‘पद्मावत’च्या निमित्ताने… निहार सप्रे

गेल्या वर्षभरात चित्रविचित्र कारणांनी, म्हणजे अगदी दिग्दर्शकाला मारहाण होण्यापासून, सेटला आग लावण्यापर्यंत ते चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यापर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट म्हणजे “पद्मावत”. सरतेशेवटी पद्मावत प्रदर्शित झाला आणि कुतूहल म्हणून मी तो बघायला गेलो. चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटापर्यंत पोचता पोचता माझ्या मनात एकच विचार येत होता. आजच्या काळात कोणी असा चित्रपट कसा काय काढू शकतो?

या चित्रपटाची कथा आहे चित्तोडची राणी पद्मिनी (दीपिका पादुकोण) आणि राजा रतनसिंग (शाहीद कपूर) यांच्या प्रेमाची, त्यांच्या प्रेमावर ग्रहण बनून आलेला अल्लाउद्दिन खिलजी (रणवीर सिंघ) आणि त्याच्या तावडीत पडू नये म्हणून राणी पद्मिनीने केलेल्या अतुलनीय त्यागाची. आता हा त्याग म्हणजे काय? तर अल्लाउद्दिन खिलजीने जेव्हा राणी पद्मिनीच्या मोहात पडून, चित्तोडवर आक्रमण केलं आणि राजा रतनसिंघची हत्या केली, तेव्हा त्याच्या हातात पडू नये म्हणून राणी पद्मिनी आणि इतर शंभर राण्यांनी ‘जोहर’ केला, म्हणजेच आत्महत्या केली पण जोहर करण्यामागचं लॉजिक काय? तर आपल्यावर ज्याचा हक्क आहे, असा आपला पतीच मेल्यानंतर जगण्यात काय अर्थ आहे? परपुरुषाच्या हातात पडून आपला व आपल्या कुटुंबाचा आत्मसन्मान घालवण्यापेक्षा आत्महत्या करणं जास्त योग्य आहे! जोहरचा ते दृश्य  बघताना किंवा एकुणच तो संपूर्ण चित्रपट बघताना माझ्या मनात प्रश्न येत होता तो म्हणजे कोणतीही स्त्री, मग ती बलात्कार पिडीत असो, विधवा असो किंवा शरीरविक्रय करणारी असो; कितीही संकटात सापडली तरी स्वतःहून स्वतःला संपवण्याचा विचार करेल का? की तिच्या आजूबाजूचा समाजच तिला तसा विचार करायला भाग पाडतो?

आता हीच कथा चित्रपट निर्मात्यांना घ्यावीशी का वाटली? यामागच्या कारणांचा विचार केल्यावर लक्षात येऊ शकतं की यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे एकतर आजही अशा प्रकारचा त्याग स्त्रियांनीच करावा अशी अपेक्षा समाजाकडून बाळगली जाते, ज्यात प्रेक्षकांनाही काही गैर वाटत नाही आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारच्या जुनाट प्रथा परंपरांचे गौरवीकरण करणाऱ्या कथा घेण्यात चित्रपट निर्मात्यांचा काय फायदा असतो. त्यामुळं अशा जुनाट गोष्टींवर भरमसाठ पैसे खर्च करून चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात त्यांनाही काही गैर वाटत नाही. असो…

तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टींबाबत चर्चा होऊ शकते हे खरंच आहे.

मुळात म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, आणि स्त्रियांचा आत्मसन्मान या नावाखाली सती प्रथेसारख्या भीषण प्रथेचे गौरवीकरण केलंय, अशी कथा निवडण्याची वेळ निर्मात्यांवर का यावी? म्हणजे आजच्या काळात सुद्धा समाजाची मानसिकता अशीच आहे का? की आपल्या पतीच्या मरणानंतर स्त्रीचा आत्मसन्मान कशात आहे तर स्वतः स्वतंत्रपणे नं जगता, तिने स्वतःलादेखील मारून टाकावे? किंवा दुसरा मुद्दा म्हणजे आजही समाजाची मानसिकता अशीच आहे का? की जी स्त्री पतीच्या मरणानंतर स्वतःला मारण्यामध्ये धन्यता मानते ती म्हणजे देवीसमान आणि जी स्त्री स्वतंत्रपणे  जगू इच्छिते ती चरित्रहीन?

चित्रपटाच्या एका दृश्यामध्ये राणी पद्मिनी, राजा रतनसिंघकडे जोहर करण्याची परवानगी मागते, म्हणजे काय तर एखाद्या स्त्रीला स्वतःहून जगण्याचे किंवा मरण्याचे स्वातंत्र्यदेखील नाही? की दरवेळी तिने तिच्या पतीचा किंवा फारतर फार तिच्या कुटुंबाचा विचार करून, त्यांच्या परवानगीनेच निर्णय घेतले पाहिजेत? या प्रश्नाचं समर्थन न करता, एक तथाकथित ‘उत्क्रांत’ समाज म्हणून आपणच हा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे. जोहरच्या दृश्याच्या वेळी राणी पद्मिनी बाकीच्या राण्यांसमोर एक मोठं भाषण करते ज्याचा सारांश असा की, वेळप्रसंगी स्त्रियांना आपल्या आत्मसन्मानासाठी, अधिकारांसाठी हत्यार उचलून दुर्गा बनावं लागतं आणि लढावं लागतं वगैरे वगैरे… आणि ते भाषण झाल्यावर सर्व स्त्रिया काय निष्कर्ष काढतात? तर परपुरुषाच्या स्वाधीन होण्याऐवजी आत्मदहन केलेलं चांगलं. म्हणजे थोडक्यात काय तर स्त्रीनं हत्यार उचलायचं म्हणजे मरायचं का? हे कुठलं लॉजिक? आणि ही अशी मानसिकता का? शिवाय आदेश देणारी कोण? तर आपली राणी आणि आपण कोण आहोत तर तिचे अनुयायी. म्हणजे इथे कुठेतरी सरंजामशाहीचे देखील उदाहरण दिसते. या सगळ्या गोष्टी किंवा विचार कुठून येतात, असा प्रश्न जर का आपण स्वतःला विचारला, तर आपल्याला लक्षात येतं की, या सर्व गोष्टी पुरुषप्रधान संस्कृतीची देणं आहेत. असे अनेक सीन या चित्रपटात आहेत ज्यातून आजच्या काळातही पुरुषप्रधान संस्कृती आपल्यात किती खोलवर रुजली आहे याचा प्रत्यय येत राहतो. मुळातच हा चित्रपट, चित्रपटाची कथा, ती दाखवण्याची पद्धत या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि चित्रपट बघून बाहेर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर लक्षात येते की आजही, आपण स्वतःला कितीही पुरोगामी म्हणवून घेतलं, तरी आपल्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीने सांगितलेल्या जुनाट मूल्यांची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत, म्हणजे एका बाजूला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा लावायचा आणि दुसरीकडे जोहर/सती सारख्या जुनाट परंपरांचा पाढा वाचायचा. हा कुठला प्रोग्रेसिव विचार? किंवा ही कुठली संस्कृती? म्हणजे बघा, चित्रपटाच्या सुरवातीला डिस्क्लेमर येतं, ‘आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे सती परंपरेचं समर्थन करत नाही’. हे सांगून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हात वर केले आणि नंतर संपूर्ण चित्रपटातून आणि खासकरून चित्रपटाच्या शेवटातून काय केलं? तर सती किंवा इतर जुनाट प्रथा – परंपरांचे गौरवीकरण केलं. दुसरा मुद्दा हा की, मुळातच राणी पद्मावतीचं पात्र आणि ती कथा काल्पनिक आहे आणि त्याला इतिहासाचा किंवा वास्तविकतेचा दुजोरा नाही, असं असताना निर्मात्यांना चित्रपटाचा शेवट स्त्रीवादी दृष्टीकोनातून करता आला असता. पण नाही, त्यांनी तसं नाही केलं, का? तर आजही आपल्याकडच्या प्रेक्षकांना स्त्री ही सती सावित्री, त्यागी अशा भूमिकेमध्येच बघायला आवडतं. स्त्रीने आपल्या पतीच्या, आपल्या कुटुंबाच्या आत्मसन्मानासाठी, अगदी स्वतःचा जीवही द्यायला मागे पुढे बघितलं  नाही पाहिजे हेच संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि हे संस्कार कुठून आले तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीतून!

दुसऱ्या बाजूला या चित्रपटाला विरोध करणारे फार शहाणपण दाखवत होते असं काही नाही. त्यांचं तर म्हणणं होतं की राणी पद्मिनी ही आमची ‘माता’ आहे आणि आमच्या मातेच्या विरोधात कुणी सिनेमा काढायचाच नाही. त्यांचं म्हणणं तर पूर्णपणे बिनबुडाचंच होतं. कारण मुळातच जर का राणी पद्मिनी हे पात्र काल्पनिक आहे, तर कुणी त्यावर चित्रपट काढावा किंवा कथा लिहावी. त्यानं काय फरक पडणार? म्हणजे काय? एक तर विरोध करणारे लोक सरळ सरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याची भाषा करत होते आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मानसिकतेवरूनही काय लक्षात येतं तर ‘माता’ म्हणजे कोण? तर त्याग करणारी, वेळप्रसंगी कुटुंबाचा अभिमान राखण्यासाठी स्वतःचा जीव देणारी आणि सरतेशेवटी आपल्या पतीच्या अधिपत्याचा संपूर्णपणे स्वीकार करणारी स्त्री. ज्या स्त्रिया या कोटीक्रमामध्ये बसत नाहीत त्या चरित्रहीन, आणि संस्कृतीचं पालन नं करणाऱ्या. विरोध करणाऱ्यांनी दीपिका पादुकोणचं शीर उडवणाऱ्यांसाठी पाच कोटींचं बक्षीसही जाहीर केलं, म्हणजे कमाल वाटते की, जो देश किंवा इथले लोक स्वतःला लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात तिथे उघडपणे, संस्कृती वाचवण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात आणि शासन त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. धमक्या देणाऱ्या या लोकांना समाजाचे पोकळ आदर्श, जुनाट प्रथा, परंपरांचा यांचा पुळका तर येतो पण मुलींची कमी होणारी संख्या, स्त्रियांचं खालावणारं आरोग्य, त्यांची खालावणारी आर्थिक – सामाजिक परिस्थिती, त्यांच्या शिक्षणाची दैना याबद्दल काहीच करावसं वाटत नाही. हे सगळं भयंकर आहे.

चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर हिने चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये काही मुद्दे खूपच चांगल्या पद्धतीने मांडले आहेत, ज्या मुद्द्यांचा सारांश असा की, ‘कोणतीही स्त्री, मग ती गृहिणी असो, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असो, बार डान्सर असो, चित्रपट कलाकार असो, बलात्कार पीडित असो, विधवा असो, शरीर विक्रय करणारी असो किंवा इतर कोणताही व्यवसाय करणारी असो, तिला स्वतःचे जीवन स्वतःहून जगण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार तिच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. परंतु पद्मावत चित्रपट बघितल्यावर मात्र असंच वाटतं की, या चित्रपटातील स्त्रियांची काल्पनिक पात्र असोत किंवा वास्तविकतेमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारे लोक असोत, त्यांच्या मते, कदाचित स्त्रीला कोणत्याही प्रकारचा अधिकार असणे हे गैरच आहे आणि तिचे संपूर्ण जीवन हे कुणाचं ना कुणाचं तरी देणं  आहे.

खरंतर कोणी कोणत्या घटनेवर, पात्रावर कथा लिहावी किंवा चित्रपट काढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कथा लिहिणाऱ्या लेखकाने, चित्रपट काढणाऱ्या निर्मात्यांनी आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी या गोष्टीचा मात्र विचार करायला हवा की, आपण एखाद्या अशा गोष्टीला तर सपोर्ट करत नाही आहोत ना, ज्या गोष्टीच्या मागे काही जुनाट, कालबाह्य मूल्यं, आणि प्रथा, परंपरा आहेत ज्या एक प्रगत समाज म्हणून आपल्यालाच मागे टाकत आहेत…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap