बालपण आणि ‘प्रेम’ पण! – ले. ञिशूल द. नि.

‘शाळा’ आणि ‘टाईमपास’ या चिञपटांमध्ये मुख्यतः किशोरवयीन प्रेम कथा रंगवण्यात आल्या होत्या. परंतु त्यामध्ये आक्षेपार्ह असं कोणालाही वाटलं नाही. माञ नुकताच आलेला ‘सैराट’ आणि त्यातील अल्पवयीन प्रेमाविषयी झालेल्या कच्च्या पक्क्या चर्चेमुळं चांगलाच धुराळा उडाला आहे. सोशल मिडियावर रोजच नवीन पोस्ट, कधी या बाजूने तर कधी त्याबाजूने. थोडा धुराळा म्यापण उडवणार आहे. (नसलं कळत तर इंग्लिश मधी सांगू का?)

कालच माझं असलेलं ‘अल्पवयीन प्रेम’ एका दिवसात प्रौढ झालं. कारण आज माझा १८ वा वाढदिवस. भारतामध्ये कायद्यानुसार प्रौढ होण्याचं वय १८ आहे. यातला गंमतीचा भाग जरी सोडला तरी प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे माञ खरं! ते कुणावरही आणि कोणत्याही वयात करावं, आपण करतो देखील. आई मुलावर प्रेम करते. मुलं आजी-आजोबांवर प्रेम करतात. पण याव्यतिरिक्तही एक प्रेम असतं. ‘शाळा’ चिञपटातील मुकुंद जोशी आणि शिरोडकरचं प्रेम सर्वांना माहिती आहे. ‘टाईमपास’ चिञपटातही शाळेतील पोरा-पोरीचं प्रेम आपण स्वीकारलं. एवढंच कशाला माझ्यासकट आपण सर्वांनी शाळेत असताना अशी प्रेम प्रकरणं पाहिलेली किंवा केलेली आहेत. कोणाबरोबर मैञी करायची, त्या धर्माची लोकं अशीच असतात, त्या भागात जाऊ नको अशा घरच्या एक ना अनेक सूचनांकडं लक्ष न देता आपण आंतरजातीय आणि आंतरधर्मीय ‘लफडी’ केली आहेत, पाहिली आहेत. पण यातली सगळीच प्रकरणं किनाऱ्याला जात नाहीत, असं का? ‘शाळा’ चिञपटातील प्रेम त्याचा शेवट दाखवत नाही म्हणून चांगलं वाटतं. पण तेच प्रेम जेव्हा ‘सैराट’ चित्रपट शेवटापर्यंत दाखवतो तेव्हा जातीय संघटनांनादेखील भूमिका घ्यावीशी वाटते. त्यामुळं अल्पवयीन प्रेमाविषयी चर्चा होणं गरजेचं आहे.

आपल्या अल्पवयीन अनुभवांवरून सज्ञान वयात केलेलं विश्लेषण यासाठी महत्वाचं ठरणार आहे. माझ्यासारख्या अनेकजणांना पौगांडावस्थेत अशी ‘प्रकरणं’(!) नवीन नाहीत. वयात येताना शरीरात आणि मनात होणारे बदल उलगडून कोणीच सांगितलेले नसतात. टी. व्ही.वर दिसणाऱ्या लव्हस्टोरीज पाहून एकूण प्रेमाच्या काही संकल्पना तयार व्हायला लागतात. त्यामुळं वयात येणं आणि प्रेमात पडणं एकाच काळात घडायला लागतं. तुला काही कळतं नाही, तू अजून लहान आहे किंवा तुझं हे शिकण्याचं वय आहे अशी कारणं देऊन ती प्रकरणं थांबवणं पालकांना सोप्प वाटतं. जेव्हा अशी प्रकरणं ‘प्रौढ’ लोकं करतात तेव्हा घरच नाही तर समाजदेखील विरोध करतो. समाजातील जाती-धर्माची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे यावरुन स्पष्ट होतं. फक्त जाती-धर्मच नाही तर समाजातील इतर सरंजामी मूल्यं, पितृसत्ताकता, भांडवलशाही या सर्वांना खतपाणी घालत असते. मातीच्या गोळ्याला एकटा कुंभार आकार देत असतो, पण मुलांवर संपूर्ण समाजाचा प्रभाव पडत असतो हे आपण दांभिकतेने नाकारतो आणि त्यांच्यातली संवेदनशीलता मारायचा प्रयत्न नेहमी कसून केला जातो. मुळात ‘सैराट’ चिञपटातील प्रेम अल्पवयीन नाही. त्याही पलिकडं जाऊन अल्पवयीन कोणाला म्हणावं हाच प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो मला. म्हणजे अल्पवयीन प्रेमाला विरोध करून त्याच अल्पवयीन मुलींचं लग्न लावलेलं प्रौढत्वाला कसं काय चालतं?

प्रेम अल्पवयीन की प्रौढ यापेक्षा ते किती संवेदनशील, जबाबदार आणि उत्कट याला महत्व दिलं पाहिजे. त्यांना दिशा देण्याचं काम पालक नक्कीच करु शकतात. आर्थिक स्वावलंबनाचे धडे दोघांनाही शिकवता येतील. आत्मसन्मान, परस्पर आदर या भावना नक्कीच जोपासता येतील. विरोधांमागची जातीयता सोडून ते स्वीकारण्यातच समाजाचं भलं आहे. प्रेम अल्पवयीन म्हणून नक्कीच नाकारता येणार नाही. शिवाय असे किती नितीन आगे आपण मारतच राहणार आहोत? आणि का?

1)http://www.lawzonline.com/bareacts/indian-majority-amendment-act-1999/indian-majority-amendment-act.html

2) http://www.punemirror.in/pune/crime/17-yr-old-hanged-in-honour-killing/articleshow/34388980.cms

Image courtesy: http://vi.sualize.us

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap