लैंगिकता शिक्षणाचा प्रवास – मुलाखत : डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे

‘शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही’, अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते. या विषयाचे निर्विवाद महत्त्व ओळखले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन-इंडियाच्या पुणे शाखेने, विशेषतः डॉ. सुमती कानिटकर, डॉ. अनंत साठे व डॉ. शांता साठे यांनी. त्यांच्या भूमिकेचा, बदलत्या काळातील प्रश्नांचा आढावा याबाबत त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांचा हा संपादित भाग.

* लैंगिक शिक्षण व लैंगिकता शिक्षण यातील फरक काय?

लैंगिक शिक्षणामधे केवळ शरीरधर्माशी निगडित माहिती दिली जाते. अल्पवयीन अवांच्छित मातृत्व आणि गुप्तरोगांचा वाढता फैलाव या गोष्टींना आळा घालण्याच्या दृष्टीने औपचारिक पातळीवर असे लैंगिक शिक्षण द्यायला पाश्चिमात्य देशात काही दशकांपूर्वी सुरुवात झाली. ह्या शिक्षणाचे स्वरूप Biomedical (मानवी पुनरुत्पादन आणि गुप्तरोग) होते. अशा मर्यादित स्वरूपामुळे या शिक्षणाचे हेतू व उद्दिष्टे साध्य होत नाहीत हे त्यानंतर आढळून आले. कामजीवनाची व्याप्ती व त्याचे मानवी जीवनातील स्थान (लैंगिक स्वास्थ्याचा एकंदर मानवी आरोग्याशी/स्वास्थ्याशी असलेला निकटचा संबंध) लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने लैंगिक स्वास्थ्याची नवीन व्याख्या तयार केली. कामजीवनाचा विचार करत असताना शारीर बाबींच्या पलीकडे जाण्याची गरज त्यातून अधोरेखित होते.

किशोरवयीन मुलामुलींशी संवाद साधताना आम्ही Sexuality= Sex + Gender अशा समीकरणाने सुरुवात करतो. मानवी कामजीवनाला भावनिक, मानसिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक संदर्भही असतात. कामजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तनाविषयीची भूमिका, मूल्ये, लिंगभाव जाणीव व स्त्री पुरुष समानता (Gender & gender equality) अशा अनेक मुद्यांची आम्ही चर्चा करतो. अशा सर्वस्पर्शी संवादामुळे स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणे, स्त्री-पुरुषांमधील श्रेष्ठ-कनिष्ठता व योनिशुचितेचे अवास्तव महत्त्व कमी करण्याची जाणीव मुलांमधे निर्माण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. पाश्चात्य देशांमधे लैंगिक शिक्षण देऊनही फरक पडला नाही. उलट अनेक गंभीर समस्या वाढत गेल्या असा आक्षेप घेऊन लैंगिक शिक्षणाला विरोध केला गेला. त्याविषयी आम्हाला वाटतं की, पाश्चात्य देशातही लैंगिक शिक्षण सर्वत्र दिले जात नाही, शिवाय शरीराविषयी केवळ शास्त्रीय माहिती देणं, हे काही खरं sex education नव्हे. लैंगिकतेचा अर्थ व्यापक व सखोल आहे. तो समजावून सांगायला हवा. आणि पाश्चात्य किंवा आपल्या देशात निर्माण झालेल्या समस्या लैंगिक शिक्षणामुळे नसून लैंगिकतेचे व्यापारीकरण झाल्याने आहेत.

आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, किशोरावस्था ही एक संक्रमणावस्था आहे. या टप्प्यात शरीरामधे अनेक बदल होत असतात. या वयात लैंगिक बाबींविषयी अंधुकशी (अपुरी, चुकीची असली तरी) माहिती मुलांना असते व जोडीला लैंगिक भावना जाग्याही होत असतात. अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायची गरज असते. शंका दूर करायची गरज असते. कामभावना नैसर्गिक आहे हे खरे. पण जीवन म्हणजे तेच नव्हे. आपल्या मनातील ऊर्मी संयमित ठेवण्याचे, प्रसंगी मन वळवण्यासाठीचे शिक्षण देणेही आवश्यक आहे.

* आज ज्या पद्धतीने लैंगिकता शिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात, त्यातल्या मर्यादा काय?

प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे ‘One-shot therapy’ असते. त्यात दोन मर्यादा येतात. शिबिरार्थी त्यातली काही माहिती विसरतात, प्रत्यक्ष शिबिराच्या वेळी संकोचलेले असतात किंवा त्यांना मागाहून काही प्रश्न पडतात तेव्हा मार्गदर्शक उपलब्ध नसतो. दुसरी, प्रत्येक वयोगटांच्या गरजाच वेगवेगळ्या असतात. जरी शालेय वयात शिक्षण मिळालेलं असलं तरी पुन्हा अकरावी-बारावीच्या टप्प्यावर काही वेगळ्या मुद्यांना प्राधान्य देण्याचा विचार त्यामध्ये करावा लागतो. उदाहरणच द्यायचं तर, सोळा ते वीस ह्या वयोगटात लग्नपूर्व लैंगिक संबंध, एकतर्फी प्रेम, लिंगभाव अशा विषयांना जास्त प्राधान्य द्यायचं असतं. ह्या गटात गटचर्चा – मांडणी – प्रश्नोत्तरं अशा पद्धतींचा परिणाम जास्त चांगला दिसतो. मुलंमुली इथे फार समर्पकपणे त्यांचं म्हणणं मांडतात. प्रेमप्रकरणे-निराशा-व्यसन इ. विषयी चर्चा करताना एक मुलगी म्हणाली, ‘प्रेमभंगाने मुलगे इतके कसे काय निराश होतात. नोकरी, प्रमोशन, बक्षिसे इ. सारख्या इतक्या निराशा पचवतात. मग एक ‘प्रेमाची’ पचवू शकत नाहीत?’

मुलामुलींशी बोलताना भाषेचा सुयोग्य वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशिक्षण देताना प्रशिक्षणार्थींचा वयोगट, त्यांचा सामाजिक स्तर, मिळणारी अनुभवव्याप्ती यावर आधारित कार्यशाळेची आखणी करावी लागते. उदा. झोपडवस्तीतील मुलांशी बोलताना त्यांच्या बोलीभाषेतल्या शब्दांना मी ‘समांतर भाषा’ सांगतो. अमुक एका शब्दाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात असे सांगून माहिती द्यावी लागते. तसे न केल्यास मुलांना आपल्या बोलीभाषेची, अनुभवांची चेष्टा केल्याप्रमाणे वाटते.

* बदलत्या काळात, माहितीच्या युगात लैंगिक शिक्षण अनेकांपर्यंत सहज पोहोचत आहे. पूर्वीपेक्षा जास्त पुस्तके, मासिके, चर्चा, कार्यक्रम होताना दिसतात. इंटरनेटसारख्या माध्यमानेही काहीशी माहिती अनेकांपर्यंत पोहोचताना दिसते. या पार्श्वभूमीवर पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रतिसादात काही बदल घडलाय असं वाटतं का?

पालकांची व शिक्षकांची लैंगिक शिक्षणाविषयीची मान्यता वाढलीय हे खरंच. समुपदेशनात मोकळेपणा आलाय. शिक्षक स्वतः मुलामुलींबरोबर ही चर्चा करायला आजही तयार नसतोच. त्याला तीन कारणं दिसतातं. एक तर त्यांना स्वतःलाही पुरेसं ज्ञान नसतं. दुसरं, ज्ञान असेल तरीही ते मांडण्याची पद्धत अवगत नसते. आणि तिसरं, आपल्याबद्दल विद्यार्थ्यांचं मत काय होईल ह्याची त्यांना चिंता असते. हे जाणूनच कदाचित मुलेही शिक्षकांपेक्षा इतर त्रयस्थ व्यक्तीकडून ऐकायला उत्सुक असतात.

आजही मुलींच्या मासिक पाळीसंबंधी बोलण्याची गरज समाजाला दिसते, पण मुलग्यांबरोबरचं काम कमी पडतंय. किशोरवस्थेतील बदलाला मुलग्यांना ‘तयार करणं’ खूप गरजेचं आहे.

अद्यापही माहिती घेण्याचा उद्देश-‘रोग/धोके टाळावे’ यासाठीच असतो. लैंगिकतेची भावनिक-मानसिक बाजू व जबाबदार लैंगिक वर्तनाविषयी काहीच बोललं जात नाही, ह्याबद्दल खंत वाटत राहाते.

स्त्री-पुरुषातील निकोप व आनंदी नात्यासाठी लैंगिकता शिक्षणाची गरज निर्विवाद आहे-मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी, त्यांची मोठेपणाकडे जातानाची वाटचाल सुकर होण्यासाठी, लैंगिकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी!

(संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी लिंक  http://palakneeti.org/ )

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Madhav says:

    लैंगिक शिक्षणाची खरोखरच खूप गरज आहे.

  2. साधना says:

    खरंच लैंगिक शिक्षणाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap