गोष्ट शरीराची… मनाची… सत्र १.

‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध मुला-मुलींसाठी प्रकाशित केलेल्या संसाधनाविषयी आपण जाणून आहातच.. १५ ऑक्टोबर या जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून वेबसाईटवर नव्याने सुरु झालेल्या ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विभागात अंध मुला-मुलींच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी लेखमाला सुरु करत आहोत.. ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या संचामध्ये अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तक, ऑडीओ सीडी, पालक-शिक्षकांसाठी मार्गदर्शिका या संसाधनांचा समावेश आहे. यातील ब्रेल पुस्तकात मुला-मुलींसाठी जे पाठ किंवा सत्रं लिहिली आहेत, त्यातील पहिलं सत्रं ‘आपण कुठून आलो?’ हे आहे. या प्रत्येक सत्राविषयी अंध मुला-मुलींच्या पालक/शिक्षकांनी या मुला-मुलींशी कसा संवाद साधायचा… हा विषय नेमका काय आहे? हे सारं मार्गदर्शिकेतून पालक-शिक्षकांसाठी मांडण्यात आलं आहे.

आता हे सारं… मार्गदर्शिकेतील एक-एक पाठ अनुक्रमे दर महिन्याला वेबसाईटवर प्रकाशित केला  जाणार आहे. पालक आणि शिक्षकांनी आवर्जून वाचलंच पाहिजे असं काही…

 आपण कुठून आलो? (उत्क्रांती)

‘मी कुठून आले?  मी कसा जन्मलो?’ कधी ना कधी मुलं हा प्रश्र्न विचारतातच! आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मिळत असतात. बहुतेक उत्तरांमधून पालकांचा अवघडलेपणा तरी दिसतो किंवा माहितीचा अभाव तरी. ‘देवानं दिलं’, ‘आभाळातून पडलास’, किंवा ‘दवाखान्यातून आणलं’, ‘रस्त्यात सापडलीस’ किंवा ‘कुणीतरी दिलं तुला’ अशी उत्तरं सर्रास दिली जातात. आपण आपल्या आईच्या पोटातून जन्माला आलो आहोत हे फारच कमी मुलांना माहीत असतं. खरं तर मोठ्या माणसांनाही सगळ्यांनाच गर्भधारणा आणि जन्माच्या संपूर्ण प्रक्रियेची शास्त्रीय माहिती असतेच असं नाही.

पण प्रत्येकालाच आपल्या जन्माबद्दल, आपण या जगात कसे आलो याबद्दल खूप कुतूहल असतं. आपण, आपले आई-वडील अगदी आपले आजी-आजोबादेखील स्त्री-पुरूषाच्या बीजांच्या संयोगातून निर्माण झाले आहेत. अगदी पहिल्या मानवापर्यंत सर्वांचा जन्म असाच झाला आणि मानव कसा तयार झाला? मानवाची उत्पत्ती सस्तन प्राण्यांमधून, सस्तन प्राण्यांची सरपटणाऱ्या प्राण्यांमधून आणि त्यांची माशातून (मासा)… ही साखळी अशीच मागे मागे जात राहते. कीटक, अळ्या, बहुपेशीय जीव, त्याआधीचे एकपेशीय जीव, त्यांच्याही आधी असणारे जीवाणू आणि त्याआधीची केवळ काही रसायनं… चार अब्ज वर्षाहून अधिक काळ चालू असलेली ही उत्क्रांतीची अखंड साखळी आहे. आपण म्हणजेच या साखळीतले ‘होमोसेपियन’ या उत्क्रांतीतली अगदी अलीकडची निर्मिती आहोत. हे माहीत करून घेतल्यामुळे आपलं आणि आपल्या पर्यावरणाचं नातं, एकमेकांवर अवलंबून असणारी जीवनचक्र समजून घ्यायला मदत होते.

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपलं शरीर, मन आणि कौशल्यं बदलत, वाढत गेली आहेत. आपल्या पूर्वजांनी अनेक स्थित्यंतरांना सामोरं जाताना ही कौशल्यं आणि बदल आत्मसात केले. आता याच शारीरिक आणि मानसिक कौशल्यांमुळे आपलं आयुष्य इतकं सोपं आणि सहज झालं आहे. ही उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेणं आणि पर्यावरण आणि आपले परस्पर संबंध समजून घेऊन त्याचा आदर करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. आपण ज्या तत्वांनी, पदार्थांनी बनलो आहोत ती सर्व डायनॉसॉरच्या किंवा त्याहूनही आधीच्या काळात तयार झाली आहेत. आपलं अस्तित्व आपल्याला पुढेही टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला ही सर्व तत्त्वं, पदार्थ, रसायनं, खनिजं आणि आपलं पर्यावरण जपायला लागेल.

