लेखांक १ : पॅराफिलीया –  मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख

Dr. Ujjwal Nene, Dr. Vasudeo Paralikar, PPPSV team, KEM Hospital Research Centre, Pune.

1,451

मागील तीन भागांमध्ये आपण पिडोफिलिया या मनोलैंगिक विकाराविषयी माहिती घेतली. आता पुढील पाच भागांमध्ये आपण पॅराफिलीया या मनोलैंगिक विकाराविषयी माहिती घेणार आहोत. या लेखमालेमध्ये आपण खालील विषयांवर माहिती घेणार आहोत.

  1. – पॅराफिलीया – मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख
  2. – पॅराफिलीया – मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार
  3. – पॅराफिलीया – मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार
  4. – बलात्कार आणि त्यामागील मानसिकता
  5. – लैंगिक वर्तन आणि भारतातील विविध कायदे

मानवी लैंगिकतेचा विचार करता मानवाचे लैंगिक वर्तन इतर पशु-पक्षांच्या आणि प्राण्यांच्या लैंगिक जीवनापेक्षा वेगळे असते. त्याचे कारण पशु-पक्षी, प्राणी इत्यादींच्या नर आणि मादीमध्ये केवळ प्रजोत्पादनासाठी लैंगिक वर्तन घडून येते. त्यामुळेच प्राणी-पक्षी यांच्यामधील नर-मादीमध्ये होणारा लैंगिक व्यवहार हा ठराविक काळासाठी असतो. सामान्यपणे प्रत्येक प्रजातीचा फलनकाळ, मादीची गरोदर अवस्था, त्याचा कालावधी आणि पुढे पिलांचा जन्म असे वर्षानुवर्षे निसर्गनियमानुसार होत असते. याउलट मानवामध्ये होणारे लैंगिक वर्तन हे केवळ प्रजोत्पादनासाठी होत नसून त्यामध्ये भावनिक अभिव्यक्ती किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल ओढ वाटणे याचा देखील समावेश असतो. त्याचप्रमाणे सर्वसामान्यत: मानवांचे लैंगिक वर्तन हे सांस्कृतिक, कौटुंबिक, सामाजिक आणि त्या-त्या देशातील कायद्यानुसार आकार घेत असते आणि मान्य अथवा अमान्य ठरत असते.  म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक वर्तन ही जरी तिची खाजगी बाब असली तरी त्यामध्ये सामान्य लैंगिक वर्तन आणि सामान्यांपासून वेगळे, अशी दोन प्रकारची विभागणी ढोबळ मानाने झालेली दिसून येते.

मानवी लैंगिक व्यवहाराला अनेक पदर असतात. उदा. भावनिक अभिव्यक्ती, लैंगिक गरजा, जोडीदाराबद्दल वाटणारे प्रेम, किंवा नुसतेच शारीरिक आकर्षण, व्यक्तीच्या सवयी, प्रेम आणि नाते व्यक्त करण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी लैंगिक व्यवहारांचा उपयोग केला जाणे, अथवा अगदी अर्थार्जनासाठी देखील त्याचा विचार होणे अशा काही गोष्टी प्रामुख्याने यामध्ये दिसून येतात. लैंगिक समाधान मिळवणे ही जरी माणसाची शारीरिक गरज असली तरी त्यामधून भावनिक आणि मानसिक समाधान सुद्धा मिळावे ही देखील त्याची अपेक्षा असू शकते. व्यक्तीच्या इतर विकास प्रक्रियांप्रमाणे मानवी लैंगिकतेचा विकास देखील निकोप व्हावा  लागतो.

जर लैंगिक विकास नीट झाला नाही, लैंगिक वर्तनाशी संबंधित नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक आणि भावनिक पैलू समजून घेण्यात जर व्यक्ती कमी पडली तर मग तिच्या लैंगिक वर्तनामध्ये आणि विचारांमध्ये काही दोष आणि कमतरता राहून जातात. सामान्य लैंगिक वर्तनापासून एखाद्याचे लैंगिक वर्तन जेव्हा अतिशय गंभीर प्रकाराने विचलित होते तेव्हा ते वर्तन सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि कधी-कधी कायद्याच्या दृष्टीनेही ते स्वीकारले जात नाही. अशा वर्तनाला पॅराफिलिया किंवा  वैद्यकीय दृष्टीकोनातून मनोलैंगिक विकार असे संबोधिले जाते.

या लेखांमधून आपण मनोलैंगिक आजारांचे किंवा वर्तन दोषांचे काही प्रकार, त्याची लक्षणे आणि त्याच्यावरती शक्य असलेले उपचार अशा काही गोष्टींबाबत माहिती घेणार आहोत.

मानसरोग तज्ञांना, चिकित्सा मानसतज्ञांना तसेच मानसिक इतर आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना विविध मानसिक आजारांचे निदान करणे सुलभ व्हावे या हेतूने  DSM-5 (डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल 5) हे जगभरात वापरले जाणारे मार्गदर्शक पुस्तक आहे. यामध्ये पॅराफिलिया या प्रकरणात अनेक मनोलैंगिक वर्तन विकारांचे विविध प्रकार सविस्तरपणे  दिलेले आहेत. आपण प्रत्येक विकाराबाबत माहिती या लेखमालेमधून जाणून घेणार आहोत. पॅराफिलियाचे निदान करण्यासाठी वरील पुस्तकामध्ये काही निकष नमूद केलेले आहेत.

पॅराफिलिया असलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक उत्तेजना येण्यासाठी आणि त्यांची लैंगिक इच्छा पूर्ती होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती, व्यक्ती किंवा साधने यांबद्दलची लैंगिक उर्मी, दिवास्वप्ने (कल्पना) आणि प्रत्यक्ष वर्तन या गोष्टी आढळतात. सामान्यपणे लोकांना लैंगिक समाधानासाठी अशा वर्तनाची, वस्तूंची किंवा परिस्थितीची गरज नसते, मात्र या व्यक्तींना त्याशिवाय लैंगिक उत्तेजना येतच नाही आणि पर्यायाने स्वत:ची गरजांची पूर्ती करताच येत नाही. त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी, सवयी आणि दिवास्वप्ने ही सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे या व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा मानसिक त्रास होऊ शकतो. डीएसएम-5 प्रमाणे असा त्रास जर सहा महिन्यांहून जास्त कालावधीसाठी होत असेल त्याचे पॅराफिलिक विकार असे निदान होऊ शकते.  याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पॅराफिलिया आणि पॅराफिलिक विकार यामध्ये फरक केला गेला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे व्यक्तीच्या लैंगिक आवडी-निवडी दिवास्वप्ने या केवळ तिच्या पुरत्या मर्यादित असतात मात्र असे असले तरी तिच्या व्यावसायिक, सामाजिक तसेच दैनंदिन आयुष्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही अथवा ही व्यक्ती इतर चारचौघांप्रमाणे सर्वसामान्य जीवन व्यतित करू शकते तेव्हा केवळ पॅराफिलियाचे निदान केले जाते. पण जेव्हा या व्यक्तीच्या विचलित अशा वर्तनाचा तिला स्वतःला, तिच्या लैंगिक जोडीदाराला तसेच कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्तींना त्रास होऊ लागतो तेव्हा मात्र त्याचे पॅराफिलिक डिसऑर्डर असे निदान केले जाते आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला नितांत वैद्यकीय आणि मानसिक उपचारांची गरज असते.

पॅराफिलियाचे काही प्रकार डीएसएम-5 मध्ये समाविष्ट केले आहेत ते आपण पुढील लेखांमध्ये जाणून घेऊयात.

महत्वाची सूचना

POCSO २०१२ कायद्यानुसार अठरा वर्षाखालील व्यक्तींबरोबरचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लैंगिक वर्तन आणि लहान मुलांचा वापर करून तयार केलेल्या लैंगिक चित्रफितीं तयार करणे किंवा त्याचा वापर करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.

 

Comments are closed.