‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये एका लैंगिक प्रश्नाभोवतीच्या सर्व मुद्द्यांना मनोरंजनात्मक पद्धतीनं हात घातलाय. ‘शुभ मंगल सावधान’ ही गोष्ट आहे मुदित (आयुष्यमान खुराना) आणि सुगंधा (भूमी पेडणेकर) यांच्या लग्नाची आणि एका अशा लैंगिक प्रश्नाची जो खरंतर लग्न तोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. पण या चित्रपटात मात्र ‘तो’ प्रश्न या दोघांना जवळ आणण्यासाठी कारणीभूत ठरतो.

चित्रपटाची सुरवातच मुळी होते मुदित आणि सुगंधा एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून. लग्न करण्याअगोदर सुगंधाला मुदितबरोबर वेळ घालवण्याची, त्यांच्या नात्याला आणखी खोलवर घेऊन जाण्याची इच्छा असते. मुदित मात्र सुगंधाशी चार चौघांच्यात बोलायला आणि प्रेमात पडलेलं एखादं कपल जसं टिपिकली वागतं तसं वागायला लाजत असतो. आणि म्हणून तो सुगंधाला लग्नासाठी ऑनलाईन मागणी घालतो. एकमेकांशी काहीच संवाद नसताना, आपल्याला आलेलं स्थळ बघून खरंतर सुगंधाला मुदितच्या भित्रेपणाचा राग येतो. सुगंधा नात्यांची सूत्रं स्वतःच्या हातात घेऊन अरेंज्ड मॅरेजला लवमॅरेज मध्ये बदलायचं ठरवते. हळूहळू मुदित आणि सुगंधा एकमेकांना समजून घेऊ लागतात, त्यांच्यातलं प्रेम फुलतं. एकदा सुगंधाच्या घरात तिचे पालक नसताना ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यात ‘तो’ क्षण येतो. ‘त्या’ क्षणाला ‘तो’ प्रश्न उपस्थित होतो. मुदित आणि सुगंधाला लक्षात येतं, की मुदितला इरेक्टाईल डिसफंक्शन ही लैंगिक समस्या आहे. इथून सुरु होतात मुदितला त्या प्रॉब्लेम मधून मुक्त करण्याचे सर्वांचे प्रयत्न.

चित्रपटाच्या पुढच्या भागात आपल्याला ते सर्व प्रयत्न, पालकांचे चित्र-विचित्र विचार, ‘त्या’ प्रश्नातून निर्माण होणारा तणाव, विनोद हे सर्व दिसतं. त्याचबरोबर या सर्व प्रश्नांवर मात करत मुदित आणि सुगंधा कशा प्रकारे एकत्र येतात तेही दिसतं.

हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या मनात अनेक मुद्दे उपस्थित होतात. सुगंधाचं पात्र आणि सगळ्या समाजाला धुडकावून आपल्या टर्म्सवर लग्न करण्याचा तिनं घेतलेला निर्णय, तिच्या पालकांनी तिला मुलींच्या शाळेत घातल्यापासून मुलींच्याच कॉलेजमध्ये घालेपर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यामुळं तिला ओघानंच पुरुषांबद्दल वाटणारी क्युरिऑसिटी, एका टिपिकल मध्यमवर्गीय घरातून आली असल्यानं तिच्या आई – वडिलांनी तिच्यावर घातलेली बंधनं, त्यांचं तिला मुलांबरोबर बोलू न देणं, मुलांनी तिच्याकडे बघूच नये म्हणून अतिशय साधे कपडे घालण्यासाठी तिला उपदेश करणं, ती अगदी साधे कपडे घालत असल्यानं आणि शरीरानं थोडीशी जाडसर असल्यानं मुलांचं तिच्याकडं न बघणं आणि त्यातून तिला येणारं फ्रस्ट्रेशन. चित्रपटामध्ये अशा अनेक मुद्द्यांना सुगंधा हात घालते.

दुसऱ्या बाजूला पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये कोणताही तरुण मुलगा ज्या दडपणातून जात असतो, त्याच्या पालकांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षांच्या ज्या ओझ्याखाली तो वावरत असतो ते सगळे प्रॉब्लेम मुदितला असतात. या प्रॉब्लेम्स व्यतिरिक्त त्याचा इरेक्टाईल डिसफंक्शनचा लैंगिक प्रॉब्लेम असतो. जेव्हा पुरुषाच्या लिंगाला योग्य प्रमाणात ताठरता येत नाही किंवा अजिबातच ताठरता येत नाही तेव्हा त्याला इरेक्टाईल डिसफंक्शन/ लिंगामध्ये ताठरता न येणं/शीघ्रपतन असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये पुरुष आपलं लिंग योनीमध्ये व्यवस्थितपणे घालू शकत नाही. जनरली काही साधे व्यायाम करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. पण आपल्याकडे अशा प्रश्नांना उघडपणे कबूल करण्याची चोरी असते कारण अशा पुरुषाला आपल्या समाजात लगेचच षंढ, छक्का, हिजडा, मामू, गे, बायल्या असं म्हणून चिडवलं जातं आणि त्याचे भयानक दुष्परिणाम होतात. त्यामुळं अनेक पुरुष असा प्रॉब्लेम असूनही त्याबद्दल उघडपणे इतरांशी बोलणे तर सोडाच तर आपापल्या पार्टनरबरोबर देखील काहीच बोलत नाहीत. इतकंच नाही तर त्यांना डॉक्टरकडे जाण्याची देखील त्यांना लाज वाटते. असो.

‘आपण सेक्स करताना परफॉर्म करू शकू की नाही?’ याबद्दल पुरुषांना वाटणारी भीती आणि त्यातून येणारं प्रेशर हे देखील इरेक्टाईल डिसफंक्शन असण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. मुदितदेखील याच प्रेशरखाली वावरत असतो. तो पॉर्न फिल्म्स बघतो, बाबा – बुवांकडे जातो, इंटरनेटवर माहिती वाचतो तरीही काहीच करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला सुगंधा पॉर्न मधल्या स्त्रिया जशा प्रकारे वागतात तसं वागण्याचा प्रयत्न करते. तरीही मुदितला काहीच करता येत नाही आणि अशा सर्व गोष्टींमधून त्या दोघांच्यात तणाव देखील निर्माण होतो. एका टप्प्यावर मुदित सुगंधाला म्हणतो देखील की आपण लग्न करायलाच नको. पण सुगंधा तिच्या निर्णयावर ठाम असते आणि ती मुदितला म्हणते देखील की सेक्स करू शकलो नाही म्हणून काय झालं? आपण एकमेकांबरोबर आनंदात राहू. त्याचवेळी तिच्यावर दुसरं दडपण असतं ते म्हणजे जर मूल जन्माला घालू शकलो नाही तर समाज तिलाच नावं ठेवेल. दुसऱ्या बाजूला मुदितचे मित्र आणि पालक आणि सुगंधाची मैत्रीण आणि पालक त्यांना चित्र विचित्र उपाय सांगत असतात ज्यामुळं प्रश्न सुटत तर नसतोच उलट त्या दोघांच्याही मनातलं कन्फ्युजन आणखी वाढत असतं.

संपूर्ण चित्रपटात अनेक प्रकारचा ड्रामा घडल्यानंतर शेवटच्या भागात, जेव्हा लग्न अगदी तोंडावर आलेलं असतं तेव्हा एका मजेशीर सीनमध्ये मुदितचा सासरा त्याला एका जनावरांच्या डॉक्टरकडे घेऊन जातो. तो डॉक्टर त्याला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतो आणि जाताना म्हणतो, ‘आप बस टेन्शन लेना बंद करो और मस्त रहो’. मुदित जेव्हा त्याच्याकडे औषधं मागतो तेव्हा तो त्याला लीम्लेटच्या गोळ्या देतो आणि त्याच्याकडे बघून फक्त हसतो. त्यांनं दिलेल्या सल्ल्यानंतर मुदितच्या विचारसरणीत फरक पडतो आणि आता कोणी काहीही बोलो, मी सुगंधाशीच लग्न करणार या निर्णयावर येतो. तो सीन जरी विनोदी ढंगात घेतला असला तरी त्यातून आपल्याला मिळणारी शिकवण फार महत्वाची आहे. चित्रपटाचा शेवट मुदितला इरेक्टाईल डिसफंक्शनचा प्रॉब्लेम असूनही, दोघांचं आनंदी आयुष्य दाखवणाऱ्या विजुअल्सवर होतो.

थोडक्यात काय, आपल्याकडे सेक्स किंवा सेक्शुअल गोष्टींबद्दल टोकाची सीक्रसी बाळगली जाते, त्याबद्दल उघडपणे बोलणं टाळलं जातं, त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही. सेक्स ही एक आनंद देणारी क्रिया नसून केवळ आणि केवळ प्रो-क्रिएशनसाठी केली जाणारी क्रिया आहे, असाच आपल्याकडे समज आहे. त्यामुळं सेक्स म्हणजे केवळ आणि केवळ योनीमध्ये शिश्न घालणं अशीच सर्वसाधारणपणे समजूत असते. सेक्सविषयीच्या आपल्या प्रॉब्लेमबद्दल किंवा परफॉर्मन्सबद्दल टेन्शन घेण्यापेक्षा, त्याच्याविषयी मोकळेपणानं बोलणं, त्याच्यासाठी मदत घेणं, उपाय शोधणं, आयुष्य त्रासदायक करून घेण्यापेक्षा आयुष्य आनंदात घालवणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं, एकमेकांची चेष्टा मस्करी करत, त्यातला आनंद एन्जॉय करणं, हे सेक्सइतकंच महत्वाचं आणि आनंददायी आहे.

नोट:  शीघ्रपतन, लिंगामध्ये ताठरता न येणं म्हणजेच इरेक्टाईल डिसफंक्शन याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटवरील याविषयीचे लेख आणि प्रश्नोत्तरे वाचा.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap