मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण– तणाव
विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं की, आव्हानं आणि जबाबदाऱ्या बऱ्याचश्या प्रमाणात वाढतात. अशा तणावग्रस्त स्थितींशी सामना करण्यासाठी विशेष मुलांच्या पालकांनी मानसिक दृष्ट्याही खंबीर आणि सक्षम असणं आवश्यक आहे. याविषयी बोलण्यासाठी स्वीकार आधार गटाच्या नुकत्याच पार पडलेल्या सत्रामध्ये ‘मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण-तणाव’ अशा महत्वपूर्ण मुद्द्यावर डॉ. वसुधा गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा झाली.
ताणांविषयी बोलणं, व्यक्त होणं आवश्यक आहे. पालकांना तशी स्पेस मिळावी हा हेतू समोर ठेवून या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या सत्रामध्ये विचार आणि भावना यांवर वसुधा ताई बोलल्या. ताणांचं एक कारण अनेकदा आपल्या विचारांत असतं कारण तणाव निर्माण करणारी घटना घडली की नकारात्मक विचार मनात निर्माण व्हायला लागतात आणि त्याचपद्धतीने नकारात्मक भावनाही जमून यायला लागतात. या सर्व गोष्टींचा परिणाम स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर दिसायला लागतो. म्हणूनच सर्वप्रथम विशेष पालकत्व निभावताना हे ताण का? कसे? व केव्हा? निर्माण होतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण आवश्यक आहे हा मुद्दा चर्चेतून पुढे आला.
यादरम्यान काही पालकांनीही आपले स्वतःचे अनुभव सांगितले. कश्या प्रकारचे ताण त्यांना जाणवतात याविषयी ते बोलले. बऱ्याचदा झोप लागत नाही, एकटेपणा जाणवतो, चिडचिड होते, लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा होत नाही, उत्साह कमी होतो किंवा आपल्यानंतर पाल्याचे काय? अशा प्रकारचे अनेक विचार आणि स्थितींमधून हतबल व्हायला होतं. ज्यावेळी तणावांच ओझं मनावर अधिक जाणवायला लागतं त्यावेळी अगदी सगळं संपवून टाकावं किंवा आत्महत्या करण्यासारख्या टोकाच्या आणि नकारात्मक विचारांपर्यंत मन पोहोचलेलं असतं असं काहीजण म्हणाले.
ताण निवारणासाठी कश्या पद्धतीने प्रयत्न करता येतील याचे काही मुद्दे चर्चिले गेले. जसे की विशेष मुलाच्या क्षमता न ओळखता अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर ताणंही जास्तच येणार. यासाठी अपेक्षेच्या चक्रातून बाहेर येणं आणि विचारांना सकारात्मक ठेवणं यांची सांगड घालता आली पाहिजे. एक पालक म्हणून स्वतःला कुठेही कमी न लेखता किंवा दोषी न मानता आपल्या पाल्यातील विशेषत्व स्वीकारलं, विचार आणि भावना यांच्यावर नियंत्रण ठेवता आलं तर पुढील गोष्टी सोप्या होऊ शकतील.
अर्थातच वसुधाताई सोबतची ही चर्चा आपल्या स्वीकार आधार गटाच्या पुढील सत्रातही चालू राहणार आहे.
– सुषमा
आपण विशेष मुलांचे पालक, शिक्षक, नातेवाईक किंवा या विषयावर काम करत असाल व तुम्हाला या सत्रात/गटात सहभागी व्हायचे असेल तर नक्की या ईमेल वर संपर्क साधा.
No Responses