आपण सर्व जरी एकाच पेशीपासून आणि सारख्याच जीवांपासून उत्पन्न झालो असलो तरी उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आपल्याला वैविध्यही दिलं आणि फरकही. प्रत्येक व्यक्ती ही एकमेव, अद्वितीय आहे. पण याचा अर्थ ती दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा वरचढ आहे असा मात्र नाही. समाजात मात्र उलटंच चित्र दिसतं. वंश, जात, धर्म, वर्ण याआधारे सर्वत्रच भेद होताना दिसतात. पण हे भेद समाजाने, मानवाने तयार केले आहेत. पृथ्वीच्या जन्मापासून सुरू झालेली सर्वच जीवांच्या उत्क्रांतीची प्रक्रिया जाणून घेतल्याने आपल्या सर्वांच्या एका उगमाबद्दल समजून घ्यायला मदत होते. तसंच सामाजिक फरकांच्या आधारावर आपण जो भेदाभेद करतो त्याचा फोलपणाही लक्षात येतो. अपंगत्वाचा स्वीकार सहजपणे केला जात नाही त्यामुळे त्यावरूनही भेदभाव होताना दिसतो. मात्र जीवसृष्टीतलं वैविध्य समजून घेतलं तर परफेक्ट अशी एक प्रतिमा मान्य करणं चूक ठरतं.

टीप : ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या पुस्तकात जिथे आई किंवा पालक असं लिहिलं आहे तिथे जन्मदात्री, जन्म देणारी असा अर्थ अभिप्रेत आहे. पण काही मुलं दत्तक गेलेली असतील किंवा काही त्यांच्या आजोळी, मावशी-आत्याकडे राहत असतील. यात काहीच गैर किंवा अस्वाभाविक नाही. मात्र या मुलांच्या मनात अशा शब्दांविषयी, नात्यांविषयी काही गोंधळ होत नाही ना याबाबत आपण जास्त संवेदनशील रहायला हवं.

     समज-गैरसमज तथ्य

माकड हे आपले पूर्वज आहेत.

हा एक गैरसमज सगळीकडे आढळून येतो. पण यात तथ्य नाही. माकडं माणसाच्या आधी उत्क्रांत झाली. आपण असं म्हणू शकतो की ही आपली अगदी जवळची भावंडं आहेत.

 

शास्त्रज्ञांचं असं मत आहे की सुमारे ५-७ दशलक्ष वर्षांपूर्वी मानव आणि चिंपांझी त्यांच्या समान पूर्वजापासून वेगळे घडत गेले.

आपण काय शिकलो?

१. बहुतेक बहुपेशीय जीव बीजापासून तयार होतात.

२. सर्व सजीवांना प्रजाती टिकवण्यासाठी पुनरुत्पादन करण्याची गरज असते.

३. आपल्या सगळ्यांचा जन्म आपल्या आईच्या गर्भाशयातून झालेला आहे.

४. आपण उत्क्रांतीच्या लांबलचक प्रक्रियेतून आलो आहोत. आपण प्रत्येक जण वेगवेगळे असलो तरी आपला उगम एकाच स्थानातून झाला आहे.

५. आपलं कुटुंब, समाज आणि वंश यांच्यामध्ये सारखेपणा असू शकतो परंतु  तरीही आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळा आहे आणि हे पूर्णपणे सामान्य आहे.

६. आपला जन्म स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीज व पुरूषाच्या शरीरातील पुरूषबीजाच्या संयोगातून झाला आहे. शास्त्रज्ञांचं असं मत आहे, की सुमारे ५-७ दशलक्ष वर्षांपूर्वी मानव आणि चिंपांझी त्यांच्या समान पूर्वजापासून वेगळे घडत गेले.

हा विषय घेताना:

  • आपण कुठून आलो हा प्रश्न मुलांना विचारून त्यांना त्याबाबत असलेली माहिती सांगायला सांगा, ऐकवा. आपण कुठून आलो हे सत्र मुलांना वाचायला द्या.
  • आपली बेंबी कशी असते ते स्पर्शाद्वारे ओळखायला सांगा. बेंबीचे महत्त्व, आपला आणि आपल्या जन्मदात्या आईचा संबंध स्पष्ट करा. अंघोळीच वेळी बेंबी साफ करणं गरजेचं आहे हेही मुलांना सांगा. आपल्या सर्वांचे मूळ उत्पत्तिस्थान एकच आहे याची मुलांना जाणीव करून द्या.
  • हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सजीवांच्या उत्क्रांतीचा आपण एक भाग आहोत हे सांगून पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचे महत्त्वाचे टप्पे सांगा. मानव ही या साखळीतली अगदी अलीकडची निर्मिती आहे हे परत एकदा समजावून सांगा.

संदर्भ : वरील सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुलांसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे. 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap