माझी मुलगी विद्या.. मंजुश्री श्रीकांत लवाटे 

तथापिच्या ‘स्वीकार आधार गटा’तील सक्रीय सदस्य श्रीकांत लवाटे आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री लवाटे यांनी त्यांची मुलगी ‘विद्या’ला वाढवतानाचा प्रवास त्यांच्या मनोगतातून उलगडला आहे. मतिमंदत्वाचा स्वीकार ते मुलांचं किशोरवय, तरुणपण अशा महत्वाच्या टप्प्यांसोबत पालकदेखील स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. हे जुळवून घेणं, त्यातून काही गोष्टी शिकणं, शिकवणं, हे हळूहळू ‘पालक’ या भूमिकेला समृद्ध करत राहतं. त्यातही मतिमंद मुलीचे पालक म्हणून ‘पालक’ या भूमिकेला आणावा लागणारा कणखरपणा, समंजसपणा; त्यासाठीची मानसिक तयारी यातून हटके अनुभवांची शिदोरीच तयार होते. मंजुश्री लवाटे यांच्या शिदोरीतील काही समृद्ध अनुभव वेबसाईटवरील वाचकांसाठी…     

माझी मुलगी विद्या. तिच्या वेळेस माझी तशी नॉर्मलच डिलिव्हरी झाली. ती साधारण १०-११ महिन्यांची झाल्यानंतर तिची वाढ थोडी हळूहळू होत असल्याचे आम्हाला जाणवले. आम्ही दोघेही त्या वेळेस नोकरी करत होतो. एकदा ती जिन्यावरून पडली आणि कदाचित तिला तेव्हा डोक्याला मार लागला असावा. तेव्हापासून तर तिची शारीरिक/मानसिक प्रगती खूपच स्लो व्हायला लागली. जवळपास दोन-अडीच वर्षानंतर ती चालायला लागली. डॉक्टरांचे म्हणणे होते, की ती हळूहळू बरी होईल. सामान्य मुलांप्रमाणे ती बोलत नव्हती, मग स्पीच थेरपी घेतली. जवळपास ७ व्या वर्षी ती बोलू लागली.

मी मानसशास्त्र विषय घेऊन शिकले आहे. त्यामुळे जेव्हा विद्याच्या अपंगत्वाच्या बाबतीत आम्हाला लक्षात आले, तेव्हा ते स्वीकारणे आम्हाला खूप अवघड गेले नाही. तिच्या बाबांनी, कुटुंबीयांनीही ते यथावकाश सहजपणे घेतले. तिला लहानपणापासून आम्ही सगळीकडे घेऊन जायचो. तिला कुठेच नेले नाही किंवा मतिमंद आहे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला न्यायचे टाळले असे झाले नाही. मी खूप सकारात्मक विचार करणारी आहे आणि माझ्या कुटुंबातही ते समंजसपण आहे. म्हणून तसे असेल. अनेकदा पालकांना समाज फार मदत करत नाही, आधार मिळत नाही. आम्हाला मात्र तसा अनुभव नाही आला. आमचे सर्व शेजारी-पाजारी खूप सपोर्टिव्ह होते. मला वाटतं या सर्वात पालकांचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही स्वतः किती खंबीर आहात पालक म्हणून, तुमच्या मुलांच्या पाठी तुम्ही किती ठामपणे उभे राहता हे फार महत्वाचे आहे. ते पाहून इतर लोकांनाही मेसेज मिळतो आणि ते तुमच्या मुलाशी नीट वागतात.

मग विद्यासाठी आम्ही शाळा शोधू लागलो. जयवकील (मुंबई) शाळेशी संपर्क साधला आणि तिथे ती जाऊ लागली आणि रमलीही. जवळपास १२ वर्षे ती त्या शाळेत होती. याच काळात मी स्वतः या मुलांसाठी कार्यशाळा चालू केली होती. मीरा विद्यालयाच्या वरांड्यात. मुख्यतः परिसरातील गरीब घरातील मुलं येत. त्यांना लहान-मोठी कौशल्ये मी शिकवत होते.

विद्या १८ वर्षांची झाल्यानंतर मग अनेक अडचणी येऊ लागल्या. मुख्य म्हणजे तिला कुठेतरी सेटल करणे गरजेचे होते. आम्ही मुंबई सोडले कारण अंतर, वाहतूक इ. पाहता मुंबईत गोष्टी अवघड आहेत याची जाणीव होत होती. आम्ही पुण्याला आलो. माझी एक बहीणही होती इकडे. आम्ही होस्टेलचा शोध घेतला. आमच्या वृद्धापकाळाचा विचार करता तिची योग्य सोय लावणे महत्वाचे होते. आम्ही खूप शोधाशोध केली. जीवनज्योत, जयवकील अशा सर्व जागी जाऊन आलो. मग नवक्षितिज इथे आलो. तेव्हा विद्या २५ वर्षांची होती.

विद्या खूप लवकर वयात आली. ११ व्या वर्षीच तिला पाळी चालू झाली. परंतु मी अगोदरच तिची तयारी करायला सुरुवात केली होती. साधारण १० व्या वर्षापासूनच मी तिच्याशी याविषयी बोलायला सुरुवात केली होती. त्यावेळेस आमच्या घरात बाजूला बसायची रीत होती. मला, तिच्या काकूला ती पाहत होती. मी तिच्याशी बोलायचे की हे असे तीन दिवस असतात, अशी स्वच्छता पाळायची इ. मात्र आम्ही कुणीही विद्याकडून बाजूला बसण्याची अपेक्षा केली नव्हती. तिला हे समजलंच नसतं नीटपणे.

शिवाय मी तिला सुरक्षेविषयीही सांगितले होते. फार कोणाच्या अंगचटीला जायचं नाही, दूर राहायचं, कोणी काही केलं तर जोरात ओरडायचं हे सर्व तिला मी सांगितलं होतं. तू जवळ गेली नाहीस तर तुझा गैरफायदा कोणी घेणार नाही. कुणी तुला त्रास दिला तर सरळ चावा घ्यायचा, तुला कुणी रागावणार नाही इ. गोष्टी मी तिला नेहमी सांगायचे. तिला जेव्हा प्रथम पाळी आली, तेव्हा तिलाही ते लक्षात आले नव्हते. पण पाळीतील काळजी, स्वच्छता, पॅडचा वापर याबद्दलचे ट्रेनिंगच मी तिला दिले होते. जयवकील शाळेतही शिक्षिका याविषयी मुलींचे ग्रुप करून त्यांना समजावून सांगायच्या. मी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले. अंघोळ करताना स्वच्छता कशी करावी, हे शिकवलं. त्याचं महत्व काय, हे सांगितलं. पाच-सहा महिने लागले पण ती शिकली. पण ती स्वतः इतकी स्वच्छता प्रिय आहे की तिलाच कपड्यावर एखादाही डाग चालत नाही!

आता नवक्षितिज संस्थेमध्ये विद्या छान रमली आहे. तिला तिच्या वयाच्या मैत्रिणींचा ग्रुप मिळाला आहे. तिथे सर्व मुला-मुलीना जास्तीत जास्त आनंदी आणि बिझी ठेवतात. महिन्यातल्या एका शनिवारी एखाद्या जवळच्या ठिकाणी ट्रेकिंगला नेतात. त्यामुळे मुला-मुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो. पुण्यात येण्याचा आमचा निर्णय बरोबर होता, असे आजच्या घडीला वाटते आहे.

शब्दांकन : अच्युत बोरगावकर

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap