‘सिमरन’च्या निमित्ताने – निहार सप्रे  

Madness need not be all breakdown. It may also be break-through. It is potential liberation and renewal as well as enslavement and existential death. – D. Laing (Scottish Psychologist)

सिमरन या चित्रपटाची कथा एका घटस्फोटीत मुलीची, प्रफुल पटेलची (कंगना राणावत) आहे. ती समाजाच्या साचेबद्ध चौकटीमध्ये बसत नाही त्यामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिचा संघर्ष चालू आहे. एका बाजूला अत्यंत साचेबध्द समाजव्यवस्थेतून आलेले टिपिकल असे प्रफुलचे आई-वडील आहेत तर दुसऱ्या बाजूला स्वतःला शोधू बघणारी, स्वतंत्र अशी प्रफुल आहे. प्रफुल आणि तिचे पालक आणि खासकरून वडील यांच्यातलं नातं फारच विचित्र आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेमही  आहे आणि ते सगळेच समाजाच्या साचेबध्द चौकटीबरोबर संघर्ष करत असल्यानं त्यांचे एकमेकांच्यात वादही आहेत. प्रफुल घटस्फोटीत असल्यानं तिच्यात आणि तिच्या वडिलांमध्ये सतत वाद होतात. तिचा घटस्फोट, तिचं मुक्तपणे वागणं या सगळ्या गोष्टींमुळे तिचे वडील सतत वैतागलेले असतात आणि तिला या ना त्या कारणाने टोमणे मारत असतात.  या सगळ्याची प्रतिक्रिया म्हणून प्रफुल आणखी स्वैरपणे वागत असते.

प्रफुल ही लैंगिकदृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्याएक लिबरेटेड मुलगी आहे असं आपल्याला चित्रपटातील वेगवेगळ्या सीन्समधून दिसतं. तिला स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे. पण ती जेव्हा हे तिच्या वडिलांना सांगते तेव्हा ते तिला रागावून विचारतात “कशाला घ्यायचंय घर? बॉयफ्रेंडना बोलावण्यासाठी?” आणि तेव्हा ती तितक्याच रागातून उत्तर देते, “हो बोलावणार आहे माझ्या बॉयफ्रेंडना”.

या सीनच्या निमित्ताने आपल्याकडे समाजामध्ये एखाद्या घटस्फोटीत महिलेकडे कसे बघितले जाते याविषयी मनात विचार आला. एखादा मुलगा जेव्हा घटस्फोट घेतो तेव्हा त्याच्याकडे अशा पद्धतीनं बघितलं जात नाही. पण जेव्हा एखादी महिला स्वतःच्या घरात एकटी राहू इच्छिते तेव्हा तिच्याबद्दल या ना त्या गोष्टी बोलल्या जातात. ही मानसिकता पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेतून आलीये. आपल्याकडे मुळातच घटस्फोट या गोष्टीला अजूनही ‘हे काहीतरी भयंकर आहे’ या दृष्टीनं बघितलं जातं. आपल्याकडे अजूनही एकदा का मुलीचं लग्न झालं की ती सासरची होते, ही मानसिकता आहे. जर एखाद्या स्त्रीनं घटस्फोट घेऊन एकटीने जीवन जगायचा निर्णय घेतला की तिच्याबद्दल ‘ती घरच्यांवर ओझंच आहे’, ‘ती कॅरॅक्टरलेस  आहे’, ‘तिचे सतराशे साठ बॉयफ्रेंड असतील’ अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागतात.

चित्रपटातील एका सीन मध्ये प्रफुल अतिशय स्वच्छंदीपणे तिच्या बहिणीला सांगते की “If you are a good girl, you will get a boy friend, and if you are a bad girl you will get many”. आणखी एका सीन मध्ये तिला एक मुलगा भेटतो आणि ती त्याच्याबरोबर सेक्स करायचं ठरवते तेव्हा ती त्याला कंडोमबद्दल विचारते आणि जेव्हा तो “no condom” असं उत्तर देतो. तेव्हा ती अत्यंत सहजपणे त्याला उत्तर देते, “no condom, no sex”. या तिच्या वागण्यातून ती सेक्शुअली लिबरेटेड आहे हे कळतं. याचा अर्थ असा मुळीच नाही की सेक्शुअली लिबरेट होण्यासाठी तुम्हाला अनेक बॉयफ्रेंड असलेच पाहिजेत. पण असं बोलणं हे कुठेतरी स्वतःच्या लैंगिकतेला मोकळेपणाने स्वीकारण्यासारखं किंवा स्वतःच्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलण्यासारखं आहे. आपल्याकडे लैंगिकतेबद्दल बोलणं टाळलं जातं. अशा वेळी प्रफुलसारखं एखादं पात्र ज्याला एका जुनाट विचारधारेची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्या पात्राला स्वतःच्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलताना दाखवणं हा धाडसी निर्णय आहे. एका इंटरव्यूमध्ये कंगनाने सांगितलंय की फिल्मच्या मूळ संहितेमध्ये हे सीन नव्हते तर तिने ते सीन्स संहितेमध्ये घालायला लावले. अशा प्रकारचे सीन्स किंवा संवाद यातून समाजात बदल घडणं अपेक्षित नाही पण असे सीन्स मुख्य प्रवाहातील सिनेमामध्ये आणणं हे देखील धाडसाचं आहे.

कथेच्या पुढच्या भागात काही कारणास्तव प्रफुल आर्थिक संकटात सापडलेली असते. त्यावेळी तिचे वडील तिला सांगतात, की जर तिने पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला तर ते तिची मदत करतील. नाईलाजाने प्रफुल मुलगा बघायला तयार होते. योगायोग म्हणा किंवा तिचा निर्णय असेल म्हणून म्हणा, तिला तो मुलगा पसंतही पडतो. परंतु तरीही कुणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून न राहता आर्थिक विवंचनेतून स्वतःहून सुटण्याचे तिचे प्रयत्न चालूच राहतात. प्रफुल वेष बदलून सिमरन या नावाने चोरी करू लागते. सर्व मिडियामध्ये तिची चर्चा होऊ लागते.

एकीकडे तिला तो मुलगा कुठेतरी हवाहवासा वाटत असतो पण दुसऱ्या बाजूला तिला समाजाच्या चौकटीच्या बाहेर राहून केलेल्या कृत्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धी हवीहवीशी वाटायला लागते. या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेल्या प्रफुलसमोर एक वेळ अशी येते की तिचं स्वत्व हे नात्यांवर भारी पडतं. ती घर सोडण्याचा निर्णय घेते. तिला आवडलेल्या मुलाला सर्व काही सांगते आणि घरातून बाहेर पडते. पण शेवटी तिला जाणवतं की नाती आणि स्वत्व या गोष्टी एकाच वेळी टिकवता येऊ शकतात. त्यासाठी सगळं काही सोडून निघून जाण्याची गरज आहेच असं काही नाही. शेवटी प्रफुल पोलिसांना शरण जाते. तिला जेल होते. जेलमध्ये जेव्हा तिचे आई वडील तिला भेटायला आलेले असतात तेव्हा ती पुन्हा अत्यंत स्वच्छंदीपणे तिचा पुढचा प्लान सांगते. तो ऐकून तिचे वडील भडकतात आणि दोघांच्यात गमतीशीर हाणामारी सुरु होते आणि इथे चित्रपट संपतो.

हा चित्रपट कोणत्याही अंगाने सामाजिक चित्रपट नाही किंवा यातून कथाकाराला किंवा दिग्दर्शकाला कोणता संदेश द्यायचा आहे असंही नाही. चित्रपट अतिशय मनोरंजनात्मक आहे पण त्यातलं जे मुख्य पात्र आणि त्याअनुषंगाने पुढे जाणारी कथा आपल्याला खूप काही सांगून जाते.

हंसल मेहेतांनी (दिग्दर्शक – सिटी लाईट्स, अलिगढ, शाहीद) या आधी अलिगढ चित्रपटात एका समलिंगी व्यक्तीची कथा दाखवली होती ज्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीचा मानसिक संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी सिमरनमध्ये त्यांनी समाजाच्या पठडीत न बसणाऱ्या एका घटस्फोटीत मुलीची कथा विनोदी अंगाने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कंगना राणावत बद्दल वेगळं सांगायची गरज नाही. नुकत्याच एका चॅनलवर आलेल्या तिच्या इंटरव्यूमध्ये तिने फिल्म इंडस्ट्री, तिथं चालणारं लिंगभेद, लैंगिक छळ आणि इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांच्या दुट्टपी वागण्यावर बिनधास्त भाष्य करून स्वतःच्या निडर आणि बिनधास्त इमेजची झलक आपल्याला दाखवली. त्यामुळं प्रफुलचं पात्र अतिशय बिनधास्त, सुंदर आणि कन्विन्सिंग पद्धतीनं करण्यासाठी तिला फार कष्ट करावे लागले नसावेत.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap