एच. आय. व्ही./एड्सचा अस्तित्व, उगम आणि मानव संक्रमण

0 1,838
वेबसाईटवर वाचकांकडून एच.आय.व्ही/ एड्स बाबत एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की,  एच.आय.व्ही/ एड्स पूर्वी अस्तित्वात होता का? हा आजार नक्की कुठून आला आहे ? या विषाणूचा इतिहास काय आहे? याच सर्व प्रश्नांची उकल वाचकांना व्हावी म्हणून या  लेखाचे प्रयोजन.

एड्सचे पूर्वी अस्तित्व होते काय?

सन १९८१ मध्ये एड्सची पहिली नोंद जगात झाली. सर्व संशोधन अभ्यासांमध्ये रक्तनमुन्यातील थोडेसे रक्त द्राव (भविष्यात उपयोगी पडतील म्हणून) सर्व सामान्यपणे जपून ठेवले जातात. आफ्रिकेतील झैरेमधील किन्शासातील एका खलाशाच्या १९५९ साली घेतलेल्या रक्तनमुन्यात एच. आय. व्ही. जंतुसंसर्ग आढळला. एच. आय. व्ही. जंतुसंसर्गाचा जगातील आतापर्यंत नोंद केलेला हा सर्वात जुना पुरावा आहे.

आनुवंशशास्त्राच्या दृष्टीने एच. आय. व्ही मध्ये आणि माकडामध्ये आढळणा-या एस्. आय. व्ही. (Simian Immuno Deficiency Virus) या विषाणूमध्ये खूप साम्य आहे. हा विषाणू वानरांमध्ये आढळतो आणि त्यांच्यातूनच त्याची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. तथापि, हा विषाणू वानरापासून मानवापर्यंत केव्हा आणि कसा पोहोचला हे निश्चितपणे ठरविणे कोणालाही शक्य नाही. सामान्यपणे असे वाटते की १९११ आणि १९३५ च्या दरम्यान एच. आय. व्ही. चा मानव जातीत प्रवेश झाला असावा.

काही आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक असा दावा करतात की, पुरातन आयुर्वेदिक साहित्यात एड्स सदृश्य स्थितीचे वर्णन ‘ओजक्षय’ म्हणून केलेले आहे. तथापि, असे निष्कर्ष अनेक गृहीतांवर आधारित आहेत. बहुतेक प्राणघातक आजारांच्या अंतिम अवस्थेत एड्स सदृश्य किमान काही लक्षणे व चिन्हे आढळू शकतात. एच. आय. व्ही. संसर्ग फैलावण्याची प्रवृत्ती लक्षात घेता १९८१ पर्यंत तो निदर्शनास न आल्याची कारणे आणि नंतरचा अकस्मात उदभव व वेगाने होणारा प्रसार याविषयीचे स्पष्टीकरण देता येत नाही. म्हणून एच. आय. व्ही. ची उत्पत्ती अलीकडेच झाली आहे यावर विश्वास ठेवणे शास्त्रीयदृष्टया आवश्यक आहे. त्यामुळे पूर्वी इतर साथींच्या रोगांच्या बाबतीत जे घडले असावे त्याच पध्दतीने सध्याचा एच. आय. व्ही. चा फैलाव सुध्दा ‘कसातरी’ आपोआप नष्ट होईल अशा प्रकारचा आत्मसंतोषी दृष्टिकोन यामुळे  टाळता येईल. एच. आय. व्ही. हा एक नवीन विषाणू आहे आणि त्याचा मानवजातीत प्रवेश कोणत्या वर्षी झाला हे शोधण्यात व्यर्थ वेळ दवडण्यापेक्षा, त्याच्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरिता व्यापक प्रयत्नांचा विचार करणे गरजेचे आहे यात शंका नाही.

एच. आय. व्ही. विषाणू कुठून आला असावा?

वानरे आणि मांजरे यासारख्या काही प्राण्यांच्या प्रजातीमध्ये सुध्दा एक एड्ससदृश्य आजार दिसतो. वानरातील या रोगास सिमिअन इम्युनो डिफिशियन्सी सिड्रोम (Simian Immuno Deficiency Syndrome) असे इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस (SIV) असे म्हणतात. तद्वतच मांजरामधील आजारास कारणीभूत असलेल्या विषाणूस फेलाइन इम्युनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम (Feline Immuno Deficiency Syndrome) म्हणतात आणि या विषाणूस फेलिन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस (FelV) असे म्हणतात. हे विषाणू एच. आय. व्ही. च्या प्राण्यांमधील आवृत्या आहेत. तथापि हे सर्व विषाणू अत्यंत प्रजातीनिष्ठ आहेत, म्हणजेच फे. आय. व्ही. (FelV) मुळे मानवात एड्स होत नाही किंवा एच. आय. व्ही. मुळे मांजरामध्ये एड्स सदृष्य आजार होत नाही.

