गेल्या दशक-दीड दशकात बायकांच्या जगण्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक -सार्वजनिक राहणीमान, आचारविचारांचा विस्तारलेला परीघ, करिअरमधे पार केलेले मोठे टप्पे अशी अनेक उदाहरणं त्यासाठी देता येतात. लोकशिक्षणामुळे समाजातून मिळणारं सहकार्य आणि स्त्रीची स्वत:ची वाढलेली इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीला मिळालेली धाडसाची सोबत अशी दोन्ही कारणं त्यामागे आहेत.
मेरी कोम तीन मुलांना जन्म दिल्यानंतरही बॉक्सिंगमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. फोगट भगिनी, साक्षी मलिक कुस्तीमध्ये नाव कमावतायत. लेफ्टनंट भावना कस्तुरी या वर्षी आर्मी डे संचलनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी ठरली. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली संचलनामध्ये फक्त महिलांच्या चमूने मोटारसायकलींवर कसरती केल्या होत्या. देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या बायका धाडसी आहेत असं म्हटलं जातं.
सैराटमध्ये बुलेट चालवत कॉलेजमध्ये येणारी आर्ची, ट्रॅक्टर चालवत सरळ परश्याच्या घरी जाऊन त्याच्या आईशी बोलते, त्याची भंबेरी उडवते. मराठीत सांगितलेलं कळतंय का इंग्लिशमध्ये सांगू, असा कुणालाही ठामपणे दम भरते. घरच्या विरोधाला प्रतिकार करून प्रियकराबरोबर पळून जाते. या धाडसी आर्चीने पब्लिकला चांगलंच येडं केलं.
हिंदी सिनेमात ‘वीरे दि वेडिंग’ आणि ‘लस्ट स्टोरी’मध्ये नवऱ्याकडून अपेक्षित शरीरसुख मिळत नाही म्हणून स्त्री पात्रं लैंगिक खेळणी वापरून आपल्या इच्छा पूर्ण करतात. ‘मनु वेडस तनु’पासून ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘पार्च्ड’, ‘अँग्री यंग गॉडेसेस’मधल्या स्त्रिया आपल्या लैंगिक भावना स्पष्टपणे व्यक्त करतात. ‘बरेली की बर्फी’तली नायिका ती व्हर्जिन नाही हे लग्नासाठी पाहायला आलेल्या मुलांना सहज सांगते. ‘मनमर्जियाँ’ मधली नायिका मित्राला राजरोस सेक्ससाठी घरी बोलावते. एके काळी सोज्वळ, नम्र, सालस नायिका केवळ पाऊस पडत असताना, अपघाताने एका खोलीत बंदिस्त झाल्याने घाबरत, नको नको म्हणत नायकाच्या मागणीखातर अपघाताने शरीरसंबध ठेवत होत्या. आता त्या आपण स्वेच्छेने, स्वानंद घेणारे लैंगिक जीव आहोत याचा उच्चार विविध अंगाने दाखवत आहेत, धाडसाचंच काम आहे ते असं मानलं जातं.
मुलं/पुरुष जे काम सर्रास किंवा पिढ्यानपिढ्या करत आले आहेत त्या गोष्टी मुली/ महिलांनी केल्या की, त्यांना पहिलेपणाचा मान मिळतो. खरं तर त्यासाठी मुलींना काही नवे अवयवारोपण करावे लागत नाही! गाडी चालवण्यासाठी, कुस्ती/बॉक्सिंग खेळण्यासाठी, परेड करण्यासाठी आहे तेच हात पाय लागतात. सृष्टीच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष दोघे मिळूनच मुलं जन्माला घालतायत. पण अलीकडेच बायकांना पण शरीरसुख हवं असतं याचा शोध लागल्याप्रमाणे मुख्य प्रवाहातील सिनेमातून स्त्री भूमिका येऊ लागल्या आहेत. हे चित्रण वादग्रस्त ठरतं, पर्यायाने प्रसिद्धी आणि खप वाढतो. सिनेमा वास्तववादी करण्याची हौस/गरज म्हणा, स्त्रियांचा लैंगिकसंबधातील पुढाकार याचं आजही अप्रूप आहे म्हणून ते ‘धाडस’ ठरतं.
या धाडसाचं प्रतिबिंब सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातही पडताना दिसतंय. चार मध्यमवयीन बायका मिळून दरडोई १५ लाख खर्चून भारताचा सत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी भारतातून मोटार घेऊन १८ देश पार करत लंडनला जातात. १९ वर्षांची वेदांगी कुलकर्णी एकटी सायकलवर जगप्रदक्षिणा करते. अनेक मध्यमवयीन स्त्रिया अनेक किलोमीटर रस्त्यावर पळताहेत, मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. खेळाला आवश्यक पेहराव घालत आहेत. एकेकाळी नऊवारी साड्या नेसणाऱ्या सहावारी नेसत आहेत. सहावारीवाल्या ड्रेस, गाऊन घालू लागल्या आहेत. पुणे असो की औरंगाबाद, धुळे, शाळा कॉलेजातल्या मुली कुर्ती-लेगिंग आणि पँट घालत आहेत. चढणं, उतरणं, उठणं, बसणं, चालणं, धावणं, प्रवास सोयीचं व्हावं यासाठी कालसुसंगत सुटसुटीत बदलही अनेकजणी करतात, आणि इतर कुणामुळे ‘धाडस’ करायला धजावले, असं सांगतात.
मुलीने/बाईने घराबाहेर पडून काम करणं, ठराविक वेळेपलीकडे, कामाशिवाय, एकटीने बाहेर फिरणं, बाहेर जेवणं, राहणं, सिनेमा-नाटक कार्यक्रमाला जाणं हे आजही खूप कमी जणी करत असल्याने धाडस सदरातच मोडतं.जोरात हसणं, बोलणं हे आपापल्या खाजगी गटात अत्यंत मोकळेपणे चालू होतं. आजकाल सार्वजनिक व्यासपीठावर कधी कधी ही स्त्रीत्वाची बंधनं गळून पडताना दिसतात. आता फेसबुक, यूट्यूब स्त्रिया, समलिंगी व्यक्ती मन मोकळं करण्यासाठी वापरत आहेत. जे जे व्यक्तिगत ते सार्वजनिक हे ब्रीद होत आहे. छोट्या गावातल्या, कमी शिकलेल्या मुली, महिला आपली गाणी, नाच, जेवण बनवण्याचे व्हिडियो करून टाकत आहेत. कोण एक मध्यमवर्गीय महिला ‘हॅलो फ्रेंड्स चाय पी लो” म्हणते, हा व्हिडियोही लाखो लोकांनी पाहिला, हे बायकांच्या ‘अभिव्यक्ती’कडे समाज किती डोळे लावून बसला आहे याचं द्योतक आहे. म्हणून खास स्त्रियांनी पुढाकार घ्यावा यासाठी Bumble Bff हे नवीन सामजिक पीठ सक्रिय होत आहे.
जुन्या माध्यमांपैकी रेडिओ विशेष लोकप्रिय होत आहे. आरजेसोबत महिला मन मोकळं करत होत्या, आता सेलिब्रिटी आरजेसोबत आणखी उत्साहाने बोलत आहेत. नुकतंच शेअर इट विथ स्वप्निल जोशी कार्यक्रमात एका ‘दीपिका’ने आपलं मन मोकळं केलं, “लग्नाअगोदर आईवडिलांमुळे मुलांशी मैत्री करता आली नाही. त्यामुळे माझी स्वप्नं अपूर्णच राहिली. आता व्हॉट्सऍपवर एकाबरोबर ओळख झाली त्याला मी माझे काही पिक्चर्स पाठवले आणि आता मला काळजी वाटतेय. त्याने माझ्या फोटोचा गैरवापर केला तर?” याहूनही खासगी प्रसंग आणि प्रश्न बायका करण जोहरबरोबरपण शेअर करतात. ‘बायकांना काय हवंय’ हे आता करीना कपूर खान रेडिओवरून सांगतेय. बायकांना जेवढं ‘द्याल’ तेवढं कमीच असं वादळ दीपिका पदुकोणच्या ‘माय चॉइस’ने आणलं होतं. पाश्चिमात्य स्त्रियांनाही साचेबद्ध बायकी अपेक्षांमधून सुटका हवी आहे. कार्डी बी, झेने आयको, प्रिन्सेस नोकिया, काली अचीस, सिझ्झा या गायिकाही आम्हाला आमच्यासारखं राहू द्या, दिसू द्या, गाऊ द्या असं सांगताहेत. महिलांचे असे आवाज, विषय यासाठी ‘स्ट्राँग ओपिनियन लूजली हेल्ड’ हे पॉडकास्ट वाहिलेलं आहे.
सेवा, उत्पादन विकण्यासाठी जाहिराती कधी विनोद, तर कधी सामाजिक बदलाच्या उद्दात हेतूने आई, बाई यांच्या साचेबद्ध कल्पनांना तडाखे देत आहेत. टीव्ही पाहत घरात व्यायाम करणारी आई मुलीने खायला मागितल्यावर व्यायाम न थांबवता काय हवं ते तुला आणि मलापण फोन करून ऑर्डर कर, असं फर्मान सोडते किंवा मुलाबरोबर व्हिडिओ गेम खेळताना त्याला खाऊ बनवण्यासाठी ब्रेक घेत नाही. ही जाहिरात लोकप्रिय होते आहे हे पाहताच ‘जेवण न बनवण्याचा जानेवारी’ अशी जादुई कल्पना त्यांच्या स्पर्धक कंपनीला सुचली आहे. मला स्वयंपाक येत नाही/आवडत नाही असं चारचौघात (म्हणजे फेसबुकवर!) सांगणाऱ्या बायका आहेत. कामाच्या स्वरूपामुळे आमची मुलगी लग्नानंतरही स्वयंपाक करणार नाही हे पालक सांगतात. एके काळी अत्यंत धाडसाची वाटू शकणारी विधानं आता सवयीची होऊ लागली आहेत.
बाईकडून अपेक्षित असलेली सीमा ओलांडली गेली तर ते समाजाच्या दृष्टीने धाडस ठरतं. नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल यांनी सद्य:परिस्थितीतल्या झुंडशाहीविरुद्ध लिहिलेलं भाषण साहित्य संमेलनाला न येताही सर्वदूर पोहोचलं. यावरून माध्यमातून प्रचंड गदारोळ माजलेला असताना वयाच्या साठीत असलेल्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात झुंडशाहीचा स्पष्ट शब्दात विरोध केला आणि अपघाताने उद्घाटक झालेल्या तिशीतल्या वैशाली येडे यांनी “बोलणारी बाई चालत नाही डोलणारी, डोलावणारी चालते. पण मीही बोलणारच आहे,” असं ठणकावून सांगितलं. आत्महत्या केलेल्या नवऱ्याप्रमाणे खचून न जाता स्वबळावर जगण्याची जिद्द कायम ठेवणार असा निर्धार व्यक्त केला. या तिघींचं असं संयत खंबीर असणं हे मात्र नक्कीच धाडसाचं आहे. ते कालातीत आहे.
चित्र साभार : गुगल सर्च
No Responses