‘मूनलाईट’च्या निमित्ताने…

Darkness cannot drive out darkness; only light can do that. Hate cannot drive out hate; only love can do that.” – Martin Luther King Jr.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मूनलाईट’ या चित्रपटाने, एका कृष्णवर्णीय पात्राच्या आयुष्यातल्या संघर्षाची कथा वेगळ्याच पद्धतीनं दाखवली. ‘मूनलाईट’ म्हणजे एकाच पात्राची, तीन काळात घडणारी कथा अत्यंत साध्या पद्धतीने दाखवलेला चित्रपट. दिग्दर्शक बॅरी जेनकिन्सनं, चित्रपटाची मांडणी स्वतःच्या आणि लेखकाच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारीत केलेली असल्यानं, हा चित्रपट खूपच कन्विन्सिंग होतो. त्यानेच एका इंटरव्यूमध्ये म्हणाल्यानुसार, “Nature versus Nurture म्हणजेच ‘एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव आणि तो ज्या परिस्थितीमधून जातो किंवा त्याच्यावर जशा प्रकारचे संस्कार होतात त्यातून त्याच्यात होणारे बदल’ या दोन्हीमध्ये चालणारा संघर्ष हा या चित्रपटाचा गाभा आहे.”

या संघर्षाच्या विषयाला अनुसरून इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो. ‘बदल’ हा निसर्गाचा नियम आहे. परंतु मुख्य मुद्दा हा, की तो बदल निसर्गतः होत असतो की बाह्य शक्तींनी घडवलेला असतो? वर्णभेद, वंशभेद, जातीयवाद, लिंगभेद या गोष्टी निसर्गाने बनवल्या का? तर नाही. त्या मनुष्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी बनवल्या. मर्दानगी आणि स्त्रीत्वाशी संबंधित साचेबध्द प्रतिमा, एका वंशाचे/रंगाचे/जातीचे लोक उच्च आणि त्यांना न पटणारे लोक नीच, एका विशिष्ट प्रकारच्या लैंगिकतेत बसणारे लोक ‘नॉर्मल’ आणि त्यांच्यानुसार नसणारे लोक ‘वेगळे’ यांसारखे भेद हे बाह्य शक्तींनी घडवलेल्या बदलाची उदाहरणे आहेत. त्यातूनच अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली आणि दोन वेगवेगळ्या प्रवृत्तींमधला संघर्ष निर्माण झाला.

मूनलाईटची कथा आहे, शॅरन नावाच्या एका कृष्णवर्णीय मुलाची. शॅरन आणि त्याच्या आजूबाजूला येणारी पात्रं आणि त्यांच्यातील परस्पर संबंध, त्याच्यावर होणारे संस्कार, त्याची लैंगिकता आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत, शॅरनच्या अंतर्मनात स्वतःबरोबर आणि आजूबाजूला असणाऱ्या सामाजिक गोष्टींबरोबर सुरु असलेला संघर्ष आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो.

चित्रपटाची कथा तीन काळांमध्ये घडते.

पहिला काळ शॅरनचं बालपण. त्याचं त्याच्या शाळेतील मुलांकडून होणारं बुलिंग, स्वतःच्या लैंगिकतेबद्दल त्याच्या मनात येणारे प्रश्न, त्याची ड्रगचे व्यसन असणारी आई, तिच्याकडून होणारे मानसिक अत्याचार, त्याला मार्गदर्शन करणारा त्याचा मित्र हुआन, त्या दोघांमधील नाजूक नातं; हे सर्व दाखवत असताना दिग्दर्शक कुठेही लाउड होत नाही.

सतत घराबाहेर असणाऱ्या आणि व्यसनाधीन झालेल्या आईला कंटाळून छोटा शॅरन, त्याचा मित्र हुआनकडे राहायला येतो. एकदा तो त्याला एक प्रश्न विचारतो, “faggot’ म्हणजे काय? आणि मी ‘faggot’ आहे का?” त्याच्या या प्रश्नाला कसं सामोरं जायचं हे हुआन आणि त्याच्या मैत्रिणीला एक क्षण कळत नाही. पण त्याच्या प्रश्नाला न टाळता हुआन अत्यंत शांतपणे त्याला समजावतो. तो सांगतो, “Faggot हा शब्द अमेरिकेमध्ये ‘गे’ व्यक्तींना वापरली जाणारी शिवी म्हणून वापरला जातो. तू कदाचित गे असशील पण faggot नाहीस आणि जे तुला तसं म्हणतात त्यांना तू तसं म्हणू देऊ नकोस.” कदाचित तेव्हाच हुआन त्याच्या मनात मर्दानगीचं बीज रोवतो असं प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवतं. जेव्हा शॅरन त्याला विचारतो की, ‘मी गे आहे ते मला कसं कळेल?’ तेव्हा हुआनची मैत्रीण त्याला एकच वाक्य बोलते, ‘तुला जेव्हा कळायचं असेल तेव्हा तुला ते आपोआप कळेल’.

