वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एखादी बलात्काराच्या घटनेची बातमी राजरोसपणे पहिली की वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषण्ण भाव येत असणार याची मला खात्री वाटते. अशा बातम्या वाचून कोणालाही बेचैनी येईल. काही लोकांना आपण अशा समाजात राहतो कसे याचीच लाज वाटेल तर काहींना खूप चीडही येईल. अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया असतील. पण ज्या समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत तेथे काहीतरी बदल घडणे नक्कीच गरजेचे आहे.
लैंगिक सुखाचा विचारमनात येताच ते कसेही करून मला मिळायलाच हवे असा पराकोटीचा स्वार्थी विचार मनात सतत घोळत राहिला, तर मग संयम या गोष्टीशी काही नातेच उरत नाही. मग अविचारीपणाने संधी मिळताच ते सुख ओरबाडून घेतले जाते. या क्षणभराच्या सुखासाठी बलात्कारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे आख्खे आयुष्य उध्वस्त करून टाकते. अत्याचाराला बळी पडलेली व्यक्ती जर लहान मूल असेल तर मग बघायलाच नको.
– अनेकदा असे दिसून येते की बलात्कार हे पूर्व नियोजनानूसार केले जातात. त्यामुळे ते वारंवार केले जाण्याची शक्यता खूप जास्त असते.
– सर्वसाधारणपणे 80 टक्के बलात्कार हे जवळपास राहणाऱ्या व्यक्तीकडून, माहितीतल्या व्यक्तीकडून केले जातात.
– असे दिसून येते की सर्वसाधारणपणे एक तृतीयांश बलात्कार हे एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या कडून म्हणजेच सामूहिक बलात्काराच्या स्वरूपामध्ये घडतात. सामूहिक बलात्काराच्या संदर्भात बोलायचे तर चुरशीच्या स्वरूपामध्ये किंवा बेटिंगच्या स्वरूपामध्ये हे गुन्हे केले जातात.
– साधारणपणे दोन तृतीयांश बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींमध्ये होतात म्हणजे बलात्कारी व्यक्ती आणि बळी पडणारी व्यक्ती हे दोघेही जण एकमेकाला ओळखत असतात.
– कोणत्या वयोगटातील स्त्रियांवर बलात्कार होतात याचा विचार करायचा झाल्यास असे आढळते की सर्वसाधारणपणे 16 ते 19 या वयोगटातील मुलींवर जास्त प्रमाणात बलात्कार होतात. त्याखालोखाल 12 ते 15 आणि 20 ते 24 या वयोगटातील मुलींवर बलात्कार होतात. 25 च्यापुढे मात्र हे प्रमाण कमी कमी होत जाते आणि साठ वर्षांच्या पुढे ते जवळपास नगण्य असते.
बलात्कारी व्यक्तींच्याबद्दल बोलायचे झाले तर सर्वसाधारणत: बलात्कार करणाऱ्या मध्ये तरुण वयोगटातील पुरुषांचे प्रमाण जास्त असते. पोलिसांच्या रेकॉर्डचा विचार करायचा झाला तर 30 ते 50 टक्के बलात्कारी पुरुष हे 18 ते 24 या वयोगटातील आढळतात. या पुरुषांचा थोडा सखोल विचार करायचा म्हटलं तर बलात्काराच्या जोडीला त्यांच्या हातून इतर गुन्हे देखील घडत असतात. समाजविघातक प्रवृत्ती, आक्रमकता आणि नियमबाह्य वर्तन करण्याकडे कल या गोष्टी त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. तसेच लहानपणापासून त्यांच्यामध्ये संस्कारांची आणि सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जडणघडण झालेली नसते. या व्यक्तींच्या मनात दुसऱ्याच्या प्रती असलेली तदनुभूतीची भावना जवळपास नसते. अनेकदा या व्यक्तीफक्त आत्मकेंद्रित विचारच करतात आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, त्यांच्या हक्कांवर आपल्या वागण्यामुळे गदा येईल याची जाणीवच त्यांना नसते.
बलात्काराचे स्वरूपच मुळामध्ये बळाचा वापर करून लैंगिक सुख मिळवणे ह्या प्रकारचे असते. त्यामुळे लैंगिक भावना अधिक तीव्र असतात की आक्रमकतेच्या भावना अधिक तीव्र असतात, याबद्दल काही संशोधने करण्यात आली. बऱ्याच संशोधनांमध्ये असे दिसून आले की बलात्कारी व्यक्तीमध्ये लैंगिक आवेग हे तीव्र स्वरूपाचे असतात त्याच्यावर नियंत्रण मिळवणे त्यांना कठीण जाते. त्याच जोडीला त्यांच्यामध्ये आक्रमकता किंवा वर्चस्व दाखवण्याची इच्छा देखील प्रबळ असते. या दोन्हीपैकी काय अधिक किंवा काय कमी असेल हे व्यक्ती भिन्नत्वाप्रमाणे वेगळे असू शकते. बऱ्याचदा बलात्कार करण्यामागे लैंगिक सुख मिळविणे हा हेतू नसतो तर स्त्रीचा अहं दुखाविणे आणि समाजामध्ये तिची किंवा तिच्या घरच्यांची मानहानी होईल ह्या हेतूने देखील बळजबरी केली जाते. आपल्या समाजामध्ये बलात्कार फक्त एक शारीरिक कृती नसून तो सामाजिक, मानसिक मानहानीचा प्रकार असतो.
बलात्कारासारख्या घटनेला सामोरे जावे लागल्यामुळे बळी पडलेल्या व्यक्तीवर तात्कालिक आणि दूरगामी गंभीर परिणाम होतात. त्यातूनच जर वारंवार बलात्काराला सामोरे जावे लागत असेल तर लक्षणांची तीव्रता खूपच जास्त वाढते आणि बळी पडणाऱ्या व्यक्तीवर अत्यंत गंभीर आणि स्वरूपाचे कायम टिकून राहणारे परिणाम दिसून येतात. सततची वाटणारी भीती, नैराश्य, अस्वस्थ झोप, निकृष्ट प्रतीची आत्मप्रतिमा, लैंगिक जीवनाबद्दल वाटणारी घृणा अथवा भीती, लैंगिक जोडीदाराबद्दल विश्वास न वाटणे, लैंगिक जीवनामध्ये रस न वाटणे किंवा गंभीर स्वरूपातील उदासीनता, आक्रमकता आणि काही वेळेला खून किंवा आत्महत्या अशी टोकाची तीव्र भावनिक प्रतिक्रियादेखील या गंभीर परिणामामध्ये मोडते. अनेकदा बलात्कार झालेल्या व्यक्ती पुढील आयुष्यात कोणाही बरोबर प्रेमाचे विश्वासाचे नाते निर्माण करण्यात किंवा टिकवून ठेवण्यात अयशस्वी होतात एकूणच शरीराला होणाऱ्या इजेपेक्षा मनावर होणारा आघात आणि त्याचे होणारे परिणाम हे जास्त गंभीर स्वरूपाचे असतात. शारीरिक परिणामांमध्ये नको असलेलं गरोदरपण, जननेंद्रियाची गंभीर हानी अथवा डोक्याला मार बसलेला असल्यास कायमचे अपंगत्व देखील येऊ शकते.
संस्कृतीचाही मोठा प्रभाव माणसाच्या लैंगिक आणि इतरही वर्तनावर असतोच. बलात्कार करावासा वाटणे यामागे लिंगभेद हे एक मोठ्ठे कारण आहेच. लहानपणापासूनच मुलांना आणि मुलींना दिली जाणारी वागणूक भिन्न असते. तू मुलगा आहेस; तुला कुठलीही वस्तू मिळाली नाही तर तू रडत न बसता ती हिरावून घेणे/ बळकावणे ह्यातच पुरुषत्व/मर्दानगी असते. मुलं बघून शिकत असतात की घरची जबाबदारी पुरुषांनी घ्यायची असते, आई, बहिण, मावशी, वाहिनी, काकू असा सगळा स्त्रीवर्ग हा घरीदारी दुबळा आहे.ताकद मग ती कोणतीही (आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक वगैरे) आहे ती पुरुषांकडे. अनेकदा भावनिकरीत्या, मानसिकरीत्या आणि आर्थिकदृष्ट्या स्त्रिया या पुरुषांवर अवलंबून असतात. मग तिला आधार हवा, तिला सांभाळायला हवं, तिची जबाबदारी आपल्यावरच आहे असा एक भाग आणि म्हणून मग तिला आदर, सन्मान, मताधिकार, निर्णय स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य या गोष्टींची गरजच काय अशी पुरुषी मानसिकता तयार होणे हे मग ओघानेच आले. मग तिचे “निष्कलंक चारीत्र्य” हे ही टिकायलाच हवे आणि याला जर धक्का लागला तर हा तिचाच घोर अपराध असे गृहीत धरणे ही सांस्कृतिक विचारसरणी.
लैंगिक अत्याचाराच्या मागे सांस्कृतिक अथवा सामाजिक जडणघडण आणि लोकांची मानसिकता कारणीभूत असते. हल्लीची वेगाने बदलती जीवनशैली, प्रसारमाध्यमे आणि जिथे तिथे आचरटपणे प्रसृत होणारी लैंगिक अभिव्यक्ती, बोकाळलेली पोर्नोग्राफी आणि सामाजिक मूल्यांचे अध:पतन अशा अनेक गोष्टींचा प्रभाव इथेही आहेच. बलात्कार या गोष्टीला सामाजिक न्याय काय असतो? घरातील वयात येणाऱ्या मुलांशी पालक संयमाचे संस्कार व्हावेत म्हणून काही प्रयत्न करतात का? आपल्या घरातील मुलानेच जर अशी कोणा मुलीची लैंगिक छेड काढली तर पालक काय भूमिका घेतात? समाज काय भूमिका घेतो? कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे ते कोणती भूमिका घेतात? अपराध्याला काही शिक्षा होते का? ती कधी होते? या सगळ्या गोष्टीचा परिणाम अत्याचाऱ्यांच्या मनावर आणि पर्यायाने वागणुकीवर होतच असतो.
बलात्काराच्या गुन्ह्याला भारतामध्ये आता अत्यंत कडक शासन देण्याची व्यवस्था केलेली आहे. बारा वर्षाच्या खालील व्यक्तीवर जर बलात्कार केला असेल देहदंडाची शिक्षा ही आता भारतामध्ये लागू झालेली आहे.
हे झाले कायद्याचे परंतु माझ्यावरील सुसंस्कृतपणाचे संस्कार हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण त्याच जोडीला समाजाचे प्रबोधन होणे हेही गरजेचे आहे.
– स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलली जायला हवी. त्याची सुरक्षितता, सन्मान, समानता, त्यांच्या मतांचा आदर या गोष्ठी समाजमनात घट्ट रुजायला हव्यात.
– तसेच मर्दानगीच्या संकल्पना देखील बदलायला हव्यात, अशा कल्पनांना खतपाणी घालणाऱ्या आणि लैंगिक वर्तनावर अयोग्य प्रभाव टाकणाऱ्या गैरसमजुती दूर करायला हव्यात.
– प्रसारमाध्यमांनी जागरूक भूमिका घेऊन समाजप्रबोधनाच्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत.
– मानसिक-लैंगिक विकृतीं वेळीच ओळखून तज्ञांकडे जाऊन उपचार घ्यायला हवेत.
– जबाबदार लैंगिक वर्तनाचे धडे लहानपणापासूनच मुलांना द्यायला हवेत.
– शालेय अभ्यासक्रमात वयानुरूप लैंगिकता शिक्षण विचारपूर्वक रितीने क्रमाक्रमाने मुलांना द्यायला हवे. जेणे करून कोणावर जोर जबरदस्ती करून मिळवण्याचे हे सुख नव्हे हे त्यांना समजेल.
– प्रसार माध्यमांवर आवश्यक तितका सरकारी अंकुश हा असायलाच हवा.
– एक समाज म्हणून जगताना, ज्या व्यक्तीवर बलात्कार होतो त्या व्यक्तींना दूषणं न देता पुन्हा त्या व्यक्ति सहजपणे समाजाचा भाग कसा होतील हे पाहायला हवं.
असे अनेक उपाय करता येतील आणि एकूणच समाज अधिक सुदृढ करता येईल. हा मात्र त्यासाठी एक चळवळच निर्माण व्हायला हवी.
Reference:
Abnormal Psychology (2007).
Robert Carson, James Butcher
No Responses