वयात येताना (मुली आणि मुलांमध्ये) – किशोरवय म्हणजे लहानपणातून प्रौढ होण्याचा काळ. वयात येण्याची ही प्रक्रिया काही वर्षं घडत असते. शरीरात होणाऱ्या बदलांसबोतच मनामध्ये आणि भावनांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात. वाढीला कारणीभूत असणारी संप्रेरकं शरीरात तयार व्हायला लागतात. त्यामुळे शरीराची वाढ वेगाने व्हायला लागते. त्याचसोबत लैंगिक आणि प्रजनन संस्थेचं काम सुरू व्हायला लागतं. लैंगिक अवयवांची वाढ व्हायला लागते. वयात येण्याची प्रक्रिया मुलींमध्ये साधारण वयाच्या 9 – 12 या काळात होते. तर मुलांमध्ये हाच काळ 11-15 वर्षे असा असतो. वयाच्या साधारण 18-20 वर्षांपर्यंत ही बदलांची आणि वाढीची प्रक्रिया पूर्ण होते.
मुलींमध्ये होणारे बदल – मुलींच्या शरीरात वयाच्या 9 वर्षांपासूनच बदल घडायला सुरुवात होत आहे असं सध्या दिसून येत आहे. मुलींच्या शरीराची वाढ अनेक कारणांवर अवलंबून असते. अनुवांशिक गुण, पोषण, व्यायाम, मानसिक स्थिती तसंच ताण तणाव अशा अनेक घटकांचा वयात येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असतो. काही मुलींची पाळी 9 व्या वर्षी सुरू होते तर काही जणींना 16-17 वर्षांपर्यंत पाळी येत नाही. जर तब्येतीच्या इतर काही तक्रारी नसतील तर हे स्वाभाविक किंवा नॉर्मल मानलं जातं.
काही मुलींमध्ये मात्र गर्भाशय किंवा बीजकोषांच्या रचनेमध्ये काही अडचणी असतात किंवा काहींच्या शरीरामध्ये जन्मतः गर्भाशय नसतं किंवा त्याचा आकार उलटा असतो. अशा वेळी मुलींना पाळी येत नाही. वयाच्या 17-18 वर्षांपर्यंत पाळी नियमितपणे आली नाही तर वैद्यकीय तपासणी करून घेण्याची गरज भासू शकते.
पाळीशिवायही मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरावर केस येतात. जांघेमध्ये, लैंगिक अवयावांजवळ आणि काखेमध्ये केस यायला लागतात. स्तनांची वाढ व्हायला लागते. शरीराचा आकार बदलतो. कंबरेखालचा भाग रुंद व्हायला लागतो. त्वचा तेलकट किंवा कोरडी होणं, मुरुमं किंवा पिंपल्स येणं असेही बदल होतात. याचसोबत भावनांमध्येही काही बदल व्हायला लागतात. मूड बिघडणं, एकटेपणाची भावना वाढणं, क्षणात आनंदी तर क्षणात दुःखी वाटणं, चिडचिड वाढणं असे बदल जाणवायला लागतात. मनात लैंगिक भावना निर्माण व्हायला लागतात. मुलींना मुलांबद्दल किंवा मुलींबद्दल आकर्षण वाटू शकतं.
शरीरात आणि मनात होणारे हे सर्व बदल वयात येण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत. सर्वांना हे सर्व बदल जाणवतीलच असं नाही. आणि त्यांची तीव्रताही व्यक्तिगणिक बदलू शकेल.
मासिक पाळी – श्वसन, रक्ताभिसरण, पचन अशा इतर क्रियांप्रमाणेच मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुलींमध्ये पहिली पाळी 9 – 12 या वयात किंवा त्यानंतरच्या काही वर्षांत येऊ शकते. मात्र पाळी सुरू होण्याआधी शरीरात इतर अनेक बदल घडलेले असतात.
मासिक पाळीची चक्रं असतात. प्रत्येक मासिक पाळीमध्ये बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येतं. ही पाळीचक्रातली मुख्य घटना आहे. या बीजाचा पुरुष बीजाशी संयोग झाला तर गर्भधारणा होते. या गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. पण जर गर्भधारणा झाली नाही तर बीजनलिकेतच स्त्री बीज विरघळून नष्ट होतं आणि त्यानंतर सुमारे 2 आठवड्यांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला सुरुवात होते. यालाच आपण पाळी येणं असं म्हणतो. अधिक माहितीसाठी लैंगिकता व जनन जागरुकता (फर्टिलिटी अवेअरनेस) वाचा.
सॅनिटरी पॅड किंवा टँपूनचा वापर – पाळीचं रक्त टिपून घेण्यासाठी आणि कपड्यावर डाग पडू नये म्हणून मुली आणि स्त्रिया विविध प्रकारच्या कापडाच्या घड्या किंवा पॅड्स वापरतात. सध्या बाजारात मिळणाऱ्या पॅड्समध्येही अनेक प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारचं पॅड वापरलं तरी ते नियमितपणे दर 4 ते 6 तासांनी बदलणं गरजेचं असतं. तसंच पॅडची विल्हेवाट नीट लावायला पाहिजे.
पॅडप्रमाणेच सुती कापडांच्या घड्यादेखील वापरता येऊ शकतात. हे कापडही दर तीन तासांनी बदलायला पाहिजे. तसंच परत वापरायचं असेल तर ते गार पाण्यात स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायला पाहिजे. पाळीसाठी सुती कापड वापरा. एकमेकींची कापडं वापरू नका आणि धुऊन ठेवलेली कापडं नीट स्वच्छ राहतील अशा ठिकाणी ठेवा. दर तीन-चार महिन्यांनी कापड बदला.
मुलांमध्ये होणारे बदल
मुलांच्या शरीरात वयात येण्याची प्रक्रिया मुलींपेक्षा 2-3 वर्षं उशीरा सुरू होते. साधारणपणे 11-14 या काळात मुलांच्या शरीरात बदल व्हायला लागतात. त्यामध्ये मुख्यपणे पुढील बदल होतात
- शरीरावर, काखेमध्ये, जांघेमध्ये केस यायला सुरुवात होते.
- चेहऱ्यावर केस, दाढी मिशा यायला लागतात
- आवाज फुटतो, घोगरा होतो
- लिंग आणि बीजकोषांचा आकार वाढायला लागतो. त्यामध्ये पुरुष बीजं आणि वीर्य तयार व्हायला सुरुवात होते.
- कधी कधी झोपेमध्ये अचानक वीर्य बाहेर येते
No Responses