मालिनी चिब यांचं ‘वन लिटिल फिंगर’ हे आत्मचरित्र अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. मालिनी चिब स्वत: बहुविकलांग आहेत. एक बहुविकलांग स्त्री म्हणून आलेले अनुभव अतिशय निडरतेने आणि पारदर्शकपणे त्यांनी या आत्मचरित्रात नोंदवले आहेत. अपंग व्यक्ती; आणि त्यातही अपंग स्त्रीकडे बघण्याचा, तिच्या लैंगिक गरजा आणि सुखांबाबतचा; तसेच तिच्या हक्कांबाबतचा दृष्टिकोन अजूनही आपल्याकडे कसा माणूसपणाचा नि सुदृढ नाही याचेच विदारक दर्शन या आत्मचरित्रातून घडते. सेज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘वन लिटिल फ़िंगर’ या बहुचर्चित पुस्तकाची ही थोडक्यात ओळख – ले. आरती जोशी
——
“प्रसुती आतिशय बिकट होती आणि डॉक्टर वारंवार स्वतःशी पुटपुटत होते चुकलंच माझं. मी सिझेरियन शस्त्रक्रिया करायला हवी होती. बघुया बाळ जगतंय का; जास्तीत जास्त 72 तास.
मी जगले.’’
“वन लिटिल फिंगर” हे मालिनी चिब यांचे आत्मचरित्र आहे. या मुलीने अक्षरशः अडचणींचे डोंगर पार करून स्वतःची यशोगाथा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. ही गोष्ट आहे तिच्या चांगल्या वार्इट अनुभवांची़. प्रत्येक कडू गोड क्षणाकडून शिकलेल्या धडयाची व प्रत्येक अश्रूतून साकारलेल्या इंद्रधनुष्याची. पुस्तकाच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला जाणवते तिचे धैर्य़ तिचा निश्चयीपणा़ तिचा उत्साह आणि तिची आनंदी वृत्ती. तिच्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेत हेच अधोरेखित होते की विजय कधीच सोपा नसतो. विजयात आणि आपल्यात असते फक्त एका बोटाचे अंतर.
ती मोठी होत असताना अपंगांकडे केवळ वैद्यकीय नजरेने पाहणे व समाजापासून लांब ठेवणे याबाबतच्या तिच्या आठवणी अतिशय बोलक्या आहेत. तिने भारतात घालवलेला काळ सर्वाधिक वार्इट होता. सत्तरीच्या दशकाच्या पूर्वार्धात तिचे कुटुंब भारतात परत आले. तिच्यावर जेथे उपचार होत होते त्या इस्पितळात तिला केवळ एक रूग्ण म्हणून वागवले जार्इ़; माणूस म्हणून नाही. इंग्लंड आणि भारतातील अपंगांकडे बघण्याच्या पूर्णपणे विरूद्ध दृष्टिकोनावर पुस्तकात वारंवार भाष्य केले आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेचा अनुभव घेतल्यावर तिने विधान केले आहे की, ही पद्धत विद्यार्थ्यांना भविष्यातले विचारक बनवण्याऐवजी केवळ सॉसेजची यंत्रे बनवत आहे. स्वतःच्या अनुभवांतून ती समावेशक शिक्षणाचे जोरदार समर्थन करते.
लिखाणातील मोकळेपणापुणे ती वाचकांना चटकन आपलंसं करते. ती वाचकांना सगळी छोटी मोठी गुपितं सांगते़ सगळ्या भावभावना त्यांच्यासमोर उघड करते; मग ते यश असो़ नैराश्य असो किंवा अपमान असो. कॉलेजात असताना इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं या विचाराने तिला पछाडले होते. एका वेगळ्या आणि निरूपयोगी शरीरात कोंडले जाणे म्हणजे काय याबद्दल ती उघडपणे व्यक्त होते. तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की लोकांच्या लक्षात कसे येत नाही की तिचे मन पूर्णपणे ठणठणीत आहे. तिला कळकळीने वाटायचे की लोकांना कळायला हवे की तिलाही त्यांच्याचसारख्या इच्छा आकांक्षा आहेत. ती एक प्रसंग सांगते. तिच्या कॉलेजातले मित्र मैत्रिणी एकत्र सिनेमाला जायचे ठरवतात पण त्यांच्या लक्षातच येत नाही मालिनीलाही यावंसं वाटत असेल. पण याचा राग न मानता तिने स्वतःला निमंत्रण लावून घेतलं आणि आपलं अस्तित्व त्यांना जाणवून दिलं. लवकरच तिला आपल्या योजनांमधे सहभागी करून घ्यायची त्यांना सवय लागली.
ती मोकळेपणाने सांगते की धिक्कारलेल्या व लैंगिकदृष्ट्या अनाकर्षक शरीरात आपण अडकलोय हे स्वीकारणे तिला खूप जड गेले. ती प्रमाणिकपणे सांगते की तिला खूप वाटायचं की एखाद्या पुरूषाने तिला मिठीत घ्यावे पण पुरूषांना तिचे स्त्रीत्व जाणवायचेच नाही. या भावनांमधून ती आपले स्त्रीत्व प्रकट करते. आजपर्यंत कित्येक अपंगांनी आपल्या समाजाच्या भितीने याविषयी बोलण्याचे टाळले. तिच्या लक्षात आले की समाजाची अशी अपेक्षा होती की अपंग स्त्रीने समागमाचा विचार करणेदेखील निशिद्ध असते. तिने हा विषय छेडला की तिला प्रतिक्रिया मिळायची, तुला समागमाची काय गरज? तिचे म्हणणे आहे की समागम ही एक मूलभूत शारीरिक गरज आहे आणि तिच्या वयाला तिला तशी इच्छा होणे व कोणाशीतरी नाते जोडावेसे वाटणे अगदी स्वाभाविक होते. ती आपली छाप पाडायचा पुरेपूर प्रयत्न करायची. ‘तुम्ही अपंग आहात़, तुमच्यासाठी समागम नाही’ असा एक लेखही लिहिला पण या कशाहीमुळे परिस्थितीत फार बदल झाला नाही.
हे पुस्तक तुमच्या हृदयाला इतकं भिडतं की तुम्ही तिच्या सुखदुःखांवर तासंतास विचार करत राहता. ती म्हणते की तिच्या शक्तीचा स्रोत तिचे छोटेसे बोट आहे. या बोटाचा वापर करून कसं व्यक्त व्हायचं हे तिला हळूहळू उमजत गेलं. तिच्यासाठी संपर्क हा पाण्याप्रमाणे जीवनावश्यक आहे. पुस्तकात तिच्या आयुष्याचे रेखाचित्र उभे करणारे काही फोटोही आहेत. हे पुस्तक वाचलं की वाटायला लागतं की ही मुलगी आपल्या खूप जवळची व ओळखीची आहे.
“मी हिवाळ्यात लांब जाऊन उन्हाळ्यात घरी येर्णाया भटक्या पक्षासारखी आहे. दोन संस्कृतींनी मला वाढवलंय. मला स्वीकारले गेल्याचा आनंदही माहित आहे आणि दूर लोटले जाण्यातले दुःखही माहित आहे. मी रोजचा दिवस जगण्याचा प्रयत्न करते व मी कोण आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतिए. सहानुभुती आणि अस्वीकार या दोन्हीवर मात करून उंच भरारी मारण्याचा संघर्ष मी करतिए. मी रोज आशा करते की उद्या नक्कीच वेगळे आणि चांगले काहीतरी घडेल. शेवटी मी मुक्तपणे मी म्हणून जगेन.’’
गोव्यातील ‘रीच’ या अपंगांच्या हक्कांबाबत कार्यरत ट्रस्टच्या ‘कोलाज’ या नियतकालिकातून साभार
पुस्तकाची माहिती – वन लिटिल फिंगर, मालिनी चिब, सेज पब्लिकेशन इंडिया प्रा. लि.
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses