मी जशी आहे, तशीच आहे – द्युती चंदची गोष्ट

मी जशी आहे तशीच आहे…

द्युती चंदच्या या आत्मविश्वासामुळे खेळाच्या दुनियेत मोठी क्रांती घडली आहे. द्युती चंद ही ओरिसामधल्या एका गरीब विणकर कुटुंबाची मुलगी आहे. पण तिची ओळख एवढीच नाही.

१६व्या वर्षी, २०१२ मध्ये १०० मीटर धावण्याची स्पर्धा ११.८  सेकंदात जिंकून ती राष्ट्रीय विजेती बनली. २०१३ च्या एशियन गेम्समध्ये कांस्य पदक आणि धावण्याच्या जागतिक युवा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. एशियन ज्युनिअर धावण्याच्या स्पर्धेत १०० आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये विजयी.

ही मुलगी ऑलिम्पिक नक्की जिंकणार अशी जिची ओळख तयार होत होती तिच्या विजयरथाला २०१४ साली लगाम बसला. भारतीय अॅथलेटिक महासंघाने तिची ‘जेण्डर टेस्ट’ करण्याचा आदेश दिला. आणि कॉमनवेल्थ स्पर्धेला जाण्याच्या पंधरा दिवस आधी द्युती चंदला पहिल्यांदाच कळालं की तिच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाचं प्रमाण ‘सामान्य’ समजल्या जाणाऱ्या पातळीपेक्षा जास्त आहे आणि यामुळे ती स्त्री किंवा मुलगी म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. यावर उपाय करण्यास म्हणजेच संप्रेरक उपचार किंवा जननेंद्रियांची शस्त्रक्रिया करण्यास द्युतीने नकार दिला. तिला खेळापासून एक वर्ष दूर रहावं लागलं.

मात्र ती गप्प बसली नाही. तिने खेळाच्या क्षेत्रातल्या सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. आणि एक वर्षानंतर जुलै २०१५ मध्ये कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (कॅस) ने तिच्या बाजूने निकाल देत तिला स्पर्धेत धावण्याची परवानगी तर दिलीच पण त्यासोबत नैसर्गिकरित्या ज्या स्त्रियांमध्ये टेस्टेस्टेरॉन जास्त आहे अशा महिला खेळाडूंच्या जेण्डर टेस्टवरच प्रश्नचिन्ह लावलं. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अथलेटिक्स फेडरेशन्सचे Hyper-androgenism संबंधीचे नियम कॅसने निकाली काढले आणि पुढच्या दोन वर्षांत या नियमांना आधारभूत ठरणारे नवे पुरावे पुढे न आणल्यास हे नियम कायमस्वरुपी निकाली काढण्याचे आदेशही कॅसने दिले आहेत.

पण हे सगळं पहिल्यांदाच होत नाहीये. या आधीही एखादी खेळाडू नक्की स्त्री आहे का पुरुष हा वाद रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेची कॅस्टर सेमेन्या असेल किंवा भारताचीच शांती सुंदराजन. महिला खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि त्यांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन किती ही चर्चा होतच राहिली आहे. आणि मुळात निव्वळ टेस्टेस्टेरॉनमुळे तुमचा परफॉर्मन्स इतका चांगला होतो का त्याला शरीराच्या इतरही गोष्टी मदत करत असतात हे अजून वादातच आहे. पण एका संप्रेरकाच्या आधारावर उभरत्या खेळाडूंना अपात्र ठरवणं आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं हे फार आधीपासून चालत आलं आहे.

द्युती चंदचं कौतुक हेच की तिने कुठल्याही दबावाला बळी न पडता संप्रेरक उपचार घ्यायला आणि जननेंद्रियाची काटछाट करायला नकार दिला. मी आहे तशीच आहे हे म्हणणं तिच्यासाठी अवघड होतंच पण त्यातूनच ती तिच्याबाबत झालेल्या अन्यायाविरोधात लढू शकली.

क्रीडाजगतातला भेदभाव आणि जीवशास्त्राचा वापर या भेदभावासाठी कसा करण्यात येतो याबाबद अधिक माहितीसाठी वाचा – http://www.bbc.com/sport/0/athletics/29446276

image courtesy – www.bbc.com

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap