पहिल्या भागात आपण ‘अपंगत्व समजून घेताना…’ हा लेख प्रकाशित केला आहे. डॉ. अनिता घई यांनी आपल्या अपंगत्वातून, आजारपणांतून निर्माण होणाऱ्या खडतर परिस्थितीवर मात तर केलीच, पण स्वतःचं व्यक्तिमत्वदेखील फुलवलं. या सगळ्या संघर्षाची वेदना आणि फुलण्यातला आनंद दोन्ही गोष्टी मुलाखतीतून आपल्याला जाणवतात. अपंग स्त्रियांच्या बाबतचे मुद्दे, एकूणच अपंगांचे हक्क अशा इतर मुद्यांवरही त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत. आता मुलाखतीच्या या दुसऱ्या भागात ‘अपंग व्यक्ती आणि लैंगिकता’ याविषयीच्या काही मुख्य मुद्यांवर त्या काय म्हणतायेत, ते समजून घेऊ…
प्रश्न ५) प्रौढ मतिमंद मुलांचं कुणाशी एखादं नातं निर्माण झालं तरी त्यात नाकारलं जाण्याची शक्यता असते. याचा प्रौढ मतिमंद मुलांवर काय परिणाम होतो?
उत्तर – प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळं घडू शकतं. प्रत्येक वेळी अस्वीकारच होईल किंवा नाकारलं जाईलच असं नाही. माझा जो अनुभव आहे, त्यात आम्ही असा प्रयत्न केला आहे की, मुला-मुलींनी एकमेकांशी गप्पा माराव्यात, डान्स करावा. लैंगिकता म्हणजे फक्त इंटरकोर्स नसतो. शरीराचा प्रत्येक भाग लैंगिकतेशी जोडलेला असतो. लैंगिकता म्हणजे आनंद! मतिमंद मुला-मुलींची लैंगिकता म्हणजे इंटरकोर्स असा विचार करणं गरजेचं नाही. एकमेकांचा हात हातात घेण्यातून आनंद वाटत असेल तर ती सुद्धा लैंगिकताच आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले एक पालकच मला म्हणाले की, ते त्यांच्या मुलाच्या लैंगिक समाधानासाठी त्याला वेश्या स्त्रीकडे घेऊन जातात. मला वाटलं की, किती चांगली गोष्ट आहे ही की स्वतःच्या अपंग मुलाची गरज पूर्ण करण्यासाठी हा पर्याय निवडण्यापर्यंत ते विचार करू शकतात. बॉर्डर लाईनच्या मुला-मुलींची लग्नं झालेली मी पाहिली आहेत. त्यांचं आनंदी वैवाहिक जीवन पाहिलं आहे. पण प्रत्येक जोडप्याचा अनुभव हा वेगळा असेल. त्यातही नकारात्मकता ही फक्त लैंगिकतेशी नसते. आपण जर एखादं काम नीट केलं नसेल तरी नकार मिळतो. प्रत्येक वेळी नकारच असेल असं होणार नाही. कधी कधी याबाबतीत स्वीकार सुद्धा अधिक असतो.
प्रश्न ६) शरीर विक्रय (वेश्या) करणाऱ्याकडे जाण्याच्या पर्यायामध्ये नीति-मूल्यांचा, सामाजिक स्वीकाराचा तसेच आरोग्याच्या धोक्याचा पण प्रश्न आहे का?
उत्तर – कोणती नीतीमूल्य? स्त्रियांना जाळणं, मारणं ही नीती-मूल्य आहेत का? लिंगनिवड करणं ही नीतीमूल्य आहेत का? शरीर विक्रय करणं हे इतर कामांसारखंच एक काम आहे, व्यवसाय आहे. एक स्त्री आणि एक कार्यकर्ती म्हणूनही मला असं वाटत नाही, की शरीर विक्रय करणं एक गुन्हा आहे. स्वतःच्या मुलाच्या (किंवा मुलीच्या) गरजांसाठी आपल्याला त्यांची गरज आहे, तर आपण त्यांनाही सपोर्ट करायलाच हवं ना.
अपंग मुलांना त्यांची लैंगिक गरज भागवण्यासाठी शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांकडे जाण्याचा पर्याय स्वीकारत नसू किंवा एक माणूस म्हणून या मुलांचाही असलेला हा अधिकार आपण नाकारत असू तर इतरही खूप पर्याय उपलब्ध आहेत. हस्तमैथुन हा एक चांगला पर्याय आहे. तसंच सेक्ससाठीची खेळणी असतात. कोणत्या प्रकारचा आनंद आपण देऊ शकतो याचा तसंच काही आर्थिक गोष्टींचाही विचार करावा लागतो. म्हणून मुलांना आर्थिकदृष्ट्या थोडं तरी सक्षम बनवलं पाहिजे. आपण या कार्यक्रमात लैंगिकतेबद्दल चर्चा करत असलो तरी शिक्षण, रोजगार या गोष्टीही जरुरी आहेत. सगळ्या गोष्टींची उत्तरं माझ्याकडे आहेत असं नाही. मी पण उपाय शोधत असते.
लैंगिकतेबरोबरच मी काळजी आणि सुरक्षिततेविषयी बोलते. कारण तीव्र अपंगत्वाबाबत जेव्हा आपण बोलतो, तेव्हा मुलाची किंवा मुलीची सर्व जबाबदारी आईवरच असते, असं समजलं जातं. म्हणूनच कमीत कमी दिवसा तरी या मुलांची काळजी घेता येईल, यासाठी आधार केंद्रे सुरु करता येतील. हा उपक्रम दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठामध्ये राबवण्यात येत आहे.
प्रश्न ७) शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया आहेत, तसे मुलींसाठी शरीर विक्रय करणारे पुरुष आहेत का?
उत्तर – जसं मुलांसाठी शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांकडे जाणं हा एक पर्याय आहे, तसंच मुलींनी पण त्यांची लैंगिक गरज भागवण्यासाठी शरीर विक्रय करणाऱ्या पुरुषाकडे जाणं हा पर्याय असू शकतो. पण जसं शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया आहेत, तसं शरीर विक्रय करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी आहे. त्यासाठी अशा पुरुषांचा शोध घ्यावा लागेल.
—————————————————————-
डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीतील वरील प्रश्नोत्तरांचा मागोवा घेता लक्षात येतं की, अपंग मुला-मुलींच्या इतर मुद्यांबरोबरच लैंगिकतेच्या मुद्द्यावरही त्या किती स्पष्ट, सकारात्मक मतं मांडत आहेत! हे सगळं वाचून तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तरी नक्की विचारा! आपली मतं जरूर लिहा..
संदर्भ – तथापि ट्रस्टच्या ‘जिव्हाळा’ या त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च २०१६ (अंक ४२) च्या अंकात ही मुलाखत प्रथम प्रकाशित करण्यात आली आहे.
शब्दांकन : प्राजक्ता धुमाळ
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses