मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार आणि त्यासाठीचा अवकाश

मार्च २०१८ मध्ये आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात सहभागींसाठी मतिमंदत्व आणि लैंगिकता या विषयावर बोलण्यासाठी डॉ. सचिन नगरकर यांना बोलावण्यात आले होते. डॉ नगरकर हे वैद्यकीय व्यवसायात अनेक वर्षे आहेतच शिवाय ते लैंगिकता तज्ञ म्हणून ही स्वतंत्र काम करतात. पुण्याजवळ पौड येथे त्यांचे ‘ सुर्हुदय’ हे  क्लिनिक आहे. पौडच्याच ‘साधना विलेज’ या प्रौढ मतिमंद व्यक्तींच्या निवासी संस्थेशी डॉक्टर अनेक वर्षे जोडून घेऊन काम करत आले आहेत. याच कामातून मतिमंद व्यक्तींच्या लैंगिकतेविषयी, त्याच्या लैंगिक अधिकारांविषयी त्यांची अशी काही ठाम मतं तयार झाली आहेत. मानवी लैंगिकता, मतिमंदत्व आणि लैंगिकता, मतिमंद व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, लैंगिक अभिव्यक्ती, हिंसा आणि सुरक्षितता आदि विषयांवर त्यांनी या कार्यशाळेत मांडलेली महत्वपूर्ण भूमिका या लेखाद्वारे आपल्या वाचकांपर्यंत आम्ही पोचवत आहोत.

प्राणी आणि माणसांची लैंगिकता

लैंगिकता हा प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तसाच तो माणसांच्या जीवनाचाही आहे. परंतु मानव प्राण्याची लैंगिकता व  इतर प्राण्यांच्या लैंगिकतेमध्ये आणि लैंगिक अभिव्यक्तीमध्ये अर्थातच खूप फरक आहे. आपण माणसं विचारी आहोत. माणसांच्या लैंगिकतेच्या अभिव्यक्तीवर संस्कृती, परंपरा, खाजगीपणा, आनंद, बांधिलकी, उद्देश आणि नीति नियमांसारख्या अनेक गोष्टींचा मोठा प्रभाव असतो. त्याच प्रमाणे आपण हे ही पाहतो की माणसांमध्ये सर्व नियम आणि परंपरा मोडण्याचीही प्रवृत्ती असते. माणसांमध्येच जबरदस्तीने शारीरिक संबंध करणे, बलात्कार अशासारख्या गोष्टी दिसतात ज्या सहसा प्राण्यांमध्ये दिसत नाहीत.

माणसांची लैंगिकता आणि लैंगिक अभिव्यक्ती ही खूप विविधतेने नटलेली आहे. परंतु विभिन्न मानवी समूहांत विभिन्न प्रकारच्या अभिव्यक्ती या मान्यता पावतात तर काहींना काही समूहात मान्यता नसते, त्यांना स्वीकारार्हता नसते. उदा. उघड्यावरील, जबरदस्तीचे, अनेक जोडीदारांसोबतचे, प्राण्यांसोबत केलेले, लहान मुलांसोबतचे किंवा रक्ताच्या/निकटच्या नात्यातील लैंगिक संबंध सहसा मान्य केले जात नाही. समलिंगी संबंध आजही आपल्या समाजात पूर्णपणे मान्य केले जाताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या समाजात विवाहबाह्य लैंगिक संबंध किंवा जोडीदारांच्या वयात खूप अंतर असलेले संबंध ही वर्ज्य समजले जातात. फसवून केले गेलेले संबंध तसेच जातींमध्ये विभागल्या गेलेल्या आपल्या समाजात तर आंतरजातीय/आंतरधर्मीय लैंगिक संबंधांकडेही संशयाच्या नजरेने पहिले जाते.

या सर्व गोष्टींकडे पहिले तर असे दिसते की, काही प्रकारचे लैंगिक संबंध हे सर्वच मानवी समूहांमध्ये निषिद्ध मानले जातात. तर काही लैंगिक वर्तनाला एका समूहात मान्यता असते तर दुसऱ्या समूहात नसते. परंतू संमती न घेता, सुरक्षिततेचा विचार न करता केले जाणारे लैंगिक संबंध हे, सर्वच समाजांनी निषिद्ध मानले आहेत हे सर्वसाधारणपणे दिसते. जरी असे असले तरी जात, धर्म, वर्ण, वर्ग या गोष्टींचा प्रभाव, त्यातून येणारी विषमता, हिंसा या गोष्टीने सुद्धा माणसांची लैंगिकता आणि लैंगिक वर्तन प्रभावित होते. परंतु तरीही संमती, सुरक्षितता, विविधता या गोष्टींचा स्वीकार सर्वांनीच करणे गरजेचे आहे.

त्यामुळे जर नीट पहिले तर माणसांची लैंगिकता ही वर उल्लेख केलेल्या या सर्व गोष्टींच्या पलीकडची आहे. ती जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या माणसांच्या आयुष्याचा भाग असते. त्यामुळे लैंगिकतेचा स्वीकारही या वरील गोष्टींवर अवलंबून असून चालणार नाही अन तो तसा नाहीसुद्धा. लैंगिकतेची चर्चा केवळ वरील गोष्टींच्या आधारे करणे अपूर्ण राहील, कारण लैंगिकता या सर्व गोष्टींच्या कुठेतरी पलीकडे आहे.

मतिमंदत्व आणि लैंगिकता

लैंगिकतेची अभिव्यक्ती प्रत्येक प्राण्याला आहे. लैंगिकतेचा आणि मेंदूचा मुख्यतः संबंध आहे. किंवा लैंगिकतेचा संबंध लिंगाशी कमी आणि मेंदूशी अधिक आहे. मग ते जलचर-भूचर असोत किंवा सरपटणारे, चार पायांवर चालणारे किंवा दोन पायांवर चालणारे असोत. ३० कोटी वर्षांपूर्वी जो मेंदू जन्माला आला तो मेंदू सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्माला आला होता. त्या मेंदूचे नाव ‘रेप्टीलिअन ब्रेन’ असे आहे. भय, भूक आणि पुनरुत्पादन या तीन मुख्य प्रवृत्ती या मेंदूत होत्या आणि असतात. उत्क्रांतीत उन्नत झालेल्या माणसांच्या मेंदूत प्राण्यांमधील हा मेंदूचा भाग ही तसाच आहे. त्यामुळे माणसांच्या आणि म्हणूनच आपल्या मतीमंद मुलांच्याही लैंगिकतेकडे पाहत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करून त्याआधारेच पाहावे लागेल. मतीमंद आहेत म्हणून या मुलांची लैंगिकता नाकारून चालणार नाही. ‘बाकी काही कळत नाही, हेच बरं कळतं ‘ असं म्हणून चालणार नाही. त्यातून आपण त्यांची आणि आपली स्वतःचीही फसगतच करत असतो. मतिमंदत्व हे मानवी मेंदूच्या भागातील एक अक्षमता आहे, तर लैंगिकता ही आदिम प्रेरणा ही उत्क्रांत मेंदूचा अविभाज्य भाग आहे.

मतिमंदत्व आजारपण नाही तर ती एक अवस्था आहे. मेंदूला काही कारणास्तव इजा झाली, एखादा मानसिक आजार, काही अनुवांशिक कारणे तसेच गुणसुत्रांतील बिघाड यांमुळे मानवी मेंदूच्या कार्यात अडथळा येतो. त्यामुळे विशेष मुलांच्याही लैंगिक भावना आहेत हे मान्य करणं व त्यांच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. मतिमंद मुला-मुलींची, शारीरिक-मानसिक विकलांग असलेल्या व्यक्तींची लैंगिकता उत्क्रांतीनुसार, मेंदूनुसार किती अपरिहार्य गोष्ट आहे याची समज आणि सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येकाजवळ असायला पाहिजे.

मासिक पाळी आणि स्वच्छता- प्रशिक्षणाची गरज

मतिमंद मुलींच्या दृष्टीतून पहिले तर त्यांच्या मासिक पाळी, स्वच्छता यासारख्या गोष्टींबद्दल आपण अधिक जबाबदार असणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळातील कटकट किंवा त्रास नकोच म्हणून मतिमंद मुलीचे गर्भाशय काढून टाकण्याचा पर्याय जवळचा वाटतो. अशा कितीतरी मतिमंद मुली आहेत की, ज्यांना लघवी करण्यावर सुद्धा नियंत्रण नाही. मग काय त्यांचे मूत्राशय काढून टाकणार? नैसर्गिक विधींवर ज्यावेळी नियंत्रण नसतं तेव्हा त्याच्याशी निगडीत गोष्टींची काळजी आणि स्वच्छता घेतली जातेच की. मग योनीमार्गाच्या किंवा पाळी येण्याच्या जागेविषयी, तिच्या स्वच्छतेविषयी मनात अढी का बरं?

तीव्र मतिमंदत्व असलेल्या मुली की ज्यांना पाळीची काहीच जबाबदारी घेता येत नाही त्यांच्या दृष्टीने वेगळा विचार करता येऊ शकतो. आपल्याकडे ८०% मतिमंद मुलं-मुली सौम्य मतिमंदत्व असलेली आहेत.  ज्या मुली सौम्य प्रकारात मोडतात त्यांना पाळीच्या काळातील स्वच्छता शिकविता येणार नाही असं का वाटतं? या मुलींना पाळीतील स्वच्छता करता येत नाही म्हणून आपण काही उपाय नक्कीच करू शकतो. त्यांना यासाठी गर्भाशय काढण्याची नाही तर योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.

मानसिक आजार आणि औषधं

मतिमंदत्व ही अवस्था आहे आजार नाही त्यामुळे कोणत्याही गोळ्या-औषधांनी ते पूर्णपणे बरे करता येत नाही. बऱ्याच मतिमंद मुलांच्या बाबतीत भारंभार खाल्याने होणारे पोटाचे आजार सर्वसाधारणपणे दिसतात. स्वच्छता नसणे यातून त्वचेचे आजार दिसतात. गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, अनुवंशिक स्थितीमुळे जेव्हा मतिमंदत्व येतं त्यावेळी येणाऱ्या आजारांची इतरही लक्षणं असतात (उदा. फिटस् येणं, काही मुलं हायपर होतात, आरडओरडा करतात) म्हणून या मुलांसाठी मानसिक आजार/ मेंदूच्या इतर आजारांवर अनेक प्रकारची औषधे चालू असतात. यातील काही औषधं अशी आहेत की ज्याच्यामुळे मुलांच्या लैंगिकतेवर परिणाम होतो. यामुळे कधीकधी ही मुलं नॉर्मल व्यक्तीपेक्षाही जास्त किंवा काहीतरी वेगळं वागतात. औषधांमुळे असं काही घडत असेल तर ते मात्र अस्वाभाविक म्हणायला पाहिजे. तो औषधांचा परिणाम असतो यात नॉर्मल लैंगिकतेचा भाग नाहीये.

संस्थात्मक पातळीवर विचार करत असता मतिमंद मुलांची जी औषधे आहेत, त्यामध्ये लैंगिकतेवर परिणाम करणारी कोणती औषधे आहेत का? याविषयी आवर्जून माहिती घ्यायला पाहिजे. तीही अगदी मोकळेपणाने…जसे आपण विचारतो भुकेवर, लघवीवर परिणाम होईल का? त्याचप्रमाणे लैंगिकतेवर होईल का? असा काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

त्यामुळे एखादी व्यक्ती आवडणं, बोलणं छान वाटणं, जवळ बसावसं वाटणं, स्पर्श करणं, निकटता/ जवळीकता दाखविणं या गोष्टी नॉर्मल असून हा लैंगिकतेचाच भाग आहे. यात समागम ही खूप शेवटची पायरी आहे. या सर्व लैंगिक कृतींवर आक्षेप घेण्यासारखं काहीचं नसतं.

 

चित्र साभार : https://schoolofthinking.org/2018/06/the-placebo-algorithm-how-can-placebos-work-in-the-triune-human-brain/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap