डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – १)

नमस्कार वाचक मित्र-मैत्रिणींनो,

मागील ३-४ वर्षांपासून तथापि ट्रस्ट ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावर काम करत आहे. सामान्य समजली जाणारी मुलं-मुली वयात येतात, त्यांच्या लैंगिक गरजा निर्माण होतात, तसंच अपंग मुला-मुलींच्या बाबतीतही होत असतं. शिक्षण, रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजांसारखीच लैंगिकता हीदेखील व्यक्तीची एक मुलभूत गरज आहे. या भूमिकेतून तथापि अंध, मतिमंद मुलं-मुली, त्यांचे पालक-शिक्षक यांच्याबरोबर शरीर साक्षरतेविषयी संवाद साधणारा उपक्रम राबवत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांनी एकत्र येऊन अपंग मुला-मुलींच्या लैंगिकतेविषयी खुलेपणाने चर्चा करावी या उद्देशाने दिनांक १३-१४ फेब्रुवारी २०१६ रोजी ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ याविषयी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. अनिता घई यांची मुलाखत हेदेखील या कार्यक्रमातील एक मुख्य आकर्षण ठरले. ही मुलाखत तथापि ट्रस्टचे विश्वस्त आशुतोष भूपटकर आणि साधना व्हिलेज या प्रौढ मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य मेधा टेंगसे यांनी घेतली होती.

शारीरिक अपंगत्व आणि अनेक आजारांचा सामना करत डॉ. अनिता घई यांनी अपंगत्वाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने अपंग महिला, अपंगत्व आणि लैंगिकता, अपंग व्यक्ती आणि त्यांचे हक्क, सरकारची भूमिका याबद्दलचे त्यांचे अनुभव आणि मतं जाणून घेऊया..

ही मुलाखत हिंदी भाषेत घेण्यात आली होती. तरी मराठीत जसेच्या तसे भाषांतर करण्यात आले आहे. आपणा सर्वांसाठी वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत…

प्रश्न १) कोणकोणती संकटे तुमच्या आयुष्यात आली आणि तरीही तुम्ही इतक्या हसू कशा शकता?

उत्तर – चौसष्ट वर्षांनी आमच्या घरात एक मुलगी जन्माला आली, ती म्हणजे मी. मी दोन वर्षांची झाल्यावर मला पोलिओ झाला. फक्त पोलिओ नाही झाला, त्याच्या आधी छोटे-मोठे आजार झाले. शाळेत असताना हृदयाचा त्रास सुरु झाला होता. औषधं घेत होते, पण इतकं लक्ष दिलं गेलं नाही. मी जेव्हा एम. ए. ला शिकत होते, तेव्हाही मला औषधे चालू होती. पण तोपर्यंत माझं मायट्रल वॉल्व्ह (हृदयाच्या डाव्या ऊर्ध्व व अधर कप्प्यातील द्विदल झडप) खराब झालं होतं. पण तेव्हा दिल्लीमध्ये अशा प्रकारचे चांगल्या पद्धतीचे उपचार उपलब्ध नव्हते, तेव्हा दिल्लीतील एका डॉक्टरांनी बॉम्बे हॉस्पिटलला उपचार घेण्याबाबत सुचवलं. मग १९८० मध्ये हृदयाचं ऑपरेशन झालं. १९८८ मध्ये लेक्चरर म्हणून काम करायला सुरुवात केली होती, पुन्हा तो वॉल्व्ह गळू लागला होता. मग पुन्हा एकदा माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया चेन्नईमध्ये झाली. तिथल्या डॉक्टरांनी धातूचा वॉल्व्ह बसवला. या सगळ्याचा अर्थ असा आहे की मी माझा जीव वाचवणाऱ्या औषधांवर अवलंबून आहे. दोन दिवस औषधं घेतली नाहीत तर माझ्या जीवाची खात्री देता येत नाही.

२००५ मध्ये मी काही उपचारांसाठीच अमेरिकेला गेले होते. तेव्हा तिथे कॅन्सरच्या बाबतीत खूप बोलणं झालं होतं. जेव्हा मी तिथून परत आले, तेव्हा मला असं वाटलं की, आता वय ४० च्या वर जायला लागलंय तर कॅन्सरची चाचणी करुन घ्यायला पाहिजे. आता इतकं सगळं झालंय तर कॅन्सर नसेल असं मनातून वाटत होतं. तरीही त्या दरम्यानच हिंमतीनं मी वडिलांना म्हटलं की, माझी एकच इच्छा आहे की मला गाडी चालवायला शिकायचंय. मी जवळ-जवळ २७ वर्षे गाडी चालवली. तेव्हा ते मध्यमवर्गीयच होते, पण त्यांनी गाडी घेतली आणि भावाने शिकवली. त्याच गाडीतून मेनोग्राम टेस्टसाठी मी एकटीच गेले होते. पण चाचणी पॉजिटिव्ह आली. ते दोन दिवस मला अजूनही आठवतात. मी कॉलेजला गेले, शिकवलं, पण मी खूप रडले होते दोन दिवस. दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पोलिओ झाला आहेच. लवकरच सर्जरी करावी लागणार होती. उपचार होण्याइतके पैसे आमच्याकडे होते. अनेकांनी आर्थिक मदतीसाठी आणि हॉस्पिटलमधील धावपळीच्या मदतीसाठीही विचारपूस केली होती. त्यावेळी खूप आधार मिळाला, जो गरजेचा असतो. कॅन्सरसारख्या आजारातून मी शिकले की जीवन खूप अमूल्य असतं. आपण असा विचार करायला पाहिजे की, फक्त आपण एकटेच दुखःतून जात नसतो, तर इतर लोकंसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखः झेलत असतात. दुखःमुळे फक्त रडतच राहिलो तर काहीही होऊ शकणार नाही. इतकं होऊनही २००५ ते २०१६ पर्यंत मी खूप हसून-खेळून आयुष्य जगले आहे. त्रास सगळ्यांनाच होत असतो कधी ना कधी. दोन दिवस मी खूप रडले, पण त्यातूनच शिकलेही. मोकळेपणाने हसायला शिकले.

प्रश्न २) अपंगत्व आणि स्त्रियायाबाबतीत भारताचं भविष्यातलं चित्र तुम्ही कसं पाहता?

उत्तर – आपण असं म्हणतो की, सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या बहिणी आहेत. पण मला असं वाटतं की सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या बहिणी नाहीयेत. कारण जात, धर्म, वर्ग वेगवेगळे आहेत, क्षमता आणि अपंगत्व वेगवेगळं  आहे. तरी पण मी स्त्रियांमध्ये एक गुण पाहिलाय, तो म्हणजे, हे फरक असूत किंवा नसूत, पण कमीत कमी त्या एकमेकींच्या गोष्टी ऐकून घेतात. कमला भसीन या प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत. एकदा त्यांच्या एका मुलाखतीमध्ये कमला भसीन खूप हसत असतात, गाणी गात असतात. पण अशी एक मुलाखत आहे, ज्यामध्ये एका क्षणी त्या रडायला लागतात. कारण त्यांना असं वाटलं की, मुलींच्या किंवा स्त्रियांच्या अपंगत्वाबद्दलचे प्रश्न माझ्याकडून कसे काय राहून गेले? मी कसा काय याबद्दल विचारच केला नाही?

भारत हा असा देश आहे की जिथं खूप सारे संघर्ष आहेत. केवळ अपंगत्व हा एकच मुद्दा नाहीये. मला असं वाटतं की ज्या महिला चळवळी आहेत, त्या उपाय शोधू शकल्या नसल्या तरी त्या कमीत कमी एकमेकांच्या गोष्टी जरूर ऐकतात. अपंग व्यक्तींनी अपंग व्यक्तींबरोबरच अपंगत्वाच्या मुद्द्यांविषयी बोललं पाहिजे असं मी मानत नाही, याउलट ज्या व्यक्तींना अपंगत्वाचे मुद्देच माहिती नाहीयेत, त्यांच्याशी बोलणंही गरजेचं आहे. हळूहळू किमान काही लोकांपर्यंत तरी भविष्यात हा विषय पोचेल अशी आशा वाटते.

प्रश्न ३) गावाकडे सर्वसमावेशक संस्कृती आणि वातावरण आहे, त्यामुळे गावातील लोकं अपंग व्यक्तींकडे समस्येच्या दृष्टीने पाहत नाहीत. पण शहरांमध्ये अपंग व्यक्तींना मोठं संकट समजलं जातं. असं का?

उत्तर – कुठेही एका प्रश्नाचं एकच उत्तर नसतं. माझे प्राध्यापक अनिल सदगोपाल यांच्याबरोबर मी दोन वर्षे भारताबाहेर तसंच महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये कामाच्या निमित्ताने फिरले आहे. गावांमध्ये इथं कुणी अपंग व्यक्ती आहेत का असं विचारलं तर ‘कुणीही नाही,’ असं उत्तर यायचं. पण प्रत्यक्षात अनेक अपंग व्यक्ती होत्या. त्या व्यक्ती इतरांना माहिती नव्हत्या कारण त्या अपंग व्यक्ती कधी घराबाहेरच पडल्या नव्हत्या. मला असं वाटतं की, या प्रश्नाचं असं उत्तर असू शकत नाही की, अपंग व्यक्तींसाठी गावं चांगली आहेत आणि शहरे चांगली नाहीयेत. काही गावांमध्ये शहरांपेक्षा चांगलं वातावरण अपंगांसाठी असेल तर काही गावांमध्ये शहरांपेक्षा वाईट वातावरण असेल. या प्रश्नाचं असं नेमकं उत्तर असू शकत नाही.

प्रश्न – ४) डीसएबल (Disable) या संज्ञेसाठी काही पर्यायी शब्द आहेत का? कारण डीस एबल (Disable) च्या विरुद्ध शब्द एबल आहे. यासाठी पर्यायी शब्द तुम्हाला सुचवायचा आहे का?

उत्तर – A person with disability, व्यक्ती म्हणून तो ठीक आहे पण तो अपंगत्वाशी जोडलेला आहे. २००६ मध्ये अपंगांचे विधेयक आम्ही दुरुस्त केलं होतं. या विधेयकात सुद्धा या शब्दाला मान्यता देण्यात आलेली आहे. तसे आणखीही शब्द आहेत. मोदिजी दिव्यांग म्हणत आहेत, पण दुसऱ्या बाजूला हक्कांच उल्लंघन तर होत आहे. Differently able म्हटलं तर वाईट वाटण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण सगळे जणच Differently able आहेत. प्रत्येक जण काही बाबतीत सक्षम असतो, काही बाबतीत अक्षम असतो. मला असं वाटतं की, मला लंगडी म्हणा किंवा पांगळी म्हणा, काहीही फरक पडत नाही, पण हक्क तर द्या. फक्त शब्दांबरोबर खेळून चालणार नाही. शब्द आपल्याला माहिती असतात, पण प्रत्यक्षात करायचं तर काहीच नसतं, अशी आपल्या सरकारची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांमध्ये आपण बातमी ऐकली असेल. २०१६ च्या वर्षात, ३५-३६ वर्षे अपंगत्वाच्या क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत असतानाही विमानातून बाहेर आल्यावर मला व्हीलचेअर मिळाली नाही. खूप वेळ वाट पाहून रांगत रांगत जावं लागलं. शिवाय विमानाचं तिकीटही दिलं होतं. मोफत तिकीट होतं असंही नव्हतं. म्हणूनच मी शब्दांना मानत नाही. मला वाटतं की शब्दांना, भाषेला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा हक्क दिलेले असतात. ते हक्क कुठे आहेत?

 

डॉ. अनिता घई यांच्या आयुष्याची खडतर तरीही अर्थपूर्ण वाटचाल त्यांच्याच शब्दातून आपण अनुभवत असताना  अपंगत्वाचे विविध कंगोरेदेखील त्यांनी मांडले. अखेरीस एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन त्या आपल्या सर्वांनाच विचारकरायला लावतात…   

शब्दांकन : प्राजक्ता धुमाळ

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap