मुलं-मुली वयात येऊ लागतात आणि आई-वडील अधिक काळजी करू लागतात. असं बहुतांश सगळ्याच पालकांच बाबतीत होतं आणि ते साहजिकच आहे. कारण किशोरवयात येताना मुला-मुलींच शरीरात घडून येणारे बदल! काही बदल मुला-मुलींना दिसू लागतात, तर काही बदल जाणवू लागतात. मुला-मुलींमध्ये बदल होतायत हे आई-बाबांनाही दिसू लागतं, जाणवू लागतं. अर्थात किशोरवयाचा हा टप्पा त्यांनीही अनुभवलेला असतोच की! ‘मुलं लहानाची ‘मोठी कधी व्हायला लागली हे कळालंच नाही असं आई-बाबांना वाटू लागतं. एकीकडं ‘मुलं’ मोठी होऊ लागल्याचा आनंद तर दुसरीकडं धास्ती अशा दोन्ही अवस्थांमधून पालक जात असतात. कारण किशोरवयात हा जसा नव बदलांचा कालखंड, तसा तो वादळी कालखंडही असतो. कारण नवे प्रश्न, नव्या भावना, त्यांचे गोंधळ असं सारं सुरु होणार असतं. जर सामान्य मुलं वयात येताना पालकांना एवढी धास्ती वाटत असेल तर मतिमंद मुलं वयात येताना पालकांना आणखी वेगळीच धास्ती वाटणं स्वाभाविक आहे. त्यातही सगळ्याच पालकांना मुलांपेक्षा मुलींच वयात येण्याबद्दल जास्तच काळजी वाटत असते.
मतिमंद मुलांचं वयात येणं हा पालकांसाठी अत्यंत वेगळा अनुभव असतो. किशोरवयात जे बदल सामान्य मुलांच्या शरीरात होतात, ते बदल मतिमंद मुला-मुलींच्या शरीरातही होत असतात. मुलींना मासिक पाळी येऊ लागते, स्तनांची वाढ होऊ लागते, स्त्रीबीज निर्मिती होऊ लागते, मुलांना दाढी-मिशा येऊ लागतात, अंगावर केस येऊ लागतात, शरीरात बदल घडून येऊ लागतात, पुरुषबीज निर्मिती होऊ लागते, एकूणच मुला-मुलींची प्रजनन संस्था काम करू लागते. मग ठराविक वयात मुला-मुलींच्या वागण्या-बोलण्यात होणारे बदल आपल्या लक्षात येऊ लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्यांच्या लैंगिक भावना उद्दीपित होऊ लागतात. उदा. मुलगे स्वतःच्या हाताने त्यांचे लिंग हलवतात, पॅंटमध्ये हात घालून बसतात, एखाद्या मासिकातील, टी.व्ही.तील किंवा चित्रातील मुलीच्या फोटोवरुन हात फिरवतात, तो फोटो बघून त्यांना छान वाटलेलं असतं. बाहेर गेल्यावर कुणालाही हात लावणं, गादीला किंवा जमिनीला शरीर घासणं, झाडाला जाऊन मिठी मारणं अशा प्रकारे मुलं व्यक्त होत असतात. तसंच उघडपणे समलैंगिकता आढळत नसली तरी काही वेळेला मुलं एकमेकांचे कपडे काढतात, असे प्रसंगही घडतात. मुली स्वतःच्या योनीमध्ये काही तरी वस्तू घालून लैंगिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण हा पर्याय सुरक्षित नाही, कारण यातून मुलींना जखमा होण्याची शक्यता असते. एकूणच हस्तमैथुनातून मुलं-मुली त्यांची लैंगिक उत्तेजना शमवण्याचा अधिक प्रत्न करत असतात असं लक्षात येतं. पण सामान्य मुलांच्या तुलनेत मतिमंद मुलां’मध्ये लैंगिक भावनांची, इच्छांची जाणीव २ – ३ वर्षे उशीरा निर्माण होते असे दिसून येते.
लहानाचं मोठं होत असताना जसं शरीर विकसित होत असतं, तसं मनसुध्दा विकसित होत असतं. मुला – मुलींना कुणाशी तरी खूप गप्पा माराव्यात असं वाटतं, तर कधी कुणाशीच बोलू नये, अगदी शांत बसावंसं वाटतं. सतत बदलते मूड, कधी राग तर कधी आनंद, कधी कंटाळा तर कधी उत्साह असं चालूच असतं आणि ते साहजिकही आहे. असं या वयाच्या सगळ्यांच्या आणि मतिमंद मुला-मुलींच्या बाबतीतही होतं. हट्टीपणा करणं, कधी चिडचिड तर कधी मारामारी करणं, हळवेपणा वाढीस लागणं, भावना व्यक्त न करता येणं, अंतर्मुख होणं, अधीरपणा, उतावीळपणा असे भावनांचे आविष्कारही मुलांध्ये वयात येताना ठळकपणे दिसू लागतात. पालक आणि शिक्षकांनी सांगितलेलं न ऐकणं आणि मित्र मंडळींच्या प्रभावाखाली येणं ही तर या वयाची वैशिष्टे आहेतच. कधी-कधी त्यांच्या लैंगिक भावना आक्रमक वर्तनातून व्यक्त होऊ लागतात. वयात येताना शरीरातील संप्रेरकांचा शरीराप्रमाणे मनावरही परिणाम होत असतो. या मुलांनाही या वयात कुणीतरी आवडायला लागतं, ते शरीराच्या माध्यमातून तसं व्यक्त होतात किंवा बोलूनही दाखवतात. उदा. कुणाला कुणाचे डोळे आवडतात, तर कुणाला कुणाचे केस आवडतात. मला तो आवडतो किंवा ती आवडते अशी वाक्यं मतिमंद मुलं-मुली सहजतेने म्हणतात, असं म्हणताना लाजणं ही भावनाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल असं भिन्नलिंगी आकर्षण वाटू लागतं. शाळेत ते एकमेकांच्या बाकावर जाऊन बसण्याचा, एकमेकांना काही वस्तू देण्याचा प्रयत्न करतात. तसंच मुली आवडत्या सरांना आणि मुलगे आवडत्या बाईंना फुल देण्याचा, त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तर मुलं-मुलं आणि मुली-मुली असं समलिंगी आकर्षणही दिसून येतं आणि यात चूकीचं किंवा वावगं वाटावं असं काहीही नाही आणि प्रत्येकाला हे वाटेलच असंही नाही. पण भिन्नलिंगी आकर्षणाइतकंच समलिंगी आकर्षण नैसर्गिक आहे. सामान्य मुलांप्रमाणं काही मतिमंद मुलांनाही स्वतःच्या जन्माबद्दल, शरीरात दिसणाऱ्या बदलांबद्दल काही साधे-सोपे प्रश्न पडू लागतात. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता, त्यांचं कुतूहल दाबून न टाकता पालकांनी शांतपणे खरी, पण समजतील अशी उत्तरं देणचा प्रयत्न करावा. नाही तर मुलं इतरांना प्रश्न विचारण्याची शक्यता असते आणि त्यातून मुलांना चूकीची माहिती मिळण्याचा धोका वाढतो. तसंही लैंगिकता शिक्षण, त्याही आधी शरीराबद्दलचं शिक्षण ही प्रथमतः आई-वडिलांची जबाबदारी असते. ती टाळली तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी ‘ या मतिमंद मुला – मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील आहे.
No Responses