आनंदाने जगायला शिकवणारी ग़ोंड/कोया (माणूस) आदिवासींची सहज सामाजिक शाळा “गोटूल”

मध्य भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आज गोंड नावाने ओळखला जातो. ही जनजाती पूर्व विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, पश्चिम ओरीसा व उत्तर आंध्रप्रदेश एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेली आहे. गोंड हे त्यांना बाहेरच्या लोकांनी दिलेले नाव, पण आज तीच त्यांची सरकारी ओळख झालेली आहे. गोंड जनजातीच्या जुन्या जाणकार माणसाला तुम्ही कोण असे विचारल्यास आजही ते आम्ही ‘कोया‘ असे उत्तर देतात. त्यांच्या भाषेत “कोयाचा अर्थ माणूस ” असाच होतो. त्यांची संस्कृति व समाजरचनासुद्धा तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तशी त्यांची समाजव्यवस्था पुरुषप्रधान, पुरुषसत्ताकच.  सभोवताली असलेल्या बहुसंख्यांक हिंदू व इतर समाजांचाही अनेक वर्षांपासून होत असलेला परिणाम, बाहेरच्या राज्यसत्तांचे निसर्गसमृद्ध असलेल्या आदिवासी भू-प्रदेशांसोबतचे दीर्घकालीन वासाहतिक संबंध, त्यातून निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना असे असले तरी खालील वैशिष्ट्ये आजही गडचिरोली जिल्ह्यातील धानोश तालुक्यातील कोया समाजाचे निरिक्षण केल्यास सहज लक्षात येतात. ती अशी

. गैरआदिवासी समाजांच्या तुलनेत

१.१ लैंगिक विकृतीचे प्रमाण कमी, विनयभंग, बलात्कारासारखे गुन्हे नाहीत.

१.२ चोरी नाही,

१.३ भिकारी नाहीत,

२. योनशुचितेच्या मुद्याला अवास्तव महत्त्व नाही.

सारखीच देवसंख्या (गोत्र) असलेली मुले-मुली, भाऊ-बहिण असल्याने त्यांच्यात शरीरसंबंध निषिद्ध आहे. या नियमांचे पालन करून दोघांच्या सहमतीने    होणा-या विवाहपूर्व शरीर संबंधाला समाजमान्यता आहे. अशा संबंधातून राहिलेल्या गर्भाचे पितृत्व कुणी नाकारले तरी त्या मुलीचे जीवन बरबाद होत नाही. समाज तिला गर्भातील जीवासह सहज स्वीकारतो, तिचे दुसऱ्या  मुलाशी लग्नही होऊ शकते.

३. लग्नासाठी मुलगा व मुलगीच्या पसंतीला सर्वोच्च मान्यता देणारी समाजमान्य विवाह पद्धती

“हैवार दायनाठ म्हणजे घर-घुसीठ”.  इतर पुरुष प्रधानपुरुष सत्ताक समाजाप्रमाणेच इथेही लग्नानंतर मुलगी तिच्या आई वडिलांचे घर सोडून मुलाच्या घरी रहायला येते. पितृसत्ताक समाजात मुलगा व मुलगी यांची पसंती आहे. पण मुलाच्या वडिलांचा विरोध असेल तर मुलाने घर व इस्टेटीचा वाटा सोडल्याशिवाय त्यांचे लग्न होऊ शकत नाही. कोया (गोंड) समाजात मात्र अशा पेचप्रसंगातून मुलाच्या वडिलाला (पितृसत्तेला) मान्यता न देता मुला-मुलीच्याच पसंतीला सर्वोच्च मान्यता देणारी समाजमान्य मान्यरीत आहे. तिलाच हैवार हायना असे गोंडीभाषेत व मराठीत घर-घुसी असे म्हणतात.

वडिलांचा विरोध असला तरी आपल्या पसंतीनेच लग्न करायचे असे मुला-मुलीने पक्के ठरविल्यास ते दोघे मिळूनच एक दिवस ठरवितात व त्यादिवशी मुलगी तिच्या घरी न सांगता विचारता घरून निघते व मुलाच्या घरात घुसते व बसून राहते, असे झाल्यास मुलाचे वडील किंवा त्यांचे वडील कोणीही त्या मुलीला त्रास देऊ शकत नाहीत. मारणे, शिवीगाळ करणे तर दूरच राहिले, अन्न-पाण्यापासूनही वंचित ठेवू शकत नाहीत. लगेच मुलाच्या वडिलांनी गावाला ही माहिती देणे आवश्यक व बंधनकारक आहे. मग मुलीला काही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी गावाची आहे. गावकरी चौकशी करून मुलीच्या वडिलाकडे निरोप पाठवतात. दोन्हीकडची गावपंच मंडळी बसून मुला-मुलीच्या पसंतीची खात्री करून घेतात व मग त्यांचे रीतसर लग्न लावून देतात. विरोध असला तरी मुलाचे वडील मुलाला घर व इस्टेटीतल्या वाट्यापासून वंचित ठेवू शकत नाहीत.

४. पैसा, सत्ता, उपभोग यांचे आकर्षण तुलनेत कमी. गरजा कमी. वैयक्तिक मालकीची संपत्ती वाढवण्यासाठी सामुहिक नैसर्गिक संसाधनांवर अतिक्रमण तुलनेत कमी. जिथे जिथे आदिवासी आहेत तिथे तिथेच जंगल टिकून आहे हा त्याचा पुरावाच म्हणावा लागेल. वनजमिनीवर अतिक्रमण करुन पट्टा मिळविण्याची खटपट तशी तुलनेत अलिकडचीच.

५. गाव समाजांच्या – लढाया, आक्रमण, प्रतिआक्रमणाचा इतिहास नाही. त्यामुळे तशी लढाईची शस्त्रे व ते वापरण्याचे प्रशिक्षण व सरावही नाही. लढाईत पराक्रम गाजवलेल्या कुटुंबातील पूर्वजांची नावेही नाहीत. त्यांचा दूराभिमान तर दूरच राहिला.

६. सर्वसहमतीने निर्णय व वेगळ्याच तत्वावर आधारीत दंडाची न्याय- प्रक्रिया न्याय करण्याकरिता एकत्रित बसलेल्या सर्व लोकांना पंच असे म्हणतात. हिंदू किंवा इतर गैरआदिवासी समाजामध्ये मात्र कुणा एक किंवा याच सर्वमान्य व्यक्तींना पंच म्हणजेच न्यायाधिश बनविण्याची प्रथा आहे. कोया समाजाच्या न्यायबैठकीत सर्व एकाच पातळीवर बसतात. सर्वजण मिळून कुणा एका किंवा काही व्यक्तींना अभिवादन किंवा ते आल्यावर उठून उभे राहून विशेष आदर व्यक्त करत नाहीत. आरोपीसहित बैठकीत बसलेल्या सर्व लोकांना बोलण्याचा अधिकार सर्वमान्य असतो. आरोपी किंवा संशयित गुन्हेगार सोडून इतर सर्वांची जरी सर्वसहमती झाली तरी न्याय होत नाही. आरोपीसुद्धा सहमत होईल तेव्हाच न्याय होतो. त्यासाठी कितीही दिवस धैर्याने बसण्याची लोकांची तयारी असते.

इतर समाजात संशयित गुन्हेगाराला गुन्हा सिद्ध होईपर्यंत समाजात ठेवतात व गुन्हा साबीत होताच त्याला समाजापासून दूर जेलमध्ये आणखी जास्त गुन्हेगारांसोबत राहण्यासाठी पाठवून देतात. कोया समाजात मात्र संशयित गुन्हेगाराला न्याय होईपर्यंत समाजापासून थोडे वेगळे करून ठेवतात. गुन्हा साबीत झाला तरी त्याला जेलमधे पाठविण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी प्राचीन काळापासून या समाजात जेलच नाही. मारहाण करणे, बांधून किंवा कोंडून ठेवणे, चटके देणे असे कोणतेही शारीरिक दंडाचे प्रकारही नाहीत. यांच्यात म्हणतात “दंडठ”, पण प्रत्यक्ष कृती असते त्या गुन्हेगाराला परत समाजात सामावून घेण्याची. झाला असेल तुझ्याकडून गुन्हा, पण तो तू कबूल केलास, पुन्हा असे करू नको म्हणण्याची. त्याची आर्थिक परिस्थिती व हैसियत लक्षात घेऊन समाजात त्याला मिसळून घेताना करावयाच्या सामूहिक जेवणासाठी धान्य, कोंबडी, बकरे किंवा डुक्कर घेणे इतकाच काय तो खरा दंड.

कोया समाजात ही वैशिष्ट्ये कशी निर्माण झालीत व इतकी वर्षे टिकून राहिलीत? या प्रश्नांचा मागोवा घेताना या समाजाच्या का विलक्षण संस्थेची- “गोटल” ची माहिती मिळते. ही संस्था नष्ट होऊन तीन पिढ्या लोटल्या तरीही तिचा सकारात्मक परिणाम वरील वैशिष्टयात अजूनही दिसून येतो. काय व कसे होते हे ‘गोटूल’?  गोटूलमधील सकारात्मक गोष्टींचा शोध व बोध माणसांच्या माणुसकीवर आधारित भविष्यातील समाजरचनेकरिता खूपच उपयुक्त ठरणार आहे.

आज गोटूल ही संस्था तिच्या मूळ स्वरुपात अस्तित्वात नाही. सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वीच सुधारित शिक्षण घेऊन आलेल्या समाजातील नवनेतृत्वाने समाजाची सुधारणा करण्याच्या प्रामाणिक हेतूने स्वत:च ही गोटूल संस्था मोडून टाकली. हिंदू व इतर तत्सम गैरआदिवासी समाजाची स्त्री-पुरुष संबंधाबाबतची दृष्टी व संस्कृती यासाठी कारणीभूत ठरली.

आनंदाने जगायला शिकवणारी सहज सामाजिक शाळा-‘‘गोटूल

काय आहेत या गोटूल संस्थेची ठळक सकारात्मक वैशिष्ट्ये-

गावसमाजातील सहा ते दहा वयोगटातील सर्व मुलामुलींना गोटूलमध्ये सहज प्रवेश व लग्न होईपर्यंतचे सदस्यत्व मिळत असे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार हा आपण तत्वत: मान्य केला आहे. पण शिक्षणसंस्थांची रचना अशी आहे की मुला-मुलींना त्यांत प्रवेश घ्यावा लागतो, तथाकथित चांगल्या शाळा त्यांत प्रवेश आणखीच मर्यादीत म्हणून कठिण.  ही अशी शिक्षण संस्था होती की, तिच्यात सर्वाना सहज प्रवेश होता.

१. आनंददायी शिक्षण – गोटूल ही सहा ते पंचवीस-तीस वर्षापर्यंतच्या अविवाहित मुला-मुलींची स्वत:ची संस्था होती. वयाने थोडेच मोठे मुले-मुली त्यांच्यापेक्षा लहानांना शिकवीत असत. आनंदाचा जल्लोष करणारी नैसर्गिक उर्जेने मुसमुसलेली ती एक जिवंत संस्था होती.

२. आवडीप्रमाणे शिक्षण – आपल्यापेक्षा मोठ्या मुलामुलींसोबत सातत्याने राहण्याची संधी मिळत असल्याने त्यांना त्यांनी सहज शिकून त्यात प्रगती सहज शक्य होती. आवड समजणे, तपासून बघणे व त्याप्रमाणे आवडीच्या गोष्टी सहज शिकून त्यात प्रगती सहज शक्य होती.

३. मुलामुलींचे एकत्रित सहशिक्षण – गोटूलमधे मुला-मुलींनी एकत्रित रहावे, खेळावे, नाचावे, गावे यावर भर होता. प्रोत्साहन होते. स्पर्श निषिद्ध नव्हता. अनेक खेळ, नाच असे होते की त्यांत शरीराला शरीर सहज घासले जायचे. मस्ती करण्याचे स्वातंत्र्य असले तरी शिस्त व स्व-रचनेचे नियंत्रणही होते. रचना अशी बांधली होती की स्वातंत्र्य व नियंत्रणाचे एक चांगले संतुलन साधले गेले होते. गोटूलचे सदस्य त्यांच्यातुनच एक मुलगा मुलांच्या गटाचा प्रमुख व एक मुलगी मुलींच्या गटाची प्रमुख म्हणून निवडायचे. त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे त्यांना व इतरांनाही माहित असायचे. मुलगा व मुलगी यांनी अनैसर्गिकरित्या वेगळे-दूर रहावे असे बंधन नसल्यामुळे लैंगिक विकृतींचे प्रमाण फारच कमी होते.

४. लैंगिक सहजशिक्षण व जोडीदार निवडण्याची संधी – अगदी लहानपणापासून सर्वच मुले-मुली एकत्रित खेळत, नाचत असल्याने त्यांच्यात अनैसर्गिक लैंगिक आकर्षणाचे प्रमाण फारच कमी होते. शिवाय शरीरसंबंधाचे स्वातंत्र्य असले तरी त्यांना सम-गोत्री मुला-मुलींच्या शरीरसंबंधाच्या निषेधाचे बंधनही होते. या निषेधातून अगदी जवळच्या नातेसंबंधामध्ये लग्न व प्रजोत्पादन होऊ नये हेही साध्य केले होते. अनेक वर्ष एकत्रित खेळण्या- नाचण्याची व  एक दुसऱ्यासोबत मिसळण्याची संधी मिळाल्याने आवडी-निवडीप्रमाणे पारखून जोडीदार निवडण्याचीही संधी मिळत होती. शिवाय ‘हैवार दायनाठ” सारख्या विवाहपद्धतीमुळे त्याला समाजमान्यता व पाठिंबाही होता.

५. जगण्यासाठी आवश्यक कौशल्याचे सहजशिक्षण– शिकार करणे व जंगलातून अन्न गोळा करणे ही जगण्याची मुख्य साधने होती. त्याच्या जोडीला तृणधान्यांची (मिलेट्सची) फिरती शेती (शिफ्टींग कल्टीव्हेशन) थोड्या प्रमाणात असे. धान (तांदूळ) व डाळींची स्थिर शेती तुलनेत अगदीच अलिकडची.

पुरुष धनुष्यबाण, सापळे व जाळी यांच्या मदतीने प्राणी, पक्षी व व माशांची शिकार करीत. फळे-फुले, कंदमुळे, पाने इत्यादीची ओळख ठेवून योग्य वेळी ती गोळा करणे हे काम मुख्यतः स्त्रियांच्या वाटणीचे.  फिरती शेती मात्र दोघे मिळून करीत. स्थिर शेतीत नांगर आला. हिंदू समाजात स्त्रियांनी नांगर चालवणे निषिद्ध मानले जाते, पण कोया समाजात मात्र असा निषेध नाही. स्त्रियाही नांगर चालवू शकतात.

६. समाजनियम व न्याय-प्रक्रियेचे भावी नागरिकांना सहजशिक्षण– गोटूल म्हणजे गाव समाज व्यवस्थेअंतर्गत तरुण मुला-मुलींचा प्रतिरूप छोटा गाव समाजच होता. भावी नागरिक म्हणून आवश्यक त्या सर्व समाजनियम व न्याय प्रक्रियेचे  माहिती व प्रयोगाला वाव या पद्धतीने प्रत्यक्ष शिक्षण देणारी ही खरी जीवन-शाळाच होती.

माणसांच्या पुढील काळातील प्रगत समाजात कशा संस्था असाव्यात? सर्वांना आवडीप्रमाणे आनंददायी शिक्षणाचा जन्मसिद्ध हक्क प्रत्यक्षात मिळवून देणारी शिक्षणसंस्थेची रचना कशी असावी? इत्यादी विचार करतांना जशा आदर्श संस्थेची आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो, त्यातील ब-याच गोष्टी ज्यात होत्या अशी ‘गोटूल’ सारखी रचना अस्तित्वात होती यावर सुरवातीला विश्वासच बसत नाही. आदिवासी म्हणजे जंगली, मागासलेले असे मानणाच्या तथाकथित सुधारलेल्या पण स्त्रियांवर वाढते अत्याचार, चोरी, भिकारी, प्रदूषण, गरिबी, असुरक्षितता, हिंसा यांनी ग्रस्त आमच्या समाजाला वांशिक अहंकार बाजूला ठेवून कोया आदिवासींच्या गोटूलसारख्या संस्थेपासून खूप काही शिकता येणे शक्य आहे. याचा अर्थ जुन्या संस्थांचे जसेच्या तसे पुनरुज्जीजीवन असा अर्थ लावणे चुकीचे होईल. जुन्यातील काय चांगले, भविष्यासाठी उपयोगी ते शिकून त्यांचा नव्या संदर्भात प्रयोग करीत पुढे जावे लागेल.

सदर लेख पुरुषस्पंदनं माणूसपणाच्या वाटेवरची दिवाळी अंकात 2008 साली प्रकाशित झालेला.

आता एक प्रश्न वाचकांसाठी :

आदिवासी समाजात बलात्काराचं प्रमाण इतर समाजांपेक्षा कमी आहे ते का असेल असं तुम्हाला वाटतं?

तुमची उत्तरे कमेंट मध्ये लिहा. तसेच या ईमेल वर letstalksexuality.com@gmail.com आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की वाचायला आवडतील.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap