लैंगिकतेबद्दल का बोलायचं?

2,855

स्वतःच्या शरीराबद्दल, भाव भावनांबद्दल, प्रेम आणि आकर्षणाबद्दल, आजारांबद्दल आपण किती मोकळेपणी बोलतो? आपल्या इच्छा, आवडी, नावडी आपण स्पष्टपणे मांडू शकतो का? आपल्याला कोणत्या गोष्टी घाण किंवा घाणेरड्या वाटतात? आपल्याला कोणत्या गोष्टींची भीती वाटते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजेत. आणि शोध घेतला तर आपल्या हेही लक्षात येईल की येईल की यातल्या बऱ्याचशा गोष्टी शरीराबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल, लैंगिक आजारांबद्दल, आकर्षणाबद्दल आणि नात्यांबद्दल असतील.

अगदी लहान असल्यापासून आपल्याला शरीराविषयी कुतूहल असतं. आपलं शरीर कसंय, इतरांचं शरीर कसंय याबद्दल जशी उत्सुकता असते तशीच लैंगिक संबंध, नाती, इच्छा, प्रेम याबद्दलही आपल्याला माहिती हवी असते. वयात येताना शरीरात काय बदल होतात, ते का होतात आणि ते नॉर्मल आहेत का हे आपल्यापैकी अनेकांना माहित नव्हतं. आणि जेव्हा हे बदल व्हायला सुरुवात झाली तेव्हा आपण घाबरून गेलो, गोंधळलो, आतल्या आत मिटून गेलो आणि जिथून मिळेल तिथून माहिती मिळवू लागलो. पण तरीही लहानपणी पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला मिळाली नाहीत.

पण ही उत्तरं मिळणं, योग्य भाषेत, शास्त्रीय पद्धतीने आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने मिळणं, आपल्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. शरीरात होणारे बदल, सेक्स, लैंगिक आवड, कल, प्रेम संबंध लैंगिक आरोग्य, प्रजनन, गर्भनिरोधन अशा सर्वच गोष्टींबद्दल बोलणं गरजेचं आहे. लैंगिक सुखाबरोबरच, लैंगिक शोषण म्हणजे काय, स्पर्शाचे अर्थ, लैंगिक नाती, त्यातलं नियंत्रण, दबाव आणि स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. लैंगिक नात्यांबद्दल असणाऱ्या आपल्या कल्पना, भावना मोकळेपणाने एकमेकांना सांगणं, विश्वास आणि आदर निर्माण करणं याची पहिली पायरी म्हणजे लैंगिकतेबद्दल बोलणं.

चुप्पी तोडू या, मोकळं होऊ या

प्रश्न विचारू या, उत्तरं शोधू या

डोळ्यावरची झापडं काढू या, बंद कवाडं उघडू या

चला, लैंगिकतेवर बोलू या…

2 Comments
 1. vinayak says

  चला बोलुया

  पिढी बदलतेय नव्या विचारांची ओळख एकमेकांना यातुनच होईल

  पन किती तरुन इकडे भेट देतील ही शंकाच आहे
  त्या साठी या वेबसाइट ची जाहिरात व्हायला हवी सेलिब्रेटी मार्फत चर्चा व्हायला हवी तरुण पिढी आवरजुन इथे कसे भेट देतील हे पहायला हवे
  निकोप समाज प्रगति साठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे

 2. I सोच says

  तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे

Comments are closed.