आपला लैंगिक अनुभव सुखकारक असावा यासाठी पूरक असलेले चार महत्वाचे घटक – लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता.
लैंगिक ज्ञान
सोप्या भाषेतील शास्त्रीय पुस्तकं वाचून किंवा कौन्सिलर/डॉक्टरांशी बोलून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. या माहितीतून प्राथमिक लैंगिक ज्ञान मिळेल व काही अंशी तरी आपले गैरसमज दूर होतील.
जोडीदाराशी संवाद साधणं
मला अनेक वेळा विचारलं जातं की, “पुरुष उत्तेजित झाला आहे, हे लगेच कळतं. पण स्त्री उत्तेजित झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं?” किंवा संभोगातून स्त्रीचं समाधान झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं?” या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं तुमच्या संवादावर अवलंबून आहेत. उत्तेजित होताना स्त्रीच्या शरीरात बदल होत असले तरी ते दिसणं अवघड असतं. तिला लैंगिक व भावनिकदृष्ट्या काय वाटतंय हे तिच्याशी साधलेल्या संवादातूनच कळतं.
संभोग हा हस्तमैथुनासारखा स्व-केंद्रित नसतो. इथे आपल्याबरोबर जोडीदार आहे व तिला/त्याला लैंगिक सुख देणं हा संभोगाचा महत्वाचा भाग आहे ही जाण हवी. अनेक वेळा दिसतं की जोडीदाराला किती लैंगिक ज्ञान आहे, कोणती भीती, काळज्या आहेत, जोडीदाराला काय केललं आवडतं, काय आवडत नाही, कोणत्या कृतीचा त्रास होतो याबद्दल जोडीदाराशी खुलेपणाने बोललेलं नसतं. जोडीदाराशी या विषयावर बोललं तर, ‘जोडीदार काय म्हणेल?’, ‘त्याचा अहंकार दुखावेल का?’ किंवा ‘तो मला वाईट चालीची समजेल का?’, ‘तो आपल्याला घाणेरडा समजेल का?’ या भीतीमुळे संवाद होत नाही. जर चांगला लैंगिक अनुभव हवा असेल तर चांगला संवाद असणं अपरिहार्य आहे. या संवादाचे तीन पैलू आहेत – समजूतदारपणा, संमती व समानता.
अनेक वेळा दिसतं की पुरुष, स्त्री जोडीदाराला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. आपलीच गरज भागली पाहिजे या एकाच विचाराने ते ग्रासलेले असतात. थोडक्यात म्हणजे ते, स्वतःचा हस्तमैथुन करण्यासाठी जोडीदाराचा वापर करतात. या अशा वातावरणात संभोग किती रंगत आणणार? पुरुष व स्त्रिया या दोघांनाही भरपूर लैंगिक इच्छा व लैंगिक सुख उपभोगायची आवड निसर्गाने दिलेली आहे. पण सामाजिक प्रभाव व नियंत्रणामुळे स्त्रियांना आपली लैंगिक इच्छा प्रकट करण्यावर अंकुश असतो. त्यामुळे त्यांच्यात लैंगिक खुलेपणा येण्यास वेळ लागू शकतो. म्हणून पुरुषांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे.
दुसरा घटक आहे तो म्हणजे संमतीचा. एखाद्या लैंगिक अनुभवासाठी जोडीदार संमत आहे का नाही, हे विचारणं जोडीदाराचं कर्तव्य आहे (जोडीदार जर प्रौढ नसेल तर त्याच्याबरोबर संभोग करणं गुन्हा आहे. त्याची/तिची जरी संमती असली तरी त्याच्या/तिच्या संमतीला संमती मानता येत नाही). अनेक वेळा नवरा, बायकोची संमती आहे हे गृहीत धरतो. जोडीदाराला एखादी कृती आवडते की नाही? का नाही आवडत? याच्यावर कोणत्या प्रकार काढता येईल, कोणत्या कौन्सिलरची मदत घेता येईल? याच्यावर काही संवादच होत नाही.
संवादाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे दोघांमधील समानतेचा. अनेक पुरुष स्वीकृत जोडीदाराला (मग ते स्वीकृत जोडीदार स्त्री असो किंवा पुरुष असो) कमी लेखतात. याचाच एक दुसरा पैलू म्हणजे संभोगात ‘वूमन ऑन टॉप पोझिशन’ बद्दलची पुरुषांची दृष्टी. अनेक पुरुषांना ही पोझिशन कमीपणाची वाटते. स्त्री आपल्या वरती आहे ही गोष्ट आपल्या पुरुषार्थाला शोभणारी नाही, अशी दृष्टी असते. जर आपण व आपला/आपली जोडीदार समान आहोत हे जाणलं तर अशी नकारात्मक भावना मनात येणार नाही. दोघंजण जरी वेगवेगळ्या भूमिका घेत असले तरी दोघंही समान आहेत ही वैचारिक प्रगल्भता नसेल तर साहजिकच ते लैंगिक नातं कधीही परिपूर्ण बनत नाही.
निवांत वेळ
दोघांना संभोगाचा पूर्ण आनंद मिळण्यासाठी निवांत वेळेची गरज असते. ‘फोरप्ले’ करायला वेळ मिळाला नाही किंवा घाईगडबडीत उरकावं लागलं, तर दोघंही असमाधानी राहतात. अनेकांच्या घरी एकांत मिळण्याची संधी खूप कमी असते व त्यामुळे तेवढा निवांत वेळ जोडप्याला मिळायला पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही.
कल्पकता
कालांतरानं त्याच जोडीदाराबरोबर तोच तोच संभोग कांटाळवाणा होतो. प्रेम असलं तरी ‘पॅशन’ गेलेली असते. म्हणून ‘पॅशन’ प्रयत्नपूर्वक आणायचा प्रयत्न करावा लागतो. संभोगात कल्पकता आणली नाही तर तो रटाळ बनतो, यांत्रिक बनतो. तसं होऊ नये म्हणून काहीजण संभोगाचे प्रकार बदलतात. तर काहीजण संभोगाच्या पोझिशन्स बदलतात, काहीजण संभोगाची जागा बदलतात (बेडरूम, हॉल. किचन, लॉज, इत्यादी), काहीजण संभोग करण्याची वेळ बदलतात (रात्र, सकाळ, दुपार). अनेकजण अश्लील वाङ्मयाचा आधार घेतात. काहीजण लैंगिक उपकरणांचा वापर करतात. काहीजण कपडे, केशभूषा बदलतात. वजन वाढलं असेल तर आकर्षक बनण्यासाठी व्यायाम व संतुलित आहाराची मदत घेतात. काहीजण अधूनमधून दोन-चार दिवस मुलांना न घेता सुट्टीवर जाऊन नात्यातील ‘पॅशन’ परत आणण्याचा प्रयत्न करतात.
संदर्भ: बिंदुमाधव खिरे लिखीत “मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख” या पुस्तकातून साभार. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.
No Responses