लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही. आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक भावना नसतातच किंवा त्या नसाव्यत असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं नाही. डोळ्यांना दिसत नसेल, कानांना ऐकू येत नसेल, हात पाय नीट काम करत नसतील तरीही वयात येण्याच्या प्रक्रिया शरीरात घडतातच. वयात येताना ज्या लैंगिक भावना निर्माण होतात त्याही निर्माण होतात. कुणाबद्दल आकर्षणही वाटू शकतं. शरीराची एखादी क्षमता कमी आहे याचा अर्थ या भावना किंवा लैंगिक नाती ठेवण्याची इच्छा निर्माण होणार नाही असं थोडंच आहे? त्यातही मानसिकदृष्ट्या अपंगत्व असेल, मतिमंदत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, अशा मानसिक स्वरुपाच्या अपंगत्वामध्ये भावना, त्यांची अभिव्यक्ती या गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात. या भावनांचा स्वीकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या भावनांना, इच्छांना वाट कशी करून देणार हा प्रश्न निरुत्तरितच राहणार आहे.
सध्या असं चित्र आहे की अपंग व्यक्तींच्या, विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींच्या अगदी प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीयेत. शिक्षण, आरोग्य, अपंगत्वावर मात करण्यासाठी आवश्यक सहाय्य, अन्न आणि निवारा या गोष्टीही मिळत नाहीयेत. अपंग मुलांवर संस्थांमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत अपंगत्वाच्या संदर्भात लैंगिकतेच्या प्रश्नाची चर्चा आवश्यक आहे.
No Responses