक्की काय घडलं आहे, केव्हापासून घडत आहे याची माहिती करून घ्या. मात्र सांगण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्या. | मुलांना ढीगभर प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. |
२. | मुलांशी बोलताना यात तुझी काही चूक नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला होणारा त्रास मला समजू शकतो, घाबरू नको, आपण यातून नक्की मार्ग काढू हे त्यांना आवर्जून सांगा. | मुलांना काहीतरीच काय सांगतेस/सांगतोस, कसं शक्य आहे, तुझंच काहीतरी चुकलं असेल, एवढं कसं समजलं नाही तुला, आधीच नाही का सांगायचं, तरी मी म्हणत होते असे शब्दप्रयोग पूर्णपणे टाळा. |
३. | तुमचे मूल शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात येणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्या. त्यामुळे मुलाला सुरक्षित वाटेल. | इतरांशी याबाबत चर्चा करताना सतत आपली काळजी, चिंता व्यक्त करू नका. |
४. | तुमच्या आधाराची मुलांना गरज आहे हे समजून घेऊन तुमचा जास्त वेळ त्यांना द्या. त्यांना तुमच्याकडून नक्की काय मदत हवी आहे हे त्यांच्याशी बोलून समजून घ्या. | आता आम्ही काय करणार, तुमचं तुम्हीच निस्तरा अशा विधानांनी मुलांना ते एकटे असल्याची आणि अपराधीपणाची भावना तयार होईल. हे टाळा. |
५. | मुलांना त्यांच्या नेहमीच्या आणि दैनंदिन गोष्टी तशाच चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्या, तुम्हीही तुमच्या गोष्टी नेहमीप्रमाणे चालू ठेवा. | मुलांचा राग राग करू नका किंवा अतिकाळजी दाखवू नका. |
६. | शोषण करणाऱ्या व्यक्तीने काही धमकावले, पुन्हा काही त्रास दिला तर लगेच आम्हाला सांग असेही मुलाला सांगून ठेवा. | मुलांना त्यांच्या सामाजिक गोष्टींपासून (कृती) दूर ठेवू नका. उदा. मित्रांबरोबर खेळणं, फिरायला जाणं, स्पर्धेत भाग घेणं इ. |
७. | शोषणाचा परिणाम मुलांच्या अभ्यास, आरोग्य, वर्तन यावरही होत असतो. मुलाच्या शिक्षकांना याची कल्पना देऊन सहकार्य करण्यास सांगा. काही मित्र-मैत्रिणींशी तुमची ओळख असल्यास त्यांनाही याची कल्पना देऊन त्यांनी कसं वागणं अपेक्षित आहे ते सांगा. उदा. चिडवू नये, समजून घ्यावे. | इतर कोणत्याही घटनांची, उदाहरणांची या घटनेशी तुलना करू नका. तसेच इतर घटनांचे तपशील चर्चांमधून चघळू नका |
८. | मुलांच्या कलाने घ्या, त्यांना तुमच्या आश्वासक स्पर्शाची गरज आहे हे लक्षात घेऊन दिवसातील काही वेळ मुलांना जवळ घ्या. रडून, बोलून त्यांच्या भावनांचा निचरा होत असेल तर तशी संधी त्यांना द्या. | मुलाला त्याच्या भावना व्यक्त करताना अडवू नका. रडू नकोस, आता पुन्हा तेच ते आठवू नकोस, बोलू नकोस असं म्हणत राहू नका. |
लैंगिक शोषणाच्या बाबतीत असा अनुभव आहे की शोषण करणारी व्यक्ती केवळ मोठी असल्याने अनेकदा शोषित व्यक्तीचे आई-वडील गप्प बसतात. मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचं असतं हे लहान मुलांना शिकवल्यामुळे किंवा आईवडील आपल्याला ओरडतील अशा भीतीने कित्येकदा आवडत नसूनही लहान मुलं मोठ्या व्यक्तीला प”तिकार करू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या शोषणापासून बचाव करण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिकवणं गरजेचं आहे. तसंच आपणही नाही म्हणायला शिकणं आवश्यक आहे.
समज-गैरसमज |
तथ्य |
नाही म्हणणं कमकुवतपणाचं लक्षण आहे. | काही वेळा आपल्याला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर नाही म्हणणं गरजेचं असतं. सगळ्या गोष्टींचा विचार करून विशिष्ट भूमिकेतून नाही म्हणण्यासाठी खूप हिंमत लागते. ते कमकुवतपणाचं लक्षण नसून ठामपणाचं द्योतक आहे. |
लैंगिक शोषण अनोळखी व्यक्तीकडून होते | बऱ्याचवेळेला लैंगिक शोषण हे ओळखीच्या किंबहुना नात्यातल्या (जवळच्या किंवा लांबच्या) व्यक्तीकडून होते असा अनुभव आहे. |
शोषण हे फक्त मुलींचे होते | शोषण होणाऱ्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असले तरी मुलग्यांचेही शोषण होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शोषण स्त्री किंवा पुरूष कोणाकडूनही कोणाचेही केले जाऊ शकते. |
संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे.
No Responses