“The only true disability is the inability to accept and respect differences.” ― Tanya Masse
मध्यंतरी जयवंत दळवी लिखित कादंबरी, ऋणानुबंधवर आधारित एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं “कच्चा लिंबू”. त्याआधी याच कादंबरीवर आधारित एक नाटक आलं होतं ज्याचं नाव होतं “नातीगोती”. या कादंबरीचा आणि चित्रपट किंवा नाटकाचा इथे संदर्भ घेण्यामागचं कारण म्हणजे मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल? हे आपल्याकडे फार कमी वेळा साहित्यातून किंवा चित्रपट, नाटकातून मांडलं जातं आणि तेच या कादंबरीतून व चित्रपटातून आणि नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय.
कच्चा लिंबू किंवा नातीगोतीची कथा आहे काटदरे कुटुंबाची. श्री व सौ काटदरे हे अत्यंत साधी सामाजिक पार्श्वभूमी असणारं दांपत्य. श्री काटदरे तार ऑफिसमध्ये काम करत असतात तर सौ काटदरे एका प्रायवेट फर्म मध्ये पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करत असतात. दोघांचंही उत्पन्न हे साधारण असतं त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही सामान्य असते. त्यांचा मुलगा बच्चू हा मानसिकरित्या अपंग असतो. त्यात बच्चू पौगंडावस्थेत असतो त्यामुळे त्याच्या सर्वच गरजा अगदी त्याची लैंगिक गरज देखील वाढायला लागलेली असते त्यामुळे श्री व सौ काटदरेंना स्वतःचं असं आयुष्यच उरलेलं नसतं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य, हे त्यांच्या पंधरा वर्षाच्या बच्चूच्या आजूबाजूला फिरत असतं. आणि या सर्वातून श्री व सौ काटदरेंची होणारी फरफट याची कथा म्हणजे कच्चा लिंबू किंवा नातीगोती.
या चित्रपट किंवा नाटकाच्या निमित्ताने, मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या, आणि त्याच्या/तिच्या कुटुंबियांच्या जीवनाबाबत काही गोष्टी इथे मांडाव्याशा वाटतात.
आपल्याकडे बऱ्याचशा मानसिक अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या पालकांची समजूत असते की मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या लैंगिक गरजा देखील कमी असतात किंवा त्यांना लैंगिक गरजा नसतातच. मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दल तर सोडाच पण सामान्य व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दलच लोकांची समज इतकी कमी असते की संपूर्ण समाजच “लैंगिकता” या विषयाकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्यातून गोष्टी सुटत तर नाहीतच उलट आणखी बिघडण्याचीच शक्यता निर्माण होते. नातीगोती किंवा कच्चा लिंबू मध्ये देखील मध्ये मध्ये असे काही संदर्भ येत राहतात ज्यातून कशा प्रकारे बच्चू त्याच्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतो आहे हे आपल्याला लक्षात येतं. एक क्षण तर असा येतो की बच्चू त्याच्या आईकडेच आकर्षित होतो आणि तिच्यावरच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. ते बघितल्यावर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की मग यावर उत्तर काय?
पहिला मुद्दा म्हणजे मुळात लैंगिकतेबद्दल समाजात जी गुप्तता बाळगली जाते ती काढून टाकणे आणि त्यावर खुलेपणाने बोलणे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यातही मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दल तर आणखी विशेष दृष्टीकोन ठेवणे, खासकरून पालकांनी, हे अत्यावश्यक आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा वैयक्तिक पातळीवर सुरवात होऊन मग शाळा, कॉलेज आणि सामाजिक स्तरावर या गोष्टींबद्दल योग्य त्याप्रकारे आणि योग्य त्या माध्यमातून माहिती दिली जाऊ लागेल. आणि ते करण्यासाठी पालक, शिक्षक, शाळा, महाविद्यालये, सरकार या सर्वांनीच एकत्र येऊन त्यावर विचार विनिमय करून, योग्य ती पाऊलं उचलावी लागतील आणि समाजसुधारणेचं काम करावं लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे एकदा का या विषयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन व्यापक बनला, की त्याबद्दल विशेष ट्रेनिंगचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणं हे गरजेचं आहे. जेणेकरून समाजातील सर्वांनाच त्यांच्या पाल्याच्या गरजा लक्षात घेता येऊ शकतील व त्यांच्याशी योग्य प्रकारे संवाद करता येऊ शकेल.
हे तर झालं पाल्याबद्दल. परंतु मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांची जी फरफट होत असते त्याबद्दलही बोलणं तितकंच आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कच्चा लिंबू आणि नातीगोतीमधल्या श्री व सौ काटदरे यांची जी फरफट होत असते, तशीच फरफट साधारणतः त्या सर्व पालकांची होत असेल ज्यांचं पाल्य हे मानसिक अपंगत्वाचं शिकार आहे. आणि ही फरफट आर्थिक सामाजिक पातळीवर तर होत असतेच पण त्याच बरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या लैंगिक इच्छा दाबून ठेवल्याने होणारी त्यांची फरफट.
कदाचित आत्ताच्या काळात जिथे थोड्याफार प्रमाणात कुटुंबियांना प्रायवसी मिळू शकते, तिथे परिस्थिती वेगळी असू शकेल पण ऋणानुबंधची गोष्ट ज्या काळात बेतली आहे किंवा ज्या आर्थिक सामाजिक स्तरातील लोकांबद्दल आहे त्यांच्यासाठी घरात एक मानसिक अपंगत्व असणारी व्यक्ती असताना स्वतःच्या लैंगिक इच्छा व्यक्त करणं हे नक्कीच अवघड जात असेल. याबाबत कथेमध्ये श्री काटदरे हे एक रॅशनल व्यक्ती म्हणून समोर येतात. कथेत त्यांचं पात्र गोष्टींबाबत स्पष्ट आहे. ते त्यांच्या लैंगिक इच्छांबद्दल त्यांच्या पत्नी समोर स्पष्टपणे बोलू शकतात, देव धर्म करून बच्चू बारा होणार नाही ही गोष्ट त्यांना स्पष्ट आहे, बच्चूच्या इच्छा त्यांना माहिती आहेत. पण त्यांची तर्कसंगत बुद्धी तिथे मार खाते जिथे बच्चू त्यांचं ऐकत नाही किंवा जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीचा राग येतो आणि तो राग ते दुसरीकडे कुठे व्यक्त करू शकत नाहीत. म्हणजे एका प्रसंगात बच्चू त्यांचं ऐकत नाही म्हणून ते स्वतःच्या नशिबाला दोष देत स्वतःला मारून घेतात आणि दुसऱ्या एका प्रसंगात ते बच्चूलाच मारतात. आणि ते केल्याने त्यांना एक प्रकारची गिल्टही येते. या सर्व गोष्टीतून कुठेतरी काटदरेंसारख्या तर्कसंगत विचार करणाऱ्या व्यक्तीवर देखील पुरुषप्रधान संस्कृतीने कसा वार केलाय हे दिसतं का?
दुसऱ्या बाजूला सौ काटदरेंची फरफट ही दोन पायऱ्यांवर होताना दिसते. म्हणजे एका बाजूला त्यांना बच्चूला सांभाळायचंय, घरातली कामं करायचीयेत, आपल्या नवऱ्याची मर्जी सांभाळायचीये आणि दुसऱ्या बाजूला त्यांना संसाराचा गावगाडाही सांभाळायचाय. अशा वेळी एक स्त्री म्हणून त्या स्वतःला कुणासमोर व्यक्त करणार? मुळातच आपल्या समाजात स्त्रियांना त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि खासकरून त्यांच्या लैंगिक इच्छा उघडपणे व्यक्त करता येत नाहीत आणि त्यात जेव्हा मानसिक अपंगत्व असणारी व्यक्ती घरात असते तेव्हा घरातूनही एक प्रकारचं दडपण येत असतं. त्यामुळे स्त्रियांची फरफट ही आणखी जास्त प्रमाणात होत असते. परंतु नातीगोती मध्ये सौ. काटदरेना त्यांच्या बॉसच्या रूपात एक चांगला मित्र भेटतो, ज्याच्यासमोर त्या त्यांची होणारी लैंगिक किंवा इतर प्रकारची फरफट खुलेपणाने बोलू शकतात. आजच्या काळात सुद्धा, जिथे लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीचे मित्र आहेत असं म्हणल्यावर समाजाचा त्या स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टीकोन होतो, तिथे ऋणानुबंध ज्या काळात लिहिली गेली त्या काळात अशा प्रकारची मैत्री दाखवणं हे नक्कीच कौतुकास्पद वाटतं. दुसऱ्या बाजूला सौ. काटदरेना त्यांच्या पतीची फरफट होताना दिसतेय आणि त्या त्यांनाही दुखवू शकत नाहीत. आणि त्यातून ज्या द्विधा मनः स्थितीत त्या अडकलेल्या आहेत, त्या परिस्थितीमधून सर्वच स्त्रिया जात असतात असा विचार एक प्रेक्षक म्हणून आपण करणं आणि त्यांना समजून घेणं आणि त्यांना त्यांच्या व्यक्त होण्यासाठी मार्ग करून देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
एकुणात काय तर ऋणानुबंध, कच्चा लिंबू किंवा नातीगोती यांसारख्या कादंबऱ्या, चित्रपट किंवा नाटकं यांमधून असे विषय हाताळले गेलेतच परंतु अशा विषयांकडे केवळ मनोरंजनात्मक पातळीवर न बघता, त्या विषयांवर खोलवर जाऊन विचार होणं गरजेचं आहे आणि त्या विषयाच्या दृष्टीने काहीतरी ठोस पाऊले उचलणं गरजेचं आहे. आणि हे कुणा एका व्यक्तीच्या हातात नाही तर सर्वांनीच तसा विचार करणं गरजेचा आहे.
लेख साभार : वरील संपादित तथापि ट्रस्टच्या ‘हितगुज ‘ च्या चौथ्या अंकातील (एप्रिल – मे २०१८) आहे.
चित्र साभार : https://www.youtube.com/watch?v=F7dlUMpA5JU
No Responses