गर्भपात – आमच्या शरीरावर आमचा हक्क

2 3,830

गरोदर राहणं ही एक चांगली, आनंददायी भावना आहे. मात्र नको असताना दिवस गेले तर मात्र गरोदरपण ही नकोशी आणि ताणाची भावना असते. अनेकदा गर्भनिरोधक न वापरल्यामुळे किंवा निकामी ठरल्यामुळे दिवस जातात. किंवा बलात्कार, जबरदस्तीमुळेही दिवस जातात. अशा वेळी गरोदरपण नक्कीच नकोसं असतं. अनेक बाळंतपणं झालेल्या स्त्रीला किंवा जिला मूल नकोच आहे अशा स्त्रीलाही मनाविरुद्ध दिवस गेले तर ते मूल वाढवायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार असणं गरजेचं आहे. गर्भपाताचा निर्णय कधीच अगदी सहज घेतला जात नाही. त्यामागे विचार असतोच आणि अगतिकताही असते. सर्व समाजांमध्ये अगदी पुरातन काळापासून स्त्रीने जिवाला धोका असतानाही गर्भपात करून घेण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. गर्भपात करता येणे, सर्व स्त्रियांना गर्भपाताची सुरक्षित सेवा मिळणे आणि त्यासंबंधी समाजात जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण होणं आवश्यक आहे.

गर्भपात म्हणजे काय?

गर्भधारणेच्या पहिल्या 28 आठवड्यात गर्भ गर्भाशयातून बाहेर पडला तर त्याला गर्भपात असं म्हणतात. गर्भपाताचे दोन प्रकार आहेत. काही वेळा गर्भ आपोआप पडून जातो त्याला नैसर्गिक गर्भपात असं म्हणतात. मात्र काही वेळा स्त्रीला मूल नको असेल किंवा तिच्या किंवा जन्माला येणाऱ्या बाळाच्या प्रकृतीला गंभीर धोका असेल तर कृत्रिमरित्या गर्भपात केला जातो. त्याच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे

 • क्युरेटिंग (Dilation and Curetting)
 • शोषण पद्धत (Manual Vacuum Aspiration or Electronic Vacuum Aspiration)
 • गोळ्यांचा वापर करून (Medical Abortion)

भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. आईच्या जिवास धोका असल्यास, गर्भामध्ये गंभीर व्यंग असल्यास, बलात्कारातून गर्भ राहिला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने गर्भ राहिला असल्यास गर्भपात करण्यास परवानगी आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यात तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो.

गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. गर्भपात करणारी डॉक्टर प्रशिक्षित आहे का याची माहिती करून घ्या. जिथे गर्भपात करणार तो दवाखाना, जागा साफ व निर्जंतुक आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या.

सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित गर्भपाताची सेवा मोफत दिली जाते. त्याची मागणी करा.

गर्भपात केल्यानंतर काही काळजी घेणं गरजेचं आहे.

 • किमान दोन आठवडे लैंगिक संबंध ठेऊ नका
 • न चुकता दोन तीन आठवड्यांनी तपासणी करून घ्या.
 • गर्भपातानंतर चार ते सहा आठवड्यात पाळी सुरू होईल. पण सहा आठवड्यानंतरही पाळी आली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • भरपूर पाणी प्या, पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळं, ताक असे पदार्थ खा.
 • पोटातील वेदना आणि रक्तस्राव कमी करण्यासाठी पोटाच्या खालच्या भागात हळूवारपणे आणि वारंवार मसाज करा.
 • दुखत असल्यास पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवा.

खालील लक्षणं गंभीर आहेत. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • अति रक्तस्राव
 • जास्त ताप
 • पोटात वेदना
 • बेशुद्धपणाचा झटका, चक्कर येणे
 • योनीमार्गातून वाईट वासाचा स्राव

हे कायम लक्षात ठेवा

 • गर्भपात हे पाप नाही. भारतात काही परिस्थितीत 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायद्याने मान्य आहे.
 • मात्र सततचे गर्भपात बाईच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाची पद्धत म्हणून गर्भपात करत राहणं योग्य नाही.
 • 18 वर्षांवरील स्त्री स्वतःच्या संमतीने गर्भपात करून घेऊ शकते. पालक अथवा नवऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नसते. अल्पवयीन मुली किंवा मतिमंद असणाऱ्या मुलींना गर्भपातासाठी पालकांच्या परवानगीची आवश्यकता असते.
 • गर्भपातानंतर एक आठवड्याच्या आत तांबी बसवू नका. तुमच्या संमतीशिवाय तांबी बसवण्याचा डॉक्टरांना अधिकार नाही.
 • गर्भपाताबद्दल गुप्तता राखणे आणि गोपनीयता राखणे हा तुमचा अधिकार आहे.

Image – Karen Haydock,
 In Our Hands, Tathapi Publication

 

2 Comments
 1. Sushil says

  Majya gril frnd pregnent haye tr mala te bal padayche haye pls hhelp me

  1. I सोच says

   पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या मैत्रिणीला दिवस गेले असतील आणि तिची इच्छा व संमती असेल तरच गर्भपात करता येतो. तुम्हाला हा निर्णय परस्पर घेता येत नाही. तिची गर्भपात करून घेण्याची तयारी असेल आणि तुम्ही तिला याबाबत पाठिंबा देत असाल तर चांगली गोष्ट आहे. तिला तुमच्या आधाराची गरज असू शकते. तशी गरज असेल तर तिला नक्की मदत करा. मात्र तिच्या मर्जीविरोधात गर्भपाताचा निर्णय घेऊ नका.
   ती 18 वर्षांहून मोठी असेल म्हणजे सज्ञान असेल तर ती तिच्या जबाबदारीवर गर्भपात करून घेऊ शकेल. गर्भपात करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भपात करून घेतला पाहिजे. नोंदणीकृत सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात गर्भपाताची सेवा मिळते. सोबत कोणी तरी मोठी (सज्ञान) व्यक्ती असणं गरजेचं आहे. तुमची मदत नक्कीच होऊ शकेल.
   जर एकच महिना पाळी चुकली असेल तर गर्भपात करणं सुरक्षित आहे. जितक्या जास्त लवकर गर्भपात करता येईल तितका चांगला. जास्त दिवस गेले तर त्यानंतर त्यातली गुंतागुंत वाढू शकते. पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात गर्भपात करणं जास्त जिकिरीचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीनेच हा निर्णय घेणं श्रेयस्कर आहे.
   तुम्ही कुठे राहता हे सांगितलंत तर तिथल्या काही डॉक्टरांचे किंवा सुरक्षित दवाखान्यांचे नंबर तुम्हाला पाठवता येतील. पुढे एक पत्ता दिला आहे, तिथे फोन करून चौकशी करून घ्या. ही संस्था सुरक्षित गर्भपाताची सेवा देते आणि तिथे तुमची ओळख उघड होणार नाही. त्यामुळे न संकोचता फोनवर चौकशी करा. खरं तेच सांगा. मुलीचं वय, किती दिवस झाले आहेत या गोष्टी खऱ्या सांगा. तुम्ही पुण्यात राहत असाल, तर या ठिकाणी गर्भपाताची सेवा मिळू शकेल. नाही तर तुमच्या भागामध्ये कुठे अशी सेवा मिळेल त्याची माहिती तुम्हाला इथे मिळेल.

   Family Planning Association of India,
   Pune Branch, 101,
   Western Court, 1082/1,
   Ganeshkhind Road, Opposite E-Square Cinema,
   Shivajinagar, Pune 411 016
   Tel. No. : 020-65601453 to 65601457

   गर्भपातानंतरही तुमच्या मैत्रिणीला मानसिक आधाराची गरज असेल. तेव्हा तिची साथ सोडू नका. आणि यापुढे लैंगिक संबंध ठेवणार असाल तर कंडोमचा वापर करूनच संबंध ठेवा. तेवढी जबाबदारी तुम्ही उचलाल अशी खात्री आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.