नुकत्याच (२५ जाने १९) निवर्तलेल्या ज्ञानपीठ विजेत्या हिंदी साहित्यिक कृष्णा सोबती यांची ही गाजलेली कादंबरी – ‘मित्रो मर जा नी ‘ १९६६ मध्ये त्यांनी ती लिहिली त्यावेळी त्या ४१ वर्षांच्या होत्या आणि अविवाहित होत्या. त्यांनी एकमेव विवाह केला तो वयाच्या सत्तराव्या वर्षी. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी कथा लेखनाला सुरुवात केली. जिंदगीनामा (१९८०) या त्यांच्या पुस्तकाने त्यांना हिंदी साहित्यिकांच्या अव्वल श्रेणीत नेऊन बसविले आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार ही मिळवून दिला. त्यांच्या साहित्यातली स्त्री पात्रे ही आपल्या स्त्रीत्वाबद्दल आणि लैंगिकतेबद्दल जागरूक असतात आणि एखादी धीट ही असते. त्या त्या भौगोलिक प्रदेशातील बोली भाषेचा खुबीदार वापर कृष्णाजी करतात आणि त्यातून एक थेट भावाविष्कार त्या साधतात. तत्कालीन समीक्षकांना ही स्त्रीपात्रे आणि त्यांची थेट भाषा पेलवणे हे अतिशय अवघड गेले यात काही आश्चर्य नाही. मराठीत विभावरी शिरूरकरांच्या ‘कळ्यांचे निश्वास’ या पुस्तकाने १९३३ मध्ये असेच साहित्य जगतात वादळ उठवले होते. (त्याबद्दल स्वतंत्र लेख पुढे येईल).
विसाव्या शतकाच्या मध्याला झालेली शैक्षणिक व वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक -सांस्कृतिक जागृती यांच्या परिणामस्वरूप स्त्रिया सर्वच क्षेत्रात वावरू लागल्या होत्या. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. तरीदेखील परंपरेने दिलेली स्त्रीपुरुष संबंधांची चौकट ओलांडण्याला धाडस लागत होते. या चौकटीत घट्ट बसविलेली स्त्री प्रतिमा आणि स्त्रियांचे प्रत्यक्ष जगण्याचे वास्तव यातला विरोध व्यक्त होण्याला साहित्य हे अतिशय ताकदीचे माध्यम त्या काळात समाजाच्या शिक्षित स्तरापुरते उपयोगाला आले.
वार्धक्यात प्रवेश केलेले गुरुदास आणि धनवंती यांचे एकत्र कुटुंब, तिन्ही मुलगे आता व्यापार सांभाळतात. त्यांच्या बायकांच्या तऱ्हा वेगवेगळ्या! मोठी सुहागवंती परंपरा पाळणारी, सगळ्यांची काळजी घेणारी आहे, तर मधली सुमित्रवंती अर्थात आपली नायिका मित्रो ही एकदम या रीतिरिवाज पाळणाऱ्या कुटुंबापासून वेगळी फटाकडी अशी आहे. सगळ्यात धाकटी फुलवंती ही माहेरच्या श्रीमंतीच्या तोऱ्यात वावरणारी आहे. या सगळ्या संसाराला बांधून ठेवण्याची पराकाष्ठा करणारी धनवंती ही काळाच्या ओघात फेकल्या जाणाऱ्या पारंपरिक मूल्यांचे प्रतीक आहे.
कादंबरीची सुरवात होते ती मधला मुलगा सरदारीलाल आपल्या बायकोला, मित्रोला, फटकारतो, मारहाण करतो तिथपासून. सासू धनवंती अन थोरली सून सुहाग या मित्रोला तिच्या नवऱ्याच्या तावडीतनं सोडवायचा प्रयत्न करतात. नवरा भडकला कशाने तर मित्रो वर तोंड करून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते म्हणून. त्याच्या मारहाणीला न जुमानता ती नजर खाली झुकवित नाही ती नाहीच. मोठ्यांसमोर, नवऱ्यासमोर डोकीवरून पदर घ्यायचा अन खालमानेनं वावरायचं असा इथला संकेत मित्रो पार धुडकावून लावत असते.
हळू हळू एकेक गोष्ट उलगडत जाते. थोरल्या जावेला, सुहागला मित्रो आपल्या नवरा सरदारीबद्दल खासगीत सांगते की तिला त्याच्यापासून शरीरसुख मिळालेले नाही. अंगावरची वस्त्रे फेडून मित्रो आपल्या पुष्ट अवयवांकडे निर्देश करीत सुहागला सांगते की तिच्या अंगांगात पेटलेला अंगार तर काही करून विझला पाहिजे ना ! सुहाग तिच्या मनोधारणेला अनुसरून “छी छी हे काय अभद्र बोलतेस तू “ असे सांगून कान बंद करून घेते. मित्रो अधून मधून सुहागला देखील तिचा नवरा (आणि आपला थोरला दीर ) बनवारी याच्याबरोबर मिळणाऱ्या सुखाबद्दल चावट बोलून चिडवत असते. एका पातळीवर या असल्या गोष्टी बोलणे तर दूरच ऐकणे देखील पाप आहे असे सुहागला वाटत असते, तर त्याच वेळेस आतून ती या चावटपणाची गंमत देखील अनुभवत असते. “जास्तीत जास्त किती दिवस नवऱ्यापासून लांब माहेरी राहू शकशील ?” असे मित्रोने विचारल्यावर सुहाग लाजते आणि पंधरा दिवस खूप होतील असे सांगते. ज्याला ‘छी छी ‘ म्हणून नावे ठेवतेस ते तुला देखील हवे आहे की नाही, असे मित्रो सुचवत असते.
बनवारी हा आपला थोरला दीर आपल्यालाही मर्दानी वाटतो, असे सुहागला सरळ सांगायला पण मित्रो कचरत नाही. आपला नवरा सरदारी हा आपल्याकडे म्हणजेच आपल्या साऱ्या तारुण्यसुलभ आणि स्वाभाविक अशा भावना -गरजा यांच्याकडे दुर्लक्ष का करीत आहे याचा सासू सासरे इ मंडळींनी विचार करायला हवा की नाही असे ती त्राग्याने म्हणत असते.
इकडे सासू तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते की बनवारी आणि सरदारी हे दोघेच व्यापार सांभाळत असतात आणि तिसरा गुलजारी हा काम काही करीत नाही उलट त्याच्या उपद्व्यापामुळे कर्ज मात्र होऊन बसले आहे. सरदारी धंद्यातल्या चिंतेने त्रस्त असल्याने तुझ्याकडे त्याचे दुर्लक्ष होत असावे. “पण सगळे काही ठीक होईल “. बनवारीच्या नजरेतून मित्रोचा बिनधास्त वावर, चावट टोमणे आणि उच्छृंखल हावभाव सुटलेले नसतात. एकीकडे तिचा खट्याळपणा भावत असला तरी वरून मात्र तो तिचे वागणे आपल्या घराण्याला कसे त्रासदायक होणार आहे असेच सांगत असतो.
बाहेर वावरताना देखील मित्रो असेच वागत असणार आणि म्हणूनच ती बाहेरच्या तरुणांच्या बोलण्याचा आवडीचा विषय झाली असणार.
फुलवंती सासरी त्रास होत असल्याचा बहाणा करून आपल्या भावांच्या दांडगाईचा वापर करून माहेरी निघून जाते, बरोबर नवरा गुलझारी याला फरफटत घेऊन जाते. आपल्या माहेरचा बडेजाव मिरवताना ती मित्रोच्या माहेरबद्दल धुरळा उडवून जाते. मित्रोची आई आपल्या हवेलीत राहत असते. धनवंतीला वाटू लागतं की सरदारीचं लग्न जमवताना मित्रोच्या घरची जरा जास्त चौकशी करायला हवी होती.
सुहाग ला दिवस जातात, तसे गुरुदास धनवंती हे वृद्धापकाळात आपल्या पुण्याईचे फळ मिळाले या भावनेने कृतकृत्य होतात, तेव्हा मित्रो जाता जाता सांगून जाते की यात काही देवबिव दैव वगैरे आणण्याची गरज नाहीय. शरीर धर्म आणि निसर्गक्रम यामुळे या गोष्टी घडत असतात. धनवंती तिच्याकडे वळते ती संधी साधून मित्रो सासूला सांगते की सरदारी शरीराने ठाकठीक आहे की नाही ते जरा तपासून पहायची गरज आहे. “मी एक काय शंभर पोरांना जन्माला घालायला तयार आहे, पण तुमच्या मुलाचं काय ते कोण पाहणार?”
शेवटी धनवंती सरदारीला महिनाभर मित्रोला घेऊन तिच्या माहेरी जाण्यास सांगते. मित्रो उड्या मारत तयार होते. ती घरच्या हवेलीत हव्या त्या पुरुषांची संगत लाभेल आणि आपला वनवास संपेल या विचाराने उल्हसित झालेली असते. तिची आई एकेकाळची कोठीवाली असते हे कादंबरीत एका दूरच्या टप्प्यावर आपल्याला समजते. तिची आई देखील मित्रोची अवस्था जाणून तिची परवड संपविण्याचा एक पट मांडते. सरदारीला मादक पेय पाजून बेहोष केले जाते. मित्रो बड्या पाहुण्याकडे चांदणी रात घालविण्यासाठी जाणार त्या मोक्याच्या क्षणी तिची आई विचार बदलते आणि तिला सरदारीकडे परत पाठविते. त्यांचे मीलन सूचित करून कादंबरी संपते.
मित्रो बरोबर इतर चार स्त्री पात्रे या कादंबरीत आहेत. मित्रोची आई ही विवाहसंस्थेच्या बाहेर राहिलेली स्त्री आहे. ती देहविक्रय करणारी वेश्या नाही तर कलारंजन करून शरीरसुख देणारी आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न अशी गणिका आहे. तिच्या दुसऱ्या टोकाला विवाहसंस्थेत स्वतःला पूर्ण समर्पित करून संतती जन्माला घालण्यात धन्यता मानणारी धनवंती आहे. त्याचबरोबर स्वतःची लैंगिकता नाकारण्यासाठी देवधर्माचा आधार तिला लागतो. तिच्याच पावलावर पाऊल टाकणारी थोरली सून सुहाग ही मित्रोच्या सहवासात आपली लैंगिकता थोडी थोडी ओळखू लागलेली आहे. मित्रो स्वतःचे मन आणि शरीर यांना त्यांच्या लैंगिकता इ सर्व गुणविशेषासह पूर्णपणे स्वीकारणारी त्यासाठी संकेत, रीतिरिवाज, परंपरा यांना धक्के मारायला तयार असणारी तरुण स्त्री आहे. विवाह बंधन तिने स्वीकारलेले आहे पण त्याचा हेतू साध्य होत नसेल तर त्याच्या बाहेर जाण्याची तिची तयारी आहे. फुलवंती हे बुचकळ्यात टाकणारे पात्र कृष्णाजींनी या कादंबरीत आणले आहे.
आपले व्यक्तित्व हे पुरुषप्रधान संस्कृतीने दिलेल्या साधनांनी सजवायचे आणि त्या आधारावर आपले गौणत्व नाकारायचे असा फुलवंतीचा प्रयत्न आहे. दागिने हे पुरुषांना आकर्षित करून घेण्याचे आणि संपन्नता टिकविण्याचे साधन आहे. आपण या एकत्रित कुटुंबात सर्वात धाकटे आणि म्हणून सर्वात निर्बल असता कामा नये म्हणून दागिने आणि संपत्तीचा तोरा मिरवायचा. नवऱ्याच्या मनात गौणत्व ठसवून त्याला आपल्या मागे फरफटत न्यायचे. त्याचे कर्तृत्व ही फुलताना दिसत नाही ना त्याच्या व्यक्तित्वाला काही उजळ पैलू असल्याचे दिसून येते. फुलवंतीच्या तुलनेत मित्रो ठसून दिसते कारण ती आपल्या स्त्री असण्याचीच शक्ती आपल्या व्यक्तित्वाला देते आणि आपला मार्ग शोधत राहते.
कादंबरीतली पुरुष पात्रे ही पुरुषप्रधान संस्कृतीतल्या सहजीवनाच्या सर्व छटा व्यक्त करतात. गुरुदास-धनवंती यांचे परिपक्व सहजीवन, बनवारी – सुहाग यांचे पुरुषकेंद्री संबंध तर फुलवंती – गुलजारी यांचे जोरूका गुलाम संबंध यापेक्षा सरदारी आणि मित्रो यांचे संघर्षपूर्ण सहजीवन हे अधिक जिवंत वाटते. मार सहन करूनही मित्रो नजर खाली वळवत नाही. टोमणे सहन करूनही आपले निखळ सौंदर्य आणि चैतन्य मुळीच लपवत बसत नाही. म्हणूनच सुहाग एकदा सासूला सांगते की घरात चैतन्य आहे ते मित्रोमुळे. ही आपली मुलगी कुणालाच आवरणार नाही हे मित्रोच्या आईने ओळखलेले असते आणि आपल्या वाट्याला जे एकटेपण वाढत्या वयात आले आहे ते पोरीला भोगायला लागू नये, म्हणून तर तिने मित्रोला शेवटच्या क्षणी रोखले नसेल ना ?
चित्र साभार : वेब दुनिया http://hindi.webdunia.com/hindi-literature-articles/jnanpith-award-2017-krishna-sobti-117110300042_1.html
No Responses