मतिमंद मुलं-मुली आणि वयात येणं…

किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड जसा सामान्य मुलांच्या आयुष्यात महत्वपूर्ण असतो, तसाच तो कोणत्याही कारणाने अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींसाठीही महत्वपूर्ण असतो. सामान्य मुलांप्रमाणेच या मुला-मुलींमध्येही किशोरवयात शारीरिक, मानसिक बदल होऊ लागतात. पण बुध्दीची वाढ झालेली नसल्यामुळे योग्य पध्दतीने भावना व्यक्त करण्याची समज आलेली नसते. मुलांचा अधिकाधिक वेळ शाळेत जात असल्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात होणारे बदल शिक्षकांच्या लक्षात येत असतात. त्यामुळे साहजिकच या काळात शिक्षकांची जबाबदारीही वाढलेली असते. मतिमंद मुला-मुलींच्या किशोरावस्थेला विशेष शाळांतील शिक्षक-शिक्षिका कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे एका शिक्षकाच्या शब्दांतच समजून घेऊया…

मतिमंद व्यक्तींपैकी जवळ-जवळ 50 ते 60 टक्के व्यक्तींध्ये वर्तन समस्या असतात. त्यामुळे पालक आणि शाळा यांच्यावर बरीच जबाबदारी असते आणि कधी कधी त्याचा ताणही येतो. अशा मुलांसाठी शालेय कार्यक्रम राबवताना शाळांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी या समस्यांचे आकलन चूकीच्या पद्धतीने केल्यामुळे व परिस्थिती चूकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे समस्या दूर होण्याऐवजी त्या अत्यंत जटील बनत जातात व परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. शाळेत या मुलांबरोबर काम करण्याऱ्या शिक्षक व सहकाऱ्यांना अशा प्रसंगी तणावाचा सामना करावा लागतो. मुलांसाठी ठरलेला शैक्षणिक कार्यक्रम राबवायचा की त्यांच्या वर्तन समस्या हाताळण्यात सर्व शक्ती खर्च करायची असा गंभीर प्रश्न शाळांना, विशेषतः शिक्षकांना पडतो. मुलांच्या या वर्तन समस्यांकडे डोळेझाक करत व त्याचे योग्य असे निराकरण न करता त्यांना शिकवत राहायचे म्हणजे परिस्थितीचे गांभिर्य हरवण्यासारखेच आहे. तेव्हा अशा वर्तनाशी संबंधित अव्हानांचे योग्य निराकरण करणे यालाच प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. विशेषतः वयात आलेल्या मुला-मुलींच्या गरजा व त्यांच्याकडून या बदलांना दिला जाणारा प्रतिसाद, त्यातून होणाऱ्या त्यांच्या विशिष्ट वर्तनाकडे अधिक संवेदनशील व विचारी पद्धतीने पाहणे क्रमप्राप्त आहे. आधुनिक विचार प्रवाहानुसार मुलांच्या अशा वर्तनाकडे समस्या म्हणून न पाहता एक वर्तन अवस्था म्हणून पाहणे गरजेचे आहे. समस्या म्हटलं की आपोआपच नकारात्मक दृष्टीकोन येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते. मुला-मुलींच्या वर्तनामागे अनेक कारणे असतात. आजूबाजूचे वातावरण, परिस्थिती, प्रसार माध्यमे, वयानुसार मुलांध्ये होणारे शारीरिक, भावनिक बदल इत्यादीमुळे विविध प्रकारचे वर्तन घडत असते.

यासाठी शाळा काय करू शकते? तर शाळा आपल्या आवाक्यातील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकते. समाजातील वातावरण, प्रसारमाध्यमे याबाबत शाळेची तशी काही भूमिका नसली तरी कौटुंबिक वातावरण योग्य राहण्यासाठी शाळेमार्फत पालकांना मार्गदर्शन करता येईल. मुलांचे वर्तन अधिक जबाबदार किंवा अपेक्षित सामाजिक नियमांनुरुप घडवून आणण्याच्या दिशेने शाळा पातळीवर काही कार्यक्रम राबवता येतील. मुलांनी मुलींना चिडवणे, एकमेकांना खाणाखुणा करणे, एकमेकांचं साहित्य लपवणे, कागदावर किंवा भिंतीवर एकमेकांची नावं लिहिणे, एकमेकांना स्पर्श करणे, ढकलणे; अशा प्रकारच्या कृती मुलं-मुली विशेषतः वयात आलेली मुलं-मुली करतात. अशा वेळेस त्यांना अपमानित न करता किंवा त्यांच्या स्व प्रतिमेला तडा जाईल अशा प्रकारची शेरेबाजी न करता कौशल्याने असे प्रसंग हाताळावेत. कारण वयात येताना होणाऱ्या बदलांचा आविष्कार त्यांच्या वागण्यातून घडत असतो. आपण एक शिक्षक म्हणून याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून आणि जबाबदारीने पाहणे गरजेचे असते. एखाद्या वर्तनाचा जर अतिरेक होत असेल तर शाळा पातळीवर काही सुधारणा कार्यक्रम राबवावेत. उदाहरणार्थ, मुला-मुलींचे एकत्रित खेळ, प्रश्नमंजुषा, कोडी, आवडता गृहपाठ देणे, एकत्रितपणे मातीकाम, कोलाज काम, चित्रकला, डान्स असे उपक्रम घेता येतील, मुला-मुलींच्या गप्पांचे अनौपचारिक कार्यक्रमही घेता येतील. यामुळे मोकळेपणाचे वातावरण निर्माण होऊन मुला-मुलींच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होईल.

– सुभाष कळसे,

श्री. पी. सी. अलवाणी मतिमंद मुलांची शाळा, वाई, जि. सातारा.

साभार: ‘तथापि’ चा  जिव्हाळा अंक ४१, ऑक्टोबर – डिसेंबर २०१५

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap