काही शिव्या मी कधीच विसरू शकत नाही. त्या माझ्या मेंदूत कोरल्या गेल्या आहेत.!
शिव्या.
खूप आहेत. असतात. असणार आहेत.
सर्वच परिचित. अगदी एक ना एक.
कधी आजूबाजूला घोंगावत असतात माशांप्रमाणे. सारख्या दूर हकलाव्या लागतात. तर कधी कधी अगदी अनपेक्षित क्षणी कानावर आघात करतात आणि मनाला टोचतात. एक कडवट, नकोसा, ओशाळला अनुभव देतात. कोणीतरी शिव्यांच्या माध्यमातून कोणाच्या तरी आई-बहिणीच्या लैंगिक अवयवांना कल्पनेने रस्त्यात उघडं करण्याचा, शाब्दिक हीन संग करण्याचा किंवा अगदीच वन्य वागणूक देण्याचा प्रयत्न करतं. आपण काहीच करू शकत नाही.
काही शिव्या मी कधीच विसरू शकत नाही. त्या माझ्या मेंदूत कोरल्या गेल्या आहेत. माझ्या मेमरीत साठवल्या गेल्या आहेत ज्या करू म्हणालं तरी डिलीट होत नाहीत. मेंदूत आहेत त्यांचे सर्व डिटेल्स; अगदी त्या ज्या काळी सर्वप्रथम शिकल्या त्या त्या प्रसंगांच्या तपशिलासहित.
मी तेव्हा सातवी-आठवीत असेन. आमची दहा-बारा जणांची टोळी होळीसाठी गल्लीत लाकडं, गवऱ्या आणि वर्गणी गोळा करत फिरत होती. मी त्या विशिष्ट वयात आलो होतो जेव्हा अशा टोळीत सामील होण्यासाठी प्रमोशन होत असतं. टोळीसोबत फिरण्याची माझी पहिलीच वेळ होती. आम्ही प्रत्येक घरी जाऊन पैसे नाहीतर लाकूड मागायचो आणि एखाद्या वळणावर जिथे आपल्याला खास असं कोणी पाहणार नाही असं पाहून जोरात शिव्या द्यायचो. अशा शिव्या ज्या ह्या टीमने खास संशोधन करून मिळवल्या होत्या. टीममध्ये काही अनुभवी मंडळी होती ज्यांना त्यांच्या आई-बापांनी गल्लीवर ओवाळून टाकलं आहे असं मोठी, सभ्य माणसं म्हणायची! गल्लीतील गिरणीवाला, शिक्षिका, सावकार, वयोवृद्ध अशा व्यक्तीना वैयक्तिकरित्या उद्देशून त्यांच्या लैंगिक अवयवांना, शरीर संबंधासारख्या वैयक्तिक लैंगिक क्रियांना उद्देशून ह्या शिव्या आम्ही देत होतो. शिवी द्यायची आणि पळून जायचं. ज्यांना उद्देशून शिवी दिली ते त्यांच्या घराच्या अथवा दुकानाच्या बाहेर येऊन बघेपर्यंत आम्ही पसार. मी नवखा असल्यामुळे पळण्यात सर्वात पुढे.
हा असा काळ आणि परिवेश होता जिथे शिवीत गोळी साहेबाच्या गांडीवरच बसायची ढेरीवर नाही. दुसऱ्या दिवशी धुळवड. होळीची राख एकमेकांच्या तोंडाला लावायची आणि परत शिव्या देत गल्लीभर फिरायचं असा कार्यक्रम. जर कोणी धूळ खेळायला बाहेर येत नसेल तर ‘एक एक दाणा जवसाचा घरात बसलाय नवसाचा’ अशा कमी हानिकारक ते ऐकू वाटणार नाहीत अशा शिव्यांची लाखोली त्या मुलाच्या नावे वहायची. त्याचे आईबाप लाजेने, गपचूप त्या मुलाला बाहेर पाठवून द्यायचे. मी असा मोठा होत होतो.
नंतर मी मोठा झालो. थोडा. अकरावी किंवा बारावीत असेन. एकदा चालत कुठेतरी जात होतो. दोन सायकलस्वार मुलं, माझ्यापेक्षा मोठी, मला कट मारून पुढे गेली. मी त्यांना कदाचित शिवी दिली असावी. च्युत्या वगैरे. पण माझा परिस्थितीचा अंदाज चुकला होता. ते थांबले. त्या दोघांनी मला शिव्या दिल्याच शिवाय बदडून काढलं. थोड्या वेळाने रस्त्यावरच्याच लोकांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं. मला खूप अपमानास्पद वाटलं. मी खूप रडलो.
मी असाच मोठा झालो. एका लहान शहरात जन्मलो, वाढलो. जरी उच्च समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलो असलो तरी माझ्यासाठी एक बरी गोष्ट झाली ती म्हणजे माझं कुटुंब खूप गरीब होतं. गरिबीचा एक फायदा आता मला जाणवतो तो म्हणजे माझे सर्व जातीधर्मातील मित्र होते. अर्थात तेही गरीबच. शिवाय अभावग्रस्ततेने खूप शिकवलं. विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत सरव्हाईव्ह होण्यासाठीची अनेक कौशल्य मिळाली जी पुढच्या काळात उपयोगी पडली. असो. पण ह्याच काळाने माझ्या पदरात ह्या शिव्या टाकल्या. घरी आईची शिस्त होती. अगदी ‘अरेच्चा’ ही म्हणण्याची परवानगी नव्हती. अरेच्चा म्हणजे ‘अरे हिच्या आईला किंवा बहिणीला…. ई ई’ असा त्याचा अर्थ असतो म्हणून ही बंदी. त्यामळे त्या वयात, होळीच्या निमित्ताने असं मोकळ्यानं शिव्या द्यायला खूप गंमत वाटायची. भन्नाट वाटायचं. कशापासून माहित नाही पण मुक्त वाटायचं. खरं तर शिव्यांनीच मला आणि माझ्या पिढीला लैंगिकतेचे पहिले धडे दिले. लैंगिकतेशी पहिला आमना सामना शिव्यांच्या रूपानेच झाला. शिव्यांच्या रूपानेच शरीर-साक्षरता आली, कोरली गेली. माझ्या मर्दानगीच्या संकल्पना घडवल्या. पुढे पुरुष श्रेष्ठ, बाई कनिष्ठ ह्या संकल्पनांचे इमले पाडण्याचा, नामशेष करण्याचा प्रयत्न मी आवर्जून केला तरीही उरलेले अवशेष कितीही पुसू म्हटल्याने पुसले जात नाहीत. जणू रक्तात भिनले आहेत.
शिव्या अमानूष असतात. त्या हिंसक असतात नव्हे हिंस्त्र असतात. (आईच्या गावात… ही शिवी सध्या टीवी सिनेमामध्ये प्रचलित आहे, तरुण मुलं मुली, हिरो हिरोईन यांच्या वापरात आहे. पण ह्या शिवीचा खरा अर्थ जर लक्षात घेतला तर ती तुम्हाला दिल्ली बलात्काराची आठवण करून देईल). त्या भयंकर जातीय आणि धर्मांध असतात. त्या पुरुषी वर्चस्व अधोरेखित करतात. शिव्यांबद्दल एक गैरसमज आहे तो म्हणजे गरीब, खालचे ठरवले गेलेले लोक शिव्या देतात. साफ चूक. सर्व जातीचे आणि वर्णाचे, मुख्यत्वे पुरुष शिव्या देतात. शिव्या समोरच्याला दुय्यम ठरवण्यासाठी दिल्या जातात, आपलं वर्चस्व दाखविण्यासाठी दिल्या जातात. गंमत म्हणजे कधी त्या एखाद्या शोषणाविरुद्धचं बंड आणि पिळवणूकीच्या विरुद्धचा संताप ही दर्शवितात. फक्त बहुतेक शिव्या ह्या स्त्रियांना उद्देशूनच असतात हे मात्र सार्वत्रिक वास्तव आहे. अर्थात एक मात्र खरं शिव्यांमुळे आणि विशेषतः लैंगिक शिव्यांमुळे समोरच्याला हीन लेखण्याचा प्रयत्न करत असताना शिव्या देणाराच स्वतःचं माणूसपण गमावून बसतो.
आता शिव्या द्याव्याशा वाटतील तेव्हा इतका विचार तर आपल्या मनात येईलच ना?
नोट – मी आजही आयला, मायला अशा शिव्या क्वचित देतो. माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया हे मला निक्षून सांगतात. संताप व्यक्त करण्याच्या तुमच्याकडे काही अधिक मानवी पद्धती असतील तर जरूर सांगा.. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांनाच (माझ्यासकट) ‘गेट वेल सून’..
2 Responses
‘लैंगिक शिव्यांमुळे समोरच्याला हीन लेखण्याचा प्रयत्न करत असताना शिव्या देणाराच स्वतःचं माणूसपण गमावून बसतो.’ या तुमच्या वक्तव्याशी मी आजिबात सहमत नाही. बऱ्याचदा शिव्या देणाऱ्यांना सगळ्यांनाच कुठे माहित असतं की, ते आई वरून शिव्या देतात. कधी कधी शिव्या देणाऱ्यांच्या मनातही नसतं की दुसऱ्यांना हीन लेखावं म्हणून.
चांगले सदर आहे अजूनही काही शिव्यांचे अर्थ समजले नाहीत