लेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

Dr. Ujjwal Nene, Dr. Vasudeo Paralikar, PPPSV team, KEM Hospital Research Centre, Pune

1,451

मागील भागांमध्ये आपण पॅराफिलीया / मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख याविषयी माहिती घेतली. या पाच भागांच्या लेखमालेत आपण पॅराफिलीया या मनोलैंगिक विकाराविषयी माहिती घेत आहोत. या लेखमालेच्या  दुस-या लेखांकामध्ये  पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार पाहणार आहोत.

निदानाचे निकष:

पॅराफीलिया या विकाराचे निदान होण्यासाठी;

– असा त्रास व्यक्तीला कमीत कमी सहा महिने इतक्या कालावधीसाठी होत असेल तर.

– प्रत्येक पॅराफीलियामधील विशिष्ट तऱ्हेने लैंगिक समाधान मिळवण्याची तीव्र इच्छा वारंवार होत असेल आणि तसे केल्याशिवाय लैंगिक उत्तेजना अथवा समाधानच मिळत नसेल तेव्हा या विकाराचे निदान केले जाते.

– व्यक्तीच्या व्यावसायिक, सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्यावर जाणवेल इतका नकारात्मक परिणाम होत असेल आणि व्यक्तीला स्वत:ला मोठ्या प्रमाणात त्याचा मानसिक आणि भावनिक ताणाच्या स्वरूपात होत असेल.

वरील गोष्टी उपस्थित असतील तरच ‘पॅराफीलियाचे’ निदान केले जाते. हे निदान करण्यासाठी सायकीअॅट्रीस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट किंवा लैंगिकआरोग्य तज्ञ असणे जरुरीचे असते.

पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

इतरांच्या खाजगी गोष्टी चोरून न्याहाळणे (Voyeurism) : वायोरिझम  असलेल्या  व्यक्तीला तिची लैंगिक इच्छापूर्ती होण्यासाठी आणि त्या आधीची लैंगिक उत्तेजना येण्यासाठी इतरांच्या नकळत त्यांच्या चाललेल्या लैंगिक क्रिया गुपचूपपणे बघणे, फटीमधून किंवा छोट्याशा छिद्रांमधून कपडे बदलणारी किंवा स्नान करणारी व्यक्ती / स्त्री बघणे, लपून-छपून इतरांची संभोग क्रिया बघणे अशा गोष्टी करणे हे गरजेचे वाटते. यामधून किंवा तशा प्रकारची दिवास्वप्ने मनामध्ये रंगवली तरच त्याना लैंगिक उत्तेजना येते त्यानंतर ते हस्तमैथुनाव्दारे लैंगिक समाधान मिळवतात. मुख्य म्हणजे असे चोरून पाहिल्याशिवाय या व्यक्तीला लैंगिक उत्तेजनाच येत नाही. म्हणूनच ही सवय किंवा असे वागणे मनोलैंगिक आजारामध्ये मोडते. अनेकदा अशा व्यक्ती असे निरीक्षण करताना पकडल्या जातात आणि कधीकधी अत्यंत गंभीर बाबींमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. आजकाल पोर्नोग्राफीचे फॅडही खूपच वाढले आहे. अनेकजण ते बघतात मात्र त्याचे व्यक्तिच्या लैंगिक वर्तनावर दुष्परिणाम होऊ शकतात. लैंगिक उत्तेजना नैसर्गिकपणेच यायला हवी मात्र जेव्हा लैंगिक उत्तेजना येण्यासाठी पोर्नोग्राफीचा सक्तीने वापर करण्याची वेळ येऊ लागली तर ते मात्र योग्य नाही.

स्वतःच्या जननेंद्रियांचे प्रदर्शन (Exhibitionism) : या मनोलैंगिक विकारामध्ये व्यक्ती जननेंद्रियाचे अनपेक्षितरित्या आणि अनेकदा चारचौघांमध्ये अनुचितरितीने प्रदर्शन करते आणि तसे केले की, त्यामधून त्या व्यक्तीला लैंगिक उत्तेजना येते. सर्वसामान्यपणे हा मनोलैंगिक विकार असलेली व्यक्ती इतरांसमोर त्यांची इच्छा नसताना किंवा अत्यंत अयोग्य अशा ठिकाणी अचानकपणे स्वतःचे लिंग प्रदर्शन करते. असे प्रत्यक्ष करून किंवा कशा प्रकारे आपण वागत आहोत असे दिवास्वप्न मनामध्ये रंगवले तरच या व्यक्तींना लैंगिक उत्तेजना आणि पुढे लैंगिक समाधान मिळते. जोपर्यंत ह्या व्यक्ती असे करत नाहीत तोपर्यंत त्यांना लैंगिक समाधानापासून वंचित राहावे लागते. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे ती व्यक्ती असे प्रदर्शन हे अयोग्य  परिस्थितीत करते आणि अनोळखी व्यक्तींच्या समोर असे प्रदर्शन त्या व्यक्तीला करावेसे वाटते. संमतीने चाललेल्या लैंगिक संबंधाच्या परिस्थितीमध्ये एकमेकांचे जननेंद्रिय दिसणे किंवा दाखवणे गैर नाही. या व्यक्तींच्या अशा वागण्यामुळे अनेकदा समाजाकडून त्यांची हेटाळणी होते, कधी-कधी मारही बसतो आणि काही अन्य गंभीर प्रसंगामध्ये पोलिसांकडे तक्रार केली जाऊ शकते.

अंग घर्षण करणे (Frotteurism) : या मनोलैंगिक विकारांमध्ये व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या लिंगाचे घर्षण इतर व्यक्तींची या गोष्टीसाठी संमती नसताना जबरदस्तीने त्यांच्या अंगावरती स्वत:च्या शरिराचे अथवा लिंगाचे घर्षण करून स्वतः लैंगिक उत्तेजना मिळवते. अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन या ग्रस्त असलेल्या व्यक्ती स्वतःच्या लिंगाचे इतरांच्या अंगावर घर्षण करून लैंगिक उत्तेजनेचा आनंद घेते. यामध्ये असेही आढळते की इतर व्यक्तींच्या विशेषतः महिलांच्या खाजगी अंगांना स्पर्श करून उदाहरणार्थ: मांड्या, नितंब, छाती अथवा पोटाचा भाग याठिकाणी लैंगिक उत्तेजना यावी म्हणून जबरदस्तीने स्पर्शही केला जातो. अशा व्यक्ती अशी कृत्ये करून तेथून लगेचच पसार होतात मात्र जर असे करताना विकृत प्रवृत्तीमुळे त्यांना कोणी पकडले तर मात्र समाजामध्ये तर हेटाळणी होतेच. शिवाय त्यांना लैंगिक अत्याचाराचा गुन्ह्या अंतर्गत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.

वस्तू/ पदार्थ/ शरिराचा भाग/ शारीरिक स्त्राव वगैरेंचा वापर करून लैगिक समाधान मिळवणे (Fetishism) :  या मनोलैंगिक विकारांमध्ये व्यक्तीला हस्तमैथुन करून समाधान मिळवण्याची सवय बहुतांश वेळा असते. परंतु असे करताना अनिवार्यपणे एखादी विशिष्ट गोष्ट (फेटीश) हाताळल्याशिवाय अथवा त्याबाद्द्लाची दिवास्वप्ने बघितल्याशिवाय त्याना लैंगिक उत्तेजनाच येत नाही. अनेकदा काही व्यक्तिना स्त्रियांनी वापरलेली अंतर्वस्त्र, केस, पावले, छाती, पायमोजे, लाळ, एखादा विशिष्ट वास, विष्ठा, लघवी इ. कोणतीही वस्तू, पदार्थ, शारीरिक स्त्राव, शरीराचा भाग अशा गोष्टी अनिवार्यपणे हाताळाव्या लागतात, तरच त्यांना लैंगिक उत्तेजना व पुढे लैंगिक समाधान मिळते.

“एक लक्षात ठेवायला हवे, कोणत्याही नको असलेल्या वर्तनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपचार हे असतातच, मात्र ते घेण्यासाठी व्यक्तिने स्वत:हून पुढे येणे महत्वाचे”

पुढील लेखात पाहू आणखी काही मनोलैंंगिक आजार …

 

Comments are closed.