आज वटपौर्णिमा. बऱ्याच स्त्रिया आज पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा करतात. गेल्या पंधरा दिवसांपासून काही चॅनल्सवर लोकांच्या आवडत्या मालिकांमधील नायिका त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत अशी जाहिरात येत आहे. घराघरांत त्यांचे तोंडभरून कौतुक देखील होत आहे. वटसावित्री हा केवळ सण नसून स्त्रियांनी करण्याच्या अनेक व्रतांपैकी एक अत्यंत महत्वाचे व्रत आहे. पुरुषप्रधान संकृती टिकविण्याचे हे व्रत एक प्रभावी साधन आहे. या व्रताची कहाणी सर्वांना माहीतच आहे. पण या कहाणीचे विश्लेषण करून आपण कधी पहिले आहे का ? त्यातील सत्य, काल्पनिकता, ऐतिहासिक शक्यता शोधल्या आहेत का? पुराणातील सावित्रीची कथेचे विश्लेषण करणारा लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.
सावित्रीची पुराणांमध्ये दिलेली कथा थोडक्यात अशी: सावित्रीच्या वडिलांना म्हणजेच अश्वपती राजाला बरीच वर्षे मुल झाले नाही म्हणून त्याने १८ वर्षे, १०० पुत्र व्हावेत म्हणून तपश्चर्या केली. मात्र त्याला एकच अपत्य आणि तीही कन्या यामुळे त्याची घोर निराशा झाली. कालांतराने ती सुस्वरूप, निरोगी व बुद्धिमान मुलगी झाली. ती वयात आल्यावर तिचे लग्न झाले कठीण झाले कारण ती इतकी दैदिप्यमान होती की कोणी तिला मागणी घालायला तयारच होईना.शेवटी राजाने स्वतःसाठी पती शोधून काढ असे सांगून तिला एका वृद्ध मंत्र्याबरोबर पाठविले. देशोदेशी हिंडून तिने शाल्व देशाच्या राज्यभ्रष्ट झालेल्या द्युमत्सेन राजाच्या एकुलत्या एका मुलाला- सत्यवानाला वर म्हणून निवडले. नारदमुनींनी सत्यवान सर्वगुणसंपन्न असला तरी लग्न झाल्यापासून एक वर्ष पूर्ण होईल त्या दिवशी तो मरण पावेल असे सांगितले. अश्वपातीने हे माहित असतानाही एकुलत्या एका मुलीचे हे लग्न लावून दिले. सावित्रीने उंची वस्त्रे, दागदागिने सोडून वल्कले नेसून सासू सासऱ्यांची सेवा केली तिने एक वर्ष पूर्ण होण्याआधी तीन दिवस उपास केला आणि यमाकडून सत्यवानाचे प्राण मागून घेतले.
सर्वसामान्य स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार केला तर त्यांना सावित्री फार जवळची वाटते. सावित्रीचे कथानक म्हणजे आपल्याच जीवनाची कहाणी वाटते. अवांच्छित अपत्य, वडिलांच्या काळजीचा विषय, नशिबात जो असेल त्याच्याशी लग्न, दारिद्र्य, वैधव्याची टांगती तलवार, स्वतःचे अस्तित्व पुसून टाकणे, मातापित्यांचा आसरा तुटणे अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण स्त्रिया पिचलेल्या असतात. सावित्रीच्या चरित्रात त्यांना आशेचा किरण दिसतो. व्रतवैकल्ये करून पुढील सात जन्मांमध्ये परिस्थिती सुसह्य होण्याची आशा दिसते, गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीत तगून राहण्याचे बळ मिळते. कडक व्रतांचे कसोशीने पालन करणे आणि त्यानंतर मनातील स्वप्न या नाही तर पुढील सात जन्मांमध्ये परिस्थिती सुसह्य होण्याची आशा दिसते, गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीत तगून राहण्याचे बळ मिळते.कडक व्रतांचे कसोशीने पालन करणे आणि त्यानंतर मनातील स्वप्न या नाही तर पुढील जन्मात तरी साकारणे यातील कार्यकारणभाव त्यांच्या मनावर बिंबवला जातो. तेव्हा खरी सावित्री ही प्रतिकूल परिस्थितीमुळे भरडून निघालेली, व्रतवैकल्ये करून आपले पारलौकिक कल्याण साधणारी आणि इहलोकीचे प्राक्तन मुकाट्याने सोसणारी आजच्या स्त्री सारखीच एक असहाय स्त्री होती असेच म्हणायला हवे.
ती स्त्रियांना परंपरागत चाकोरीच्या बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारी आदर्श स्त्री नाही. तर पातिव्रत्य, व्रतवैकल्ये, आज्ञापालन या चाकोरीतच सुरक्षितता आहे हे पटवून देणारी, स्त्रियांवर लादलेली आचार संहिता आहे. ती दुखाच्या निर्मूलनाचा मार्ग दाखवीत नाही; केवळ ते सोसण्याचे बळ देते. आपली मुलगी स्वतंत्र विचार करणारी धडाडीने काम करणारी कर्तबगार स्त्री व्हावी असे वडिलांना तर सोडाच, आईलाही वाटत नाही. त्याउलट तिने सावित्रीसारखी नवऱ्याच्या मागेमागे जाणारी, आदर्श पत्नी, सून आणि कन्या व्हावे; स्वतःचं व्यक्तित्व तर नाकारावेच शिवाय अस्तित्वही केवळ त्यागासाठी आहे हे ध्यानात ठेवावे अशीच आई-वडिलांची आणि सगळ्या समाजाची अपेक्षा असते. हा मानवी स्वातंत्र्याच्या विकासासाठी आसुसलेल्या, त्याप्रीत्यर्थ धडपडणाऱ्या आणि जीवनावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचा आदर्श नव्हे.
आजच्या जमान्यात अशा स्त्रीबद्दल हळहळ वाटेल, सहानुभूती वाटेल पण ती जिचे अनुकरण असा आदर्श वाटणार नाही. निदान वाटायला तरी नकोच. आदर्श वाटायला हवा अशा हजारो स्त्रियांचा; ज्या आपल्या कर्तृत्वाने पुरुषप्रधान समाजामध्येही स्वतःचे मानाचे स्थान बनवू शकल्या आहेत.
नोट: वटपौर्णिमा आणि यांसारख्या अनेक पुरुषप्रधान संस्कृती जपणाऱ्या, आपल्या हातात काही नाही, उपास-तापासातून आपलं भलं होईल असं मनावर बिंबविणाऱ्या, स्त्रीचे आयुष्य फक्त तिचा नवरा आणि कुटुंब एवढ्यापुरतंच असतं, ही मानसिकता अधिक घट्ट करणारी व्रतं आपण करायची का, यावर विचार करूयात. तुमची यावरची मतं नक्की कळवा.
संदर्भ: सुमन ओक लिखित ‘सणांचे कुळ, उत्सवांचे मूळ’ या फेब्रुवारी २०१२ मध्ये साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील ‘वटसावित्री’ या लेखामधील काही भाग.
चित्र साभार: https://commons.wikimedia.org/wiki/File:Yama_and_Savitri_by_Nandlal_Bose_1913.jpg
2 Responses
तुम्ही म्हणालात ते अगदी पटतंय . आजच्या स्त्रीने चाकोरीबद्ध विचार न करता स्वेच्छेने विचार केला पाहिजे .
अगदी बरोबर… पण आपली समाजव्यवस्था स्त्रिया चाकोरीबद्ध आयुष्य जगायला भाग पाडते. जे कोणी प्रवाहाविरुद्ध विचार करताना त्यांना संघर्ष करावा लागतो… कधी कुटुंबाशी तर कधी समाजाशी.