प्रेम आणि लैंगिकता
लैंगिक कल
प्रत्येक व्यक्ती विशिष्ट लिंग घेऊन जन्माला येत असली तरी त्या व्यक्तीची लैंगिकता तिच्या वाढीबरोबर तयार होत जाते. लैंगिकता ही केवळ लैंगिक अवयव, शरीरसंबंध किंवा पुनरुत्पादन याच्याशी संबंधित नसून ती एक अभिव्यक्ती आहे. आपली वाढ, मोठं होणं, स्वप्रतिमा, आत्मविश्वास आणि परस्पर नातेसंबंध या सर्वांचा परिणाम आपल्या लैंगिकतेवर आणि लैंगिक भावनांवर होत असतो. वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते. हे आकर्षण तीन प्रकारचं असू शकतं.
1. भिन्नलिंगी,
2. समलिंगी
3. उभयलिंगी.
अनेक मुलांना भावनिक आणि लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ या मुलांचा किंवा मुलींचा लैंगिक किंवा भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे असतो. अशा विरुद्धलिंगी व्यक्तीकडे असणाऱ्या लैंगिक किंवा भावनिक कलाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल म्हणतात.
काही मुला-मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटतं. मुलींना मुलं आणि मुली दोघांबद्दल लैगिक आकर्षण वाटतं आणि मुलांना देखील मुलं आणि मुली दोघांबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण निर्माण होतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल असं म्हणतात. इंग्रजीत याला बायसेक्शुअल असं म्हणतात. उभयलिंगी कल असणाऱ्या व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे असा काही निसर्गाचा नियम नाही.
काही मुला-मुलींना केवळ त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. म्हणजेच मुलांना फक्त मुलांबद्दल आणि मुलींना फक्त मुलींबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला-मुलींचा लैंगिक-भावनिक आकर्षणाचा कल समलिंगी असतो. अशा व्यक्तींना समलिंगी कलाच्या किंवा स‘लिंगी व्यक्ती म्हणतात. इंग्रजीत समलिंगी मुलांना किंवा पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी मुली किंवा स्त्रियांना लेस्बियन म्हणतात.
कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण होणारं लैंगिक आकर्षण नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं असं काहीही नाही. लैंगिक कलाबद्दल समजून घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वयात येताना कधी कधी काही भिन्नलिंगी मुला-मुलींना समलिंगी आकर्षण निर्माण होऊ शकतं. कालांतराने दोन-तीन वर्षात असं आकर्षण नाहीसं होतं आणि त्यांना परत भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यामुळे वयात आल्यावर लगेचच लैंगिक कल स्पष्ट होतो असं नाही. मात्र 18 वर्षाचे होईपर्यंत प्रत्येकाला आपला कल काय आहे आणि आपल्या मनात कोणाविषयी, कोणत्या लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होतं हे स्पष्ट होतं.
यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की, सर्व प्रकारचे लैंगिक कल स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल हा नैसर्गिक / नॉर्मल आणि बाकीचे अनैसर्गिक / अबनॉर्मल / विकृत हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता हा काही आजार नाही. त्यामुळे त्यावर कसले उपाय करण्याची गरज नाही किंबहुना कोणत्याच उपायाने (समुपदेशन, औषध गोळ्या, गंडे-दोरे, सक्तीने केलेलं लग्न) लैंगिक कल बदलता येत नाही. ज्याला-त्याला आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. त्यामुळे आपणही सर्व प्रकारच्या लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या भेदभावाला विरोध केला पाहिजे.
लैंगिक भावना ही पूर्णपणे नैसर्गिक ऊर्मी असून त्यात घाणेरडे, वाईट, पाप, अपवित्र असे काहीही नाही. या भावना वाईट आहेत असे सांगून त्याबाबतचे बोलणे दडपून टाकण्याऐवजी या भावना सकारात्मक पद्धतीने व्यक्त करायला शिकवणे ही पालक अथवा शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे.
अनेकदा अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची किंवा स्वतःच्या आवडी-निवडी व्यक्त करण्याची संधी दिली जात नाही. अनेकदा त्यांना कुणाबद्दल आकर्षण वाटत असले तरी त्यांच्यातील अपंगत्वामुळे या भावना व्यक्त करणं आणि त्याला प्रतिसाद मिळणं या दोन्ही गोष्टी घडत नाहीत. कित्येक वेळा अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना लैंगिक भावना असतात हेच मुळी नाकारलं जातं. त्यामुळे प्रेम, लैंगिकता, जोडीदार अशा विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला जात नाही आणि त्याबाबत त्यांची मतं, अनुभव, इच्छा, आकांक्षा याबद्दल काहीच बोललं जात नाही. वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल सर्वच व्यक्तींमध्ये कमी-अधिक फरकाने होत असतात. त्यामुळे अपंगत्व असो वा नसो या स्थित्यंतराविषयी मुलांशी संवाद साधणं अतिशय महत्वाचं आहे.
समज-गैरसमज |
तथ्य |
अपंग मुलं वयात येताना होणारे बदल आणि लैंगिक भावना हाताळू शकत नाहीत. |
वयात येतानाच काळात मनात, शरीरात होणारे बदल समजून घेणं आणि लैंगिक भावना, आकर्षण ओळखणं आवश्यक असतं. अपंगत्व असणार मुला-मुलींशी या विषयावर संवाद साधल्यास तेही या भावना आणि बदल नीट हाताळू शकतात. |
समलिंगी संबंध अनैसर्गिक आहेत. |
कोणत्याही व्यक्तीची लैंगिक इच्छा आणि कल हे वेगवेगळे असू शकतात. यामध्ये विकृत असं काही नाही. भिन्नलिंगी, समलिंगी आणि उभयलिंगी कल तितकेच नॉर्मल, स्वाभाविक आहेत. |
हा विषय घेताना
हा विषय मोठ्या वयोगटासाठी आहे. 13 ते 15 वयोगटाच्या मुलां-मुलींसाठी वेगवेगळ्या गटांत हे सत्र घ्यायचे आहे.
फक्त मुलींसाठी (वयोगट १३ ते १६)
मुलींसोबत संवाद साधताना प्रेमात पडणं म्हणजे काय वाटतं, याविषयी मुलींना काय वाटतं याबद्दल चर्चा घ्या. प्रेमाबद्दलच मुलींच्या स्वतःच्या व्याख्या समजून घ्या. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपल्या काय अपेक्षा असतात याबद्दल मुलींशी संवाद साधा. प्रेम, ‘मैत्री आणि आकर्षण यातील ‘फरक ‘मुलींना समजावून सांगा. भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी असणं म्हणजे का याविषयी मोकळेपणाने ‘मुलींबरोबर चर्चा करा. प्रेम आणि आकर्षण हे भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतं हे समजावून सांगा. हे आकर्षणही नैसर्गिक आहे. यात काहीही गैर नाही. हे मुलींना पटवून द्या. तसंच या भावनांचा स्वीकार करायला मुलींना मदत करा. एकतर्फी प्रेम, प्रेमातली जबरदस्ती अशा वेळी ठाम‘पणे नाही म्हणता येणं गरजेचं आहे हे मुलींना पटवून द्या. ठामपणे नकार देता येणं जसं गरजेचं आहे तसंच मोकळेपणाने नकार स्वीकारता येणंही गरजेचं आहे. हे आवर्जून सांगा.
यानंतर जोडीदाराबद्दल मुलांच्या आणि मुलींच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात. याविषयी चर्चा करा. अनेकदा समाजामध्ये मुला-मुलींच्या साचेबध्द प्रतिमांवर या अपेक्षा अवलंबून असतात असे दिसते. जोडीदार निवडीबाबतचे सत्र मुलींना वाचायला सांगा. मुलींच्या जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत हे समजून घेऊन त्यावर चर्चा घ्या. अनेकदा मुलींना नवरा हा मोठ्या पगाराची नोकरी असणारा, श्रीमंत, घरावर हुकूम‘त गाजवणारा, रुबाबदार अशा अपेक्षांच चौकटीत हवा असतो. याविषयी चर्चा घ्या. हाच जोडीदार समानततेनं वागवणारा, विचार, भावना समजून घेणारा असेल तर सहजीवन अधिक सुखकर, आनंददायी होऊ शकतं, अशा प्रकारे विचार करायला मुलींना प्रोत्साहन द्या. मुलींनीही जोडीदाराबद्दलच स्वतःच अपेक्षा घरात सर्वांसमोर भांडण महत्वाचं आहे हे पटवून द्या.
फक्त मुलांसाठी : (वयोगट : १३ ते १६)
मुलांसोबत संवाद साधताना प्रेमात पडणं म्हणजे मुलांना काय वाटतं याबद्दल चर्चा घ्या. प्रेम म्हणजे काय, प्रेम करण्याच्या मुलांच्या व्याख्या आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपल्या काय अपेक्षा असतात याबद्दल मुलांशी संवाद साधा. प्रेम आणि आकर्षण भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतं हे समजावून सांगा. अशा आकर्षणामध्ये काही गैर नाही आणि या भावनांचा स्वीकार करायला मुलांना मदत करा. एकतर्फी प्रेमाबद्दल मुलांशी संवाद साधा. विविध उदाहरणं देऊन प्रेमाबद्दल कुणावरही जबरदस्ती करता येत नाही त्यामुळे नकार स्वीकारणं गरजेचं आहे हे मुलांना समजावून सांगा.
यानंतर जोडीदाराबद्दल मुलांच्या आणि मुलींच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात याविषयी चर्चा घ्या. समाजामध्ये मुला-मुलींबद्दल काही प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर या अपेक्षा अवलंबून असतात. आपली जोडीदार किंवा बायको दिसायला सुंदर हवी, शिकलेली, घरचं सगळं सांभाळणारी आणि नोकरी करणारी हवी, जातीतली, एकाच धर्माची हवी अशा अनेक अपेक्षा समाजाने तयार केलेल्या असतात. त्याच अपेक्षा ऐकत मुलं मोठी होतात. या अपेक्षा समजून घ्यायला मुलांना मदत करा आणि सुखी, समजूतदार नात्यासाठी यापेक्षा आपल्याला वेगळा विचार करता येईल का याबद्दल चर्चा घ्या.
मुलामुलींसाठी :
प्रेमसंबंध चालू असताना शारीरिक जवळीक, शरीरसंबंध याबद्दल समाजाचे अनेक नियम आहेत. त्यातलं काय योग्य आणि काय अयोग्य याबद्दल मुला-मुलींची मतं विचारात घ्या. मुलांकडून आणि मुलींकडून वागण्याबाबत वेगळ्या अपेक्षा ठेवल्या जातात. मुलींवर अधिक बंधनं आणि मर्यादा घातल्या जातात. खरं तर मुलं आणि मुली असा भेदभाव करणं योग्य नाही. त्यामुळे याबाबतही मुला-मुलींची मतं लक्षात घ्या.
अंध मुलांना जोडीदार अंध असावा का डोळस यावरही मोठ्या मुलांशी संवाद साधता येईल. याबाबत त्यांची स्वतःची मतं, पालक म्हणून आपल्या अपेक्षा आणि त्यातील फायदे आणि येऊ शकणाऱ्या अडचणी अशा सर्व गोष्टी मोठ्या मुलांबरोबर बोला. शेवटी प्रेम किंवा कोणत्याही नात्यामध्ये समानता, एकमेकांबद्दल आदर, संमती, सुरक्षितता आणि सुख ही मूल्यं जपणं महत्वाचं ठरेल.
यानंतर लैंगिक आजारांची माहिती द्या. ‘मुला-मुलींना जाणवणाऱ्या लैंगिक समस्या, लैंगिक आजार, त्यांची लक्षणं आणि त्याबद्दलचे समज गैरसमज याविषयी त्यांना माहिती द्या. मुलांच्या मनात काही शंका असतील तर त्या विचारून शंका निरसन करा. जर कुणाला काही त्रास होत असेल तर विचारा आणि त्यावर योग्य सल्ला द्या.
एच.आय.व्ही. एड्सबद्दल मुला-मुलांना काय माहिती आहे ते विचारून घ्या. एच.आय.व्ही. म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, या आजाराची लागण कशी होते, लक्षणं काय आणि प्रतिबंध कसा करता येईल यावरची माहिती ‘मुला-मुलींना वाचायला सांगा. केवळ चारच मार्गांनी एच.आय.व्ही. ची लागण होऊ शकते त्याची माहिती द्या. त्याबद्दलच्या शंकांचं निरसन करा. एच.आय.व्ही. एड्सबद्दल समाजात अनेक गैरसमज आणि त्यातून तिरस्काराची भावना आहे. पण त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्याबद्दल मुलांशी बोला आणि एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीबाबत भेदभाव करता कामा नये हे ठासून सांगा.
संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे.
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses