पालवी फुटते तेव्हा… कलिका मुजूमदार

झाडाला ‘पालवी’ फुटली की तेच झाड नव्या रुपात आपल्या समोर येतं. आपण त्याची निगा राखतो, त्याला जपतो, त्याचे संरक्षण करतो आणि हेच झाड आपल्याला फुले-फळे देऊन मोहरून टाकतं.

१६, १७ व्या वयात मुलं-मुली पदार्पण करतात, तेव्हा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून वेगळेपणा दिसत असतो. ते तो व्यक्त करत असतात. तेव्हा त्यांच्या मनात एक छानशी पालवी फुटायला सुरवात झालेली असे समजावे. म्हणजेच ही मुलं वयात आलीत असे समजावे. सामान्य मुलं आपल्या भावना बोलून मोकळे होतात अथवा त्यांच्या कृतीतून व्यक्त होतात. त्यांच्याशी बोलताना पालक, इतर माणसं कौतुकानं बोलतात. एका परीने चांगले आहे की मुलं थोडी मोकळी होतात. प्रश्न असतो तो आपल्या मतिमंद मुलांचा. मानसिक वय व शारीरिक वय याच्यात तफावत जरी असली तरी वाढत्या वयानुसार शारीरिक बदल हे नैसर्गिकरित्या होत असतात. वयात येणं, मोठं होणं यातील फरकच मुळात मतिमंद मुलांना समजत नाही. एकीकडे शरीरामध्ये बदल होत असतात, स्वतःच्या शरीरात होणाऱ्या वाढत्या बदलांमुळे मुलं अस्वस्थ असतात. नक्की काय आहे हे पटकन समजत नाही. चिडचिडेपणा वाढतो, विशेषतः मुलींमध्ये स्तनाचा आकार वाढतो, पाळी येऊ लागते. मुलांमध्ये दाढी-मिशा येऊ लागतात. लिंगाचा आकार वाढू लागतो. या सर्व गोष्टी स्वीकारणे त्यांच्या दृष्टीने खूप अवघड जाते. पालक उघडपणे बोलत नाहीत. या सर्व हार्मोनल बदलांमुळे त्यांच्या कृतीत बदल दिसतो. या आपल्याला समस्या वाटतात, पण ते वर्तणुकीतील बदल किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या क्रिया असतात.

बऱ्याचशा शाळांमध्ये मोठ्या मुलांबरोबर (१८ वर्षांवरील) काम करत असताना हे बदल दिसून येतात. जसे की सातत्याने शिक्षिकांशी बोलणे, सतत स्वतःच्या लैंगिक अवयवांना हात लावणे, मोठ्याने बोलणे, इतरांना मारणे किंवा शिव्या देणे यामुळे इतरांचे लक्ष वेधून घेतले जाते. बऱ्याचदा मुलं-मुली एकमेकांच्या जवळ जातात. अंगाला हात लावून आपल्या भावना व्यक्त करतात. उदा. शिक्षिकांना तुमची साडी छान आहे, छान दिसत आहे असे बोलतात, बऱ्याचदा ही मुलं त्यांच्या शिक्षिकेमध्ये आई, बहिण, मैत्रीण, प्रेयसी अशी विविध रूपे शोधून बोलतात. जसे की निलेश (नाव बदलले आहे) नेहमी आम्हाला म्हणतो की आपण बागेत जाऊयात, एकाच बाकावर बसून कोल्ड ड्रिंक घेऊयात, गाडीवरून पिक्चरला जायचे आहे, गप्पा मारायच्या आहेत. या संभाषणानंतर शिक्षिकेने न चिडता त्यांच्याशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारल्या व त्याच्या मनात चालणारा गोंधळ कमी केला. यावेळी शिक्षिकेने हा अशा गप्पा कसा काय मारतो? लाज नाही वाटत? मी त्याची शिक्षिका आहे, अशा प्रकारचे कुठलेही विचार मनात आणू नयेत. उलट त्याच्याशी मोकळेपणाने बोलावे. मैत्री, प्रेम या नात्यांचा अर्थ निखळपणे विविध पद्धतीने समजावून द्यावा, कारण टी. व्ही., वर्तमानपत्रे, पुस्तके याचा पगडा मुलांवर असतो. ही मुले इतरांचे अनुकरण करत असतात.

आपल्या विद्यार्थ्यांना कुणी नाकारले आहे हे सहन होत नाही. कारण प्रत्येकाला स्वाभिमान प्रिय असतो. म्हणूनच तो प्रत्येकाने जपला पाहिजे. एकदा ट्रीपनंतर असाच एक अनुभव आला. शाळेतील एका मुलीला शाळेतलाच एक मुलगा आवडू लागला. पण ती ते बोलू शकत नव्हती. हे थोडे चेष्टेने घेतले गेले. पण ती खूप अस्वस्थ होती. यातूनच आपण कोणाला आवडत नाही हा गैरसमज तिने करून घेतला आणि ती नैराश्यामध्ये गेली. यातूनच तिच्या वर्तणुकीच्या समस्या वाढीस लागल्या. सतत तिचे मूड्स बदलायला लागले.

हे सर्व पाहता प्रकर्षाने असे जाणवते की, या मुलींनी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर राहावे, जिथे त्यांचे विचार, रोजच्या घटना यांची देवाण-घेवाण होईल. मैत्रीचं नातं निर्माण होईल. कारण त्यांना त्यांचा ग्रुप हवा असतो. या मुलांचे लग्न हा फार पुढचा विचार आहे. पण त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय म्हणून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा एक पर्याय होऊ शकतो का? याचा विचार पालकांनी जरूर करावा. “समाज काय म्हणतो यापेक्षा आपल्या मुलांचा आनंद कशात आहे याचा विचार करूया.” यामध्ये आपल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार हा विचार करावा. ही जबाबदारी एकाच पालकाची नसून मुलगा व मुलगी या दोन्ही पालकांची आहे. यामध्ये एकमेकांबद्दल असलेले शारीरिक आकर्षण हे कालांतराने कमी होऊन हे नाते एक निखळ मैत्री व खऱ्या अर्थाने एक सहजीवन होईल. यासाठी समुपदेशक, डॉक्टर यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे आणि मुलांना जबाबदारीची जाणीवही करून द्यावी.

लग्न म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने अनेक सामान्य माणसांनाही समजलेले नसते, तर आपल्या मतिमंद मुलांना समजणे खूप अवघड आहे. काम करताना आलेल्या अनुभवातून, विद्यार्थ्यांशी केलेल्या गप्पांतून असे लक्षात आले की मुळात त्यांना पालकांच्या दबावामुळे, आग्रहामुळे लग्न करायचे असते. हे मुख्यतः सौम्य व मध्यम स्वरूपाच्या मतिमंद मुला-मुलींमध्ये दिसून येते. लग्न करण्याबाबतचे विचार किंवा खाद्य आपणच त्यांना पुरवित असतो, तेव्हा पालकांनी त्यावर विचार करावा. मुळात त्यांच्या दृष्टीने लग्न म्हणजे मजा, छान छान कपडे घालणे, छान जेवण करणे, तिच्याबरोबर किंवा त्याच्याबरोबर फिरायला जाणे, गप्पा मारणे, पिच्चरला जाणे; एवढचं असतं. मतिमंद मुलं-मुली ही निरीक्षणातून शिकत असतात. तेव्हा पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्याशी चांगला संवाद करणं गरजेचं आहे.

कलिका मुजूमदार,
माधवी ओगले व्यावसायिक शाळा, प्रिझम फौंडेशन, पुणे

संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘शरीर साक्षरता  सर्वांसाठी ‘  या  मतिमंद मुला – मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील आहे. 

चित्र साभार : http://shriumrikar.blogspot.in/2014/04/blog-post.html

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap