मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही? हा तसा कायमचाच चर्चेचा प्रश्न आहे. काही मतिमंद मुला-मुलींनाही त्यांचं लग्न व्हावं, बाळ व्हावं असं वाटत असतं. स्वतःच्या लग्नाबद्दल मुलं घरात विचारपूस करतात. काही वेळा माझ्याशी लग्न करशील का? असे मुलगा किंवा मुलगी कुणालाही विचारतात. मुलांच्या अशा पद्धतीने व्यक्त होण्यामुळे त्यांच्यातील या भावना कशा हाताळायच्या असा प्रश्न पालकांसमोर असतो.
हे घडण्यापूर्वी घ्यावयाची काळजी म्हणजे लग्नाबाबत मतिमंद मुलांशी चेष्टा करणं टाळावं. लग्न म्हणजे नवे कपडे घालणं, लाडू खाणं, सगळ्यांनी आपलं कौतुक करणं असाच अर्थ मतिमंद मुला-मुलींच्या मनात ठसलेला असण्याची शक्यता अधिक असते. कारण हेच त्यांनी लग्न समारंभात अनुभवलेलं असतं. यापलीकडे लग्न म्हणजे काय हे समजायला त्यांची बौध्दिक क्षमता कमी पडते. तसंच लग्नामुळे आणि आई-वडील होण्यामुळे येणाया जबाबदा-या पार पाडण्याची क्षमता या मुला-मुलींमध्ये नसते. या आनंदापासून दूर राहावं लागत असल्याने त्यांचा भावनिक कोंडमारा होण्याची शक्यता असते. खासकरून मुलांच्या मनात निर्माण होणा-या या भावनांमुळे घरातील तरुण स्त्रियांना (भावाची पत्नी) असुरक्षित वाटत असतं
लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध करणे हे भारतीय समाजात आजही स्वीकारार्ह नाही. त्यामुळे मतिमंद मुला-मुलींची शारीरिक किंवा लैंगिक गरज भागविण्यासाठी लग्न करुन देणं हे गृहीत धरलं जातं. असाच पालकांचा दृष्टिकोन असतो. शिवाय आपल्यानंतर मुलाची या मुलीची काळजी कोण घेणार असा प्रश्न पालकांपुढे असतोच. त्यासाठी आपलं जवळचं माणूस असावं या भूमिकेतूनही अनेक पालक मतिमंद मुला-मुलींची लग्न करुन देयासाठी अनुकूल असतात.
अनेकदा मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक संबंधांसाठी लग्न हा पर्याय निवडला जात असावा. या मुला-मुलींच्या लग्नाचा विचार करताना संबंधित मुलाची किंवा मुलीची भावनिक आणि बौद्धिक क्षमता, त्याला किंवा तिला असणारा कौटुंबिक आधार, आर्थिक पाठिंबा आणि सहकार्य अशा सर्व गोष्टींचाही विचार करुन लग्नाचा निर्णय घ्यावा. लग्नाच्या नात्यात एकमेकांबद्दल प्रेमभावना असते. प्रेमभावनेतून एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, बोलणं, वागणं आवडत असतं. यात त्या व्यक्तीचा आदर, विश्वास, आपुलकी, काळजी अशा विविध भावनांची, मूल्याची गुंतवणूक असते. प्रेमात अंतर्भूत असणा-या या विविध भावना, मूल्य, विचार मतिमंद मुलांना समजण्यात मर्यादा येतात.
कायद्याने या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असे आहे. तरीही अगदी काही मुलं-मुली अश्या इतरांच्या मदतीने वैवाहिक जीवन जगू शकतात. अपवादात्मक केसमध्येच तज्ञांच्या सल्याने/मार्गदर्शनाने मुलांच्या लग्नाचे निर्णय होणे उचित ठरु शकतं. यातही मतिमंद मुलाचं आणि मतिमंद मुलीचं एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करणं योग्य ठरू शकते. तरीही मुलगा व मुलगी यांच्या बौद्धिक क्षमता, त्याची व्यक्तिमत्वं, त्यांच्या सवयी, गुण-दोष, त्यांचे आजार, दोघांनाही उपलब्ध असणारा कौटुंबिक आधार या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करण्याची गरज असते. मात्र कुणाशीही फसवणूक करुन या मुला-मुलींची लग्न करु नयेत. हे त्या दुस-या व्यक्तीसाठी आणि या मुला-मुलींसाठीही त्रासदायक ठरु शकतं.
१) मुलाच्या आणि मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावी. तसेच लग्न नोंदणी पध्दतीने, किमान खर्चात केल्यास या मुलांच्या भविष्यासाठीच्या आर्थिक तरतुदीत भर पडते.
२) या जोडप्याला अपत्य झाले तर त्याची काळजी, जबाबदारी घेता येईल का याबाबत नीट विचार करावा.
३) दोन्हीकडच्या पालकांनी समान जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक कारणांवरुन कटुता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) जोडप्याला वसतिगृहात राहावं लागणार असेल तर पालकांच्या पश्चातही त्यांना पती-पत्नी या नात्याने राहता येईल अशी व्यवस्था करावी.
५) दोघांमध्ये मतभेद असतील किंवा पटत नसेल तर वेळीच घटस्फोट घ्यावा.
संबंधित मुला-मुलीचे पालक, नातेवाईक यांच्यातील सामंजस्यावर, सहकार्यावरच हा पर्याय प्रत्यक्षात येऊ शकेल. दोघांच्या सहजीवनाबाबतीत अशा काही गोष्टींचा विचार करुन त्यांचे आयुष्य भावनिकदृष्टया स्थिर करण्याचा प्रयत्न पालक करू शकतात.
हे झालं लग्नाबाबत … पण अशा जोड्प्यांना शारीरिक संबंध करायला जमेल का? अन त्यांना मूल होऊ द्यावं की नाही? शारीरिक संबंध न करताही या मुलांना sexual pleasure कसा मिळू शकतो. या अन अशा अनेक विषयांसाठी लवकरच घेऊन येत आहोत पुढील लेख आवर्जुन वाचा.
संदर्भ : वरील संपादित लेख तथापि ट्रस्टच्या ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी ‘ या मतिमंद मुला – मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील आहे.
8 Responses
माझा विवाह गतिमंद असलेल्या मुलीशी झालेला आहे. तिचा बुध्यांक हा ५८ आहे. माझी फसवणूक केली आहे, सासरच्या सर्वानी माझ्या वर खूप आरोप केला की, तुमच्या कडे पाठविली तेव्हा पासुन ती आशी झाली. तुम्ही तिला वेड केले. पाेलिस स्टेशन तक्रारी केल्या, मला व आई ला खुप फार, व तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. नंतर आम्हाला काही समजत नव्हते. एका डॉ. सल्ला दिला, की तुम्ही तिला एकदा दवाखान्यात दाखवून बघा, तेव्हा आम्हाला समजले.
नंतर तिला तिच्या घरी परत पाठविले, तिच्या वडीलांनी तिला खूप मारुन आमच्या कडे पाठविली, तेव्हा तिने सर्व सांगितले. व मला एक मुल होऊ द्यावे अशी विनंती केली, व नंतर मी वेगळी राहील, तुम्ही दुसरा विवाह करा असे म्हणाली, आज मला एक मुलगी आहे पण तिचा संभाळ करण्यासाठी ती समर्थ नाही. आता सासर कडील सर्व गप्प बसून अबोला धरतात. तिला वेड म्हणून सोडून दिले, आपल्या जबाबदारी माझ्यावर टाकुन मला भांडत असतात. मी तिचा संभाळ करण्यासाठी तयार आहे, पण मुलीच्या वडीलांची काही जबाबदारी नाही का? माझ ❓
महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. समाजामध्ये अनेक मुलं मुली अशा प्रकारच्या किंवा विविध प्रकारच्या फसवणुकीला बळी पडत असतात. खरतरं लग्नाचा विचार करताना संबंधित मुलाची किंवा मुलीची भावनिक आणि बौद्धिक क्षमता, त्याला किंवा तिला असणारा कौटुंबिक आधार, आर्थिक पाठिंबा आणि सहकार्य अशा सर्व गोष्टींचाही विचार करून लग्नाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्याकडील विवाह संस्थेचा विचार करता मुला मुलींच्या मतांचा विचार न करता बऱ्याचदा इतर व्यक्तीच निर्णय घेत असतात असंच चित्र दिसत. खरंतर लग्नाआधी एकमेकांना भेटण्यास, एकमेकांचे विचार, आवडी-निवडी समजून घेण्यास वेळ दिला पाहिजे जेणेकरून एकमेकांना व्यवस्थितपणे समजून घेता येईल.
तुमच्या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे तुमच्या पत्नीचा बुध्यांक जर ५८ असेल तर त्या सौम्य मतिमंदत्व या वर्गीकरणामध्ये येतात कारण ५० ते ६९ बुध्यांक हे सौम्य मतिमंदत्व मानले जाते. सौम्य मतिमंदत्व हे त्या व्यक्तीशी बोलताना किंवा सहवासात आल्यावर लक्षात येते. तुम्हाला लग्नाआधी किंवा लग्नादरम्यान पुसटशीही कल्पना आली नाही का? आज ज्या स्थितीमधून तुम्ही जात आहात त्यात केवळ तुम्हालाही नाही तर तुमच्या पत्नीलाही तितकाच त्रास सहन करावा लागत असणार आहे. तिच्या वडिलांनी तिला मारले देखील आहे म्हणजे फक्त मानसिकच नाही तर शारीरिक त्रासही त्या सहन करत आहे. तुमची जी फसवणूक झाली त्याचा परिणाम तुमच्या पत्नीच्याही आयुष्यावर होत असणार आहे. आपली फसवणूक झाली किंवा लपवून ठेवलेली खरी माहिती उघडकीस येते, एकमेकांना सांभाळणं कठीण होतं तेव्हा सामान्य सहचर मतिमंद सहचराला सोडून देतो किंवा सोडून देणे शक्य नसेल तर तर त्या मतिमंद व्यक्तीची आर्थिक, मानसिक, लैंगिक बाबतीत कुचंबना केली जाते. मुलीच्या बाबतीत विचार केला तर सासर आणि माहेर या दोन्ही बाजूंनी दबाव टाकला जातो त्यामुळे तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिच्या कुटुंबावर आणि तिचे कुटुंब तुमच्या कुटुंबावर दोषारोप करत राहणार पण यातून काय साध्य होणार आहे का? तुम्ही तिच्या माहेरच्या लोकांनी तिची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा ठेवली ती कोणत्या प्रकारची आहे? आर्थिक की मानसिक आधाराच्या स्वरुपात विचार करत आहात? तुमच्या आयुष्यात एक अपत्य देखील आहे त्यामुळे निश्चित तुमची जबाबदारी अधिक वाढली आहे. मुलीचा सांभाळ करणं ही केवळ आईचीच नाही तर वडिलांची देखील तितकीच जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. भांडणापेक्षा दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी योग्य संवाद साधून प्रश्न सोडवला तर निश्चित मार्ग मिळेल. एखादया समुपदेशकाचीही मदत घेऊ शकता.
महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीची आणि बाळाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास सक्षम असाल तर तुमचं नातं तुम्ही टिकवू शकता. तुमच्याही काही अपेक्षा असतील परंतु या घडीला कशाला प्राधान्य द्यायचे आहे याचा शांतपणे विचार तुम्ही करायला हवा. तुमची फसवणूक झाली ही खरंच चुकीचीच गोष्ट आहे. कोणत्याही पालकाने आपल्या मतिमंद मुलाचा किंवा मुलीचा विवाह करताना कुणाची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती बौद्धिक दृष्टया सक्षम नसेल तर त्या व्यक्तीची काळजी घेणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. पण आपल्या समाजामध्ये याबद्दल केवळ नकारात्मक विचारच दिसून येतात ही खंताची बाब आहे.
असा काही पर्याय नाही का? ज्या मध्ये तिचा संभाळ करून मला दूसरा विवाह करता येईल का? तिचे वडील अशावेळी रूपये (दहा लाख) मागणी करतात, व आम्ही तिचा दुसरा विवाह लांब करून देवु असे म्हणतात, पण दिलेले रूपये हेच वापरून परत तिला बे भरोसा सोडुन देतील व इतर कोणाची फसवणूक करतील. लग्नाच्या एका महिने मध्येच त्यानी रूपयांची मागणी करून आम्हाला मोकळा करा असे म्हटले होते. असा काही कायदेशीर मार्ग जेणेकरून आम्हाला दोघांना आपआपले जीवन जगता येईल.
तुमच्या प्रश्नात तुम्ही दुसऱ्या विवाहाबाबत विचारले आहे. तत्पुर्वी ही गोष्ट लक्षात घ्या-पती किंवा पत्नी हयात असताना, किंवा पहिल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरा विवाह करणे हा गुन्हा आहे. पहिल्या पत्नीने पतीस दुसऱ्या विवाहास तोंडी अथवा लेखी संमती दिली तरीही दुसरा विवाह हा गुन्हाच असतो. असा गुन्हा करणाऱ्यास कायद्याअंतर्गत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
म्हणजेच पहिल्या पत्नीचा सांभाळ करून दुसरा विवाह केला काय किंवा मुलीच्या वडिलांना पैसे देऊन प्रकरण मिटवले आणि तिचा दुसरा विवाह लावून दिला काय हा कायद्याने गुन्हाच आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कायद्यासंदर्भातील गोष्टींसाठी किंवा एकूणच स्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही योग्य समुपदेशकाची मदत घेणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या आसपास समुपदेशन केंद्र आहे का याची माहिती काढा, मदत घ्या एखादा चुकीचा निर्णय घेतला तर हा गुंता अजून वाढू शकतो. यात तुमच्या मुलीचं भविष्यही तितकाच महत्त्वाचा आहे हे लक्षात असू द्या.
मुलीच्या वडिलांची पैशांची मागणी पूर्ण झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या मुलीचा दुसरे कुणासोबत विवाह लावून देतील आणि कदाचित यातून आणखीन कुणाची तरी फसवणूक होऊ शकते. हा तुमच्यासाठी काळजीचा मुद्दा आहे, आणि अस घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी भावनेच्या आधारे पाऊल न उचलता कायदेशीर मदत घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.
सर मी केलेले कमेंट नावासहीत वे साईट वर दिसत आहे
केलं दुरुस्त
या लेखाचा स्रोत काय आहे??
नजरचुकीने राहिला होता….लेखाच्या खाली दिला आहे.
धन्यवाद