आज २१ व्या शतकातही उच्चवर्णीय असो अथवा मोलमजुरी करणारी स्त्री असो, कोणत्याही वर्गातली, कोणत्याही समाजातली असो, विवाहित/अविवाहित असो अथवा विधवा असो; स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावूनही भारतीय स्त्री ही कायम दुय्यम स्थानीच असते आणि तिचं ते दुय्यम स्थान इतर सर्व जगासोबत तिने स्वतःही गृहीत धरलंय. त्यामुळंच स्त्रियाही या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या बळी पडून वाहक झालेल्या आहेत. हे आजही दुर्दैवी वास्तव आहे, याचंच उदाहरण थप्पड या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे.
आपल्या घरासाठी एखादी मुलगी लग्न करून तिचं पूर्ण आयुष्य खर्ची करत असेल तर तिला आपल्याकडून त्या प्रती योग्य तो आदर आणि प्रेम मिळालं पाहिजे याची काळजी घेण्याचा एक धडा मुलालाही शिकवला गेला पाहिजे, ही काळाची गरज थप्पड या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आली आहे.
थप्पड हे एक पुरुषप्रधान विचारांचं रिफ्लेक्शन असलं तरी इतर अनेक कृती ज्या हेच विचार दर्शवतात; मग ते प्रत्यक्ष थप्पड न मारता अनादर करणाऱ्या शब्दांचा जाचक मार असो वा सोयीनुसार बदललेल्या भूमिका असो.. अशा प्रत्येक अन्यायाच्या क्षणी मुलीला ज्या मानसिक आधाराची गरज असते आई-वडिलांकडून कारण त्यांच्या संसारात त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचं निरीक्षण करतच मुलीचं विचार/भावविश्व घडत असतं. त्यामुळे आई-वडिलांमधील नातं ज्या पायावर उभारलं आहे तो पायाही आदरयुक्त, विवेकी प्रेम, समानता आणि समंजसपणा, विश्वासाचा असेल तर ही थप्पड काय पण तिच्यामागे असलेल्या संकुचित पण वर्चस्वशाली विचारांचाही शिरकाव कुठे होत नाही, परिणामी हे चित्र पाहणाऱ्या तरुण मुला-मुलींच्या विचारविश्वातही मग हा विषय कधी येऊ शकत नाही! हे पालकांनीही समजून घ्यायला हवं यातून.
पुरुषप्रधान व्यवस्थेत जगताना मुलींनी, स्त्रियांनी आपणही त्याच्या वाहक बनत नाहीयत ना? वाहक बनून आपल्या पुढच्या पिढीकडे आपण ही संकुचित विचारांची चौकट पास करत नाहीयत ना? परिणामी समस्त स्त्री-वर्गावर होण्याऱ्या अन्यायाला आपणही कुठंतरी कारणीभूत नाहीयत ना? हे तपासायचं असेल तर, स्त्रियांनी हा चित्रपट नक्की पहावा. जेणेकरून तसं होत असेल तर त्यांना त्यांची चूक गवसून योग्य त्या सुधारणेला वाव मिळेल.
तसंच पुरुषांच्या बाबतीतही म्हणता येईल. मुलांनीही हे तपासण्याची गरज आहे की आपण आपल्या गर्लफ्रेंडसोबत/ बायको सोबत वागताना तिचा आत्मसन्मान दुखावला जात नाही ना, तिचं व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपण अबाधित राहील याची काळजी घेतोय ना. म्हणजेच तरुण मुलं-मुली, पालक (असलेले आणि होऊ पाहणारेसुद्धा आणि ज्येष्ठ सुध्दा!) अशा सर्वांनी हा चित्रपट पहावा.
प्रस्थापित पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय क्षुल्लक असणारी एक थप्पड! ती सहन करणारी स्त्री तीच थप्पड त्या व्यवस्थेवर उलटवण्याचं आत्मधैर्यही बाळगते हे मात्र या समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.
– अस्मिता नेवसे
——–
चित्र साभार : t series
2 Responses
खूप छान मांडलं आहेस तू अस्मिता!! हा विषय इतका मोठा आहे, त्यावर करू तेवढी चर्चा कमीच आहे!; स्त्री पुरुष समानता हा खूप क्लिष्ट मुद्दा आहे! त्यावर वेगवेगळे विचार, मत आहेत लोकांचे. काही गोष्टी, सवयी इतक्या वाईट रुजलेल्या आणि रुतलेल्या आहेत मनात की त्या चुकीच्या आहेत असं कुणालाच वाटत नाही, हे फार भयंकर चित्र आहे!”माझा नवरा खूप चांगला आहे, मला कामात मदत करतो!? मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाई!! मला त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय!!” हे आणि असे बरेच विधानं आपण ऐकत असतो, प्रसंगी बोलून पण गेलेलो असतो!; तेव्हा जाणीव होत नाही की असं बोलून आपण स्वतःच एका नकळत बंधनात स्वतःला बांधून घेतलेलं आहे आणि त्यातच वावरत असतो!! हे बदलणं गरजेचं आहे..
@ प्राची..
खरं आहे अगदी. स्त्रिया स्वतःच त्यात किती खोलवर रुतल्यात हे त्यांनाही समजत नाही. पण आपण आपल्या आजूबाजूच्या शक्य तेवढ्या स्त्रियांना आपापल्या परीने छोट्या छोट्या गोष्टींतून हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. मग चित्र बदलू शकतं.