अंधत्वाचे प्रकार, कारणे, उपचार
आपण अंध मुला-मुलींच्या शरीर साक्षरतेचा, लैंगिकतेचा विचार करताना, अंधत्वाचे प्रकार, कारणे, उपचार याविषयीदेखील समजून घ्यायला हवं. या चौथ्या सत्रात आपण ते समजून घेणार आहोत.
अंधत्व म्हणजे काय?
ज्या व्यक्तीला डोळ्याने दिसत नाही किंवा अगदी थोडे दिसते त्या व्यक्तीस अंध म्हटले जाते.
अंधत्वाचे प्रकार:
१) पुर्णतः अंध
२) अंशतः अंध
कारणे: अंधत्वाची कारणे ही जन्माच्या अगोदर, जन्मताना, जन्मानंतर अशी वेगवेगळी आहेत.
१) जन्माच्या अगोदर: अनुवंशिकता, गरोदर महिलेचे कुपोषण, तसेच गरोदर असताना तंबाखू, दारू, सिगारेट यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन केल्यास, लसीकरण करून न घेतल्यासही मूलाला अंधत्व येऊ शकते.
२) जन्मताना: प्रसूतीच्या वेळी डोळास झालेली इजा किंवा जंतू संसर्ग, ही मूल जन्माला येत असताना अंधत्वास जबाबदार ठरणारी कारणे आहेत.
३) जन्मानंतर: अंधत्वास जबाबदार ठरणारी जन्मानंतरची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- अ जीवनसत्वाचा अभाव असल्यास अंधत्व येण्याची भीती असते.
- तीक्ष्ण हत्यारे, पेन्सिल, कंपास, विटी, धनुष्यबाण वगैरे खेळणी टोकदार असल्याने घातक ठरतात.
- डोळ्यांवर बसणारा फटका, आघात तसेच क्लोरीन, अमोनिया अशा विषारी वायूंमुळेही तसेच आम्ल, अल्कली डोळ्यांत गेल्यामुळेही डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते.
- रक्तदाब, मधुमेह या आजारांमुळे अंधत्व येते. काचबिंदू, मोतीबिंदू हेही अंधत्वास कारणीभूत होऊ शकतात. ही वयापरत्वे येणारी कारणे आहेत.
- अल्बिनो आणि अंध आणि कर्ण-बधिर (श्रवणदोष असणारे) हेही अंधत्वाचे प्रकार आहेत.
रंगहीनता (अल्बिनो): मेलॅनिन या प्रथिनाच्या कमतरतेमुळे किंवा मेलॅनिन अजिबातच तयार होत नसेल तर या प्रकारचे अंधत्व येते. त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग येण्यासाठी या प्रथिनाची आवश्यकता असते. अल्बिनो पूर्ण अंध असतील असं नाही. मात्र त्यांची दृष्टी अतिशय अंधुक असते. कायद्याने या व्यक्तींना अंध मानण्यात आलं आहे. अल्बिनिझम आई-वडील दोघांकडून आलेल्या विशिष्ट जनुकांमुळे होतो आणि तो संसर्गजन्य नाही. तसंच या आजाराचा बहिरेपणाशी आणि मतिमंदत्वाशीही थेट संबंध नाही. अल्बिनो व्यक्ती या कमी दृष्टी असणाऱ्या आणि सूर्यप्रकाशाला जास्त संवेदनशील असणाऱ्या नॉर्मल व्यक्ती आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे.
सूर्यप्रकाशातील घातक किरणांपासून रक्षण करणारे मेलॅनिन हे रसायन शरीरात नसल्यामुळे सनबर्न किंव त्वचा भाजल्यासारखी होणे असे आजार होऊ शकतात. थेट आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून मुलांचं रक्षणकरण्यासाठी अंगभर कपडे घालणं आणि शक्य असेल तर सनस्क्रीन क्रीमचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
अल्बिनो मुलांच्या डोळ्यांची सतत हालचाल होत असते. त्यावर त्यांचा ताबा नसतो. राग आल्यावर किंवा काही कारणाने चिंतेत असले तर ही हालचाल वाढते.
अंध आणि कर्ण-बधिर (डेफ ब्लाइंड) : दृष्टी नाही आणि ऐकू येत नाही असं गंभीर स्वरुपाचं अपंगत्व म्हणजे डेफब्लाइंड किंवा अंध आणि कर्णबधिरत्व. या अपंगत्वामुळे संवादामध्ये आणि हालचालींमध्ये अडचणी येतात. बौध्दिक, सामाजिक विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो. वाढीचे टप्पे उशिरा पूर्ण होतात.
डेफब्लाइंड या अंधत्व प्रकारात चार गट पडलेले आहेत.
१) जन्मतः बहिरे आणि अंध आहेत – गरोदरपणी स्त्रीला रुबेला (जर्मन गोवर) या आजाराची लागण झाल्यास जन्मणाऱ्या बाळामध्ये अंधत्व आणि बहिरेपणा येऊ शकतो.
२) जन्मतः बहिरेपण असतं आणि नंतर दृष्टि जाते, हे अशर (USHER) सिंड्रोममुळे होतं, ज्यामध्ये बहिरेपणा असतो नंतर दृष्टी हळूहळू कमी होत जाते.
३) जन्मतः अंधत्व असतं आणि नंतर बहिरेपणा येतो.
४) म्हातारपणी आजार किंवा अपघातामुळे दोन्ही प्रकारचे अपंगत्व येते.
आपण जे काही शिकतो त्यातील ९५% भाग हा पाहून आणि ऐकून शिकत असतो. त्या दोन्ही क्षमता नसतील तर शिकण्यावर आणि गोष्टी आपणहून समजण्यावर बऱ्याच मर्यादा येतात. खाण्या-पिण्याच्या, राहण्याच्या, वागण्याच्या अनेक गोष्टी आपण इतरांकडे पाहून शिकत असतो. या प्रकारचं अपंगत्व असणाऱ्या मुलांना यातल्या अनेक गोष्टी शिकता येत नाहीत.
उपचाराच्या पातळीवर –
- सर्वप्रथम डोळ्यांच्या डॉक्टरांकडून मुलाची तपासणी करणे आणि त्यानुसार किती दृष्टी आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे.
- अंध मुलांसाठी मोबिलीटी ट्रेनिंग म्हणजेच म्हणजेच एका जागेहून दुसऱ्या जागी जाण्याचे, बाहेर फिरण्याचे, आपल्या भोवतालचा परिसर समजून ट्रेनिंग खूप आवश्यक असते.
डोळ्यांची काळजी –
- डोळ्यांत रंग, गुलाल, साबण, इतर रासायनिक पदार्थ जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- डोळे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा, स्वच्छ कापडाचा वापर करावा.
संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे.
No Responses