या संपूर्ण सीनमधून आपल्याला जाणवतं, लैंगिकतेसारख्या विषयावर संवाद होणं किती आवश्यक आहे. वाढत्या वयातल्या मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या लैंगिकतेबद्दल, त्याच्या/तिच्या भिन्नलिंगी किंवा समलिंगी मित्रमैत्रिणींबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल जे प्रश्न पडत असतात; त्या प्रश्नांना पालक किंवा शिक्षक योग्य पद्धतीनं उत्तरं देतात, की त्यांच्या प्रश्नांना उडवून लावतात. बरेचसे पालक कदाचित त्यांच्या प्रश्नांना उडवून लावत नसतीलही, पण ते पाल्याला ‘तुला देवानं आकाशातून पाठवलंय’ किंवा ‘समलिंगी आकर्षण म्हणजे अनैसर्गिक, देवाच्या मर्जी विरोधात’ अशी काहीतरी भलतीच उत्तरं देऊन त्यांची तर्कसंगत विचार करण्याची क्षमताच मारून टाकतात. आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मुलं/मुली इंटरनेटसारख्या किंवा तत्सम मिडीयमचा वापर करतात आणि त्यातून योग्य माहिती मिळेलच याची खात्री नाही. मुलाच्या/मुलीच्या मनात येणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची गरज आहे.

चित्रपटात येणारा दुसरा काळ शॅरनची युवावस्था दाखवतो. बालपणापासून वेगवेगळ्या टप्प्यावर शोषण सहन करावं लागलेला शॅरन अजूनही बुजलेला/दबलेला दिसतो. त्याला त्याच्या लैंगिकतेबद्दल अजूनही प्रश्न पडत असतात. त्याच्यातला निरागसपणा अजूनही टिकून असतो. त्याची आई आता संपूर्णपणे व्यसनाधीन झालेली असते आणि शॅरनकडून जबरदस्तीने किंवा त्याचं इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे घेत असते. हे सगळं होत असतानाच शॅरनच्या अंतर्मनात त्याच्या लैंगिक ओळखीबद्दल झगडा चाललेला असतो. एका नाजूक क्षणी  शॅरनचा एक जवळचा मित्र, केविन त्याला हस्तमैथूनाचा अनुभव देतो तो अनुभव शॅरनला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतो. शॅरनला तो समलिंगी आहे हे जाणवू लागतं. एक दिवस अचानक केविन त्याच्या एका मित्राच्या दबावाखाली येऊन शॅरनला बेदम मारतो. शॅरनला हुआनचे शब्द आठवतात, ‘कुणालाही तुझ्या मर्जीविरोधात तुझ्याबद्दल निर्णय घेऊ देऊ नकोस, कुणालाही तुझ्यावर जबरदस्ती करू देऊ नकोस’ आणि त्यातून शॅरन केविनच्या मित्राचा बदला घ्यायचं ठरवतो आणि घेतो देखील. पोलीस त्याला पकडून घेऊन जातात आणि जाताना केविन त्याच्याकडे हतबलपणे बघत असतो इथे दुसरा काळ संपतो. अशा काही घटना घडतात, ज्यामुळं निरागस शॅरन मरून त्याच्यातला एक अहंकारी पुरुष जागा होतो.

.

चित्रपटाच्या या टप्प्यावर, एक प्रेक्षक म्हणून आपल्याला शॅरनचं बदलतं रूप प्रकर्षानं जाणवतं. आपल्यातल्या किती लोकांनी परिस्थितीसमोर खचून जाऊन स्वतःमधील निरागसपणा मारला असेल? स्वतःबरोबर झगडत एका अहंकारी व्यक्तीला जन्म दिला असेल? आपण स्वतः जरी  अशी अवस्था अनुभवली नसेल तरीही शॅरनवर ओढवणाऱ्या परिस्थितीमधून दिग्दर्शक आपल्याला त्या अवस्थेतून जाण्याचा अनुभव देतो.

चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्याला मानसिक पातळीवर संपूर्णपणे बदललेला तरुण शॅरन दिसतो. युवकांसाठी असणाऱ्या करेक्शन सेंटरमधून सुटून आल्यानंतर, शॅरन स्वतः ड्रग डीलर बनलेला असतो. त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे त्याची आई व्यसन मुक्ती केंद्रामध्ये मध्ये रहात असते. एकट्याने आयुष्य व्यतीत करणाऱ्या शॅरनला जवळची अशी कोणी व्यक्ती नसते. एक दिवस अचानक त्याला केविनचा फोन येतो. शॅरनच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि न राहून तो त्याला भेटायला जातो. केविन त्याची माफी मागतो पण शॅरनच्या आयुष्यात जो ‘बदल’ घडायचा असतो तो घडलेला असतो. शॅरनने त्याच्यातल्या निरागसतेला मारलेलं असतं आणि तो आता टिपिकल पुरुष बनलेला असतो. केविनने त्याच्या जुन्या मैत्रिणीबरोबर केललं लग्न आता तुटलेलं असतं. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते पण तो खुश असतो. कारण त्यानं स्वतःवर बेतलेल्या परिस्थितीचा, त्याने केलेल्या चुकांचा स्वीकार केलेला असतो. कथेच्या या टप्प्यावर जेव्हा केविन शॅरनला त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारतो तेव्हा शॅरन शांतपणे, ‘तुझ्यानंतर कोणी माझ्या शरीराला तशा प्रकारचा स्पर्शच केला नाही’ असे उत्तर देतो. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये शॅरन केविनच्या खांद्यावर डोकं ठेवलेला दिसतो आणि केविन त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. शॅरनला त्याचं बालपण आठवतं आणि अथांग समुद्राच्या किनारी, रात्रीच्या निळ्या प्रकाशात लहानगा शॅरन उभा असलेल्या शॉटवर चित्रपट संपतो.

या संपूर्ण चित्रपटाच्या निमित्तानं, काही गोष्टी इथं मांडाव्याशा वाटतात. मुळात शॅरनवर जी परिस्थिती ओढवली ती का ओढवली? त्याच्यात झालेला ‘बदल’ हा कशाचं फलित आहे? आणि तो बदल केवळ परिस्थितीमुळे झाला की त्याला शॅरन स्वतःदेखील त्याला जबाबदार आहे? आपल्या आजूबाजूला देखील असे अनेक शॅरन असतील ज्यांना स्वतःबद्दल, स्वतःच्या लैंगिकतेबद्दल, त्यांच्याबरोबर घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्यात होणाऱ्या बदलाबद्दल प्रश्न पडत असतील. काहीजण त्या बदलाला सकारात्मक दृष्टीकोनातून घेत असतील आणि आपलं आयुष्य पुढे ढकलत असतील पण काही त्या बदलांमुळे प्रचंड नकारात्मकही बनत असतील. चित्रपटातील शॅरन हा त्याच्या वयातल्या मुला-मुलींचे आणि त्यांच्यातल्या चलबिचलतेचे प्रतिनिधित्व करतो. अमेरिकेत ज्याप्रमाणे कृष्णवर्णीयांना घृणास्पद वागणुकीला सामोरं जावं लागतं त्याप्रमाणे आपल्याकडेदेखील एका मोठ्या वर्गाला धर्म, जातीयता यांमुळे घृणास्पद वागणुकीला सामोरं जावं लागतं. या सर्वात भर पडते ती समाजमान्य, एकाच पठडीत मोडणाऱ्या लैंगिकतेची, त्यातून निर्माण होणाऱ्या क्लिष्टतेची आणि त्यातून स्वतःच्या समाजाबरोबर आणि स्वतःबरोबर निर्माण होणाऱ्या संघर्षाची. बाह्य स्वरूपात होणाऱ्या संघर्षाशी आपण कसेतरी का होईना लढू शकतो. पण अंतर्मनात चाललेल्या संघर्षाशी कसं लढणार?

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap