वयाच्या 45-50च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं.
पाळी जाण्याचा काळ काही महिने ते काही वर्षं इतका असू शकतो. शेवटच्या मासिक चक्राच्या आधीचा आणि नंतरचा काळ म्हणजे पाळी जाण्याचा काळ. पाळी जाण्याआधी काही वर्षं ती अनियमित होऊ शकते. काही जणींची पाळी चक्रं लहान होऊ लागतात तर काही जणींच्या दोन चक्रात बरंच अंतर पडतं. काही जणींचे पाळीचे दिवस आणि रक्तस्राव कमी होतो तर काही जणींना जास्त दिवस, गाठीयुक्त आणि जास्त रक्तस्राव होऊ शकतो. या काळात सलग एक वर्ष पाळी आली नाही तर पाळी गेली असं समजायला हरकत नाही.
मेनोपॉज (पाळी जाणे) – मेनोपॉज म्हणजे पाळी जाणे. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सलग 1 वर्ष बाईला पाळी आली नाही तर तिची पाळी गेली असं समजलं जातं. पाळी जाण्याच्या प्रक्रियेचे दोन मुख्य टप्पे आहेत.
प्री मेनोपॉज – पाळी जाण्याच्या आधीचा काळ – पाळी पूर्णपणे जाण्याच्या आधीचा हा काळ आहे. हा काळ 2 ते 10 वर्षं असा कितीही असू शकतो. या काळामध्ये स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरकं कमी प्रमाणात तयार व्हायला लागतात. वयाच्या 45 ते 55 या काळात ही प्रक्रिया घडू शकते. या काळात संप्रेरकांचं संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडतं.
पोस्ट मेनोपॉज – पाळी गेल्यानंतरचा काळ – पाळी थांबल्यानंतर शरीर जेव्हा संप्रेरकांच्या बदललेल्या स्थितीशी सामावून घेते तो हा काळ आहे.
पाळी जाण्याच्या काळात इस्ट्रोजनच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरातून गरम वाफा येणं, घाम फुटणं, योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं असे बदल होतात. रक्तदाब वाढणं, हृदयविकार आणि हाडं ठिसूळ होण्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
हे बदल समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांचा आपल्या शरीरावर, भावभावनांवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे लैंगिक इच्छा आणि भावनाही त्यानुसार बदलत असतात. हे बदल आणि स्थित्यंतरं समजून घेणं हा शरीर साक्षरतेचा महत्त्वाचा भाग आहे.
No Responses