एच. आय. व्ही. चे दोन प्रकार असतात. एकास एच. आय. व्ही.-१ आणि दुस-यास एच. आय. व्ही.-२ असे म्हणले जाते. एस. आय. व्ही. (वानरामधील विषाणू) हा एच. आय. डी.-१ पेक्षा एच. आय. डी.-२ थी अधिक जवळचा समजला जातो. म्हणून एच. आय. व्ही.-२ ची उत्पत्ती प्रथम, एच. आय. व्ही. पासून झाली असे मानले जाते. हा विषाणू वानरांपासून मानवात कसा संक्रमित झाला याबाबत अद्यापही मतभिन्नता आहे. त्याचा मानवातील प्रवेश स्पष्ट करण्यासाठी अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत.

– कटीर भागात इंजेक्शनद्वारे वानरचे रक्त टोचल्यास लैंगिक भावना वाढते अशी आफ्रिकेतील काही जमातींच्या लोकांची अंधश्रध्दा आहे. या इंजेक्शनामुळे त्यांची लैंगिक ताकद वाढते असा त्यांचा विश्वास आहे. या सिध्दांतानुसार मानवास जंतुसंसर्ग करण्याची क्षमता असलेल्या एच. आय. व्ही. च्या एका जातीचा अशा प्रथेद्वारे मानव जातीमध्ये प्रवेश झाला. वानरासोबत संभोग (Bestiality) केल्याने एच. आय. व्ही. चा प्रवेश मानव जातीमध्ये झाला असाही एक सिद्धांत आहे.

– वारंवार होणा-या अणुस्फोटांमुळे आणि त्यांच्या पर्यावरणावरील दुष्परिणामामुळे एच. आय. व्ही. विषाणू अस्तित्वात आला असावा. असे काही शास्त्रज्ञांना वाटते.

– एच. आय. व्ही. हे शीत युध्दाच्या कालखंडात शास्त्रज्ञांनी जैविक युध्द करण्यासाठी विकसित केलेले एक शस्त्र आहे असा काही लोकांचा विश्वास आहे.

– एच. आय. व्ही. च्या उगमासंदर्भात काही वर्षांपूर्वी एक सनसनाटी शास्त्रीय गृहीत मांडण्यात आले. पोलिओ प्रतिबंधक लसीच्या एका प्रकारामुळे एस, आय. व्ही. विषाणूचा मानवी शरीरात प्रवेश झाला असावा. (असा एक दावा करण्यात आला) जुन्या काळी पोलिओ प्रतिबंधक लसींपैकी एक लस वानरांच्या मूत्रपिंड पेशीपासून तयार करण्यात येत असे. मानवी शरीरास जंतुसंसर्ग करण्याची क्षमता असलेले एच. आय. व्ही. विषाणू या वानरांच्या या मुत्रपिंड पेशींमध्ये असावेत असा विचार मांडला गेला. पुरुषांशी संभोग करणा-या पुरुषांनी ही लस या ना त्या कारणाने वारंवार घेतली. तथापि पोलिओ लसीच्या अशा वापरामुळे एच. आय. व्ही. जंतुसंसर्गाचे एकही प्रकरण अद्यापि नोंदले गेले नाही. हे गृहीत जर सत्य असते तर या साठ्यातून लस प्राप्त झालेल्या कितीतरी बालकात किंवा बालकांच्या गटांत सुरुवातीच्या काळात एच. आय. व्ही. संसर्ग आढळला असता. तथापि १९८० च्या दशकात एच. आय. व्ही. बाधित बालकांचे प्रमाण खूप कमी होते. याच्या उगमाच्या कारणाचा पोलिओ प्रतिबंधक लसीशी संबंध जोडणे योग्य होणार नाही.

– काही वैज्ञानिकांना वाटते की, काही जंतुची विषाणूशी जनुकीय प्रतिक्रिया झाल्याने एच. आय. व्ही. या विषाणूची (Recombinant Virus) निर्मिती झाली असावी.

एच. आय. व्ही. चा उगम आणि त्याचा वानरापासून मानवापर्यंतच्या संक्रमणाबाबत सुध्दा अनेक सिध्दांत असले तरी त्यांची वैज्ञानिक सत्यता पडताळून पाहणे या क्षणी शक्य नाही आणि गरजेचे देखील नाही. या बाबी समजून घेण्याचे प्रयत्न करण्यात वेळ व्यर्थ दवडण्यापेक्षा एच. आय. व्ही. प्रतिबंधाबाबतच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी तो उपयोगात आणणेच उत्तम होय.

सदर लेख यौवनाच्या उंबरठ्यावर या डॉ. रमण गंगाखेडकर व डॉ. प्रकाश भातलवंडे लिखित पुस्तकातून घेतलेला आहे. याचे प्रकाशक युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड हे आहेत.  

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.