गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ३.

 

आपले आरोग्य आपल्या हातात

आपलं आरोग्य नीट राखणं आपल्याच हातात कसं आहे याचं उत्तर या सत्रातून मिळेल. आपल्यापैकी बहुतेकजण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापलीकडे सहसा आपल्या शरीराचा विचार करत नाहीत. त्यामुळे आपल्या शरीराबाबतच्या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीही आपल्याला माहित नसतात. पण प्रत्येकालाच स्वतःच्या शरीराबाबतची किमान माहिती असणं गरजेचं आहे. अगदी साध्या आजारांमागील कारणं, त्यावरचे साधे उपचार समजले तरी आपण आपलं शरीर खऱ्या अर्थानं समजू शकतो, असा एक विश्वास आपल्याला मिळतो. या दृष्टीनं हे सत्र महत्त्वाचं आहे.

भाग १. साध्या आजारांची माहिती :

ताप, सर्दीखोकला, डोकेदुखी हे नेहमी आढळणारे आजार आहेत. यावरील उपचारांसाठी आपण गरज नसताना बराच वेळ व पैसा वाया घालवत असतो. मुलांना या आजारांमागची खरी कारणं आणि शास्त्रीय उपचार वाचून त्याची माहिती सांगा. घरीच करता येण्यासारखे साधे सोपे उपाय मुलांना समजतील. ताप का आणि कसा येतो? तो कसा मोजायचा? हे समजून घेत असतानाच तापमापी वापरुन ताप मोजायला मुलांना मजा येते. ताप आल्यावर काय करावं याचे सोपे उपाय सांगून मुलांना त्यांचे अनुभव सांगायला सांगा.

आपल्या देशात रक्तपांढरी हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो. रक्तपांढरी या आजारासंबंधीची माहिती मुलांसोबत वाचा. रक्तपांढरी म्हणजे काय? ती ओळखावी कशी? ती रोखण्यासाठी काय  उपाय  करावेत? याबाबत मुलांना विचारा. मुली आणि स्त्रियांमध्ये रक्तपांढरी जास्त प्रमाणात आढळते, याची माहिती द्या. लोहयुक्त आणि क जीवनसत्वयुक्त पदार्थ मुलांना माहिती करून देऊन आहारातील त्यांचे महत्व पटवून द्या

भाग २. समतोल आहार :

समतोल आहार म्हणजे काय, समतोल आहाराची निवड कशा प्रकारे करायची हे मुलांना सांगा. कोणत्या पदार्थातून कोणते पोषण घटक शरीराला मिळतात याची नीट माहिती द्या. काही वेळा योग्य व पुरेशी माहिती न मिळाल्यामुळेदेखील आहार समतोल होत नाही. हे उदाहरणं देऊन मुलांना समजावून सांगा. उपलब्ध पैशांमध्ये उपलब्ध पदार्थांतून पौष्टिक आहार घेता येतो हेही मुलांना सांगा.

समज-गैरसमज तथ्य
मुलींना मुलांपेक्षा कमी अन्न पुरतं.

 

 

हा गैरसमज आहे. शरीराच्या वाढीसाठी मुलांना आणि मुलींना सारख्याच प्रमाणात सकस व पौष्टिक आहाराची गरज असते. वाढीच्या काळात सर्व मुला-मुलींनी दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी आहार घ्यायला हवा.
सर्दी झालेली असताना केळी, पेरू, लिंबू, चिंच, आवळा असे इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत. हा गैरसमज आहे. सर्व आंबट पदार्थांमध्ये क जीवनसत्त्व असते. क जीवनसत्त्व आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती देते. त्यामुळे सर्दी-खोकला झाला असताना आंबट फळे खाल्ली तरी त्याचा काही अपाय होत नाही.
पौष्टिक अन्न खाण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. हा गैरसमज आहे. कोणत्या पदार्थातून कोणते पौष्टिक घटक मिळतात हे आपल्याला माहीत असेल तर आपण कमी खर्चामध्ये आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या आणि सहजपणे उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधून पौष्टिकद्रव्ये मिळवू शकतो. पौष्टिक अन्न शरीराला मिळण्यासाठी केवळ महाग पदार्थ खाण्याची गरज नसते.
उपवास म्हणजे पोटाला आराम. आपल्या शरीरात विविध संस्था त्यांना नेमून दिलेली कामे/प्रक्रिया करत असतात. त्यांची विश्रांती घेण्याचीसुद्धा आपापली पद्धत असते. उपवासामुळे या सर्व संस्थांवर ताण येतो. उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जास्त पिष्टमय पदार्थच असतात त्यामुळे त्याचा पचनावर ताणच पडतो.

संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे. 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap