कालिदास : मेघदूत – लैंगिकता व संस्कृती १०

भाग पहिला – कालिदास : मेघदूत

गेली किमान दीड हजार वर्षे भारताच्या साहित्यविश्वात आपले अढळ स्थान निर्माण करणारा कविकुलगुरु कालिदास हा गेल्या दोनशे वर्षात जगभर जाऊन पोचला. असे म्हणतात की कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम् या नाटकाचे भाषांतर वाचून प्रभावित झालेला प्रख्यात जर्मन कवी गर्टे हा ते पुस्तक अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचला होता.  दोन महाकाव्ये, तीन नाटके व दोन खंडकाव्ये ही कालिदासाची ग्रंथसंपदा.

कालिदासाचा जीवनकाळ निश्चित करता येत नसला तरी तो वर्तमानगणनेच्या चौथ्या पाचव्या शतकात मानला जातो. राजेशाही व्यवस्थेने मूळ धरले असल्याने काही अंशी स्थिरता आली होती. शेतीचा विस्तार होऊन उत्तर-दक्षिण भारतातील दळणवळणाचे मार्ग जैन-बौद्ध भिक्षूंच्या भ्रमंतीमुळे खुले होऊन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत होता. पूर्वीच्या तुलनेत वर्णाधिष्ठित समाजाला संपन्नता आली होती. राजे कलांना प्रोत्साहन देत होते. ईश्वरस्तवने तशी राजस्तवने रचली जात होती. पाचसहा  शतकांच्या ग्रीक वस्त्यांमुळे या काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती. अभ्यासकांच्या मते ग्रीक व भारतीय सांस्कृतिक प्रवाहांच्या संगमामुळे नाट्य-काव्य-स्थापत्य या कला आणि खगोल-वैद्यक ही शास्त्रे यांना नवीन ऊर्जा मिळाली. वर्गसंस्कृती व लोकसंस्कृती यांची फारकत झाली होती की नाही हे समजणे कठीण आहे.  सत्ता व संपत्ती धारण करणारे अभिजन व इतर सामान्य जन यांना सारखाच आवडणारा कलाप्रकार म्हणजे नाटक. कालिदासाचे जे वचन पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात लावले आहे, त्याचा अर्थ जवळपास तसा आहे – नाट्यं भिन्नरुचेर्जनस्यबहुधाप्येकं समाराधनम्।

कालिदासाने सुरवातीला रामायण-महाभारतातली कथानके निवडून त्यात आपल्या प्रतिभेने नवीन प्राण ओतला. नंतर मात्र मेघदूतासारखे अगदी वेगळ्या धाटणीचे खंडकाव्य लिहून आपल्या प्रतिभेचा अनोखा आविष्कार घडवला. त्याच्या साहित्यात सदैव खळाळणारा प्रवाह म्हणजे शृंगाररस आणि त्याच्या उत्कर्षासाठी प्रेमिकांचे मीलन, ताटातूट, हुरहूर, घालमेल आणि हे सारे होत असताना प्रेमिक निसर्गात आपले प्रियजन पाहत असतात, या सर्वाचे मनोरम चित्रण त्याने केले. आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे कुबेर यक्षाला वर्षभर अलकापुरीपासून दूर दक्षिणेत रामगिरी पर्वतावर पिटाळतो.  पत्नीच्या विरहाने तळमळणारा यक्ष ढगाकरवी तिला निरोप पाठवण्याचे ठरवितो. धूर, प्रकाश, वाफ आणि हवा यांच्या मिश्रणाने बनलेला तो ढग कसा संदेश वाहून नेईल? पण कामपीडित यक्षाला हे चेतन-अचेतनातले अंतर कसे कळावे, हे कवी सुरवातीलाच नमूद करतो. यक्ष मेघाला सांगतो की तुझी मोहिनी अशी आहे की पतीच्या परतण्याची वाट पाहणाऱ्या स्त्रिया तुला पाहून ‘लवकरच ते येतील’ म्हणून आश्वस्त होतात तर प्रेमी पुरुष प्रियेकडे जाण्यास तत्पर होतात. रामगिरीवरून अलकापुरीस जाताना तुला काय काय दिसेल याचे मनोरम वर्णन कवी करतो.  आम्रकूट पर्वतशिखरावर आमराई मधे अन् सभोवती पठार हे तुला स्तनासारखे दिसेल, असे सांगताना यक्षाच्या विरहावस्थेला सूचक स्पर्श कवी करतो. “या पर्वताच्या वनराईमधे तू काही काळ विश्रांती घे. या ठिकाणी वनचर आणि त्यांच्या कामिनी प्रणयक्रीडा करतात, इतके ते रम्य ठिकाण आहे. मधेमधे तू गरजशील तेव्हा भीतीने प्रियतमा आपल्या प्रियकरास घट्ट बिलगतील आणि म्हणून प्रियकर तुला मनोमन धन्यवाद देतील.”

यानंतर कवी अधिकाधिक धीटपणाने यक्षाच्या तोंडून मार्गातल्या शृंगारवैशिष्ट्यांचे वर्णन करू लागतो. “विदिशा राजधानीजवळच्या पर्वतावर विश्राम कर, तेथल्या गुहा सुगंधित असतात कारण तिथे नागरजनांचे रंजन वेश्या करीत असतात. उज्जयिनीतल्या विजांच्या कडकडाटाने भयभीत होऊन चंचल नयनांचे कटाक्ष टाकणाऱ्या ललनान पाहता जर तू निघालास, तर आयुष्यातल्या अनोख्या आनंदास मुकशील. नंतर निर्विंध्या नदीपाशी येशील तेव्हा पाण्यातले भोवरे जणू तिच्या अर्धवट उघड्या बेंबीसारखे दिसतील. तिची लगबग म्हणजे तुझ्याबद्दल तिला वाटणाऱ्या ओढीचा सूचक इशारा समज. मग तुझ्या विरहाने सुकून गेलेली सिंधू नदी लागेल. तिच्या तीरांवरचे वृक्षपानगळीमुळे खिन्न भासतील. तिचे आराधन करण्याचा उपाय तुला ठाऊक आहेच. मग विशाला नगरीजवळ शिप्रा नदीवरून वाहत येणारा वारा लागेल. तो सारस पक्ष्यांचा कलरव आणि कमळांचा सुगंध पसरवतो, जणू मिलनाच्या रात्रीनंतर प्रियतमेला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी प्रियकर गुजगोष्टींनी तिचे मन रिझवतोय असे वाटावे.

पुढे गेल्यावर तू हलकेच बरसल्यावर रोमांचित झालेल्या नर्तकी तुझ्याकडे असे नेत्रकटाक्ष टाकतील की त्यामुळे तुला धन्य वाटेल. मग रात्र होताना तू काळजी एवढीच घे की वीज चमकवून प्रियकराच्या घरी जाण्यास निघालेल्या रमणींना वाट दाखव, पण गडगडाट करू नकोस, कारण त्या तेवढ्याने गडबडून जातील. पहाट झाल्यावर सूर्योदय होण्याच्या आत तू दृष्टीआड हो, सूर्यदेव कमलिनीचे आसू पुसण्यास येत असतील. हीच वेळ असते पुरुष आपल्या पत्नीची समजूत काढतात की इतर स्त्रियांबद्दलचे त्यांचे आकर्षण क्षणिक होते.  गंभीरा नदी मधले मासे उसळी मारत असतील, जणू ती तुझ्याकडे नितांत प्रेमाने पाहत असेल. तूदेखील गंभीरतेने तिचे निरीक्षण कर. तिच्या तटावर दाटलेल्या वेताच्या झाडीने असे भासेल की जलरूपी वस्त्र नदीतीरावरून घसरले आहे. स्त्रीसमागमाचे सुख भोगलेल्या पुरुषाला अशा अर्धावृत स्त्रीची ओढ न वाटली तरच नवल!

मग तू अलकानगरीस पोचशील, तेव्हा कसे ओळखशील की ही तीच अलका? तिच्या गंगारूपी वस्त्राचा भाग तिचा जणू प्रियकर भासावा असा कैलास पर्वत त्याच्या कुशीत विसावलेला दिसेल. तिथल्या स्त्रियांच्या अंगांगावर सहा ऋतूंमधे मिळणारी वेगवेगळी फुले माळलेली तुला दिसतील. इथे लोकांच्या डोळ्यात आसवे येतात ती आनंदाश्रूंची, ताप होतो तो प्रियजनांच्या ताटातुटीचा, तोंडे फिरवतात ती प्रेमिकांच्या गोड कुरबुरींमुळे अन् तारुण्याशिवाय दुसरे वयच कुणाला ठाऊक नाही. अशी ही रसिकजनांची रसीली नगरी, अलका! इथले रत्नदीपही अशा उंचीवर शयनगृहात ठेवलेले असतात की प्रियकराने कामक्रीडेची सूचक हालचाल करताच ती रमणी दिवे मालवण्याचा प्रयत्न करते खरी, पण तिला ते जमत नाही. मग रतिक्रीडेने आलेला तिचा थकवा दूर करण्याचे काम चंद्रकिरण करतात छताला टांगलेल्या चंद्रकांत मण्यांद्वारे.  सूर्योदय झाल्यावर या नगरीतल्या उद्यानाजवळ विखरून पडलेली फुले, कमळाच्या पाकळ्या आणि हारातले मोती इथून लगबगीने गेलेल्या अभिसारिकांकडे निर्देश करतात.  अभिसारिका म्हणजे रात्री धोका पत्करून प्रियकरास भेटायला जाणाऱ्या प्रेमिका.” एवढे सर्व रसभरित वर्णन केल्यावर आपल्या घराचा पत्ता यक्ष मेघाला समजावून सांगतो.

कुबेरसदनाच्या उत्तरेला घराबाहेर पत्नीने मोठ्या आवडीने लावलेला अन् प्रेमाने वाढविलेला मंदार वृक्ष दिसेल. घराजवळ तळे, तळ्यात सुवर्णकमळे आणि त्यात विहरणारे हंस दिसतील. तुला पाहून त्यांना मानस सरोवराचा विसर पडेल. तिथे माझी प्रियपत्नी मोराला नाच शिकविते, त्यावेळेस टाळी देताना तिच्या हातातील कंकणाची किणकिण तुला ऐकू येईल. अर्थात घराची रया गेल्याचे तू तेव्हाच ओळखशील. मग तुला दिसेल माझी प्रिया.”  तिचे वर्णन करताना यक्ष रंगून न जाता तरच नवल! तिच्या अवयवांचे वर्णन करून यक्ष म्हणतो की विधात्याने घडविलेली स्त्रीची ती जणू पहिलीच प्रतिमा भासावी. तिचे डोळे सुजले असतील अन् ओठ सुकले असतील. पिंजऱ्यातल्या मैनेला ती विचारत असेल, “तुझी पण आठवण येत असेल ना त्यांना?” वीणा घेऊन बसली असली तरी ते गाणे तिला काही केल्या सुधरत नसेल. झोप येत नसल्याने खिडकीजवळ उभी राहून आसवे ढाळत असेल ती. रुखेसुखे केस तिच्या गालावर पसरले असतील. तिची मांडी ममस्पर्शाच्या आठवणीने कंप पावत असेल. ती निद्राधीन असेल तर तिला उठवू नकोस, कारण स्वप्नात ती मला मिठी मारीत असेल. पुरेशी वाट पाहून शीतल झुळकांनी तिला हलकेच जाग आण. तिला सांग, “मी परदेशी गेलेल्या पुरुषांना घराच्या ओढीने परत आणतो. तुझ्या प्रिय पतीचा मी मित्र. त्याचा निरोप घेऊन आलोय.” कानात सर्वस्व आणून ती ऐकत राहील. “तुझे प्रियतम कसेबसे काळ कंठीत आहेत, तुझी खुशाली जाणण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. सारखा तुला कल्पनेने जवळ घेऊन नि:श्वास टाकीत असतो मित्र माझा. म्हणून तर हा निरोप मजकरवी त्याने पाठविला आहे. वृक्षवल्ली, पशुपक्षी यातही मी तुलाच शोधत असतो, पण, हाय, तू कशी त्यात मिळणार.? शिळेवर तुझे चित्र रेखाटावे म्हटले तर डोळ्यात आसवे दाटतात अन् चित्र धूसर होत जाते. स्वप्नात तुला मिठी मारण्यासाठी बाहू पसरावे तर इथल्या स्थानदेवता गलबलून जातात अन् त्यांचे आसू टपटप गळू लागतात.  हिमालयावरून जे वारे येतात त्यांना मी आलिंगन देतो, या कल्पनेने की कदाचित तुझा त्यांना आधी स्पर्श झाला असेल. कधी संपेल हा वियोग या कल्पनेने मी झुरत राहतो. पण हाही काळ जाईल अन पुन्हा आपले मीलन होईल तेव्हा शरदाचे चांदणे आपण यथेच्छ भोगू. तुला आठवते का, एकदा माझ्या गळ्यात हात टाकून झोपली असताना तू दचकून जागी होऊन स्फुंदुन स्फुंदुन रडू लागलीस. काय झाले असे पुन:पुन्हा विचारल्यावर म्हणालीस की सवतीसमवेत मला पाहिलेस अन् ते दृश्य असह्य होते.  वेडे, आता पुन्हा तसले काही मनात आणू नकोस.” यक्ष मेघाला सांगतो की तसे आश्वासन माझ्या प्रियेला देऊन तू सत्वर परत ये. तिच्या सांकेतिक खुणा मला मिळाल्या तर ते मला संजीवनच मिळेल. तुझा देखील फार काळ तुझ्या लाडक्या विद्युल्लतेपासून वियोग होता कामा नये.

असा हा मेघदूताचा आशय आहे. त्यातून त्या काळातल्या लैंगिक व्यवहारांचे दर्शन आपल्याला घडते. इथे गणिकांना नगरजनांमध्ये रसिकांना रिझवणारी सौंदर्यवती, कलावती असे स्थान आहे. प्रियतमाला भेटण्यासाठी धोका पत्करणाऱ्या आणि स्वत:ची कामभावना-वृत्ती स्वीकारणारी अभिसारिका आहे. प्रेमाची अशरीरी, अमूर्त कल्पना कालिदासाकडे दिसत नाही. स्त्रीपुरुषांचे प्रेम हे इंद्रियोपभोगावर बेतलेले आहे आणि त्यामुळे जीवनाला एक नित्यनूतनत्व येते, असे अलकानगरीच्या वर्णनातून कालिदास सूचित करतो. या प्रेमाची एकांतरम्यता म्हणजे प्रियकर-प्रेयसी यांनाच ठाऊक असणारी गुपिते कालिदास यक्ष-मेघाच्या माध्यमातून बहारदार रीतीने व्यक्त करतो, हे मेघदूताचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. मराठीत मेघदूताचे अनेक अनुवाद झाले, त्यात चिंतामणराव देशमुख, वसंत बापट आणि शांता शेळके यांचे ठळक दिसतात.  मेघदूतात साहित्यिक दृष्टीने शृंगाररस आहे आणि समाजेतिहास या दृष्टीने पाहिले तर लैंगिकतेचा नागरसंस्कृतीतला आविष्कार त्यात पाहायला मिळतो.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap