छेडछाड, विनयभंग, बलात्कार, लैंगिक छळ हे गुन्हे आहेत. आणि ते होतात कारण ते करणारे गुन्हेगार समाजात असतात. मात्र बहुतेक वेळा या गुन्ह्यांसाठी स्त्रिया किंवा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. एखादी बलात्काराची घटना घडली की लगेच ती इतक्या रात्री बाहेर कशाला गेली होती किंवा तिने असं कपडे घालायला नको होते किंवा पार्टी किंवा क्लबमध्ये कशासाठी जायचं असे अनेक सवाल उभे केले जातात. मुली तंग कपडे घालतात आणि बलात्काराला निमंत्रण देतात असा अत्यंत चुकीचा समज समाजात पसरलेला आहे. आणि त्यामुळे बलात्कार किंवा छेडछाडीचे गुन्हे करणारे सुटतात आणि ज्यांच्यावर हिंसा होते त्या मुली किंवा बाया मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केल्या जातात.
जर कपड्यांचा आणि बलात्काराचा संबंध असता तर मग अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांचा अर्थ कसा लावायचा? किंवा कोठेवाडीसारख्या अनेक प्रकरणात अंगभर नऊवारी लुगडं नेसणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रियांवरच्या बलात्काराचं कारण तरी काय? आतापर्यंतच्या बलात्काराच्या घटना पाहिल्या तर त्यात हर तऱ्हेचे कपडे घालणाऱ्या, सगळ्याच वयोगटातल्या, जाती धर्माच्या स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे बाईचे कपडे आणि तिच्यावर होणारी हिंसा याचा संबंध लावणं गैर आहे.
साप साप म्हणून काठी धोपटणं थांबवू या का?
No Responses